Friday, October 19, 2018


कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळी
नियंत्रणासाठी उपाययोजना
नांदेड, दि. 19 :- कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळी नियंत्रणाबाबत कृषि विभागासह कापुस उद्योग क्षेत्र, संबंधीत सर्व संस्थांच्या सहभागाने यावर्षी विस्तृत मोहीम हाती घेण्यात आली आहे. सर्व संस्थांनी एकत्र काम केल्याने सद्यस्थितीत कापूस पिकावरील गुलाबी बोंड अळी नियंत्रणात आहे. हे सर्व आपल्या क्षेत्रीय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सर्व संबंधीत संस्थांच्या प्रयत्नातुन शक्य झाले आहे, असे अभिनंदनाचे पत्र पुणे कृषि आयुक्तालयाचे संचालक (विस्तार व प्रशिक्षण) विजय घावटे यांनी दिले आहे.
सुरुवातीला कापूस पिकावरील गुलाबी बोंड अळी नियंत्रणात ठेवण्यात यशस्वी झालो असलो तरी किडीच्या पुढील पिढीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने याबाबतीत बेसावध राहता यापुढील खबरदारी घेणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने सर्व यंत्रणांनी अधिक जागरुक राहुन कापूस पिकावरील गुलाबी बोंड अळी व्यवस्थपानाच्या कालबध्द कार्यक्रमांची पुढील प्रमाणे अंमलबजावणी करण्याबाबत विविध प्रसिध्दी माध्यमांद्वारे शेतकऱ्यांमध्ये तसेच जिनिंग / प्रेसिंग मिल्स, कापुस खरेदी केंद्र, गोडावुन या ठिकाणी सातत्याने जनजागृती करण्याच्या सुचना प्राप्त झाल्या आहेत.
जुन मध्ये लागवड केलेल्या कापसाच्या एक ते दोन वेचण्या झालेल्या असतील तेथे लावण्यात आलेल्या फेरोमन सापळ्यांची उंची पिकाच्या वाढीनुसार कापसांच्या झाडापेक्षा एक फुट उंच राहील या प्रमाणे वाढवावी. फेरोमन सापळयातील ल्युर त्यांच्या क्रियाशीलतेनुसार वेळेवर बदलावेत. पिकास बोंडे लागल्यावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव बोंडामध्येच जास्तीत जास्त प्रमाणात दिसुन येतो. त्यावेळी बोंडाचे वरुन निरिक्षण केल्यास प्रादुर्भाव दिसुन येत नसल्याने 15 ते 20 दिवस वयाची हिरवी बोंडे फोडुन त्यातील अळीचे निरीक्षण करावे. कापूस पिकावरील गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावानुसार गरजेनुरुप शिफारशीत किटकनाशकांचा तातडीने वापर करावा. जेणे करुन त्यामुळे पुढील प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यास मदत होईल. शेतात गळुन पडलेल्या पात्या, फुले, बोंडे गोळा करुन नष्ट करावीत. तसेच प्रादुर्भाव ग्रस्त डोमकळ्या, व्यवस्थीत उघडलेली बोंडे तोडुन नष्ट करुन शेत स्वच्छ करावे. सिंचनाची सोय नसलेल्या तसेच जिरायती भागातील कापसाच्या वेचण्या पुर्ण झालेल्या ठिकाणी पिकांमध्ये शेळ्या, मेंढ्या इतर जनावरे चरण्यासाठी सोडावे, लागलीच पऱ्हाट्यांचे श्रेडर सारख्या यंत्राद्वारे लहान लहान तुकडे करुन त्या शेतात गाढुन टाकाव्यात किंवा त्याचा वापर शेताबाहेर कंपोस्ट तयार करण्यासाठी करावा. सध्या वेचनी केलेला कापुस जिनिंग/प्रेसिंग मिल्स, कापुस खरेदी केंद्र, गोडावुन या ठिकाणी येत आहे. त्याठिकाणी प्रकाश सापळे, फेरोमन सापळे लावणे त्यात अडकलेले पतंग नियमित गोळा करुन नष्ट करणे, फेरोमन सापळ्यातील ल्युर्स वेळेच्यावेळी बदलने तसेच कापसातुन निर्माण झालेला कचरा, सरकीतील आळया कोष नष्ट करुन परिसर स्वच्छ ठेवणेबाबत या सर्व ठिकाणी कार्यवाही होत असल्याची खात्री करावी. ज्या गावात सलग दोन किंवा त्यापेक्षा जास्त, आठवड्यात गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भाव आढळून येत आहे. त्या ठिकाणी जबाबदार अधिकारी तसेच कृषि विद्यापीठ, कृषि विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञाच्या क्षेत्री भेटी आयोजित करुन प्रादुर्भावाची खात्री करावी व त्यानुसा शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. शेतकऱ्यांना तात्काळ कृषि संदेश पाठवावेत. शास्त्रज्ञाकडून प्राप्त सल्ला उपाययोजना याचा प्रचार व प्रसार करावा.
आतापर्यंत राबविण्यात आलेल्या कार्यक्रमाप्रमाणेच यापुढेही शेतकरी त्याचबरोबर सर्व संबंधीत यंत्रणांशी समन्वय साधून संयुक्तपणे मोहिम स्वरुपात उपाय योजना करण्याची दक्षता घ्यावी. जेणेकरुन गुलाबी बोंडअळीची नियंत्रण करणे शक्य होईल, असे पुणे कृषि आयुक्तालयाचे संचालक (विस्तार व प्रशिक्षण) विजय घावटे यांनी पत्रात नमूद केले, अशी माहिती  जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी दिली आहे.
000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   401 लोकसभा निवडणुकीतील सहभागी कर्मचाऱ्यांचे यावर्षी विक्रमी मतदान   10 हजारावर  कर्मचाऱ्यांनी बजावला मताधिकार   नांदेड दि. 2 ...