Thursday, November 24, 2022

 शासन-सेवाभावी संस्था आणि व्यापक लोकसहभागातून

चला जाणुया नदीला अभियान यशस्वी राबवू

               - जिल्हाधिकारी अभिजित राऊत

 

·         अभियानाच्या व्यापकतेसाठी बैठकीत नियोजन

 

नांदेड (जिमाका) दि. 24 :- अलीकडच्या दशकांमध्ये वाढलेला पर्यावरणातील असमतोल, वाढत्या लोकसंख्येमुळे सांडपाणी व्यवस्थापनेचा निर्माण झालेला प्रश्न, नागरिकीकरण आणि आपल्या भोवताली असलेल्या पर्यावरणाप्रती वाढत चाललेली अनास्था यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम पंचक्रोषित असलेल्या लहान-मोठ्या नदीवर झाल्या शिवाय राहत नाही. लहान नदीपासून मोठ्या नदी पर्यंतची मिळत जाणारी ही श्रृंखला याला पर्यावरणातील असमतोलाचा मोठा धोका निर्माण झाला असून आपल्या नदीला यातून सावरण्यासाठी चला जाणुया नदीला हे अभियान अत्यंत महत्वाचे आहे. यासाठी समाजातील सर्व घटक, संस्था, युवक, प्रशासन असे सर्व मिळून व्यापक लोकसहभागावर नदी साक्षरतेचे अत्यंत चांगले काम करू असा विश्वास जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी व्यक्त केला.

 

महाराष्ट्र शासनाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत चला जाणुया नदीला हे अभियान व्यापक प्रमाणात हाती घेतले असून यासंदर्भात जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या अध्यक्षतेखाली आज व्यापक बैठक घेण्यात आली. या बैठकीत ते बोलत होते. यावेळी सगरोळी येथील संस्कृती संवर्धन मंडळाचे अध्यक्ष प्रमोद देशमुख, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, उपजिल्हाधिकारी संतोषी देवकुळे, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता बी. के. शेटे, सहायक वनसंरक्षक अधिकारी एस. एल. लखमावाड, लेंडी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता वि. पा. तिडके, कार्यकारी अभियंता आ. शी. चौगले, मांजरा नदी समन्वयक दिपक मोरताळे, कयाधु नदी समन्वयक दयानंद कदम, लेंडी नदी समन्वयक यादव बोरगावकर, कैलाश येसगे, आसना नदी समन्वयक प्रा. डॉ. परमेश्वर पौळ आदी मान्यवर उपस्थित होते.

 

चला जाणुया नदीला हे अभियान लोकसाक्षरतेच्या दृष्टिने अत्यंत महत्वाचे आहे. स्वाभाविकच या अभियानात लोकसहभाग आणि विविध शासकिय यंत्रणा यांनी मिळून नदीचे स्वास्थ्य समजून घेण्याला महत्त्व दिले आहे. नदीचे स्वरुप अमृत वाहिनीमध्ये कसे आणता येईल याचा अभ्यासही या निमित्ताने करता येणार आहे. सर्वांच्या सहभागातून नदी संवाद यात्राच्या माध्यमातून तयार झालेल्या आराखड्यावर अंमलबजावणी करण्याकरीता नदी, समाज आणि शासन या तत्त्वानुसार आपण या अभियानाला अधिक व्यापक करू असेही जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सांगितले. तालुका पातळीवरील समन्वयासाठी शासनाचे कृषि अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, सामाजिक वनीकरण, सिंचन हे विभाग या अभियानासाठी नेमलेल्या समितीतील सदस्यांसमवेत विचार विनिमय करून प्राथमिक टप्प्यातील अहवाल पूर्ततेच्या कामात सोबत राहतील, असे त्यांनी सांगितले.

 

सजग नागरिक म्हणून आपले भोवताल आणि नदीचे पावित्र्य राखण्याची प्रत्येकाची जबाबदारी आहे. नदीच्या साक्षरतेच्यादृष्टिने हे अभियान अत्यंत महत्वपूर्ण असून याला अधिकाधिक व्यापक करण्यासाठी सर्व स्तरावरुन प्रयत्न होण्याची गरज संस्कृती संवर्धन मंडळाचे अध्यक्ष प्रमोद देशमुख यांनी व्यक्त केली. या अभियानात शिक्षण संस्थाही तेवढ्याच हिरीरीने सहभाग होत युवकांमध्येही जाणिव जागृतीचे कार्य करतील. प्रत्येक तालुक्याला टप्याटप्याने नदी संसद सारखे उपक्रम याला दिशा देतील, असे त्यांनी सांगितले.  

 

 हे आहेत जिल्ह्यातील 5 नद्यांचे समन्वयक

या बैठकीत अभियानाच्या कार्याला दिशा मिळण्यासाठी शासन निर्णयासमवेत समन्वयकांची नावे निश्चित करण्यात आली. यात अर्धापूर, नांदेड, मुदखेड तालुक्यातून वाहणाऱ्या आसना नदीच्या समन्वयक पदी डॉ. परमेश्वर पौळ, देगलूर-मुखेड तालुक्यातून वाहणाऱ्या नदीसाठी वसंत रावणगावकर, कैलास येसगे, यादव बोरगावकर, हदगाव तालुक्यातील कयाधू नदीसाठी दयानंद कदम, लोहा-कंधार-मुखेड-नायगाव या तालुक्यांमधून वाहणाऱ्या मन्याड नदीसाठी प्रमोद देशमुख, शिवाजीराव देशपांडे, बिलोली देगलूर तालुक्यातून वाहणाऱ्या मांजरा नदीसाठी दिपक मोरताळे, प्रमोद देशमुख तर अर्धापूर, भोकर, मुदखेड तालुक्यातून वाहणाऱ्या नदीसाठी बाळासाहेब देशमुख, नंदण पाठक हे योगदान देणार आहेत.

00000







No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 412 पाणी टंचाईबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये  जिल्हा प्रशासनाचे आवाहन नांदेड (जिमाका) दि. 8 :-   सद्यस्थितीत नांदेड शहरात कु...