Saturday, May 16, 2020


हवामान खात्याच्या अंदाजानुसार
शेतकऱ्यांच्या खरीपाच्या आशा पल्लवीत
नांदेड, (जिमाका) दि. 16 :- यावर्षी हवामान विभागाच्या अंदाजानुसार पावसाला वेळेवर सुरूवात होणार असून सरासरी इतका पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्यामुळे  शेतकऱ्यांसाठी व कृषी विभागासाठी हे वर्षा समाधानाचे जाईल अशी आशा वाटते. कोविड-19 विषाणूच्या लॉकडाऊनच्या काळात शेती व्यवसायाला काही अंशी सूट मिळाली आहे. बळीराजा आता शेतीच्या पूर्वमशागतीसह इतर कामे पूर्ण करून पेरणीसाठी सज्ज होतो आहे.
कंधार तालुक्यात खरीप पेरणी क्षेत्र 68 हजार हेक्टर असून मुख्य पीक कापूस साधारणतः 28 हजार हेक्टरवर तर सोयाबीन साधारणत: 22 हजार हेक्टरवर पेरले जाते. त्यानंतर ज्वारी तुर मुग उडीद ही खरीप पिके प्रामुख्याने घेतली जातात. तालुक्यात यावर्षी खरीपासह रब्बी व उन्हाळी हंगामात पेरणी मोठ्या प्रमाणावर झाली असून पीक घनता जवळपास 134 टक्के झाली आहे. रब्बी हंगामात हरभरा, गहू ,रब्बी ज्वारी तर उन्हाळी हंगामात भुईमूग, ज्वारी या पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात तर तिळासह  भाजीपाला चारा पिकांची लागवड  करण्यात आली.
कृषी विभागाच्या विविध योजनांचा शुभारंभ
खरीप हंगाम 2020 मध्ये कृषी विभागामार्फत काही उपक्रम हाती घेतले असून यामध्ये सोयाबीन पेरणीसाठी घरचे बियाणे वापरणे, या सोयाबीनची उगवण क्षमता तपासणी करणे व त्यानंतर बीजप्रक्रिया करून रुंद सरी वरंबा पद्धतीने पेरणी करण्यावर  विभागाने मार्गदर्शन करून भर दिला आहे. सोयाबीन बियाणे उगवण क्षमता प्रात्यक्षिके क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना मार्फत तालुक्‍यात गावोगावी मोठ्या प्रमाणावर घेतले जात असून नुकतीच उगवण क्षमता चाचणीचे प्रात्यक्षिक आमदार शामसुंदर शिंदे यांच्या हस्ते हाळदा येथे शेतकऱ्यांच्या उपस्थितीत घेण्यात आले.
कृषी निविष्ठाची खरेदी गटामार्फत
एकत्रितरित्या थेट बांधावर उपक्रमाचा शुभारंभ
कृषी निविष्ठांच्या खरेदीसाठी कृषी निविष्ठा विक्री केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी होऊ नये व कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव पासून सुरक्षित राहण्यासाठी बाजारातील गर्दी टाळण्यासाठी कंधार तालुक्यातील आत्मा अंतर्गत नोंदणी झालेले गट व गावातील शेतकऱ्यांना अशा निविष्ठांची खरेदी एकत्रितरीत्या करण्याबाबत कृषी विभागाकडून मोठ्या प्रमाणावर जनजागृती करून थेट बांधावर कृषी निविष्ठा पुरवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून आज मौ. बिजेवाडी तालुका कंधार येथील वसंतराव नाईक शेतकरी गट यांना कृषी निविष्ठांचा थेट बांधावर पुरवठा या उपक्रमाअंतर्गत आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते आज कंधार येथे करण्यात आला. यावेळी या 4 गटातील एकूण 70 शेतकऱ्यांना 20 टन रासायनिक खते व बियाणे  21  क्वि. थेट बांधावर विक्री करण्यात आले.
याप्रसंगी उपविभागीय कृषी अधिकारी आर. टी. सुखदेव, तालुका कृषी अधिकारी रमेश देशमुख, मंडळ कृषी अधिकारी नागोराव आंबुलगेकर, विकास नरनाळीकर, पवनसिंह बैनाडे , कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक यांची उपस्थिती होती. या निविष्ठांचा थेट बांधावर पुरवठा विषाणूच्या पार्श्वभूमीवर योग्य खबरदारी घेऊन मास्क बांधून व सुरक्षित अंतर ठेवून करण्यात आला.
कृषी यांत्रिकीकरण अंतर्गत ट्रॅक्टरचलीत औजारांची पाहणी कंधार तालुक्यातील मौ. बहाद्दरपुरा येथे केली यावेळी शिवाजी गणपती पेठकर यांनी खरेदी केलेल्या रोटाव्हेटरची पाहणी केली. तालुक्यात यावर्षी ट्रॅक्टर व ट्रॅक्टरचलीत औजारे साठी 52 लाख रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर डीबीटीद्वारे जमा केले.
मनरेगा अंतर्गत फळबाग लागवडीचा शुभारंभ
महात्मा गांधी राष्ट्रीय  ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मौ. बिजेवाडी तालुका कंधार येथे कल्पवृक्ष फळबाग लागवड अंतर्गत आंबा फळपीक लागवडीचा शुभारंभ आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. चालू वर्षी या योजनेतून इच्छुक पात्र लाभार्थ्यांना फळबाग लागवड करण्यासाठी कृषी विभागाकडून विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत व मोठ्या प्रमाणावर फळ पिकाची लागवड करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. मौ. बिजेवाडी येथे गजानन संभाजी डांगे यांच्या आंबा फळ लागवडीचा खड्डे खोदण्याचा शुभारंभ आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते  करण्यात आला. तसेच सन 2018 19 मध्ये या योजनेअंतर्गत  लागवड केलेल्या संभाजी माणिकराव लुंगारे यांच्या आंबा लागवड केलेल्या फळपिकांच्या बागेला भेट देऊन पाहणी करण्यात आली.
निंबोळी अर्क घरी तयार करून  फवारणीसाठी  वापर करा
मागील काही वर्षापासून कापूस पिकावर शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढलेला होता या अळीमुळे दोन वर्षापूर्वी कापूस पिकाचे नुकसानही मोठ्या प्रमाणावर झालेले होते. शेंदरी अथवा गुलाबी बोंड आळीचे व्यवस्थापन करण्यासाठी कृषी विभागाकडून मागील काही वर्षापासून विशेष मोहीम हाती घेण्यात आली असून विविध उपाययोजनाद्वारे सेंदरी बोंडअळीचे व्यवस्थापन करण्यात येत आहे. त्याअंतर्गत कापूस फरदड मुक्ती अभियान राबविणे, पूर्वहंगामी कापूस पिकाची लागवड टाळणे, शेतातील पराठी काडी-कचरा जाळून नष्ट करणे, क्रॉप सॅपच्या माध्यमातून गावोगावी निवडलेल्या कापूस प्लॉटची दर आठवड्याला निरीक्षणे नोंदवणे, किडीची आर्थिक नुकसानीची पातळी पाहून त्वरित उपाय योजना सुचविणे, रासायनिक-जैविक कीटकनाशके, कामगंध सापळे यासह प्रत्येक फवारणी सोबत निंबोळी अर्काचा वापर या बाबी प्रभावीपणे वापरल्याने या अळीचे चांगल्या प्रकारे व्यवस्थापन होऊन किडीचा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यात यश आले आहे.
रासायनिक कीटकनाशकावरचा खर्च कमी करून लिंबोळी अर्काचा वापर केल्याने किडीचे नियंत्रण प्रभावीपणे होत असल्याचे दिसून आले पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी ही फायदेशीर दिसून आली. निंबोळी अर्काची खरेदी बाजारातून न करता शेतातील व परिसरातील लिंबोणीच्या झाडाखाली निंबोळ्या जमा करून उन्हात वाळवून सुकवून त्या लिंबोळीचा भरडा तयार करून असा पाच किलो भरडा दहा लिटर पाण्यात रात्रभर भिजवून दुसऱ्या दिवशी वस्त्रगाळ करून 100 लिटर पाण्यात मिसळून वापरला तर घरच्या घरी कमी खर्चामध्ये लिंबोळी अर्क तयार होत असल्याने अशा पद्धतीने निंबोळ्या गोळा करून घरच्याघरी निंबोळी अर्क तयार करण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून प्रवृत्त करण्यात येत आहे. 
फुळवळ येथील एमआयडीसी स्थित निमार्क निर्मिती केंद्रास भेट
कंधार तालुक्यात फुळवळ येथील एमआयडीसी येथे निंबोळी पासून निंबोळी भरडा व नीम तेल तसेच निमार्क तयार करण्यात येते व माफक दरात विक्री केली जाते. त्याचाही फायदा तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर होत आहे. या प्रकल्पाला आमदार शामसुंदर शिंदे यांनी भेट दिली व हा उपक्रम शेतकऱ्यांसाठी निश्चितच फायदेशीर ठरेल. तालुक्यातील व तालुक्याच्या आजूबाजूला असलेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांना याचा निश्‍चितपणे फायदा होईल असे मनोगत व्यक्त केले.
या केंद्रातून शेतकऱ्यांना माफक दरात तसेच दर्जेदार लिंबोळी पावडर निंबोळी अर्क मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली. गरजू शेतकऱ्यांना जमा केलेल्या लिंबोळीचा भरडा योग्य दर लावून करून देण्याबाबत सूचना केली. केंद्रचालकांनी सुद्धा यास संमती दर्शविलीव शेतकऱ्यांनी स्वत: जमा केलेल्या लिंबोळीचा भरडा शेतकऱ्यांना त्यांच्या समक्ष योग्य दरात करून देऊ असे आश्वासन दिले.
खरीप हंगामाच्या सर्व शेतकरी बंधूंना व कृषी विभागाला  आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी पंचायत समितीचे कृषी अधिकारी एस. एम. मुंढे, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक विनोद पुलकुंडवार, कृषी सहायक भुषण पेटकर, बंटी गादेकर, ज्ञानेश्वर चोंढे, उमराव आदमपुरे, प्रल्हाद डांगे, बालाजी डांगे, माधव लुंगारे सुरेश राठोड यांची उपस्थिती होती.
000000

No comments:

Post a Comment

8 मे रोजी जप्त रेती साठ्याचा लिलाव

  8 मे रोजी जप्त रेती साठ्याचा लिलाव नांदेड दि.   7   :-   सन 2019-2020 मधील मौ. सांगवी व मेळगांव परिसरातील अवैध उत्खननातून 4647.83 ब्रास जप...