Tuesday, September 27, 2016

नांदेड, परभणी जिल्ह्यातील अतिवृष्टी
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पीक विमा भरपाईचे अर्ज
तहसीलदार, कृषी अधिकाऱ्यांकडे स्विकारून भरपाई द्यावी
                                                       - पालकमंत्री दिवाकर रावते

मुंबई, दि. 27 : नांदेड आणि परभणी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे सोयाबिन आणि उडीद पीकांच्या झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी पीक वीमा योजनेंतर्गत तहसीलदार किंवा कृषी अधिकाऱ्याकडे अर्ज जमा करण्यात यावेत. याबाबत राज्यभरासाठी शासन आदेश निर्गमीत होत असून जिल्ह्यातील आपद्‌ग्रस्त शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम उपलब्ध करुन द्यावी, असे निर्देश पालकमंत्री दिवाकर रावते यांनी आज दोन्ही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे चर्चा करुन दिले. पालकमंत्री श्री. रावते यांनी कृषी विभागाचे प्रधान सचिव श्री. विजयकुमार यांच्याशीही आज चर्चा करुन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक वीमा अंतर्गत भरपाई मिळण्यासाठी कार्यवाही करावी, अशा सूचना दिल्या.
     
आमदार सुभाष साबणे व तुषार राठोड यांनी आज मंत्रालयात श्री. रावते यांची भेट घेऊन जिल्ह्यातील आपद्ग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळण्याबाबत विनंती केली.
नांदेड आणि परभणी जिल्ह्यात अतिवृष्टी झाली असून त्यामुळे सोयाबीन, उडीद इत्यादी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत नुकसान भरपाईसाठी काही शेतकरी बँकांकडे गेले असता बँकांनी अर्ज स्विकारण्यास असमर्थता दर्शविली, असे आमदार श्री. साबणे व श्री. राठोड यांनी पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणले. पीक विमा योजनेंतर्गत भरपाईसाठी बॅकांकडे 48 तासाच्या आत दावे दाखल करावे लागतात. तथापी, या दोन जिल्ह्यात बँकांनी अर्ज स्विकारण्यास असमर्थता दर्शविली आहे, असे आमदारांनी सांगितले. त्याची तातडीने दखल घेत पालकमंत्री श्री. रावते यांनी कृषी विभागाचे सचिव श्री. विजयकुमार यांच्याशी चर्चा केली. याशिवाय दोन्ही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरुन चर्चा केली. झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. संपूर्ण जिल्ह्यात नुकसान झालेल्या पीकांचे पंचनामे करुन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने पीक वीम्याअंतर्गत भरपाई उपलब्ध करुन देण्यात यावी. तहसीलदार, कृषी अधिकारी यांना अर्ज स्विकारण्याबाबत सूचना देवून आपद्‌ग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळेल, यादृष्टीने कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश त्यांनी दिले.

०००००००

No comments:

Post a Comment

विशेष वृत्त क्र. 137   ‘ हिंद-दी-चादर’ गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या बलिदानातून मानवी मूल्यांच्या रक्षणाची प्रेरणा - मुख्यमंत्री देवें...