Friday, November 21, 2025

 त्रिभाषा धोरण निश्चिती समिती बुधवारी (दि.२६) विभागात

छत्रपती संभाजीनगर, दि.२१(जिमाका)- राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार राज्यातील शाळांमध्ये त्रिभाषा धोरण निश्चित करण्याबाबत  राज्य शासनाने गठीत केलेल्या डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखालील समिती लोकांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी बुधवार दि.२६ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे येत आहे.

           

यासंदर्भात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी पूर्वतयारीचा आढावा घेतला. शिक्षण उपसंचालक कैलास दातखीळ, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जयश्री चव्हाण, शिक्षणाधिकारी (योजना) अरुण शिंदे, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. राजेंद्र कांबळे, डॉ. विशाल तायडे, विवेकानंद महाविद्यालयाचे प्रा. केशरचंद राठोड, पवनकुमार गोरे, देवगिरी महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. समिता जाधव, डॉ. एम.एफ. मेवाड, पोलीस निरीक्षक शिवाजी तावरे आदी  उपस्थित होते.

           

बैठकीत माहिती देण्यात आली की. त्रिभाषा धोरण निश्चिती समिती दि.२५ रोजी रात्री  जिल्ह्यात येणार असून बुधवार दि.२६ रोजी सकाळी ११ वाजेपासून एमआयटी महाविद्यालयाच्या आनंद सभागृहात समिती विविध घटकांना भेटणार आहे. त्यात भाषा तज्ज्ञ, साहित्यिक, शिक्षण तज्ज्ञ, बालमानस तज्ज्ञ, शिक्षण तज्ज्ञ, शिक्षण संस्था चालक, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, प्रसार माध्यम प्रतिनिधी, शिक्षक- पालक संघ आदी उपस्थित राहतील. त्यांचे म्हणणे समिती जाणून घेईल.

           

समितीचे स्वरुपः-अध्यक्ष डॉ. नरेंद्र जाधव, सदस्य- डॉ. सदानंद मोर्रे, डॉ. वामन केंद्रे, डॉ. अप्रणा मॉरिस, डॉ. सोनल कुलकर्णी, डॉ. मधुश्री सावजी, डॉ. भूषण शुक्ल, सदस्य सचिव संजय यादव राज्य प्रकल्प संचालक समग्र शिक्षा अभियान.

           

समिती येणाऱ्या सर्व घटकांतील तज्ज्ञांचे म्हणणे ऐकून घेईल. तसेच संवाद साधेल,असे यावेळी सांगण्यात आले. यावेळी विभागातील पाचही  जिल्ह्यातील लोक सहभागी होऊन आपले म्हणणे सादर करतील. बाहेरील जिल्ह्यातील लोकांना म्हणणे सादर करण्या करीता ज्यांना येथे येणे शक्य नाही त्यांच्यासाठी त्या त्या जिल्ह्यातून दूरदृष्य प्रणालीची सुविधा उपलब्ध करुन द्यावी,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले.

०००००

वृत्त क्रमांक 1230

दत्तक कायद्याच्या जनजागृती भिंतीपत्रकाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते विमोचन

नांदेड, दि. 21 नोव्हेंबर : महिला व बाल विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय दत्तक महिना-2025 अंतर्गत दत्तक कायद्याविषयीची जनजागृतीकरण्यासाठी भिंतीपत्रकाचे जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्या हस्ते नुकतेच विमोचन करण्यात आले. 

या मोहिमेच्या माध्यमातून समाजातील लोकांना कायदेशीर दत्तक प्रक्रियेची माहिती आणि विशेषत: मुलांना प्रेमळ कुटुंब मिळवून देण्यासाठी प्रोत्साहन मिळेल, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.

यावेळी महिला व बाल विकास अधिकारी गणेश वाघ व परिवीक्षा अधिकारी गजानन जिंदमवार, जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे संरक्षण अधिकारी संदीप फुले, श्रीमती नरसाबाई शिशुगृह आनंदनगर येथील अधिक्षक विरभद्र मठवाले, सामाजिक कार्यकर्ता मारोती दुबेवाड हे उपस्थित होते. 

या मोहिमेचा उद्देश दत्तक कायद्याची जनजागृती करणे, समाजात बालकांबाबत संवेदनशिलता व स्विकार्यता वाढवणे आणि प्रत्येक मुलाला प्रेमळ व स्थायी कौटुंबिक वातावरण मिळावे हा आहे. केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या अखत्यारीतील केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरणाने (सीएआरए) नोव्हेंबर-2025 हा महिना राष्ट्रीय दत्तक जागरुकता महिना म्हणून सुरु केला आहे. प्रत्येक मुल महत्वाचे हा विशेष लोगो आणि हैशटॅग मोहिमेसाठी वापरला जात आहे. 

दत्तक प्रक्रीयेसाठी प्रदिर्घ प्रतिक्षा कालावधीमुळे काही पालक बेकायदेशीर किंवा अनधिकृत मार्गाचा अवलंब करतात, जे की धोकादायक ठरु शकते. सीएआरएने स्पष्ट केले आहे की, बाल न्याय अधिनियमानुसार केवळ नोंदणीकृत संस्थांमार्फत कायदेशीर प्रक्रियाच सुरक्षित आणि वैध आहे. 

00000





  वृत्त क्रमांक 1229

प्रलंबित ई-चलन प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी लोकअदालतमध्ये उपस्थित राहण्याचे आवाहन


नांदेड, दि. 21 नोव्हेंबर : प्रादेशिक परिवहन कार्यालयातील प्रलंबित प्रतिवेदन, ई-चलन या संदर्भात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे 13 डिसेंबर 2025 रोजी लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

तरी या प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी विधी सेवा प्राधिकरणाद्वारे आयोजित केलेल्या लोक अदालतमध्ये वाहन चालक/मालक यांनी हजर राहावे. तसेच तडजोड पध्दतीने आपल्या वाहनासंबंधी प्रकरणाचा निपटारा करावा व सर्वानी उपलब्ध सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
00000

 वृत्त क्रमांक 1228

उमरी शहरात 20 तंबाखू विक्रेत्यांवर दंडात्मक कार्यवाही                                                                                        

 नांदेड, दि. 21 नोव्हेंबर : उमरी शहरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची मोठ्या प्रमाणात विक्री तसेच कोटपा २००३ कायद्याचे उल्लंघन होत असल्याबाबत मिळालेल्या माहितीनुसार जिल्हास्तरीय तंबाखू नियंत्रण पथकाने आज रोजी उमरी शहरात विविध ठिकाणी अचानक धाडी टाकून एकूण 20 तंबाखू विक्रेत्यांवर दंडात्मक कार्यवाही केली. या कार्यवाहीत 9 हजार 200 रुपये दंड आकारण्यात आला. ही कार्यवाही जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या निर्देशाखाली व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.संजय पेरके, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पांडुरंग पावडे व नोडल अधिकारी डॉ. हनमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. 

 या पथकात जिल्हा सल्लागार डॉ. शितल चातुरे, डॉ. संजीवनी जाधव, डॉ. पूजा भाकरे, मानसशास्त्रज्ञ प्रकाश आहेर, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते बालाजी गायकवाड व एमजीवीएसचे मंगेश गायकवाड तसेच उमरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयप्रकाश गुठे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक  सचिन आरमाळ, महिला पोलीस कॉन्सटेबल आम्रपाली कांबळे व जयश्री शेळके उपस्थित होते. सार्वजनिक ठिकाणी तसेच शैक्षणिक अथवा शासकीय, निमशासकीय कार्यालयाच्या परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची विक्री अथवा सेवन किंवा साठवण होत असल्यास जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष, जिल्हा रुग्णालय नांदेड येथे तक्रार नोंदवून नांदेड जिल्हा तंबाखू मुक्त करण्याच्या या अभियानास सहकार्य करावे असे, आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके यांनी केले आहे.

00000



वृत्त क्रमांक 1227

जिल्हाधिकांऱ्याच्या संकल्पनेतून मनरेगा अंतर्गत जिल्ह्यात साकारणार 1 लाख जलतारा 

जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतीमध्ये आज जलतारा कामाचा शुभारंभ                                                                                                                                                                                                                                  नांदेड, दि. 21 नोव्हेंबर : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे संकल्पनेतुन नांदेड जिल्ह्यात मनरेगा योजनेंतर्गत एक लक्ष जलतारा पूर्ण करण्याचे लक्ष निर्धारित करण्यात आले आहे. याअनुषंगाने जिल्हा प्रशासनाच्यावतीने संपूर्ण जिल्ह्यातील  16 तालुक्यात याबाबतची जनजागृती करण्या्साठी ग्रामपातळीपर्यंत सर्वांना मागील आठवडयात प्रशिक्षीत करण्यात आलेले आहे. याचाच पुढील टप्पा म्हणून आज 21 नोव्हेंबर रोजी नांदेड जिल्ह्यातील  संपूर्ण 16 तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींमध्ये एकाच दिवशी जलतारा कामाचा शुभारंभ करण्याात आला आहे. 

जिल्ह्यातील 16 तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींमध्ये  आज अधिकाऱ्यांच्या हस्ते जलतारा कामांचा शुभारंभ करण्यात आला. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या हस्ते भोकर तालुकातील ग्रामपंचायतीमध्ये तर उपवनसंरक्षक केशव वाबळे यांच्या हस्ते लोहा व कंधार तालुकातील ग्रामपंचायतीमध्ये,  विभागीय वन अधिकारी चव्हाण यांच्या हस्ते माहुर, किनवट व हिमायतनगर तालुक्यातील ग्रामपंचायत मधे तर उपजिल्हाधिकारी रोहयो संजिव मोरे यांच्या हस्ते हदगांव व अर्धापुर तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये, जिल्हा् अधिक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांच्या हस्ते देगलुर व बिलोली तालुक्यातील ग्रामपंचायतीत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नरेगा अमित राठोड यांनी भोकर व मुदखेड तालुकयातील ग्रामपंचायतीत, उपसंचालक कृषी विभाग वानखेडे यांनी नायगांव व मुखेड तालुकयातील ग्रामपंचायतीमध्ये तर जिल्हा रेशिम विकास अधिकारी नरवाडे यांनी उमरी व धर्माबाद तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये जलतारा कामाचा शुभारंभ केला. 

जलतारा हा शेतातील पाणी एकवटल्या जाते अशा उताराच्या ठिकाणी किंवा जेथे जमीन चिभडल्या जाते अशा ठिकाणी 5 फूट रुंद, 5 फूट लांब आणि 6 फूट खोल खड्डा करून त्यात मोठे व मध्यम दगड भरून जलतारा तयार केला जातो. एका जलतारामधून सुमारे 3.60 लाख लिटर पाणी जमिनीत मुरविण्याची क्षमता आहे. ज्यामुळे विहीर, बोअरवेलचा पाणीसाठा वाढण्यास मदत होते. जलतारा हा मनरेगाच्या एनआरएम कामाच्या प्रकारामध्ये येतो. त्यामुळे अशी जलताराची कामे जिल्ह्यातील ग्रामपंचायतीनी केल्यास कामाचे कुशल व अकुशलचे प्रमाण राखता येईल व मजुरांच्या हाताला काम मिळेल व नैसर्गिक संसाधन संवर्धन करण्यास मदत होईल.“Catch the Rain – Where it Falls, When it Falls”  या संकल्पनेनुसार पावसाचे वाहून जाणारे अतिरिक्त पाणी शेतातच मुरवून भूजलपातळी वाढवणे व जमीन चिभडण्याचे प्रमाण कमी करणे. या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला असुन जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा  प्रशासनाच्यावतीने करण्यातत आलेले आहे. 

00000





वृत्त क्रमांक 1277   जिल्हा माहिती कार्यालयातील रद्दी विक्रीसाठी उपलब्ध   नांदेड (जिमाका) ,  दि .   5 :-   जिल्हा माहिती कार्यालय ,   नांदे...