Saturday, November 5, 2016

विधान परिषद निवडणुकीत मतदारांनी
निर्भय, मुक्तपणे मतदान करावे - डॉ. पाटील
उमेदवारी यादी निश्चित , 19 नोव्हेंबरला मतदान
नांदेड, दि. 5 :- महाराष्ट्र विधान परिषदेच्या नांदेड स्थानीक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारांनी आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे, तर निवडणुकीत गुप्त आणि अत्यंत पारदर्शी प्रक्रियेद्वारे मतदान होणार असल्याने मतदारांनी निर्भय आणि मुक्त वातावरणात मतदान करावे, असे आवाहन निवडणूक निरीक्षक डॅा. जगदीश पाटील यांनी आज येथे केले. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आज अंतिम मुदतीनंतर उमेदवारी यादी निश्चित झाली. त्यानंतर उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधी समवेत झालेल्या बैठकीत डॅा. पाटील बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात ही बैठक झाली.
बैठकीस निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सुरेश काकाणी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अंकुश पिनाटे, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जिल्हा अधीक्षक गणेश पाटील तसेच उमेदवार अमरनाथ राजूरकर, श्यामसुंदर शिंदे तसेच पक्ष प्रतिनिधींचीही उपस्थिती होती.
बैठकीत जिल्हाधिकारी श्री. काकाणी निवडणुकीबाबत तपशीलवार माहिती दिली.  निवडणुकीसाठी शनिवारी 19 नोव्हेंबर 2016 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 4 यावेळेत मतदान होईल. जाहीर प्रचाराचा कालावधी गुरुवार 17 नोव्हेंबर 2016 रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत राहील. निवडणुकीसाठी शुक्रवार 19 नोव्हेंबर 2016 रोजी मतदान साहित्य रवाना करण्यात येईल. मतदानासाठी पात्र मतदारांना निवडणूक आयोगाने विहीत केलेल्या 14 पैकी कोणताही एक छायाचित्र असलेल्या पुरावा सोबत ठेवावा लागेल. मतदान केंद्रात मतदारांना मोबाईल तसेच अन्य कोणतेही इलेक्ट्रॅानिक उपकरण ज्याद्वारे छायाचित्र, चित्रीकरण करता येईल, असे नेता येणार नाही. मतदानासाठी पंसती क्रमाची मतदान पद्धती असल्याने, मतदारांना उमेदवाराच्या छायाचित्रासह असलेल्या मतपत्रिकेवर पसंती क्रमांक नोंदवावा लागणार आहे. त्यासाठी निवडणूक यंत्रणेकडूनच जांभळ्या शाईचा पेन पुरविण्यात येणार आहे. मतपत्रिका आणि मतदान याबाबतची सर्व प्रक्रिया गुप्त मतदान प्रक्रियेनुसार काटेकोरपणे अंमलात आणली जाणार आहे. त्यामुळे मतदारांना निर्भय आणि मुक्त वातावरणात मतदान करता येणार आहे.
निवडणुकीची मतमोजणी मंगळवार 22 नोव्हेंबर, 2016 रोजी सकाळी 8 वाजता सुरु होईल. मतदान आणि मतमोजणीसाठी विहीत पद्धतीने उमेदवारांना आपले प्रतिनिधी नियुक्त करता येणार आहेत. मतदानासाठी मतदान केंद्र म्हणून आठही उपविभागीय कार्यालयस्तरावर तहसील कार्यालयांची निश्चिती करण्यात आली आहे. निवडणुकीसाठी 472 मतदार पात्र आहेत. त्यामध्ये 227 मतदार पुरूष तर 245 मतदार स्त्रिया आहेत. या मतदारांची 18 भाग असलेली यादी छायाचित्रांसहीत यापुर्वीच जाहीर करण्यात आली आहे.
बैठकीत आचारसंहिता तसेच विविध प्रकारच्या परवानग्या, स्थळांचा वापर याबाबतही माहिती देण्यात आली. तसेच आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन व्हावे याबाबत निर्देश देण्यात आले.

0000000

No comments:

Post a Comment