Saturday, September 3, 2016

राज्याला समृद्धीच्या दिशेने नेण्यात
सहकारी संस्थाचे योगदान मोलाचे - शिंदे
गोदावरी अर्बनच्या 12 व्या शाखेचे अर्धापुरात उद्घाटन
नांदेड, दि. 3 :- राज्याला समृद्धीच्या दिशेने नेण्यामध्ये सहकारी संस्थांचे मोलाचे योगदान असल्याने या संस्था अधिक सक्षम करण्याचे काम राज्य शासन करीत आहे, असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.    
गोदावरी अर्बन मल्टिस्टेट क्रेडिट को-ऑप. सोसायटीच्या 12 व्या अर्धापूर शाखेचे उद्घाटन श्री. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आमदार सर्वश्री डॉ. बालाजी किन्हीकर, शांतराम मोरे, अमित घोडा, प्रतापराव पाटील चिखलीकर, नागेश पाटील आष्टीकर, सोसायटीचे संस्थापक तथा आमदार हेमंत पाटील, अध्यक्षा सौ. राजश्री पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे, आदी मान्यवर उपस्थित होते.
शेतकरी व सर्वसामान्यांना आर्थिक पाठबळ देवून स्वत:च्या पायावर उभे करण्याचे काम सहकारी संस्था करीत असतात, म्हणून अशा सहकारी संस्था आर्थिक पायावर सक्षमपणे  उभे राहण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. गोदावरी अर्बन मल्टिस्टेट क्रेडिट को-ऑप. सोसायटी सर्वसामान्याच्या विश्वासास पात्र ठरल्याने तिची प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. तिचे लवकरच बँकेत रुपांतर होईल असा विश्वासही श्री. शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.
अर्धापूर भागातील कष्टकरी शेतकऱ्यांना आर्थिक ताकद मिळावी म्हणून ही सोसायटी काम करीत आहे, असे आमदार हेमंत पाटील यांनी सांगितले. तर आमदार नागेश पाटील आष्टीकर व आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचीही समयोचित भाषणे झाली.
सोसायटीच्या अध्यक्षा सौ. राजश्री पाटील यांनी सोसायटीच्या प्रगतीचा आढावा घेतांना जनतेच्या विश्वासावर या सोसायटीच्या 12 शाखा सुरु झालेल्या आहेत. चार राज्यांसाठी आर्थिक व्यवहाराची परवानगी असणाऱ्या या सोसायटीचे प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. या भागात केळी व हळदीचे महत्वाचे पीक आहे. यावर प्रक्रिया उद्योग सुरु करणाऱ्यांना अर्थसहाय्य दिले जाईल. त्यामुळे या भागात अधिक समृद्धी निर्माण होईल. नव उद्योजक निर्माण होतील, असा विश्वास व्यक्त केला.  
यावेळी एका अपघात प्रसंगी सापडलेले सोसायटीचे सुमारे 6 लाख रुपये प्रामाणिकपणे परत करणारे कैलास बारसे, व्यसनमुक्तीचे काम करणारे उत्तमराव दुधाटे, शेतीनिष्ठ शेतकरी हनुमत राजेगोरे, आदींचा श्री. शिंदे यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.  
प्रारंभी सोसायटीचे व्यवस्थापकीय संचालक धनजय तांबेकर यांनी प्रास्ताविक केले. आभार सुरेश कटकमवार यांनी मानले तर सुत्रसंचलन दिवाकर चौधरी यांनी केले. या समारंभात सोसायटीचे संचालक, अधिकारी, ठेवीदार नागरिक उपस्थित होते.

000000

No comments:

Post a Comment

विशेष वृत्त क्र. 137   ‘ हिंद-दी-चादर’ गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या बलिदानातून मानवी मूल्यांच्या रक्षणाची प्रेरणा - मुख्यमंत्री देवें...