Wednesday, January 25, 2023

वृत्त क्रमांक 43

 ई-पीक पाहणी ॲपद्वारे पीक पेरा नोंदवण्यासाठी विशेष मोहिम

 

नांदेड (जिमाका) दि. 25  :- जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ॲपद्वारे पीक पेरा नोंदणी करावी. यासाठी 27 ते 31 जानेवारी 2023 या कालावधीत जिल्हाभरात ई-पीक पेरा नोंदणीसाठी विशेष मोहिम राबवण्यात येत आहे. ही मोहिम यशस्वी करण्यासाठी तलाठी, कृषी सहायक, पोलीस पाटील, रोजगार सेवक, स्वस्त धान्य दुकानदार, कोतवाल, शेतीमित्र, प्रगतीशील शेतकरी, आपले सरकार केंद्र चालक, संग्राम केंद्र चालक, कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी, तरुण मंडळाचे प्रतिनिधी अशा स्वयंसेवकांच्या सहकार्याने ई-पीक पेरा नोंदवण्याची मोहिम पार पाडण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोबाईल ॲपमध्ये ई-पीक पेरा अचूक नोंद करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

 

क्षेत्रीय स्तरावरून पीक पाहणी Real time crop data संकलित होण्याच्यादृष्टिने तसेच सदर डाटा / माहिती संकलन करतांना पारदर्शकता आणणे, पीक नोंदणी प्रक्रियेत शेतकऱ्यांचा सक्रिय सहभाग घेणे, पतपुरवठा सुलभ करणे, पीक विमा आणि पीक पाहणी दावे निकाली काढण्याची प्रक्रिया सुलभ करणे, किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत विक्रीसाठी संगती देण्याची सुविधा उपलब्ध करून देणे, नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई आणि योग्य प्रकारे मदत करणे शक्य व्हावे या उद्देशाने शेतकऱ्यांनी त्यांच्या स्मार्ट मोबाईलमध्ये ई-पीक पाहणी ॲप चालू करून त्यात पीक पाहणी नोंदवण्याची नवीन पद्धत शासनाने सुरू केली आहे. पात्र शेतकऱ्यांना विविध शेती विकासाच्या योजनांचा लाभ सुलभतेने मिळण्यासाठी, पीक कर्ज, पीक विमा नुकसान भरपाई, नैसर्गिक आपत्ती काळात सुयोग्य शासकीय मदत मिळण्यासाठी ई-पीक पेरा नोंद गरजेचा आहे.  

00000

वृत्त क्रमांक 42

जिल्ह्यातील प्रत्येक शाळांमधून 

3 लाख 50 हजार  विद्यार्थी बालविवाह विरोधी घेणार  शपथ  

नांदेड (जिमाका) दि. 25  :- मुलींना आपले भावाविश्व निकोप जपून सुदृढ होता यावे यासाठी #बेटी_बचाव_बेटी_पढाव ही चळवळ सुरु आहे. हा संदेश प्रत्येक गावात पोहचावा यासाठी प्रजासत्ताक दिनी जिल्ह्यातील सुमारे तीन लाख पन्नास हजार विद्यार्थी बालविवाह प्रतिबंधक प्रतिज्ञा घेणार आहेत.  

नांदेड जिल्ह्यातील सर्व प्राथमिक / माध्यमिक शाळा तसेच अंगणवाडी केंद्रामध्ये प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी 2023 रोजी बालविवाह प्रतिबंधक प्रतिज्ञेचे (आम्ही बाल विवाह करणार नाही व इतरांना करूही देणार नाही) आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात शाळेतील ध्वजारोहन संपताच ही शपथ घेतील असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी सांगितले. 

दिनांक 24 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा करण्यात येतो. याचे औचित्य साधून तसेच बेटी बचाओ-बेटी पढाओ हा कार्यक्रम अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासाठी दिनांक 18 ते 24 जानेवारी या कालावधीत जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. बेटी बचाओ-बेटी पढाओ या योजनेचा मुळ उद्देश लिंग निवडीस प्रतिबंध करणे, मुलीच्या शिक्षणाबाबत खात्री देणे व मुलीच्या जीवनमानाच्या सुरक्षेबद्दल खात्री देणे आहे. .

0000



वृत्त क्रमांक 41

 अभिजीत राऊत यांच्या हस्ते ध्वजवंदन

 

नांदेड (जिमाका) दि. 25  :- भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त गुरुवार 26 जानेवारी 2023 रोजी नांदेड वजिराबाद परिसरातील पोलीस मुख्यालय पोलीस कवायत मैदान येथे सकाळी 9.15 वा. राष्ट्रध्वज वंदन व संचलनाचा मुख्य शासकीय समारंभ होणार आहे. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते ध्वजवंदन होणार आहे.  

 

सर्व निमंत्रितांनी राष्ट्रीय पोषाखात समारंभ सुरु होण्यापूर्वी होण्यापुर्वी 20 मिनिटे अगोदर आसनस्थ व्हावे, सुरक्षिततेच्या दृष्टीने सोबत कोणतेही बँग किंवा तत्सम वस्तू आणू नये असे आवाहन करण्यात आले आहे. या मुख्य शासकीय कार्यक्रमास सर्वांना उपस्थित राहता यावे यासाठी इतर सर्व कार्यालय, संस्था, आदींनी त्यांचे ध्वजवंदनाचे समारंभ सकाळी 8.30 वाजेपूर्वी किंवा 10 वाजेनंतर आयोजित करावेत, असेही आवाहन करण्यात आले आहे.  

 

दरम्यान प्रजासत्ताक दिनाच्यानिमित्ताने विविध कार्यक्रम, समारंभ आदी ठिकाणी राष्ट्रध्वज लावण्याच्या योग्य पद्धतीबाबत शासन परिपत्रक तसेच ध्वजसंहितेतील सूचनेचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. गृह विभागाच्या राष्ट्रध्वजाच्या उचित सन्मानाबाबतच्या परिपत्रकात नमूद केलेल्या निर्देशनानुसार राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिकचा वापर होणार नाही याची दक्षता संबंधितांनी घ्यावी, असेही आवाहनही राष्ट्रध्वज वापराबाबतच्या जिल्हास्तरीय जनजागरण समितीने केले आहे.

000000

वृत्त क्रमांक 40

 किनवट येथे अकरा तंबाखू विक्रेत्यांवर कार्यवाही

 

नांदेड (जिमाका) दि. 25  :- किनवट शहरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची मोठ्या प्रमाणात विक्री तसेच कोटपा 2003 कायद्याचे उल्लंघन होत असल्याबाबत मिळालेल्या माहितीनुसार जिल्हास्तरीय तंबाखू नियंत्रण पथकाने 23 जानेवारी रोजी किनवट शहरात अचानक धाडी टाकून 11 तंबाखू विक्रेत्यांकडून 7 हजार 800 रुपये दंड आकारण्यात आला.

 

ही कार्यवाही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संतोष शिरसीकर व नोडल अधिकारी डॉ. हनमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात जिल्हा सल्लागार डॉ. साईप्रसाद शिंदे, कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. उमेश मुंडे, समुपदेशक सदाशिव सुवर्णकार, सामाजिक कार्यकर्ता बालाजी गायकवाड, प्रकाश आहेर तसेच स्थानिक पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय मामीडवार, पो.हे.कॉ. श्री वाडगुरे व ना.पो.कॉ. श्री पाटोदे आदी होते.

 

सार्वजनिक ठिकाणी तसेच शैक्षणिक अथवा शासकीय, निमशासकीय कार्यालयाच्या परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची विक्री अथवा सेवन किंवा साठवण होत असल्यास जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष, जिल्हा रुग्णालयात तक्रार नोंदवून नांदेड जिल्हा तंबाखू मुक्त करण्याच्या या अभियानास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

0000

वृत्त क्रमांक 39

 लोकशाही बळकट करण्यासाठी नवमतदारांनी नोंदणी करून मौलिक मतदान करावे                                                                                                                               -कुलगुरू डॉ. उद्धव भोसले


नांदेड (जिमाका) दि 25:- जगातील सर्वात मोठा लोकशाही देश म्हणून जग आपल्याकडे पाहते. लोकशाहीला बळकट करण्यासाठी नवमतदारांनी म्हणजेच १८ वर्षे पूर्ण केलेल्या नवमतदारांनी आपल्या मतदानाची नोंदणी करून मतदानाच्या पवित्र कर्तव्याचे पालन करावे असे आवाहन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी केले.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘राष्ट्रीय मतदार दिन २०२३’ कार्यक्रमात ते बोलत होते. विद्यापीठातील सभागृहात आयोजित या कार्यक्रमास अप्पर जिल्हाधिकारी पी. एस. बोरगावकर, उपविभागीय अधिकारी  विकास माने, उप निवडणूक अधिकारी श्रीमती संतोषी देवकुळे. तहसीलदार किरण आंबेकर, मतदार नोंदणी अधिकारी ब्रिजेश पाटील, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव यांची उपस्थिती होती.

मतदानाची टक्केवारी ही अपेक्षेपेक्षा खूप कमी प्रमाणात असते. लहान गावापेक्षा मोठ्या शहरांचीघटनारी मतदानाची टक्केवारी काळजी करण्यासारखी आहे. देशाची लोकशाही सदृढ होण्यासाठी नवमतदारांना मतदानाची नोंदणी करून नैतिकतेने मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले.

२५ जानेवारी १९५० रोजी राष्ट्रीय निवडणूक आयोगाची स्थापना झालेली आहे. या  स्थापना दिनाच्या माध्यमातून लोकशाही बद्दलची जनजागृती करून नवमतदारांना मतदान करण्यास नोंदणी करून मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करणे हा उद्देश या कार्यक्रमाचा असल्याचे अपर जिल्हाधिकारी बोरगावकर यांनी सांगितले.

यावेळी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त कार्यक्रमांमध्ये मतदार नोंदणीमध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ब्रिजेश पाटील, उत्कृष्ट नायब तहसिलदार डी. एन. पोटे, रामराव पंगे, उत्कृष्ट अव्वल ल कारकून फैय्याज अहमद युसुफ खान, उत्कृष्ट महसूल सहाय्यक शरद बोरामने, संदीप भुरे, गजानन मठपती, उत्कृष्ट संगणक चालक विनोद मनवर, बबलू महेबूबसाब अत्तार, उत्कृष्ट संगणक मतदार केंद्रस्तरीय अधिकारी जी.बी.मरशिवणे, उद्धव रंगनाथराव कदम, गणेश कहाळेकर, श्रीमती वर्षा गरड, बालाजी विधमवार इत्यादी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

उपस्थित मतदारांना बोरगावकर यांनी ‘राष्ट्रीय मतदार दिवस’ मतदारांसाठीची प्रतिज्ञा दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नायब तहसीलदार मुगाजी काकडे यांनी केले तर आभार प्रदर्शन फैय्याज अहेमद युसुब खान यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
00000

  ०५-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ लोकशाही प्रक्रीयेत सहभागासाठी जास्तीत जास्त पदवीधर मतदारांनी नाव नोंदणी करावी - विभागीय आयुक्त जितेंद्र...