Sunday, September 30, 2018


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे
नांदेड विमानतळावर स्वागत

नांदेड, दि. 30 :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे येथी श्री गुरुगोबिंदसिंजी विमानतळावर आगमन झाले.
जिल्हा प्रशासनाच्यावतीने मुख्यमंत्री फडणवीस यांचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. आमदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार हेमंत पाटील, आमदार राम पाटील रातोळीकर, हिंगोलीचे आमदार तानाजी मुटकूळे यांनीही मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्वागत केले.
याप्रसंगी मनपा आयुक्त लहूराज माळी, पोलीस अधीक्षक संजय जाधव, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, अपर पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे, उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी यांच्यासह अनेक मान्यवर तसेच अधिकारी उपस्थित होते. येथून मुख्यमंत्री यांचे हेलिकॉप्टरने किल्लारी जि. लातूरकडे प्रयाण झाले.






Saturday, September 29, 2018


महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांचा दौरा
नांदेड, दि. 29 :-  राज्याचे महसूल मंत्री संजय राठोड हे रविवार, दि. 30 सप्टेंबर 2018 रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.  
रविवार, दि. 30 सप्टेंबर, 2018 रोजी सांयकाळी 7.00 वाजता शासकीय विश्रामगृह , नांदेड येथे आगमन व राखीव.
सोमवार, दि. 1 ऑक्टोबर, 2018 रोजी सकाळी 10.00 वा. वाहनाने नांदेड विमानतळाकडे प्रयाण.              10.15 वाजता नांदेड विमानतळ येथे आगमन व राखीव . 10.55 वाजता विमानाने मुंबईकडे प्रयाण.
****  


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा
नांदेड, दि. 29 :-  राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रविवार, दि. 30 सप्टेंबर 2018 रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.  
रविवार, दि. 30 सप्टेंबर, 2018 रोजी शिर्डी येथून निघून विमानाने दुपारी 1.05 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन. हेलिकॉप्टरने किल्लारी ता. औसा जि. लातूरकडे प्रयाण करतील.  सांयकाळी 4.50 वाजता नांदेड विमानतळ येथे आगमन व 4.55 वाजता विमानाने दिल्लीकडे प्रयाण. करतील.
000000


Friday, September 28, 2018


जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू
नांदेड, दि. 28 :- जिल्ह्यात शुक्रवार 12 ऑक्टोंबर 2018 रोजी मध्यरात्रीपर्यत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात शनिवार 29 सप्टेंबर ते शुक्रवार 12 ऑक्टोंबर 2018 रोजी मध्यरात्रीपर्यत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.
अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.
000000


माहिती अधिकार दिनानिमित्त व्याख्यान संपन्न
कायदाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी
आरटीआय ऑनलाईन प्रणालीचा वापर
नांदेड दि. 28 :- "माहिती अधिकार दिन" हा 28 सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा करण्यात येतो. "माहिती तंत्रज्ञानाचा- माहिती अधिकार कायदा अंमलबजावणीत होणारा प्रभाव" या विषयावरील व्याख्यानात सहा. जिल्हा सुचना विज्ञान अधिकारी अशोक जाजू यांनी मार्गदर्शन केले. जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांचे मार्गदर्शनाखाली या व्याख्यानाचे आयोजन उपजिल्हाधिकारी  (सामान्य) अनुराधा ढालकरी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे केले होते.   
माहितीचा अधिकार अधिनियम 2005 हा कायदा देशभरात 12 ऑक्टोंबर 2005 पासून लागू करण्यात आला आहे. शासनाने वेळोवळी जाणीवपूर्वक उचलेल्या पावलांमुळे अल्पावधीतच राज्यात हा कायदा लक्षणीय स्वरुपात लोकाभिमूख झाला आहे. राज्यात माहितीचा अधिकार अधिनियम 2005 या कायदाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शासन स्तरावरुन सर्व त्या उपाययोजना करण्यात येत आहेत.
श्री. जाजू यांनी या कायदाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आरटीआय ऑनलाईन प्रणालीचा वापर प्रशासनाच्या कारभारात कसा करावा याची माहिती दिली. आरटीआय ऑनलाईन प्रणाली जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिका, पोलीस अधीक्षक व जिल्हा परिषद नांदेड या कार्यालयात कार्यान्वीत करण्यात आली आहे. ही सुविधा         https://rtionline.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्यानुसार नागरिकांनी ऑनलाईन प्रणालीद्वारे माहिती अधिकार अर्ज व अपील दाखल करुन शकतात. तसेच नांदेड जिल्हा संकेतस्थळ www.nanded.gov.in वर माहिती अधिकार अधिनियम 2005 कलम 4 अन्वये प्रत्येक कार्यालयनिहाय, सर्व कार्यासन प्रमुख, जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड, जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांची 1 ते 17 मुद्यांची माहिती प्रसिद्ध केली आहे. ही माहिती नागरिकांना सहज उपलब्ध होऊ शकते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांनी केले. यावेळी माहितीचा अधिकार अधिनियमाबाबत अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या शंकाचे निरसन करण्यात आले. शेवटी हिमायतनगरचे तहसिलदार डॉ. अशिष बिरादार यांनी आभार मानले.  कार्यक्रमास प्रथम अपिलीय अधिकारी, जन माहिती अधिकारी, सहाय्यक जन माहिती अधिकारी व आरटीआय ऑनलाईन संकेतस्थळाचे कामकाज हातळणारे अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती.  
00000


29 सप्टेंबर शौर्य दिनानिमित्त
आजी-माजी सैनिकांचा बचत भवन येथे सत्कार
नांदेड, दि. 28 : - भारतीय सैनिकांचा सन्मान आणि सत्कार या भावनेतून शौर्य दिनाच्या निमित्ताने नांदेड जिल्ह्यातील आजी-माजी सैनिकांचा सत्कार जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे शनिवार 29 सप्टेंबर 2018 रोजी सकाळी 11.30 वा. करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला एनसीसीचे कंमाडींग अधिकारी कर्नल विकासराय शांडील्स, मेजर बिक्रमसिंग थापा, ईसीएचएस अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य, शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना आमंत्रित करण्यात आले आहे. यातून आपल्याला सैनिकांप्रती असलेली भावना अधिक वृध्दीगंत होण्यास मदत होणार आहे.
29 सप्टेंबर 2016 रोजी भारतीय सैन्य दलाने पाकिस्तान हद्दीत घुसून सर्जिकल स्ट्राईकदवारे अतिरेक्यांचा खात्मा केला. त्यामुळे 29 सप्टेंबर हा दिवस भारतवासियांसाठी अभिमानाचा दिवस आहे. भारतीय सैन्याची ही अभिमानास्पद कामगिरी राज्यातील जनतेपर्यंत जावी तसेच माजी सैनिकांचा सन्मान व्हावा यासाठी राज्य शासनामार्फत 29 सप्टेंबर हा दिवस शौर्य दिन म्हणून साजरा करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
देशाचे स्वातंत्र्य, सार्वभौमत्व अबाधित ठेवण्यासाठी, परकीय शक्तीपासून देशवासियांचे रक्षण करण्यासाठी, आपत्ती काळात देशबांधवांच्या मदतीसाठी सज्ज असणारे, कोणत्याही अडचणीत आपली कर्तव्ये चोखपणे बजावणारे भारतीय सैनिक हे आपल्या सर्वांसाठी आदर आणि अभिमान आहेत. भारतीय सैनिकांचे काम हे निश्चितच गौरवाचे, कर्तृत्वाचे आणि अभिमानाचे असून यांचे फार मोठे ऋण आपल्यावर आहेत.
शौर्य दिनाच्या निमित्ताने सैनिकांप्रती आपल्याला असलेली आदराची भावना अधिक वृध्दीगंत व्हावी यासाठी नांदेड जिल्हयातील सर्व विरपत्नी, विरमाता, विरपिता, शौर्यपदकधारक आजी / माजी सैनिक, माजी सैनिक विधवा यांना शौर्यदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास जिल्हा प्रशासनातर्फे निमंत्रित करण्यात आले आहे, असे नांदेड जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे. 
0000

Thursday, September 27, 2018

डिजीटल इंडिया भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण व चर्चासत्र संपन्न
ऑनलाईन फेरफारमुळे शेतकऱ्यांचा वेळ, श्रम कमी होणार 
                            - जिल्हाधिकारी अरुण डोंगरे
नांदेड दि. 27 :- डिजीटल इंडिया भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम हा राज्य शासनाचा महत्वकांक्षी प्रकल्प असून याद्वारे शेतकऱ्यांना अचूक, संगणीकृत व डिजीटल स्वाक्षरीयुक्त गा. न. नं. 7/12 व 8-अ उपलब्ध होणार आहे. फेरफार ऑनलाईन पद्धतीने होत असल्याने शेतकऱ्यांचा वेळ व श्रम कमी होणार आहेत, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले.
नांदेड, लातूर, परभणी व हिंगोली जिल्ह्यासाठी डिजीटल इंडिया भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम विभागीय स्तरावरील प्रशिक्षणवर्ग व चर्चासत्र आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयातील डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकरी श्री. डोंगरे बोलत होते.   
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, डिजीटल इंडिया भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमाचे राज्य समन्वयक रामदास जगताप, गणेश देसाई, कृष्णा पाष्टे, नांदेड, लातूर, परभणी, निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हा सुचना विज्ञान अधिकारी नांदेड, सहजिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, सर्व तालुक्याचे तहसिलदार, नायब तहसिलदार तथा डीबीए, मंडळ अधिकारी, मास्टर ट्रेनर्स यांची यावेळी उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी श्री. डोंगरे म्हणाले, या प्रकल्पात जिल्ह्याची कामगिरी चांगली असून किनवट तालुक्यातील खंबाळा वगळता जिल्ह्यातील सर्व गावांचे शंभर टक्के काम पूर्ण करण्यात आले आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी विशेष करुन तलाठी व मंडळ अधिकारी यांनी परिश्रम घेतले आहे. या सर्वांचे त्यांनी अभिनंदन केले.  प्रकल्प यशस्वी व 7/12 दुरुस्ती, प्रत्येक प्रकारचा फेरफार ऑनलाईन पद्धतीने नोंदविण्यासाठी जमाबंदी आयुक्त कार्यालयाद्वारे विविध प्रकारच्या आज्ञावली विकसीत केलेल्या आहेत. त्यात नविन सुविधा वेळोवेळी विकसीत करण्यात येतात. त्या वापरात असतांना तलाठ्यांना विविध तांत्रिक अडचणी येतात. या अडचणीवर मात करण्यासाठी व अज्ञावली वापराची कार्यपद्धतीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी जमाबंदी आयुक्त पुणे यांनी विशेष विभागीय प्रशिक्षण सत्राचे आयोजन नांदेड येथे करण्याचे निर्देश दिल्यानुसार या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात निवासी उपजिल्हाधिकारी श्री. वेणीकर म्हणाले, राज्यातील जनतेला अचूक संगणकीकृत गा. न.नं 7/12 व 8-अ ऑनलाईन उपलब्ध होणे आणि सर्व फेरफार ऑनलाईन पद्धतीने होण्याच्यादृष्टिने राज्य शासनाने डिजीटल इंडिया भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमाची अंमलबजावणी राज्यात सुरु आहे. या प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक गावात चावडी वाचन पूर्ण करण्यात आले असून खातेदारांकडून प्राप्त आक्षेप / तक्रारी नुसार प्रत्येक संगणीकृत गाव न. नं. 7/12 मुळ हस्तलिखीत गाव. नं. नं. 7/12 शी तंतोतंत जुळविण्याचे काम जिल्ह्यात 99.94 टक्के काम पूर्ण करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे नांदेड जिल्ह्यातील 16 तालुक्यांपैकी 16 तालुक्यांचे रि. एडीटचे काम किनवट तालुक्यातील खंबाळ वगळता शंभर टक्के पूर्ण करण्यात आले असून या 16 तालुक्यांचे प्रख्यापन देखील पूर्ण करण्यात आले आहे. हा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी व 7/12 दुरुस्त करण्यासाठी व प्रत्येक प्रकारचा फेरफार ऑनलाईन पद्धतीने नोंदविण्यासाठी जमाबंदी आयुक्त कार्यालयाद्वारे विविध प्रकारच्या आज्ञावली विकसीत करण्यात आलेल्या आहेत.
या संगणकीय अज्ञावली वापराची कार्यपद्धतीबाबत व प्रत्यक्ष अंमलबजावणीतील येणाऱ्या अडीअडचणी बाबतचे मार्गदर्शन सकाळच्या सत्रामध्ये करण्यात आले. मार्गदर्शनानंतर अडचणी शंकानिरसन करण्यात आले. लातूर , नांदेड, हिंगोली, परभणी येथील अधिकारी, कर्मचारी यांनी प्रशिक्षणाचा लाभ घेतला. आभार लोहा तहसीलदार विठ्ठल जवळगेकर यांनी मानले.
000000
ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य
शिबिराचे 1 ऑक्टोंबरला आयोजन
नांदेड दि. 27 :- ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन 1 ऑक्टोबर रोजी श्री गुरुगोबिंद सिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालय नांदेड येथे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच पोलीस अधीक्षक संजय जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी 9 ते दुपारी 2 यावेळेत करण्यात आले आहे. या शिबिराचा ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ बी. पी. कदम यांनी केले आहे.  
  ज्येष्ठ नागरिक समन्वय सनियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच घेण्यात आली. त्याअनुषंगाने जेष्ठ नागरिकांचे मधुमेह, उच्चरक्तदाब, हृदयरोग, पक्षाघात, कर्करोग, भौतिकोपचार, सर्व प्रकारचे रक्त तपासण्या, नेत्र तपासणी तसेच औषधोपचार व आरोग्यविषयक समुपदेशन करण्यात येणार आहे. जेष्ठ नागरिकांनी तपासणी व उपचार शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ बी. पी. कदम यांनी केले आहे.
0000000

कापूस, सोयाबीन पिकासाठी कृषि संदेश
नांदेड दि. 27 :- जिल्ह्यात कापूस व सोयाबीन पिकासाठी किड व रोग सर्वेक्षण या प्रकल्पाअंतर्गत काम सुरु आहे. शेतकऱ्यांनी पुढीलप्रमाणे किडीपासून संरक्षणासाठी कृषि संदेश देण्यात आला आहे.
कापूस पिकावरील कामगंध सापळ्यातील लुर बदलावे आणि असीफेट 50 प्लस इमिडाक्लोप्रीड 1.8 एसपी 20 मिली किंवा क्लोरॅनट्रानिलीप्रोल 9.3 प्लस 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून त्वरीत फवारावे. उशीरा पेरणी झालेल्या सोयाबीन पिकावर खोडमाशी, उंटअळी तसेच चक्रीभुंग्यासाठी थायमिथोक्झॅम 12.6 प्लस लॅमडा सॅहलोथ्रीन 9.5 झेड सी 3 मिली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे, असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी डॉ. व्ही. व्ही. भरगंडे यांनी केले आहे.
000000



भारतीय व्यवसाय परीक्षेसाठी
अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड दि. 27 :-  (शिकाऊ उमेदवारी योजना) 108 वी अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा 28 नोव्हेंबर 2018 पासून सुरु होत आहे. या परीक्षेसाठी पात्र नियमित व माजी उमेदवारांनी परीक्षा अर्ज 15 ऑक्टोंबर 2018 पर्यंत संबंधीत आस्थापनेमार्फत ऑनलाईन अर्ज भरुन निर्धारीत शुल्कासह बीटीआरआय केंद्र औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड येथे निर्धारीत वेळेत सादर करावेत. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी बीटीआरआय केंद्र औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड येथे संपर्क साधावा, असे आवाहन केंद्राचे अंशकालीन प्राचार्य जी. जी. पाटनूरकर यांनी केले आहे.
000000

Wednesday, September 26, 2018

राष्ट्रीय पोषण महिना विशेष लेख क्र. 3 :



दि. 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2018 या कालावधीत देशभर राष्ट्रीय पोषण महिनासाजरा करण्यात येत आहे. या कालावधीत कुपोषणमुक्तीसाठी मोहीम राबविण्यात येत असून पोषणाचे महत्व लोकांना पटवून देण्यात येत आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून आपल्या आहारात फळांचे महत्व सांगणारा लेख ...
आहारात फळांचे महत्व
आहारात विविध प्रकारच्या फळांच्या समावेशाला अनन्यसाधारण महत्व आहे. फळांमध्ये 90 ते 95 टक्के शुद्ध पाणी असते. त्याने रक्ताचे शुद्धीकरण होते. शरीराची अंतर्गत स्वच्छता करण्याचे महत्वपूर्ण कार्य फळातील पाणी करू शकते. फळांमध्ये मोठ्या प्रमाणात 'तंतुमय' म्हणजे चोथायुक्त पदार्थ असतात. तंतुमय पदार्थांनी आतड्यांच्या स्नायूंचे आकुंचन - प्रसरण चांगले झाल्याने मलप्रवृत्ती चांगली होऊन मलविसर्जन क्रिया सुलभ, सुकर होते. शौचास साफ होते. त्यायोगे अपचन होत नाही किंवा अपचनाने पोटात दुखणे, बद्धकोष्ठता, मलावरोध, आतड्यांना व्रण निर्माण होणे इत्यादी विकार जडत नाहीत.     
आवळा, लिंबू, संत्री, मोसंबी आणि अन्य काही फळात '' जीवनसत्व मोठ्या प्रमाणात आढळते. सर्दी कमी करण्यास '' जीवनसत्व उपयुक्त ठरते. '' जीवनसत्वामुळे 'स्कर्व्हो' सारखा रोग होत नाही.
फळात जीवनसत्वे, आम्ले आणि संप्लवनशील तेले (व्होलाटाईल ऑईल्स) असतात. संप्लवनशील तेलामुळे भूक चांगली लागण्यास मदत होते. आंबा, कलिंगड, चेरी आणि अन्य काही फळात 'बीटा कॅरॉटीन' नावाचे द्रव्य असते. आरोग्य तज्ञांच्या मतानुसार या द्रव्यामुळे कर्करोगापासून बचाव होऊ शकतो. फळात 10 ते 15 टक्के मिनरल्स म्हणजेच खजिनद्रव्ये म्हणजेच धातू, अधातू, क्षार असतात. या खजिनद्रव्यात सोडीयम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, गंधक, फॉस्फरस, लोह, तांबे या धातू मूलद्रव्याचा समावेश होतो. कॅल्शियममुळे हाडांना बळकटी येते. दातांचे आरोग्य चांगले राहते. रक्तात योग्य प्रमाणात कॅल्शियम नसल्यास माणसे चिडक्या स्वभावाची बनतात. मॅग्नेशियम मेंदूचे आरोग्य चांगले ठेवण्यास उपयुक्त ठरते. रक्तातील लोहाचे प्रमाण कमी झाल्यास व्यक्तीचा उत्साह मंदावतो. माणसास थकवा जाणवतो. रक्तातील सोडियम अन्नपचनाला मदत करते. पोटॅशियममुळे जखमांच्या वेळी रक्त थिजण्याच्या (क्लॉटिंग) क्रियेला मदत होते. थिजण्याच्या सक्षम क्रियेमुळे रक्तस्त्राव जास्त होत नाही. पोटॅशियम यकृताला उत्तेजीत करते. आयोडीनमुळे कंठस्थ ग्रंथीचे आरोग्य चांगले राहते. त्यायोगे थायरॉईड ग्रंथीच्या संबंधित विकार जडू शकत नाहीत. सर्वसमावेषक संतुलीत आहारामध्ये सर्व प्रकारच्या फळांचा, मोसमी किंवा बिगरमोसमी, त्याचबरोबर बदाम, पिस्ते, काजू, अक्रोड, चारोळी, इ. ड्रायफ्रुटसचा समावेश असणे आगत्याचे आहे.
विविध फळांमध्ये केळी, डाळिंब, अंजीर, करवंदे, जांभूळ, चिकू, सीताफळ, रामफळ, संत्री, मोसंबी, द्राक्षे, फणस, बोरे, अननस इत्यादी अनेक प्रकारची फळे समाविष्ट होतात. ज्या आहारात फळांचा समावेश अधिक त्या आहाराला संरक्षक आहार म्हणून संबोधले जाते.
महागडा आहार म्हणजे 'सत्वयुक्त' आहार किंवा सफरचंदसारख्या महागड्या फळांचे सेवन म्हणजेच अधिक सत्वयुक्त आहार हा आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या मनात खोलवर रुजलेला एक गैरसमज आहे. खरे पाहता सफरचंद, बदाम, आक्रोड हे फळांचे प्रकार सकृतदर्शनी महागडे वाटत असले तरी त्यांच्यातील पोषण मूल्यांचा विचार केला आणि त्यांच्यातील रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्याच्या शक्तीचा विचार केल्यास ती खऱ्या अर्थाने महागडी नाहीत. दुसरा मुद्दा हा की केळी, पेरू, पपई, चिकू, बोरे, संत्री, मोसंबी, सीताफळ, करवंदे, जांभळे ही उच्च दर्जाची पोषणमुल्ये असणारी, अत्यंत स्वस्त अशी फळे आहेत. नित्यनियमाने त्यांचे सेवन करण्यास काय हरकत आहे ?
            नारळ :- कफ, वात, पित्त प्रकृतीच्या व्यक्तीसाठी नारळ व नारळपाणी हे वरदानच आहे. नारळातील खोबरे आणि नारळ पाणी या दोहोत प्रथिने आहेत, कार्बोहाड्रेट्स आहेत. तेलाच्या स्वरूपात स्निग्धांश आहे, क्षार आहेत, जीवनसत्वे आहेत, अनेक प्रकारची खनिजद्रव्ये आहेत. आजारपणात डॉक्टर नारळपाणी पिण्याचा सल्ला देतात. नारळ म्हणजे सर्व प्रकारच्या पोषकद्रव्यांनी परिपूर्ण असा समतोल आहार आहे.
सफरचंद :- सफरचंद संधिवातावर उत्तम आहे. सफरचंद सेवनाने डोकेदुखी कमी होते. नैराश्य आले असल्यास तेही कमी होते. सफरचंद शरीराची ताकद व रोगप्रतीकारक शक्ती वाढविण्यास उपयुक्त ठरते. सफरचंदामुळे शौचाच्या तक्रारी कमी होतात व पचनशक्ती सुधारते.
द्राक्षे :- आयुर्वेदात द्राक्ष फळाला उच्च स्थान आहे. पिकलेली द्राक्षे चवीला मधुर असतात. ती तहान भागवू शकतात. द्राक्षांमुळे पित्तदोष कमी होतो. द्राक्षे खाल्यानी थकवा कमी होतो. एक महत्वाचा सल्ला हा की द्राक्षावर कीटकनाशकांचा प्रभाव अधिक असतो. त्यामुळे द्राक्षे ही दोन - तीन वेळा स्वच्छ धुवून खावीत हे अधिक महत्वाचे. 
केळी :- केळी सर्व ऋतूत उपलब्ध होतात. केळ्यामध्ये ७० टक्के पाणी, ०.८ टक्के खनिज द्रव्ये, ०.४ टक्के तंतुमय पदार्थ, प्रथिने आणि जीवनसत्त्वे असतात. केळात कॅल्शियम, लोह, फॉस्फरस असतात. कॅल्शियममुळे हाडे व स्नायू मजबूत होण्यास मदत होते. केळातील साखर पचनास सुलभ असल्याने थकलेल्या शरीराला चटकन शक्ती प्राप्त होऊन उत्साह वाढतो. पचनसंस्थेचे आरोग्य टिकविण्यासाठी, मलविसर्जनची क्रिया सुलभ होण्यासाठी केळी फारच मोलाची ठरतात. केळी शक्तिवर्धक असल्यामुळे बालकांना शक्ती वाढविण्यासाठी ती टॉनिकच्या स्वरूपात उपयोगी पडतात. अधिक वाढलेले पित्त केळाने कमी होते. मलावरोध, आतड्याची जळजळ, मूळव्याध, डायरीया, संधिवात इ. अनेक रोगांवर केळ्याचा आहार फायद्याचा ठरतो. केळात लोह असते.
डाळींब :- डाळिंबात ग्लुकोजसारखी चटकन पचणारी साखर असते. डाळिंब दाण्यातील रस रक्तवर्धक असून त्याचा लॅक्टींग एजंट म्हणून म्हणजेच मातेला दूध वाढविण्यासाठी उपयोग होतो. डाळींबाच्या सेवनाने हगवण आमांश, मुळव्याध, जठर विकार बरे होतात. डाळिंब सालीचा रसही औषधी गुणधर्माचा असून त्याचा जंतूनाशक म्हणून आणि त्वचारोगावर चांगला उपयोग होतो. डाळिंब जठराग्नी प्रदिप्त करते. त्यामुळे भूक चांगली लागते. डाळिंब पित्तनाशक असल्यामुळे पित्ताच्या तक्रारीवर उत्तम ठरते. डाळिंबाने वातदोषाचे शमन होते. हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते. डाळिंबाने मलप्रवृत्ती सुधारून शौचास साफ होण्यास मदत होते.
पपई :- पपई हे शरीराची ताकद वाढविणारे फळ आहे. पपई मूळव्याधीवर गुणकारी सिद्ध झाली आहे. मूत्रपिंडाचे विकार कमी करण्यासाठी पपई खाण्याचा सल्ला दिला जातो. पपईच्या रसामुळे आम्लपित्त कमी होते. जठराला आलेली सूज कमी होते. पपईच्या सेवनाने अन्नपचन सुलभ होते. पपईने मांसाहाराच्या पचनास सुलभता प्राप्त होते. पपईच्या बियांचे चूर्ण व मध यांचे मिश्रण जंतुनाशक आणि कृमिनाशक म्हणून उपयोगी पडते.
अन्य फळे:- पेरू कफवर्धक परंतु मलप्रवृत्ती साफ करण्यास उपयुक्त. अंजीर पित्तशामक असून रक्तातील हिमोग्लोबिन वाढविण्यास मदत करते. आंबा वीर्यवर्धक असून शक्ती वाढविण्यास उपयुक्त आहे. लिंबे, संत्री, मोसंबी या फळात '' जीवनसत्व मोठ्या प्रमाणात आढळते. '' जीवनसत्व अन्नपचन कार्यास प्रभावी ठरते. व्यायाम केल्यानंतर घाम येतो व शरीराचे निर्जलीकरण होते. या फळांनी म्हणजेच त्यांच्या रसांनी शरीरातील कमी झालेल्या जलाशयाची भरपाई होऊन शरीरातील 'जलसंतुलन' कायम राखले जाते. बदाम प्रथिनयुक्त असून बुद्धिवर्धक आहे. बदामामुळे अतिरिक्त कोलेस्टेरॉल कमी होऊ शकते.
जांभूळ कफ व पित्तनाशक आहे. हे फळ विशेष करून मधुमेही व्यक्तिंना अधिक पथ्यकारक आहे. कलिंगड उन्हाळ्यातील मोसमी फळ आहे. कलिंगड, टरबूज, खरबूज, काकडी ही उन्हाळ्यात उत्पादीत होणारी फळे आहेत. निसर्ग कल्पक आहे. उन्हाळ्यात उन्हामुळे आणि अधिक उष्णतेमुळे प्राणीमात्राच्या शरीरातील घामाच्या स्वरूपात मोठा जलक्षय होतो. या फळात पाण्याचे प्रमाण मोठे असल्याने शरीरातील पाण्याचे संतुलन राखण्याचे काम ही फळे करतात. या फळातील पाणी शुद्ध असून रक्त शुद्धीकरणाचे काम ती चांगल्या प्रकारे करतात. या फळातील साखर लवकर सहजरित्या पचणारी असल्यामुळे त्यांचा चांगला उपयोग होतो. कफ प्रकृतीच्या आणि ज्यांना वारंवार सर्दी, पडसे, खोकला होतो, त्यांनी शक्यतो ही फळी खाऊ नयेत.
फळे हि मानवी जीवनाला लाभलेले 'वरदान' आहे. 'फलाहार' हा उत्तम आहार आहे. निसर्ग फळांच्या माध्यमातून मानवी आरोग्याचे रक्षण करतो. फलाहाराकडे सकारात्मक दृष्टीने पाहून आपल्या आहारात योग्य ते बदल घडविण्याची जिद्द आपण सर्वानी का बरे बाळगू नये?
-प्रा. वसंतराव बंडोबा काळे
  सेवानिवृत्त उपप्राचार्य
  जयसिंगपूर, जि. कोल्हापूर
००००


जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीची
शुक्रवारी बैठक, तक्रारी देण्याचे आवाहन
नांदेड, दि. 26 :- जिल्ह्यातील  शासनाच्या  कोणत्याही  कार्यालयामध्ये  चालू  असलेल्या  किंवा आजपर्यंत  केल्या  गेलेल्या  भ्रष्टाचाराबाबत  कोणाची  काही  तक्रार  असल्यास  अथवा एखाद्या कार्यालयामध्ये होत असलेल्या भ्रष्ट काराभाराबाबतची माहिती असल्यास त्याबाबत लेखी  स्वरुपात  तक्रार शुक्रवार 28 सप्टेंबर 2018 रोजी आयोजित  जिल्हास्तरीय  भ्रष्टाचार  निर्मुलन  समितीच्या  बैठकीत  सादर  करावी, असे  आवाहन नांदेड जिल्हाधिकारी  तथा  जिल्हा  भ्रष्टाचार  निर्मुलन  समितीचे  अध्यक्ष  यांच्यावतीने  करण्यात  आले.    
येथील  जिल्हाधिकारी कार्यालयातील  जिल्हाधिकारी  यांचे निजी कक्षात शुक्रवार 28 सप्टेंबर 2018 रोजी  दुपारी 4.30 वा. समितीची बैठक आयोजित केली आहे. कोणत्याही शासकीय, निमशासकीय विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्या भ्रष्टाचाराच्याबाबतीत  निवेदन  लेखी  स्वरुपात  प्रत्यक्ष  उपस्थित  राहून  सादर  करावे  लागेल.  हे निवेदन अध्यक्ष, जिल्हास्तरीय  भ्रष्टाचार  निर्मूलन  समिती  नांदेड  या  नावाने  सबळ  पुराव्यासह  दोन  प्रतीत  सादर  करावे  लागेल.
या  बैठकीसाठी  सर्व  विभागांचे  प्रमुख  अधिकारी  उपस्थित  राहणार   असल्यामुळे  आपल्या  निवेदनाची तातडीने दखल  घेवून  शासनाच्या  नियमानुसार   भ्रष्टाचार  करणाऱ्या  अथवा भ्रष्टाचारास  वाव  देणाऱ्या  जबाबदार  अधिकारी  व कर्मचारी  यांच्याविरुध्द  कार्यवाही  करण्यात  येईल,  असे  आवाहनही  जिल्हा  भ्रष्टाचार  निर्मुलन  समितीतर्फे  करण्यात  आले आहे.
00000


डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी
विद्यार्थ्यांना 15 ऑक्टोंबर पर्यंत अर्ज करण्याची मुदत
नांदेड दि. 26 :- अनूसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा सन 2016-17 व सन 2017-18 या शैक्षणिक वर्षामध्ये ज्या पात्र विद्यार्थ्यांनी लाभ घेतला आहे. अशा विद्यार्थ्यांनी सन 2018-19 या शैक्षणिक वर्षातील लाभ घेण्यासाठी 15 ऑक्टोंबर 2018 तारखेपर्यंत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय डॉ. बाबासाहेब सामजिक न्याय भवन नांदेड येथे संपर्क साधावा.
सन 2017-18 मध्ये उत्तीर्ण झालेल्या परिक्षेचे गुणपत्रक, सन 2018-19 मध्ये शिकत असलेल्या महाविद्यालयाचे बोनाफाईड, सुधारीत आयएफएससी कोडसह बँक पासबुकची झेरॉक्स प्रत, सन 2017-18 मध्ये शिकत असलेल्या महाविद्यालयाचे किमान 75 टक्के हजेरीसह उपस्थिती प्रमाणपत्र या कागदपत्रासह संपर्क साधावा. सन 2017-18 या शैक्षणिक वर्षामध्ये स्वाधार योजनेसाठी अर्ज करुन पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांनी वरील सुचनाप्रमाणे कार्यालयास संपर्क करावा. सन 2017-18 या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांने किमान 50 टक्के गुण मिळविलेले असावेत. जे विद्यार्थी सन 2017-18 या शैक्षणिक वर्षांमध्ये कोणत्याही कोर्सच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत होते उदा. बीए / बीएससी / बीकॉम / पॉली तृतीय वर्ष, एमए / एमएससी / एमकॉम द्वितीय वर्ष, इंजिनिअंरिग, मेडिकल / लॉ शेवटचे वर्ष व इयत्ता 12 वी अशा विद्यार्थ्यांनी कार्यालयाशी संपर्क साधू नये. सन 2016-17 व सन 2017-18 या शैक्षणिक वर्षात स्वाधार योजनेंतर्गत अर्ज करुन पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांनीच या सुचना गृहित धराव्यात. 15 ऑक्टोंबर 2018 तारखेपर्यंत संपर्क न झाल्यास विद्यार्थ्यांचा लाभ देण्यासाठी विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांनी केले आहे.
0000000


उमरी येथे 30 तंबाखू विक्रेत्यांवर कार्यवाही
नांदेड दि. 26 :- राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कक्ष जिल्हा रुग्णालय नांदेड यांना प्राप्त माहितीनुसार जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. पी. कदम व नोडल अधिकारी डॉ. एच.आर. गुंटूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय तंबाखू नियंत्रण पथकाने उमरी येथे मंगळवार 25 सप्टेंबर रोजी अचानक धाडी टाकण्यात आल्या.
या परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याचे तसेच कोटपा २००३ कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले. कायद्यातील तरतुदीनुसार पथकामार्फत 30 तंबाखू विक्रेते यांच्याकडून 29 हजार 900 रुपये दंड आकारण्यात आला.
या पथकात जिल्हा सल्लागार डॉ. साईप्रसाद शिंदे, कार्यक्रम अधिकारी डॉ. अर्चना तिवारी, कार्यक्रम समन्वयक डॉ. प्रदीप बोरसे तथा सामाजिक कार्यकर्ता बालाजी गायकवाड, ग्रामीण रुग्णालय, उमरी येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. आशिष कदम, दंतशल्यचिकित्सक डॉ. पूजा काळे व स्थानिक पोलीस स्थानकातील पोलीस निरीक्षक कारेगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना. जी.एस. सरोदे आदी होते.
नांदेड जिल्ह्यात कोणत्याही ठिकाणी कोटपा 2003 कायद्याचे उल्लंघन करणारे तसेच शैक्षणिक अथवा शासकीय कार्यालयाच्या परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची विक्री होत असल्यास जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष, जिल्हा रुग्णालय, नांदेड येथे तक्रार नोंदवून नांदेड जिल्हा तंबाखू मुक्त करण्याच्या अभियानास सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी.पी. कदम यांनी केले आहे.
000000

विशेष वृत्त क्र. 137   ‘ हिंद-दी-चादर’ गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या बलिदानातून मानवी मूल्यांच्या रक्षणाची प्रेरणा - मुख्यमंत्री देवें...