Sunday, March 24, 2024

 वृत्त क्र. 273

 

निवडणूकीसाठी प्रशासन सज्‍ज,

आचारसंहितेचे पालन करा

 

नांदेड दि. 24 :- भारत निवडणूक आयोगाने 16-नांदेड लोकसभा मतदार संघासाठी निवडणूक कार्यक्रम जाहिर केला आहे. त्‍यानुषंगाने निवडणूक आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे. या निवडणूकीसाठी संपूर्ण निवडणूक यंत्रणा सज्‍ज झालेली आहे. 23 जानेवारी 2024 रोजी प्रसिद्ध झालेल्‍या  मतदार यादीनुसार 86-नांदेड विधानसभा मतदार संघात एकुण  मतदारसंख्‍या 3 लाख 39 हजार 140एवढी असुन  पुरुष मतदार संख्‍या  1 लाख 74 हजार 852 (51.56 टक्के) व स्‍त्री मतदार संख्‍या  1 लाख 64 हजार 190 (48.47 टक्के) तर  इतर मतदार संख्‍या 98 एवढी आहे.  ज्येष्‍ठ नागरीकांची मतदार संख्‍या  4 हजार 389 एवढी आहे. तर सेनादल  मतदारांची संख्‍या 154 एवढी आहे.  दिव्‍यांग मतदार संख्‍या  1 हजार 685 ( पुरुष 966, स्‍त्री 719) एवढी आहे. नांदेड उत्‍तर विधानसभा मतदार संघात एकुण 348 मतदान केंद्रे असुन 6 सहायक  मतदान केंद्रे आहे. तर 18-19 वयोगटातील नवमतदारांची संख्‍या  4 हजार 441 एवढी आहे.

 

नांदेड उत्‍तर  विधानसभा  मतदार संघामध्‍ये एकुण 31 झोन निश्चित करण्‍यात आलेले असून त्‍यासाठी 31 क्षेत्रिय अधिकारी यांची नियुक्‍ती करण्‍यात आलेली आहे. नांदेड उत्‍तर विधानसभा मतदार संघात आदर्श आचारसंहितेची कडक अंमलबजावणी करण्‍यासाठी  4  S.S.T पथके आलेगाव चेकपोस्‍ट, लिंबगाव चेकपोष्‍ट, आसना चेकपोष्‍ट व कासारखेडा या चेकपोष्‍टवर पुरेशा मनुष्‍यबळासह तैनात करण्‍यात आलेली असुन या चेकपोस्‍टवर येणाऱ्या वाहनांची कसुन तपासणी करण्‍यात येत आहे. तसेच 4 Flying Squad देखील तैनात करण्‍यात आलेली आहेत. नांदेड उत्‍तर मतदार संघात होणाऱ्या  विविध पक्षांचे कार्यक्रम, सभा, इत्‍यादीवर देखरेख ठेवण्‍यासाठी 4 V.S.T कक्ष  स्‍थापन करण्‍यात आलेले आहेत. मतदारांमध्‍ये मोठया प्रमाणात जनजागृती करण्‍यासाठी स्‍वीप कक्षाची स्‍थापना करण्‍यात आलेली आहे. प्रत्‍येक मतदान केंद्रावर  पिण्‍याची पाणी,  दिव्‍यांगासाठी रँप,  स्‍तनदा मातांसाठी  स्‍वतंत्र व्‍यवस्‍था व प्रतिक्षालय उभारण्‍यात येणार आहे.

 

निवडणूकीसाठी  नियुक्‍त करण्‍यात आलेले S.S.T, F.S.T.VST.VVT पथके, क्षेत्रिय अधिकारी व सर्व अधिकारी, कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्‍यात आलेले आहे. नांदेड उत्‍तर विधानसभा मतदार संघासाठी मतदान अधिकारी व कर्मचारी यांचे पहिले प्रशिक्षण 30 मार्च 2024 रोजी सचखंड पब्‍लीक स्‍कुल, गुरुग्रंथ साहिब भवन नांदेड येथे  आयोजीत करण्‍यात आलेले आहे. त्‍यामध्‍ये मतदानासाठी नियुक्‍त अधिकारी व कर्मचारी यांना  प्रशिक्षण देण्‍यात  येणार आहे.

 

निवडणूक काळात 86-नांदेड उत्‍तर विधानसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहितेची कडक अंमलबजावणी करण्‍यात येत असून सर्व राजकीय पक्षांनी आदर्श आचारसंहितेची कडक अंमलबजावणी करुन मतदान प्रक्रिया शांततेत, निस्‍पृह वातावरणात पार पाडावी  तसेच  सर्व मतदारांनी  उत्स्‍फुर्तपणे  मतदान करावे, असे आवाहन  निवडणूक निर्णय अधिकारी व  सहायक निवडणूक निर्णय अधिकारी  86- नांदेड उत्‍तर विधानसभा मतदार संघ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे  केले आहे.  

00000

272

हत्तीरोग दुरीकरण मोहिमेअंतर्गत घरी येऊन गोळ्या देणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करा

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे आवाहन

नांदेड, दि. २३ : हत्तीरोग दुरीकरण सार्वत्रिक औषधौपचार मोहिम अंतर्गत २६ मार्च  ते ५ एप्रिल २०२४ या कालावधीत नागरीकांना  वयोमानानुसार डिईसी गोळ्या व अलबेडाझॉल गोळयाची एक मात्रा खाण्याचे, घरी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

नांदेड जिल्हा हा हत्तीरोग जोखीमग्रस्त जिल्हा असून या जिल्हयातील वास्तव्यास असणाऱ्या सर्व नागरीकांना या आजाराचा धोका होवू शकतो. शासनाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे सन २००४ पासून दरवर्षी हत्तीरोग एकदिवसीय सामुदायिक औषधोपचार मोहिम नांदेड जिल्हयात राबविली जाते.या वर्षी मात्र जिल्ह्यातील १० तालुक्यात (किनवट, माहूर, भोकर, हदगाव, हिमायतनगर, कंधार, नायगाव, बिलोली, देगलूर, मुखेड) ही मोहीम राबविण्यात येत आहे.

यावर्षी २६ मार्च ते ०५ एप्रिल २०२४ या कालावधीत सदर मोहिमेअंतर्गत आरोग्य खात्यातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांना लाभार्थ्यांच्या घरोघरी जावून प्रत्येक पात्र लाभार्थ्यांना वयोमानानुसार डिईसी गौळण व अलबेंडाझॉल गोळयाची एक मात्रा कर्मचाऱ्यांसमक्ष खाऊ घालण्याची कार्यवाही करावी, असे आदेशीत केलेले आहे.

     हत्तीरोग हा दिर्घ मुदतीचा व व्यक्तीची एकूणच शारिरीक व मानसिक क्षमता कमी करणारा आजार आहे. हा आजार "बुचेरेरिया बँक्रॉप्टाय" व "ब्रुगीया मलायी" या नावाच्या कृमीमुळे होतो. याचा प्रसार क्युलेक्स क्विकिफॅसिएटस् या डासाच्या मादीपासून होतो. हत्तीरोग झाल्यास रोग्यास अपंगत्व व विद्रुपता येते, हातापायावर सुज, जननेंद्रीयावर व इतर अवयवावर कायमची सुज येवून विद्रुपता येते. त्यामुळे रुग्णास सामाजिक उपेक्षेस तोंड द्यावे लागते, आर्थिक नुकसान होते. त्यामुळे रुग्ण मानसिक दबावाखाली वावरतो. तसेच जन्मभर दुःख-वेदना सहन कराव्या लागतात.

    सद्यस्थितीत नांदेड जिल्हयात दि. १६ ते ३१ ऑगस्ट २०२३ हत्तीरोग रुग्ण शोध मोहिम सर्वेक्षण  करण्यात आले.सन २०२३ च्या अहवालानुसार नांदेड जिल्ह्यात अंडवृध्दीचे रुग्ण २६५ व हत्तीपायाचे रुग्ण २२०८ असे एकूण २४७३ हत्तीरोगाचे बाहयलक्षणेयुक्त रुग्ण आहेत.

 नांदेड जिल्हा हत्तीरोगासाठी जोखीमग्रस्त असल्याने तसेच आपल्या जिल्हयात हत्तीरोग जंतुचे संक्रमण चालू असल्याने यावर एकच उपाय म्हणजे प्रत्येक नागरिकांनी ज्यांच्या शरिरात मायक्रोफायलेरीयाचे जंतु असोत किंवा नसोत, हत्तीरोगाचे लक्षणे असोत किंवा नसोत अशा सर्व पात्र लाभार्थ्यांना वयोमानानुसार डिईसी गोळ्या व अलबेंडाझॉल गोळयाची एक मात्रा वर्षातून एकदा खाणे आवश्यक आहे. फक्त दोन वर्षाखालील मुलांना, गरोदर स्त्रियांना व अति गंभीर आजारी रुग्णांना हा औषधोपचार देण्यात येत नाही. तेंव्हा डीईसी व अलबेंडाझॉल गोळ्या खाऊ घालण्यासाठी दि. २६ मार्च रोजी गावातील बुथवर नियोजन करण्यात येत आहे. लगेच दुसऱ्या दिवशी पासून आरोग्य खात्यातील आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेविका, अंगणवाडी कार्यकर्ता, आशा स्वयंसेविका व इतर स्वंयसेवक दि. २७ मार्च ते ०५ एप्रिल २०२४ दरम्यान आपल्या घरी येतील तेंव्हा दिलेल्या गोळ्या जेवन करुन आरोग्य कर्मचाऱ्या समक्ष घेवून शासनाच्या या राष्ट्रीय मोहिमेस प्रतिसाद द्यावा व हत्तीरोगापासून मुक्त रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राउत यांनी जिल्हा समन्वय समितीच्या बैठकीमध्ये केलेले आहे.
00000




Friday, March 22, 2024

 वृत्त क्र. 271 

जिल्ह्यातील कोणत्याच मतदान केंद्रावर

दिव्यांगांना त्रास होता कामा नये : जिल्हाधिकारी

 

·  दिव्यांगांसाठी मतदान केंद्रावर सुविधा पुरविणाऱ्या सनियंत्रण समितीची बैठक

 

नांदेड दि. 22 : अठराव्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दिव्यांगांना व ज्येष्ठ नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये ,यासाठी भारत निवडणूक आयोग दक्ष असून जिल्हास्तरावरही दिव्यांगांना कोणता त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज येथे दिले.

 

दिव्यांगांसाठी मतदान केंद्रावर सुविधा पुरविणाऱ्या सनियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच संपन्न झाली.या बैठकीला जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी संबोधित केले.यावेळी प्रत्यक्ष व दूरदुष्यप्रणालीद्वारे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, सहाय्यक आयुक्त नगर प्रशासन गंगाधर इरलोड,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे,निवडणूक उपजिल्हाधिकारी राजकुमार माने, उपविभागीय अधिकारी विकास माने, यांच्यासह दिव्यांगाचे प्रतिनिधी प्रशिक्षक नितीन निर्मळ, विशेष शिक्षक पाटील सर आदींची उपस्थिती होती.

 

दिव्यांगांना मतदानासाठी अडचण जाणार नाही अशा पद्धतीचे मतदान केंद्राकडे जाणारे रस्ते, प्रत्येक मतदान केंद्रावर ज्यांची मतदान आहेत अशांची यादी, त्यांना रांगेत उभे राहावे लागणार नाही यासाठी प्रतीक्षालय, सुलभ रस्ते, पाणी, शौचालय, दृष्टीहीन मतदारांसाठी ब्रेल लिपी, मुबलक प्रकाश व्यवस्था, उपलब्ध करण्याबाबत सूचित करण्यात आले.

 

लोकसभा मतदारसंघांमध्ये सर्व ठिकाणी ही व्यवस्था करण्यात यावी. सर्व ठिकाणच्या व्यवस्थेबाबतची खातरजमा संबंधित अधिकाऱ्यांनी करावी असे निर्देशही यावेळी देण्यात आले. यावेळी उपस्थित दिव्यांग प्रतिनिधींकडून या संदर्भात आणखी काय काय उपाययोजना करण्यात येऊ शकतात याबाबतची माहिती प्रशासनाने घेतली. मतदान केंद्रावर नियुक्त कर्मचाऱ्यांना बेसिक साईन लँग्वेजचे प्रशिक्षण देण्याची सूचना यावेळी करण्यात आली. तसेच दिव्यांगांना मदत करण्यासाठी स्वयंसेवकांची नेमणूक करण्याबाबतही स्पष्ट करण्यात आले. या समितीचे सदस्य सचिव समाज कल्याण अधिकारी डॉ. सत्येंद्र  आऊलवार यांनी उपस्थितांचे आभार मानले.

00000






 वृत्त क्र. 270

लोकसभा निवडणुकीसंदर्भात

जिल्हाधिकाऱ्याची शनिवारी आकाशवाणीवर मुलाखत

नांदेड, दि. 22 :- लोकसभा निवडणुकीच्या तयारी संदर्भात शनिवारी रात्री आठ वाजता आकाशवाणी नांदेड वर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची मुलाखत प्रसारित केली जात आहे.

जिल्ह्यात आगामी लोकसभा निवडणूक शांतता व सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाची प्रशासकीय पातळीवर जोरात तयारी सुरु आहे. जिल्ह्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणूक विषयक तयारीच्या त्याअनुषंगाने जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची मुलाखत आकाशवाणी नांदेड केंद्रावरुन प्रसारित होणार आहे.

त्यांची मुलाखत नांदेड येथील पत्रकार अनुराग पोवळे यांनी घेतली आहे. सदर मुलाखतीचे प्रसारण शनिवार दिनांक 23 मार्च 2024 रोजी रात्री 8.00 वाजता आकाशवाणी नांदेड केंद्र वरून प्रसारित होणार आहे.

0000

वृत्त क्र. 269

ग्रंथालय संचालनालयातर्फे ग्रंथ खरेदीची यादी जाहीर

नांदेड, दि. 22 : राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान योजनेंतर्गत ४८ व ४९ व्या ग्रंथ भेट योजनेंतर्गत ग्रंथांच्या खरेदीसाठी सन २०२१ व सन २०२२ मध्ये प्रकाशित व ग्रंथालय संचालनालयास प्राप्त ग्रंथांपैकी निवड केलेल्या मराठी ४८५, हिंदी २०४ व इंग्रजी २२१ अशा एकूण ९१० ग्रंथांची निवड करण्यात आली आहे. या ग्रंथांची यादी उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्या https://htedu.maharashtra.gov.in/maim/ या संकेतस्थळावर १८ ते ३० मार्च २०२४ या कालावधीत अवलोकनार्थ खुली ठेवण्यात आली आहे. या ग्रंथ यादीतील ग्रंथ किमान ३० टक्के सूट दराने वा त्यापेक्षा अधिक सूट दर देण्यास तयार असल्यास त्या सूट दराप्रमाणे ग्रंथांचा पुरवठा करणे आवश्यक राहील. याबाबत प्रकाशक, वितरकांनी देयकात स्पष्टपणे नमूद करावे.

या संदर्भात यादीतील कोणत्याही ग्रंथाबाबत सूचना, हरकती, आक्षेप असल्यास ३० मार्च २०२४ पर्यंत ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, नगरभवन, मुंबई- ०१ यांच्याकडे लेखी स्वरूपात कार्यालयीन वेळेत हस्त बटवड्याने, टपालाने किंवा ई- मेलवर मुदतीत पाठवावेत. त्यानंतर आलेल्या सूचना, हरकती आणि आक्षेपांचा विचार केला जाणार नाही. तसेच यादीत ग्रंथाचे नाव, लेखक, प्रकाशक, किमतीत काही बदल असल्यास निदर्शनास आणून द्यावे, असे अशोक मा. गाडेकर, प्र. ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

००००

 वृत्त क्र. 268

निवडणूक प्रचारासाठी वापरात येणाऱ्या वाहनांवर

पक्ष प्रचाराचे कापडी फलक, झेंडे लावण्यास मनाई

नांदेड, दि. 22 :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक आचारसंहिता कालावधीत प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनावर पक्ष प्रचाराचे कापडी फलक, झेंडे लावणे इ. बाबीसाठी निर्बंध घालण्यात आले आहेत, असे आदेश जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमित केले आहेत.

भारत निवडणूक आयोगाकडून लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची 16 मार्च 2024 रोजी घोषणा केली असून घोषणेच्‍या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आली आहे. नांदेड जिल्‍ह्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्‍याय वातावरणात पार पाडण्‍याच्‍या दृष्‍टीकोणातून जिल्‍हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी  फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्‍वये पक्ष प्रचाराचे कापडी फलक, झेंडे लावणे इ. बाबीसाठी निर्बंध आदेश निर्गमीत केले आहेत. हे आदेश 6 जून 2024 पर्यत लागू राहतील.

फिरत्या वाहनांवर पक्ष प्रचाराचा झेंडा हा वाहनाच्या डाव्या बाजूला विंड स्क्रिन ग्लासच्यापुढे राहणार नाही आणि तो त्या वाहनाच्या टपापासून 2 फुट उंची पेक्षा जास्त राहणार नाही. प्रचाराच्या फिरत्या वाहनांवर कापडी फलक वाहन चालकाच्या आसना मागे वाहनाच्या डाव्या व उजव्या बाजूने लावण्यात यावा, इतर कोणत्याही बाजूस तो लावता येणार नाही. फिरत्या वाहनांवर लावावयाचा पक्ष प्रचाराचा झेंडा किंवा कापडी फलक संबंधित पक्षाचे जिल्हाध्यक्ष उमेदवार व उमेदवाराचे निवडणूक प्रतिनिधी निवडणूक प्रचारासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडून अधिकृत परवानगी घेतलेल्या वाहना व्यतिरिक्त इतर कोणत्याही वाहनांवर लावता येणार नाही असेही आदेशात नमुद केले आहे.

0000

 वृत्त क्र. 267

दारु दुकाने सोमवारी बंद 

नांदेड दि. 22 :- जिल्ह्यात येत्या 25  मार्च रोजी धुलिवंदन उत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी सोमवार 25 मार्च 2024 रोजी दारु दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमीत केले आहेत.   


जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवून अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या दृष्टिने महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 चे कलम 142 (1) अन्वये जिल्हाधिकारी नांदेड यांनी सोमवार 25 मार्च रोजी धुलिवंदन निमित्त जिल्ह्यातील सर्व एफएल-2, एफएल-3, सीएल-3, टी.डी-1, सिएलएफएलटीओडी-3 व एफएल/बीआर-2 अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाचा भंग करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकाविरुद्ध नियमानुसार कठोर कार्यवाही करण्यात येईल, याची नोंद घ्यावी, असेही आदेशात नमूद केले आहे.

0000

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...