Saturday, May 24, 2025

24.5.2025

वृत्त क्रमांक 532

वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर गुलामनबी काझी यांचा दौरा

नांदेड दि. 24 मे :- महाराष्ट्र राज्याचे वक्फ मंडळाचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) समीर गुलामनबी काझी हे दि. २५ मे २०२५ रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

रविवार दुपारी 2 वा. छत्रपती संभाजीनगर येथून वाहनाने नांदेडकडे प्रयाण. सायंकाळी 7 वा. नांदेड शासकीय विश्रामगृह येथे आगमन. रात्री 8 वा.  सय्यद मुख्तार हुसैन जागिरदार यांच्या मुलाच्या रिसेप्शनसाठी प्रिन्स लॉन्स, मालटेकडी, देगलूर नाका, नांदेड येथे उपस्थिती. रात्री 9.30 वा. श्री. एस.एस.बावजीर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट . ठिकाण -अरब गल्ली, किल्ला रोड, जामा मस्जिद समोर, इतवारा, नांदेड. सोईनुसार वाहनाने बीडकडे प्रयाण करतील.

0000

24.5.2025

 वृत्त क्रमांक 531

पालकमंत्री अतुल सावे यांचा नांदेड दौरा             

नांदेड दि. 24 मे :- राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास व अपारंपारिक ऊर्जा मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे हे रविवार 25 व सोमवार 26 मे 2025 रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील. 

रविवार 25 मे 2025 रोजी सकाळी 6.30 वा. छत्रपती संभाजीनगर येथून वाहनाने देगलूर जि. नांदेडकडे प्रयाण. दुपारी 12 वा. शासकीय विश्रामगृह, नांदेड जि. नांदेड येथे आगमन व राखीव.

सोमवार 26 मे 2025 रोजी दुपारी 1 वा. शासकीय विश्रामगृह, नांदेड जि. नांदेड येथून कुसुम सभागृह , व्हीआयपी रोड, नांदेडकडे प्रयाण. दुपारी 1.15 वा. कुसुम सभागृह, व्हीआयपी रोड, नांदेड येथे आगमन व केंद्रीय गृहमंत्री मा. ना. श्री. अमितभाई शाह यांच्या उपस्थित होणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या मराठवाडा विभागीय संवाद बैठकीस उपस्थिती. सायं. 4.15 वा. केंद्रीय गृहमंत्री मा.ना. श्री.अमितभाई शाह यांच्या उपस्थित होणाऱ्या जाहीर सभेस उपस्थिती. स्थळ: नवा मोंढा, नांदेड . सोईनुसार नांदेड येथून छत्रपती संभाजीनगर कडे वाहनाने प्रयाण.

00000

24.5.2025

 वृत्त क्रमांक 530

माहूर तालुक्यातील पडसा येथे घरकुल धारकांना मोफत रेतीचे वाटप

नांदेड दि. 24 मे :- माहूर तालुक्यातील मौजे पडसा येथे शासनामार्फत घरकुल धारकांना मोफत 5 ब्रास रेती वाटपाची सुरुवात आज करण्यात आली. या कार्यक्रमास आमदार भिमराव केराम हे दूरदृश्यप्रणालीद्वारे, तर तहसिलदार किशोर यादव, नायब तहसिलदार राजकुमार राठोड, ग्राम महसूल अधिकारी गांवडे, घरकुल लाभार्थी आदीची प्रत्यक्षात उपस्थिती होती.

यावेळी आमदार भिमराव केराम यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे लाभार्थ्यांशी संवाद साधला व तहसीलदार व महसूल विभागांनी केलेल्या कामाबाबत समाधान व्यक्त केले.

00000







24.5.2025

 सस्ती अदालत उपक्रमातून  560 शेतरस्ते व पाणंद रस्ते मोकळे

समूपदेशनातून तब्बल 560 प्रकरणे सामंजस्याने निकाली

सस्ती अदालतीमध्से काही प्रकरणात प्रत्यक्ष बांधावर जाऊन स्थळ पाहणी

विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांचा विशेष पुढाकार

छत्रपती संभाजीनगर दि.24: (विमाका) मराठवाडा विभागातील आठही जिल्हयातील शेतकऱ्यांना अतिक्रमित शेतरस्ते तसेच पाणंद रस्ते मोकळे करण्यासोबतच प्रलंबित प्रकरणाचा तातडीने निपटारा व्हावा यासाठी छत्रपती संभाजीनगर विभागामधील सर्व तालुक्यात सस्ती अदालत उपक्रम सुरू आहे. विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या या उपक्रमामुळे समूपदेशनातून तब्बल 560 शेतरस्यां्रची प्रलंबित प्रकरणे सामंजस्याने निकाली काढण्यात आली आहेत. प्रशासन थेट बांधावर पोचल्याने शेतरस्ते मोकळे करून देण्यात यश आले आहे. 

राज्यातील जे शेतरस्ते, पाणंद रस्ते अस्तित्वात आहेत त्यांना क्रमांक देण्यात यावेत. शेतजमिनीमध्ये वहिवाट करण्यासाठी अस्तित्वात असलेले रस्ते काही ठिकाणी अरुंद आहेत. अशा ठिकाणी मोठी वाहने जाण्यास अडचण निर्माण होऊन तक्रारही होतात. राज्यातील सर्वच शिवपाणंद आणि शेतरस्त्यांची हद्द निश्चित करून त्यांची कामे दर्जेदाररीत्या पूर्ण करावी, शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर महसूल प्रशासनामार्फत योग्य ती कार्यवाही करावी, शेत वहिवाट रस्त्याची तक्रार सुनावणी तहसीलदार यांच्याकडे होते. अशी रस्त्यांबाबत प्रलंबित असलेली प्रकरणे एका महिन्यात निकाली काढावीत. असे स्पष्ट आदेश राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत.

महसूलमंत्री श्री बावनकुळे यांच्या सूचनेनुसार मराठवाडा विभागातील आठही जिल्हयातील गरजू नागरिक शेतकऱ्यांना अतिक्रमित शेतरस्ते व पाणंद रस्ते मोकळे करण्यासोबतच जलद न्याय मिळावा व प्रकरणाचा तातडीने निपटारा व्हावा यासाठी शासनाच्या सर्व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना प्रत्येक माहिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शुक्रवारी शक्यतो तहसिल कार्यालयात किंवा गरजेनुसार मंडळ मुख्यालयाच्या ठिकाणी " सस्ती अदालत" या नावाने हा उपक्रम सुरू आहे. 

विभागात 9 मे रोजी प्रथम सस्ती अदालत व 23 मे रोजी  दुसरी सस्ती अदालत तहसिल कार्यालयात तसेच गरजेनुसार मंडळ मुख्यालयाच्या ठिकाणी घेण्यात आली. सस्ती अदालतीमध्से काही प्रकरणात प्रत्यक्ष बांधावर जाऊन स्थळ पाहणी करण्यात आली आहे. विभागीय आयुक्त श्री. गावडे यांनीदेखील अदालतीमध्ये ऑनलाईन सहभागी होत नागरीकांशी संवाद साधला. 

छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्या संकल्पनेतून कमी खर्चात आणि कमी वेळात शेतकऱ्यांचे रस्ते मोकळे करून देण्याची सस्ती अदालत योजना परिणामकारक ठरते आहे. शेतकरी हिताच्या दृष्टिकोनातून दोनशे रुपयात शेताच्या हद्दीची मोजणी या निर्णयाला गती देण्यासाठी विभागीय आयुक्त श्री गावडे यांनी विभागातील आठही जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांची दूरदृष्यप्रणालीद्वारे विभागीय आयुक्त यांनी बैठक घेतली आहे.

सस्ती अदालती मध्ये मोठ्या प्रमाणावर प्रकरणे प्राप्त झाली असून त्यामधील बऱ्याच प्रकरणात समुपदेशन करुन प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. जी प्रकरणे बऱ्याच कालावधीपासुन प्रलंबित होती अशा प्रकरणांमध्ये देखील समुपदेशन करुन सामंजस्याने प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये आठही जिल्ह्यात आयोजित सस्ती अदालतीमध्ये एकुण 1280 प्रकरणे प्राप्त झाली असून त्यापैकी 560 प्रकरणे निकाली काढण्यात आलेली आहेत. उर्वरीत प्रकरणात देखील यापुढील सस्ती अदालतीमध्ये समुपदेशन करुन सामंजस्याने प्रकरणे निकाली काढण्यात येत असल्याचे विभागीय  प्रशासनाकडून सांगण्यात आले.

सस्ती अदालतीमध्ये तहसिलदार स्तरावर गरजू शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन जास्तीत जास्त प्रकरणे सामंजस्याने व समुपदेशन करुन सोडविण्यासाठी कार्यवाही करण्यात येत आहे. वर्षानुवर्ष प्रलंबित रस्त्यांचे प्रकरणात समुपदेशन करुन सामंजस्याने मार्ग काढुन अनेक प्रकरणे निकाली काढली जात आहेत.

तसेच सध्या पावसाळा सुरु होणार असून शेतकऱ्यांना पेरणीसाठी शेतात उपकरणे ने आण करणेसाठी रस्ता नसल्याने येणाऱ्या अडचणी देखील कमी होत आहेत. यामुळे गरजू शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त फायदा करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. तरी या अदालतीचा गरजू शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे अवाहन विभागीय आयुक्त श्री. गावडे यांनी केले आहे.

जिल्हानिहाय शेतरस्ते आकडेवारी अशी

छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राप्त 141, निकाली 44 तर शिल्लक प्रकरणे 97

जालना - प्राप्त 109, निकाली 38 तर शिल्लक प्रकरणे 71

परभणी- प्राप्त 242, निकाली 142 तर शिल्लक प्रकरणे 100

हिंगोली- प्राप्त 61, निकाली 25 तर शिल्लक प्रकरणे 36

नांदेड- प्राप्त 153, निकाली 59 तर शिल्लक प्रकरणे 94

बीड- प्राप्त 128, निकाली 53 तर शिल्लक प्रकरणे 75

लातूर- प्राप्त 278, निकाली 162 तर शिल्लक प्रकरणे 116

धाराशिव- प्राप्त 168, निकाली 37 तर शिल्लक प्रकरणे 131

एकूण- प्राप्त 1280, निकाली 560 तर शिल्लक प्रकरणे 720

0000









24.5.2025

 वृत्त क्रमांक 529

वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता 

हवामानशास्त्र केंद्राने दिल्या सूचना  

नांदेड, दि. २४ मे :- प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी 24 मे 2025 रोजी दुपारी 13 वाजता दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दि. 24 मे 2025 या एक दिवसासाठी ऑरेंज (Orange) अलर्ट व दि. 25, 26, 27, 28 मे 2025 हया चार दिवसासाठी यलो (Yellow) अलर्ट जारी केलेला आहे. 24 मे 2025 या दिवशी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह मुसळधार स्वरूपाचा पाऊस व 25,26,27,28 हे चार दिवस जिल्ह्यात तूरळक ठिकाणी ताशी 40 ते 50 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता वर्तविली आहे. या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि जनतेने खबरदारी घ्यावी. नागरिकांनी खबरदारीची उपाययोजना म्हणून पुढील प्रमाणे काळजी घ्यावी. असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 

या गोष्टी करा 

विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा. तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा.

 या गोष्टी करु नका

आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका. उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका. धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका. जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे. असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

00000

वृत्त क्र.  724 देशाचा समृध्दीसाठी विद्यार्थ्यांची बौध्दीक क्षमता वाढवावी – राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे नांदेड, दि. 14 जुलै : जगात शि...