Saturday, March 25, 2023

यशकथा

सेंद्रीय शेती व उत्कृष्ट गांडुळ खत निर्मितीतून

दहावी शिकलेल्या शेतकऱ्यांने साधला उन्नतीचा मार्ग !

 

रासायनिक पध्दतीने शेती करुन मोठया प्रमाणात शेतमाल उत्पादन करण्यावर शेतकऱ्यांचा भर असतो. परंतु रासायनिक खताच्या अतिवापरामूळे वरचेवर जमीनीचा पोत बिघडत आहे. हे रसायने शेतीतील उत्पादनाद्वारे नागरिकांच्या आहारात येत असल्याने आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.  हे टाळण्याच्या उद्देशातून सेंद्रीय शेतीला शासनाकडून प्रोत्साहन देण्यात आले.

 

कृषी विभागाच्या सेंद्रिय शेती धोरणांतर्गत हदगाव तालुक्यातील बनचिंचोली येथील बळवंतराव देवराव पऊळ या दहावी शिकलेल्या शेतकऱ्यांने रासायनिक खताच्या अतिवापरामुळे झालेले विषारी अन्न खायचे नाही, आपल्या ग्राहकांना विषमुक्त अन्न द्यायचे असा दृढ निश्चय केला. त्यांची वडिलोपार्जित 15 एकर शेती त्यांनी या ध्येयावर केली. यात 8 एकर शेतीची भर त्यांनी घातली. आजच्या घडीला एकूण 23 एकर शेती ते सेंद्रीय पध्दतीने करतात.

 

बळवंतराव यांनी यासोबतच सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून गांडुळ खत निर्मिती व्यवसायाची जोड दिली. सुरुवातीला त्यांनी गांडूळ युनिटची उभारणी केली. 10 बेडपासून सुरु केलेला व्यवसाय 40 बेडवर पोहोचला. प्रत्येक बेडमध्ये 2 किला गांडुळे सोडली जातात. सेंद्रीय घटक लवकर कुजण्यासाठी 3 ते 4 किलो गुळ अधिक दोन लिटर दही अधिक 3 किलो हरभरा पीठ,  25 ते 30 लीटर पाणी असलेला द्रव बेडवर नियमित शिंपडला जातो. तीन महिन्याला एक बेडमधून जवळपास 1 टन गांडूळ खत तयार होतो. 40 बेडमधून वर्षाकाठी निघणाऱ्या 40 टन खतापैकी काही खताचा वापर घरच्या शेतीत ते करतात. उर्वरित खत 40 किलोची बॅग तयार करुन प्रतिबॅग 600 रुपये दराने विक्री करतात. त्यांच्या खतास मोठी मागणी असून हिंगोली, परभणी, यवतमाळ व नांदेड येथून त्यांचे गांडूळ खत व शेतीमाल विक्री करण्यासाठी शेतकरी येतात.  या गांडुळ खत विक्रीतून वर्षाकाठी ते 3 ते 4 लाख रुपये कमवत आहेत. 

 

या उद्योगाला शेणखत, मलमूत्र यांची आवश्यकता असते. या बाबी शेतकऱ्यांकडून विकत  घेवून परवडत नसल्याने त्यानी पाच लक्ष रुपयांच्या राजस्थानी गाई विकत घेवून गोशाळा सुरु केली. कृषी विभागाच्या एमआरजीएस फळबाग लागवड योजनेतून त्यांना पेरू लागवडीसाठी 70 हजार रुपये मिळाले. 278 झाडातून पहिल्या हंगामात त्यांना पेरु विक्रीद्वारे 40 हजार रुपये मिळाले. यासोबत ते सेंद्रीय उत्पादन, सेंद्रीय पध्दतीने पिकविलेले धान्य घरुन विक्री करतात असे बळवंतराव पौळ यांनी सांगितले.

 

विषमुक्त जमीन आणि विषमुक्त शेतीमाल यासाठी सेंद्रीय शेतीकडे वळले पाहिजे असा निश्चय करुन बळवंतराव पौळ सेंद्रीय शेतीसाठी इतरानांही प्रोत्साहन देत आहेत. गांडुळ खत निर्मिती प्रकल्प समजून घेण्यासाठी शेतकरी मोठया संख्येने त्यांच्या शेतात भेट देतात. येणाऱ्या शेतकऱ्यांना ते सेंद्रीय शेतीचे महत्व पटवून सेंद्रीय शेतीबाबत प्रबोधन करतात व 2 किलो गांडूळ बीज मोफत देतात. आजच्या घडीला 25 हजार शेतकरी त्यांच्याशी जोडले गेले आहेत. त्यांच्या या कार्याची कृषी विभागाने दखल घेवून त्यांना महाराष्ट्र शासनाचा सेंद्रिय शेतीतील कृषिभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. 

 

काळाची गरज ओळखून महाराष्ट्र शासनाने यावर्षीच्या अर्थसंकल्पात नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन दिले आहे. आगामी 3 वर्षात राज्यातील 25 लाख हेक्टर क्षेत्र सेंद्रिय शेतीखाली आणण्याचा निश्चय अर्थसंकल्पात व्यक्त केला आहे. सुमारे 1 हजार जैवनिविष्ठा स्त्रोत केंद्रे स्थापन करुन डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनची व्याप्ती वाढविली जाणार आहे. यासाठी तीन वर्षात 1 हजार कोटी रुपयांचा भरघोस निधी उपलब्ध केला जाणार आहे. 

 

अलका पाटील

उपसंपादक,

जिल्हा माहिती कार्यालयनांदेड

00000





No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 412 पाणी टंचाईबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये  जिल्हा प्रशासनाचे आवाहन नांदेड (जिमाका) दि. 8 :-   सद्यस्थितीत नांदेड शहरात कु...