Friday, November 24, 2017

कृषि यांत्रिकीकरण उपअभियांतर्गत
शेतकऱ्यांना अनुदानावर औजारे उपलब्ध
नांदेड दि. 24 :- खरीप रब्बी हंगाम 2017 मध्ये उन्नत शेती समृध्द शेतकरी या मोहिमेतर्गत कृषि यांत्रिकीकरण याबाबीची अंमलबजावणी करण्यात येत आहे. शिल्लक अनुदान खर्च करण्यासाठी शुक्रवार 8 डिसेंबर 2017 पर्यंत ट्रॅक्टर इतर औजरासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
यापुर्वी 16 मे 2017 पर्यंत ट्रॅक्टर, इतर औजारांसाठी अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यात एकुण 2 हजार 558 अर्ज प्राप्त झाले होते. परंतु प्रत्यक्षात 486 अर्जदार लाभार्थ्यांनी ट्रॅक्टर, इतर औजारे खरेदी केली आहेत. त्यामुळे अर्ज मागविण्यात येत आहे. पुर्वसंमती दिलेल्या शेतकऱ्यांना औजारे, ट्रॅक्टरची खरेदी खुल्या बाजारातून आपल्या पसंतीप्रमाणे करता येणार आहे. इच्छूक शेतकऱ्यांनी ठरवून दिलेल्या अर्जाच्या नमुन्यात आपला अर्ज 8 डिसेंबर 2017 पर्यंत तालुका कृषि अधिकारी कार्यालयाकडे करावयाचा आहे. या तारखेनंतर अर्ज स्विकारले जाणार नाहीत. अर्जाचा नमुना तालुका कृषि अधिकारी कार्यालयाकडे तसेच कृषि विभागाच्या वेबसाईटवर (www.krishi.maharashtra.gov.in) उपलब्ध आहे.
अर्जासोबत 7/12, 8-, अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती प्रवर्गातील असल्यास प्राधिकृत अधिकाऱ्यांनी दिलेल्या जात वैधता प्रमाणपत्राची प्रत, आधार कार्ड, फोटो असलेले ओळखपत्र, खरेदी करावयाच्या यंत्र, औजारांचे अधिकृत विक्रेत्यांचे दरपत्रक, कोटेशन जोडावे. लाभार्थ्यांनी अर्ज करतांना परिपुर्ण भरलेला अर्ज कागदपत्रासह सादर केलेल्या लाभार्थ्यांचीच ईश्वर चिठ्ठी द्वारे निवड केली जाईल. अपुर्ण अर्ज किंवा कागदपत्र नसल्यास अर्जाचा विचार केला जाणार नाही. निवड केलेल्या लाभार्थ्यांना औजारे, यंत्र खरेदीची पूर्वसंमती दिली जाईल. पूर्वसंमती मिळाल्यानंतर एक महिन्यामध्ये औजार खरेदी करणे बंधनकारक आहे, नसता पूर्वसंमती आपोआप रद्द समजली जाईल. खरेदी केलेल्या औजाराचे केंद्र किंवा राज्य शासनाच्या अधिकृत सक्षम तपासणी संस्थेने (बीआयएस किंवा अन्य सक्षम संस्था) तपासणी प्रमाणपत्र, तपासणी अहवाल सादर करणे शेतक-यांना बंधनकारक आहे. औजारांच्या गुणवत्तेची सर्वस्वी जबाबदारी लाभार्थींची राहणार आहे. अर्ज करतांना यापुर्वी लाभार्थ्यांने कोणत्याही शासकीय योजनेतून लाभ घेतलेला नसावा.
खुल्या बाजारातून औजारांची खरेदी करतांना शेतकऱ्यांना स्वत:च्या बँक खात्यातून इलेक्ट्रॉनिक पध्दतीने (आर.टी.जी.एस.), धनादेश, धनाकर्ष विक्रेत्यास रक्कम अदा करणे बंधनकारक आहे. शेतकऱ्यांना विक्रेत्याशी रोखीने व्यवहार करता येणार नाही.
प्रत्येक औजारांसाठी शेतकऱ्यांनी विहित नमुन्यात स्वतंत्र अर्ज करणे आवश्यक आहे. तथापि, ज्या औजारास जास्तीतजास्त अनुदान  देय आहे त्या एकाच यंत्र / औजारास अनुदान दिले जाईल. जे शेतकरी केवळ ट्रॅक्टर चलित यंत्र / औजारांकरीता अर्ज करतील त्यांना अर्जासोबत त्यांचेकडे ट्रॅक्टर असल्याबाबतचा पुरावा (आर.सी.बुक) जोडणे आवश्यक आहे. खरेदी केलेल्या औजारांची तपासणी झाल्यानंतर अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा केली जाईल.
औजारांचे अनुदान दर शासनाने निश्चित केले आहेत. या उपअभियातर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, पॉवर टिलर, रिपर कम बाईंडर, रिपर, नांगर, कल्टीव्हेटर, सबसॉयलर, रोटावेटर, प्लांटर (खत बि पेरणी यंत्र), पॉवर विडर, थ्रेसर, ट्रॅक्टर माऊंटेड, ऑपरेटेड स्प्रेअर, मिनी राईस मील मिनी दाल मिल आणि त्यासाठी लागणारे सर्व प्रकारचे पॉलिशर, क्लिनर कम ग्रेडर, ग्रॅडीयंट सेपरेटर, स्पेशिफिक ग्रॅव्हीटी सेपरेटर, भात लावणी यंत्र, भात मळणी यंत्र, पाचरट कुट्टीयंत्र, कडबा कुट्टीयंत्र इ. औजारे अनुदानावर घेता येतील. ट्रॅक्टरसाठी अनुसूचित जाती / जमाती, अल्प, अत्यल्प भुधारक शेतकरी, महिला शेतकरी ांना किंमतीच्या 35 टक्के किंवा 1 लाख ते 1 लाख 25 हजार इतर शेतकऱ्यांना किंमतीच्या 25 टक्के किंवा जास्तीतजास्त 75 हजार ते 1 लाख अनुदान देय आहे. कृषि औजारांसाठी अनुसूचित जाती, जमाती, अल्प, अत्यल्प, भुधारक शेतकरी महिला शेतकरी यांना किंमतीच्या 50 टक्के किंवा शासनाने ठरवून दिलेली उच्चतम अनुदान मर्यादा इतर शेतकऱ्यांना किंमतीच्या 40 टक्के किंवा शासनाने ठरवून दिलेली उच्चतम अनुदान मर्यादेप्रमाणे अनुदान देण्यात येणार आहे. औजारे / यंत्रनिहाय अनुदान मर्यादा तालुका कृषि अधिकारी / जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांच्या कार्यालयात उपलब्ध आहे.
भाडेतत्वावर कृषि यांत्रिकीकरण सेवेसाठी कृषि औजारे बँक स्थापन करण्यासाठीपण अनुदान दिले जाणार आहे. शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकऱ्यांचे स्वयंसहाय्यता गट, कृषि विज्ञान केंद्र यांना या योजनेचा लाभ घेता येईल, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.

00000

No comments:

Post a Comment