Saturday, January 6, 2018

सर्वांगिण विकासासाठी प्रशासन कटिबद्ध
- जिल्हाधिकारी डोंगरे
"सिद्धी 2017 - संकल्प 2018" उपक्रमाची पत्रकार परिषदेत माहिती
नांदेड,दि. 6 :- जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी प्रशासनाच्यावतीने विविध विकास योजना राबविण्यात येत असून त्या अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले.
"सिद्धी 2017 - संकल्प-2018" या उपक्रमांतर्गत पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी श्री डोंगरे हे पत्रकारांशी संवाद साधत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, प्र. जिल्हा माहिती अधिकारी मीरा ढास व विविध वृत्तपत्रांचे संपादक, प्रतिनिधी, ईलेक्ट्रॉनिक्स मिडियाचे प्रतिनिधी, छायाचित्रकार आदि उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी श्री डोंगरे यांनी उपस्थित पत्रकारांना जिल्ह्यातील मागील वर्षभरातील विकास कामांची सादरीकरणाद्वारे माहिती दिली. यात प्रामुख्याने भटक्या विमुक्त प्रवर्गातील बेरोजगार तरुणांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. डिजीटल इंडिया या उपक्रमांतर्गत जिल्ह्यात भुमिअभिलेख आधुनिकीकरण जिल्ह्यात 1 हजार 547 गावाचे काम पूर्ण झाले असून जिल्हा राज्यात सहाव्या स्थानी  आहे. ई-डिसनिक प्रणाली 26 कार्यालयात कार्यान्वित करण्यात आली आहेत. यामध्ये 3 हजार 205 प्रकरणे हाताळण्यात आली आहेत. नांदेड जिल्ह्याची अद्ययावत माहिती असलेल्या मोबाईलॲपचा 12 हजार 900 लोकांनी वापर केला आहे. हस्सापूर नसरतपूर वाडी पश्चिम वळण रस्त्यासाठी भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. ई-पॉस या बायोमॅट्रीक पद्धतीने अन्न-धान्य वाटप करण्यासाठी 1 हजार 988 रेशन दुकानाला ई-पॉस मशिन वाटप करण्यात आले आहेत. या बायोमॅट्रीक पध्दतीने 72.6 टक्के अन्न-धान्य वाटप करण्यात आले असून एकुण लाभार्थ्यांपैकी 6 लाख 5 हजार 724 पैकी 4 लाख 36 हजार 298 लाभ मिळाला आहे. मतदार छायाचित्रासहित निवडणूक ओळखपत्राचे वाटप जानेवारी 2017 मध्ये 99.51 टक्के करण्यात आले आहे. राज्यात प्रथमच तृतीय पंथीयासाठी निवडणूक ओळखपत्र शिबीर नांदेड जिल्ह्यात आयोजित करण्यात आले होते. यामध्ये 53 तृतीय पंथांना निवडणूक ओळखपत्र वाटप करण्यात आले आहे.   
जलयुक्त शिवार अभियानातंर्गत सन 2016-2017 मध्ये 226 गावाची निवड करण्यात आलेले असून 7 हजार 89 कामे प्रस्तावित करण्यात आली होती. 226 गावापैकी 124 गावे शंभर टक्के पूर्ण झाली असून त्यांतर्गत आज अखेर 8 हजार 220 कामे पूर्ण करण्यात आली आहेत. यात  324 कामे प्रगतीपथावर आहेत. आतापर्यंत रुपये 65.53 कोटी खर्च करण्यात आले आहेत. जिल्ह्यात 32378.82 टिएसीएम पाणीसाठा निर्माण झाला आहे. त्याअंतर्गत एक संरक्षीत सिंचन दिल्यास 12107.48 हे. व दोन संरक्षीत सिंचन 6 हजार 358.77 हे. क्षेत्र निर्माण झाले आहे. या कामांमुळे पाणी पातळीत 0.30 ते 2.50 मी. ने वाढ झाली आहे.
नांदेड जिल्ह्यातील उमरी नगरपरिषदेचे स्वच्छ महाराष्ट्र अभियानातंर्गत उत्कृष्ट काम केल्यामुळे मराठवाडा विभागातून प्रथम पारितोषिक मिळाले आहे. स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षणाच्या दुसऱ्या टप्प्यात उमरी नगरपरिषदेची महाराष्ट्रातील पहिल्या 25 शहरामध्ये हाय पोटेंशीयल सिटी म्हणून निवड करण्यात आली आहे. सन 2016-17 मध्ये नगरपालिका व नगरपरिषद निवडणूक ऑनलाईन पध्दतीने पार पाडण्यात आली असून हे एक जिल्हा प्रशासनाचे मोठे यश आहे, असे सांगितले.  त्याचप्रमाणे उदय योजनेतंर्गत वंचित घटकांचा शोध घेवून त्यांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. उदय योजनेद्वारे वंचितांसाठी कार्य करण्यात येत आहे. ( लोहा व नांदेड तालुक्यामध्ये). प्रामुख्याने भटक्या विमुक्त जाती जमातींतील वैदु, नामजोगी, पारधी, कैकाडी, मसनजोगी, वडार, तांबकरी, बहुरुपी, वसुदेव, जोशी, गोंधळी, कतारी, पाथरव, लवंगी गोसावी, तृतीयपंथी, कचरा वेचणारे आदी घटक वंचित असल्याने या घटकांसाठी नियोजनबध्द कार्यक्रम आखण्यात आला आहे. अशा घटकांना शोधून त्यांना त्यांचे हक्क देण्यासाठी त्यांचे पुनर्वसन, आरोग्य, शिक्षण, निवारा, अन्न-धान्य, शिधापत्रिका व्यवसायासाठी अर्थसहाय्य या सारख्या सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबतची अंमलबजावणी करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी यावेळी दिली. नांदेड जिल्ह्याचा सर्वांगिण विकासाचा आढावा जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी यावेळी घेतला.

00000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   407 लोहा विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश  नांदेड दि. ४ मे :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 प्र...