Thursday, December 23, 2021

 स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने

जिल्ह्याला "मोतीबिंदू मुक्त" करण्याचा निर्धार

पालकमंत्री अशोक चव्हाण यांचे ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य सुविधेबाबत विशेष लक्ष 

नांदेड (जिमाका) 23 :- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त अनेक वैशिष्ट्यपूर्ण विशेष उपक्रम नांदेड जिल्ह्याने हाती घेतले आहेत. यात ज्येष्ठ नागरिकांना मोतीबिंदू सारख्या वेळेवर उपचार कराव्या लागणाऱ्या आजाराचा समावेश करून मोठा दिलासा देण्याचे नियोजन आरोग्य विभागातर्फे केले गेले आहे. कोविड-19 या वातावरणात अनेकांनी मोतीबिंदूचे शस्त्रक्रिया पुढे ढकलून अधिकचे संकट ओढावून घेण्याला आमंत्रण दिले आहे. अशा स्थितीत जिल्ह्यातील 60 वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरीक मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेपासून वंचित राहणार नाहीत यादृष्टिने नांदेड जिल्हा मोतीबिंदू मुक्त करण्याचा‍ निर्धार पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला. 

कोविड-19 च्या कालावधीत मोतीबिंदू व इतर आजारांबाबत आरोग्य विभागात असलेल्या आवश्यक सुविधा तत्पर ठेवून केवळ कोविडच्या भितीपाई अनेकांनी मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया पुढे ढकल्या. तथापि ही शस्त्रक्रिया वेळेवर करणे आवश्यक असून जिल्ह्यातील ग्रामीण भागासह शहरी भागातील लोकांच्या आरोग्यासाठी एक अत्यंत चांगला हा उपक्रम असल्याचे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले.

 

वृद्धापकाळात मोतीबिंदू हा सर्वसामान्यपणे आढळून येणारा आजार असून सन 2010 च्या सर्वेक्षणामध्ये 50 वर्षे वयावरील वयोगटात 1.38 टक्के, 60 ते 70 वयोगटात 3.48 टक्के व पुढे 10.89 टक्के एवढे प्रमाण आहे. सन 2015 च्या सर्वेक्षणात सदर प्रमाण अनुक्रमे 1.17 टक्के, 2.59 टक्के एवढे आहे. जिल्ह्यातील हे प्रमाण कमी करण्यासाठी नागरीकांनीही तेवढ्याच उत्सफूर्तपणे यात सहभाग घ्यावा, असे आवाहनही पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले. 

मोतीबिंदू मुक्त नांदेड जिल्ह्यासाठी असे आहे नियोजन 

हे अभियान नांदेड जिल्ह्यात यशस्वीपणे राबविण्यासाठी प्रशिक्षण, सर्वेक्षण आणि शस्त्रक्रिया या तीन उपक्रमांमार्फत नियोजन केले आहे. यात या आठवड्यात जिल्ह्यातील सर्व समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेविका, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर, महापालिका क्षेत्रातील आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर यांचे विशेष प्रशिक्षण केले जात आहे. हे प्रशिक्षण 31 डिसेंबर पूर्वी पूर्ण केले जाईल. 

दिनांक 1 ते 20 जानेवारी 2022 पर्यंत समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेविका, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी व आशा वर्कर यांनी तपासलेल्या संशयीत मोतीबिंदू रुग्णांची शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, आयुर्वेदिक महाविद्यालय, जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, शासकीय नेत्र रुग्णालय येथे नेत्र व तज्ज्ञ, चिकित्सा अधिकारी यांच्याकडे पुन्हा निदान केले जाईल. 

या नंतर तज्ज्ञांमार्फत उपरोक्त ठिकाणी शस्त्रक्रिया करण्यासंदर्भात विविध तपासण्या करून शस्त्रक्रियेचे नियोजन केले जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली. जिल्हा प्रशासनाचा हा अभिनव उपक्रम असून नागरीकांनीही यात सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

00000

No comments:

Post a Comment

8 मे रोजी जप्त रेती साठ्याचा लिलाव

  8 मे रोजी जप्त रेती साठ्याचा लिलाव नांदेड दि.   7   :-   सन 2019-2020 मधील मौ. सांगवी व मेळगांव परिसरातील अवैध उत्खननातून 4647.83 ब्रास जप...