Monday, August 22, 2016

लेख -

छतावरील पावसाच्या पाण्यातून जलसंवर्धनाचा
नांदेड पाटबंधारे कार्यालयाचा यशस्वी प्रयोग

नांदेड पाटबंधारे विभाग (दक्षिण) नांदेड हे कार्यालय अधीक्षक अभियंता नांदेड पाटबंधारे मंडळ नांदेड कार्यालयाच्या अंतर्गत नांदेड शहरात चैतन्यनगर वसाहतीमध्ये आहे. या कार्यालयाची ईमारत भव्य आहे व या इमारतीचे बांधकामाधील क्षेत्रफळ दिड हजार  चौरस मीटरहून अधिक आहे.
कार्यालयीन इमारतीच्या स्लॅबवर पडणाऱ्या पावसाचे पाणी या इमारतीच्या चारही बाजूने वाहुन जात होते. मुळातच उन्हाळ्यात शहरामध्ये पाण्याची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण झाली होती. त्याची चर्चाही होत असे. त्यातूनच कार्यकारी अभियंता एस. एस. अवस्थी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मिळून आपल्या परिसरातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी पावसाळयातील इमारतीच्या छतावरील वाहुन जाणारे पाणी जमिनीमध्ये मुरवून कार्यालयामध्ये असलेल्या विंधन विहरीचे पुनर्भरण करण्याचे निश्चित केले.
चैतन्यनगर नांदेडच्या उंच भागात कार्यकारी अभियंता श्री. अवस्थी यांनी सन 2000 मध्ये स्वत:च्या निवासस्थानी छताचे पाणी जमिनीत मुरवून विंधन विहीरीचे पुनर्भरण केले आहे. त्यामुळे या विहीरीला अखंड पाणी उपलब्ध होत असल्याने त्याच धर्तीवर विभागाच्या इमारतीत ही संकल्पना राबविण्यात आली. हे काम कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून वैयाक्तिक वर्गणीव्दारे करण्याचे ठरविले व यासाठी निधी संकलित करुन हे काम पुर्ण करण्याचे निश्चित केले.
रेन रुफ वॉटर हार्वेस्टिंगचे संक्षिप्त विवरण : कार्यालयीन इमारतीच्या छताचे क्षेत्रफळ 1533.40 चौ.मी. आहे. त्यातील आतल्याबाजूस पडणारे पावसाचे पाणी रुफ रेन वॉटर  हार्वेस्टिंगसाठी विचारात घेण्यात आले. त्याचे क्षेत्रफळ 920. चौ.मी. आहे. नांदेडचे सरासरी वार्षिक पर्जन्यमान 955 मी.मी. आहे. त्यापैकी 75 टक्के पर्जन्यमान विचारात घेता, या छतावर साधरणत: एकूण पावसाळयात 7 लक्ष लीटर पाणी उपलब्ध होते व हे पाणी रेन रुफ वॉटर हार्वेस्टिंग केली नसती तर वाहुन गेल्यामुळे पाणी जमिनीमध्ये मुरले नसते.
इमारतीच्या मध्यभागी एकूण मोकळी जागा 209.25 चौ.मी. आहे व या मोकळया जागेच्या मध्यभागी एक हौद या पूर्वीच बांधलेला होता. सदर हौदाची लांबी 1.53 व रुंदी 1.53 मी. एवढी आहे व या हौदास जमिनीमध्ये 3 मीटर खोदण्यात आले.जमिनीखालील भागहा खडकाळ आहे. दगड हा सछिद्र खडकाळ संवर्गातील दिसून आला. त्यामुळे पाणी जमिनीमध्ये मुरण्यास व झिरपण्यास अनुकुल परिस्थिती आहे. तसेच या खोदलेल्या हौदामध्ये जाड वाळुचा  एक थर व कोळशाचा थर व त्यावर पुन्हा जाड वाळुचा एक थर अशी रचना केली. हौदामध्ये अंदाजे 7 ते 8  हजार लीटर पाणी सामवण्यासाठी मोकळी जागा आहे. त्यामुळे छतावरील पाणी 4 ईंची पाईपद्वारे चार लाईन मार्फत एकत्रित आणलेले आहे. ते सर्व पाणी हौदामध्ये एकत्रित सोडण्यात आलेले आहे. उपरोक्त रुफ रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या 920 चौ.मी. क्षेत्रफळाचे पाणी हौदात आणण्यासाठी 4 इंची पी.व्ही.सी.पाईपची 220 फुट पाईप लाईन करण्यात आली. हौद फिल्टर करण्यासाठी व पाईप लाईनसाठी आणि इतर कामासाठी मिळून 16 हजार रुपये खर्च आला. अशाप्रकारे  पाणी जमिनीमध्ये मुरविण्यासाठी योजना केल्यामुळे यापूर्वी छतावरुन वाहुन येणारे पाणी इमारतीच्या मध्यभागी जमा होऊन सुव्यवस्थितपणे जमिनीमध्ये मुरविले जात आहे.
अशा प्रकारे रेन रुफ वॉटर हार्वेस्टिंग केल्यामुळे संपूर्ण पावसाळयानंतर जमिनीमध्ये छतावरील एकूण सात लाख लिटर पाणी जमिनीमध्ये मुरविले जाणार आहे. त्यामुळे विंधन विहीरींचे चांगल्या प्रकारे पुनर्भरण होणार आहे. अधिकारी व कर्मचारी यांच्या एकत्रित योगदानाचे सुफळ या पावसाळयानंतर लागलीच दिसणार आहे. सर्वांनी एक राष्ट्रीय कार्य पार पाडल्याचा एक वेगळाच आंनद असल्याचे, कार्यकारी अभियंता सु. सं. अवस्थी यांनी प्रतिक्रीयाही नोंदविली आहे.

रेन रुफ वॉटर  हार्वेस्टिंगची छायाचित्रे खालीलप्रमाणे -
1)     फोटो क्रं.1 :- कार्यालयीन इमारतींचे नाव दर्शविणारा फोटो.
2)     फोटो क्रं.2 :- इमारतीचे छत दर्शविणारा फोटो.
3)     फोटो क्रं.3-6:- इमारतीच्या छतावरील पाणी वेगवेगळया चार इंची पीव्हीसी  पाईपव्दारे हौदाकडे
                     आणलेल्या पाईप लाईनचे फोटो -4.
4)   फोटो क्रं.7 :- हौद खोलीकरणाचा फोटो.
5)    फोटो क्रं.8:- हौदामध्ये जाड वाळू व कोळसा व त्यावर पुन्हा जाड वाळू चा थर दिल्यावरचा फोटो.
6)     फोटो क्रं.9:- हौदामध्ये कचरा पडू नये म्हणुन त्यावर लावण्यात आलेल्या आच्छदनाचा फोटो.
7)    फोटो क्रं.10 :- हौदा लगत असलेल्या विंधन विहीरीचा फोटो.







-         संकलन जिल्हा माहिती कार्यालय नांदेड 

No comments:

Post a Comment

वृत्‍त क्र. 350

  लोकसभा सार्वत्रिक निवडणूक मतदानासाठी 26 एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी   नांदेड (जिमाका)   16  :-   भारत निवडणूक आयोगाने 16 मार्च 2024 रोजी ...