Friday, February 14, 2020

लेंडी अंतरराज्य प्रधान प्रकल्पाचे बंद पाडलेले बांधकाम सुरु करण्याबाबत
नांदेड, दि. 14:- लेंडी नदीवर नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील गोणेगाव येथे लेंडी प्रकल्पाचे बांधकाम करण्यात येत आहे .या प्रकल्पाचा पाणी वापर 168 दलघमी असून सिंचन क्षेत्र 26924 हे. आहे. या प्रकल्पाच्या बांधकामास इ.स.1986 मध्ये सुरुवात करण्यात आलेली असून सद्यस्थितीत धरणाचे बांधकाम 80 टक्के सांडवा व विमोचकाचे 95 टक्के पुर्ण झालेले आहे. तसेच कालव्याची कामे प्रगत आहेत.
            धरणाच्या बुडीत क्षेत्रात 12 गावठाणे येत असुन त्यांचे 11 ठिकाणी पुनर्वसन प्रस्तावित आहे त्यापैकी 9 गावाच्या पुनर्वसनाची कामे हाती घेण्यात आलेली आहेत. सदरची कामे जुन, 2020 अखेर पुर्ण होतील. 2 गावठाणातील भुसंपादनाची कार्यवाही खाजगी वाटाघाटीने करण्यात येत आहेत. एका गावाचे (मुक्रमाबाद) स्वेच्छा पुनर्वसन करण्याचे प्रस्तावित आहे. धरणाच्या बांधकामासाठी आवश्यक जमिन व बुडीत क्षेत्रातील जमिनीचा मावेजा वाटप करण्यात आलेला आहे. मुक्रमाबाद येथील घरांच्या मावेजांसाठी शासनाकडून उपलब्ध झालेल्या तरतुदीतुन निधी उपलब्धतेनुसार मावेजा वाटपाची कार्यवाही सुरु करण्यात येत आहे. तसेच संपादित जमिनीच्या वाढीव मावेजा प्रकरणी मा. न्यायालयाच्या न्याय निर्णयानुसार वेळोवेळी वाढीव मावेजा वाटप करण्यात येत आहे.
घळभरणी पुर्वी करावयाची अत्यावश्यक कामे करण्यासाठी प्रकल्पग्रस्त गावातील सरपंच, धरणग्रस्त समितीचे पदाधिकारी व ग्रामस्थ यांना अनेकवेळा बैठक घेवून धरणाची घळभरणी वगळता उर्वरित कामास सुरुवात करु देण्याची विनंती वेळोवेळी करण्यात आली आहे. तसेच शासनाकडून प्रकल्प मार्गी लावण्यासाठी सर्व संबंधितांशी विचार विनिमय सुरु असून त्यांच्या कायदेशीर चौकटीतील मागण्यांची पुर्तता करण्यात येत आहे. तसेच स्वेच्छा पुनर्वसन सारख्या नाविण्यपुर्ण संकल्पना राबवून शासन स्तरावरुन विशेष मान्यता घेण्यात येत आहे.
          या प्रकल्पाच्या बांधकामासाठी महाराष्ट्र शासन व तेलंगणा शासन यांचे दरम्यान झालेल्या करारनाम्यानुसार प्रकल्पाच्या 168 दलघमी पाणी वापरापैकी महाराष्ट्र राज्याचा 62 टक्के व तेलंगाणा राज्याचा 38 टक्के पाणी वापर आहे. प्रकल्पाच्या बांधकामावर आतापर्यत मार्च, 2019 पर्यंत 504.30 कोटी येवढा खर्च झाला असून त्यापैकी भुसंपादनावर रु. 236.20 कोटी इतका खर्च झाला आहे. प्रकल्पीय राज्यनिहाय पाणी वापराच्या प्रमाणात(38 टक्के) धरण बांधकामासाठी  तेलंगणा राज्याकडून निधी प्राप्त झाला आहे. मुखेड तालुका हा कायमस्वरुपी दुष्काळी तालुका असुन दरवर्षी पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकर लावावे लागतात. प्रकल्पाचे बांधकाम पुर्ण झाल्यास कामावर आतापर्यत झालेला खर्च हा उपयोगी होवून लोकांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध होणार आहे आणि 26924 हे.जमिन ओलीताखाली येणार आहे. शासनाकडून हे काम पुर्ण करण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
त्याअनुषंगाने घळभरणीपुर्वीची कामे या वर्षी हाती घेवुन पुढील वर्षात घळभरणी करण्याचे नियोजित आहे. मुक्रमाबाद येथील घरांचा मावेजा वाटपास सुरुवात करण्यात आलेली असुन बुडित क्षेत्रातील सर्व कुटुंबाना घराचा व जमिनीचा मावेजा देण्यात आलेला आहे. सद्यस्थितीत संपादित जमिनीत पिकाचे उत्पन्न प्रकल्पग्रस्त स्वत: घेत असल्यामुळे त्यांचे सध्या कुठल्याही प्रकारचे नुकसान होत नाही, त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी प्रकल्पाचे बांधकाम सुरु करु देण्यास मनाई करणे योग्य नाही.
या कामास दि.20 फेब्रुवारी, 2020 नंतर केव्हाही सुरुवात करण्यात येईल. यावेळी कोणी व्यक्ती अथवा जमाव यांनी बांधकामात अडथळा निर्माण केल्यास कायदेशीर कार्यवाही करण्यात येइल याची नोंद घ्यावी. प्रकल्पाचे बांधकाम पुर्ण करण्यासाठी सहकार्य करावे अशी विनंती करण्यात येत आहे, लेंडी प्रकल्प विभाग, देगलुर कार्यकारी अभियंता  रा.मा.देशमुख यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.


00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   405   नांदेड जिल्ह्यात ड्रोन उडविण्यास प्रतिबंध नांदेड दि. 3     - नांदेड जिल्ह्यात   4   ते   7   मे 2024   या कालावधीत ड्रो...