#मराठी #नववर्ष #गुढीपाडवा निमित्त हार्दिक शुभेच्छा…!
#नांदेड
वृत्त क्रमांक 335
100 दिवसांच्या उपक्रमात जिल्हाधिकाऱ्यांनी
मुदखेड तहसिल कार्यालयास दिली भेट
विविध कामाचा घेतला आढावा
नांदेड, दि. 28 मार्च :- राज्य शासनाच्या 100 दिवसांच्या नाविण्यपूर्ण उपक्रमात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले हे जिल्ह्यातील विविध कार्यालयांना भेटी देत असून नुकतीच त्यांनी तहसिल कार्यालय, मुदखेड येथे भेट देवून कामकाजाचा आढावा घेतला.
यावेळी तहसील कार्यालय मुदखेड अंतर्गत सातबारा वरील नावाची दुरुस्ती करून दुरुस्त केलेले सातबारा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. तसेच भोकरचे उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी यांच्या संकल्पनेतून गोबरा तांडा, तोरणा तांडा आणि वरदडा तांडा येथील नागरिकांना जातीचे दाखले आणि ऑनलाईन राशन कार्ड यांचे त्यांच्या यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
मिशन 100 डेज अंतर्गत विविध उपक्रमाची माहिती यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली तसेच तहसील कार्यालय मुदखेड येथे करण्यात आलेल्या विविध कार्यालयीन सुधारणांचा आढावा त्यांनी घेतला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळ अधिकारी पठाण यांनी केले. या कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी भोकर प्रवीण मेंगशेट्टी, तहसीलदार आनंद देऊळगावकर, नायब तहसीलदार विजयकुमार पाटे तसेच सर्व ग्राम महसूल अधिकारी , मंडळ अधिकारी आणि लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
00000
वृत्त क्रमांक 334
गिग, प्लॅटफार्म वर्कर व ॲग्रिगेटर यांनी
वृत्त क्रमांक 333
जमिनीच्या सुपिकतेसाठी प्रकल्पातील काढलेला गाळ लाभदायक -जिल्हाधिकारी
वृत्त क्रमांक 332
अनुसूचित जाती जमाती आयोगाचे
सदस्य गोरक्ष लोखंडे यांचा दौरा
नांदेड दि. 26 मार्च :- महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य गोरक्ष लोखंडे नांदेड दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
बुधवार 26 मार्च 2025 रोजी सायंकाळी हिंगोली येथून सोयीनुसार वाहनाने नांदेडकडे रवाना व शासकीय विश्रामगृह नांदेड येथे मुक्काम. गुरुवार 27 मार्च 2025 रोजी सकाळी 11 ते दुपारी 12 पर्यत मुख्याधिकारी अर्धापूर नगरपरिषद यांचेसोबत आढावा व कामाची पाहणी. दुपारी 12 ते 1 पर्यत मुख्याधिकारी भोकर नगरपरिषद यांचेसोबत आढावा व कामाची पाहणी. दुपारी 1 ते 2 पर्यत मुख्याधिकारी मुखेड नगरपालिका यांचे सोबत आढावा व कामाची पाहणी. दुपारी 2 ते 2.30 राखीव. दुपारी 2.30 ते 4 पर्यत मा. आयुक्त नांदेड महानगरपालिका यांचेसोबत अनुसूचित जाती जमातीच्या निधीबाबत आढावा व कामाची पाहणी. दुपारी 4 ते सायं. 5 वाजेपर्यत मुख्याधिकारी पूर्णा नगरपरिषद यांचेसोबत आढावा व कामाची पाहणी व नंतर सोयीनुसार नांदेड येथून कारने पुणेकडे रवाना.
00000
वृत्त क्रमांक 331
मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने पुरवठा योजनेतील लाभार्थ्यांची लॉटरी पध्दतीने निवड
नांदेड दि. 26 मार्च :-अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचतगटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करण्याबाबत योजना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या 8 मार्च 2017 च्या शासन निर्णयान्वये सुरु करण्यात आली आहे.
या योजनेसाठी पात्र बचतगटांनी सन 2023-24 साठी http://mini.mahasamajkalyan.in/ या संकेतस्थळावर लाभार्थ्यांचे ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज मागविण्यात आले होते. या योजनेअंतर्गत पात्र झालेल्या बचतगटांची संख्या उपलब्ध तरतुदीच्या अनुषंगाने अर्जदारांची संख्या जास्त असल्यामुळे लाभार्थ्यांची निवड लॉटरी पध्दतीने उद्या 27 मार्च 2025 रोजी सकाळी 11 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, नांदेड येथील सभागृहामध्ये करण्यात येणार आहे. तरी लॉटरी पध्दतीने निवड करण्यासाठी पात्र अर्जदारांनी उपस्थित राहावे, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.
00000
वृत्त क्रमांक 330
कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष
ॲड निलेश हेलोंडे पाटील यांचा नांदेड दौरा
नांदेड, दि. 26 मार्च :- कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) ॲड निलेश हेलोंडे पाटील हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.
बुधवार 2 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 7.30 वाजता कळमनुरी येथून विश्रामगृह नांदेड येथे आगमन व मुक्काम. गुरुवार 3 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11 वा. लोहा ता. जि. नांदेड येथे तहसिलदार लोहा यांनी निश्चित केलेल्या शेतकरी आत्महत्या प्रकरणात कुटूंबियास भेट. दुपारी 1 वा. कंधार ता. जि. नांदेड येथे तहसिलदार कंधार यांनी निश्चित केलेल्या शेतकरी आत्महत्या प्रकरणात कुटूंबियास भेट. दुपारी 2 वाजता विश्राम भवन, कंधार जि. नांदेड येथे आगमन व राखीव. दुपारी 3 वा. जळकोटकडे रवाना.
00000
वृत्त क्रमांक 329
राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानात
जिल्हाधिकारी कर्डिले यांच्या ई -ऑफिस प्रणालीला दुसरा क्रमांक
6 लक्ष रुपयांचे राज्यस्तरीय पारितोषिक जाहीर
नांदेड दि. 26 मार्च :- वर्धा येथे जिल्हाधिकारी असताना राहुल कर्डिले यांनी संपूर्ण वर्धा जिल्ह्यातील महसूल विभागात राबविलेल्या ई - ऑफिस प्रणालीची दखल राज्य शासनाने घेतली आहे. २०२४-२५ च्या राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानात या उल्लेखनीय कार्याला पुरस्कृत करण्यात आले असून राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार त्यांना मिळाला आहे.
नवीन तंत्रज्ञानामुळे प्रशासनाच्या कामात नवनवीन बदल करणे आवश्यक ठरते. वर्ध्याचे तत्कालिन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी जिल्हाधिकारी वर्धा कार्यालयात ई-ऑफिस प्रणाली सन 2023-24 मध्ये यशस्वीरित्या राबविली. यामुळे प्रशासकीय कामकाजात सुलभता आली. या उल्लेखनिय कार्याची दखल घेवून राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता प्रगती अभियान 2023-24 स्पर्धेत वर्ध्याचे तत्कालिन जिल्हाधिकारी व आताचे नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या कार्य कर्तृत्वाला द्वितीय पारितोषिक जाहिर झाले आहे. विभागीय स्तरावरील निवड समित्यांकडून प्राप्त होणाऱ्या प्रस्तावांच्या गटामध्ये ही निवड करण्यात आली आहे. वर्धा जिल्ह्याच्या तालुकास्तरावर देखील त्यांनी ई -ऑफिस प्रणाली सुरू केली होती. त्यामुळे फायलींचा पसारा कमी करण्यात मदत झाली. नांदेडमध्येही त्यांनी या अभियानाला सुरुवात केली आहे.
संपूर्ण वर्धा जिल्ह्यातील महसूल विभागात ई-ऑफिस प्रणाली राबविण्याबाबत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांना 6 लक्ष रुपयांचे द्वितीय राज्यस्तरीय पारितोषिक शासनाच्यावतीने जाहीर झाले आहे. महसूली विभागातील बदलत्या नवीन तंत्रज्ञानामुळे व जागतिकरणामुळे प्रशासनाच्यामध्ये मोठया प्रमाणात बदल करणे आवश्यक असते. त्यानुसार प्रशासनातील सेवांच्या गुणवत्तेत वाढ, लोकाभिमुखता व निर्णयशिलता आणण्यासाठी तसेच सर्वाच्या सहकार्यातून उत्तम प्रशासन कार्यान्वित करण्यासाठी राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता प्रगती अभियान व स्पर्धा आयोजित केली जाते.
या गटात अवैध गौन खनिज उत्पादन आणि वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याकरिता केलेल्या प्रयोगासाठी अहिल्यानगरला प्रथम पुरस्कार. तर नगर परिषद कार्यालयाकरिता सोलार प्रकल्प कार्यान्वित केल्या प्रकरणी लातूर जिल्ह्यातील निलंगा नगर परिषदेला तृतीय पुरस्कार मिळाला आहे.
0000
वृत्त क्रमांक 328
माळी कामासाठी 31 मार्चपर्यत अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड दि. 25 मार्च :- सैनिकी मुलांचे वसतिगृह, विष्णुपूरी नांदेड येथील परिसरात सुंदर फुलांची व शोभनीय झाडे व बगीचा रखरखाव कामासाठी अशासकीय माळी कर्मचारी कंत्राटी पध्दतीने निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात रोजंदारीच्या कामावर नियुक्त करणे आहे. इच्छूक आणि अनुभवी व्यक्तीने 31 मार्च 2025 पर्यत जिल्हा सैनिक कार्यालय, नांदेड येथे अर्ज करावेत, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी महेश वडदकर यांनी केले आहे.
00000
वृत्त क्रमांक 327
जिल्हा मध्यवर्ती कारागृहात देशभक्तीपर कार्यक्रमाची रंगत
'जीवन गाणे ',गृह विभाग व सांस्कृतिक विभागाचा कार्यक्रम
नांदेड दि.२५ मार्च : नांदेड जिल्हा कारागृहामध्ये जीवन गाणे गातच जावे या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बंदिवानांमधील काही कलाकारांनी देखील या कार्यक्रमात भाग घेऊन देशभक्ती, सामाजिक एकोपा आणि राष्ट्रभक्तांवर आधारित गायन स्पर्धेमध्ये भाग घेऊन कार्यक्रमाची रंगत वाढवली.
राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग व गृह विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारणे सेवा यांच्या विशेष सहकार्याने 25 मार्चला नांदेड जिल्हा कारागृहामध्ये हा कार्यक्रम रंगला. राज्याच्या सांस्कृतिक विभागामार्फत निर्धारित केल्याप्रमाणे एकाच दिवशी 36 कारागृहात एकाच वेळी या कार्यक्रमाला सुरुवात झाली.
नांदेड जिल्हा कारागृहामध्ये अधीक्षक एस. एच.आढे, जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके, कारागृहाचे तुरुंग अधिकारी विजय मेश्राम, रूकमे, तसेच गायक रंजीत भद्रे व त्यांच्या संचाच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात झाली. या कार्यक्रमांमध्ये देशभक्तीपर कार्यक्रम गीतांसोबतच, महापुरुषांच्या संदर्भातील गीते तसेच अनेक लोकप्रिय गाण्यांचे गायन सांस्कृतिक विभागामार्फत पाठविण्यात आलेल्या संचाने केले.
मात्र प्रमुख आकर्षण ठरले ते बंदीवानांपैकी अनेकांनी स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन रॅप पासून तर भजनापर्यंत आणि कविता वाचनापासून तबलावादनापर्यंत कार्यक्रमात भाग घेऊन आपल्या नियमित रोजच्या बंदीवानाच्या जीवनातून काही निवांत क्षण घालवले. यावेळी अशा कार्यक्रमाचा आनंद झाल्याचे बंदीवानानी यावेळी आपल्या प्रतिक्रिया देताना सांगितले.
00000
वृत्त क्रमांक 326
बोगस रेशन कार्ड देणाऱ्या सेतू चालकावर गुन्हा दाखल
नागरिकांनी सावध राहण्याचा इशारा
नांदेड दि. २४ मार्च : नांदेड ग्रामीण परिसरात बोगस रेशन कार्ड काढून देणाऱ्या सेतू चालकावर आज गुन्हा दाखल करण्यात आला. नागरिकांनी पात्रता नसताना रेशन कार्ड काढण्याचा प्रयत्न करू नये व कोणाच्याही खोट्या दाव्याला बळी पडू नये, असे आवाहन तहसीलदार नांदेड संजय वारकड यांनी केले आहे.
आज तहसील कार्यालय नांदेड येथील पुरवठा विभागामध्ये एक व्यक्ती त्यांच्या रेशन कार्ड ऑनलाइन झाले आहे. परंतु धान्य मिळत नाही म्हणून तक्रार करायला आला होता, कर्मचाऱ्यांनी अधिक तपासणी केली असता असे निदर्शनास आले की त्यांचे रेशन कार्ड हेच फसवे आहे.
संबंधित व्यक्तीला फक्त ऑनलाइन एक पेज देण्यात आले होते. तर रेशन कार्ड हे बोगस असल्याचे निष्पन्न आहे.
या प्रकार लक्षात येता तात्काळ पोलीस निरीक्षक वजीराबाद पोलीस स्टेशन यांना बोलावून त्या व्यक्तीला त्यांच्या ताब्यात देण्यात आले.पुरवठा निरीक्षण अधिकारी श्री.रवींद्र राठोड यांना प्राधिकृत करून संबंधित सेतू चालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांनी दिलेले सहा रेशन कार्ड असे बनावट सापडले आहेत. संबंधीत सेतू चालक ऋषिकेश पेदेवाड राहणार सिडको नांदेड यांच्यावर या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे, तहसील कार्यालयातील कोणत्याही दस्तऐवज काढून देण्यासाठी किंवा सुविधा देण्यासाठी स्थानिक कर्मचाऱ्यांशी चर्चा करावी. एजंट व अनोळखी लोकांच्या तोतयेगिरीला बळी पडू नये, असे आवाहन तहसीलदार संजय वारकड यांनी केले आहे.
वृत्त क्रमांक 325
जागतिक क्षयरोग दिन आणि टीबी मुक्त
ग्रामपंचायत गौरव सोहळा उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न
नांदेड दि. 24 मार्च :- जागतिक क्षयरोग दिनानिमित्त 24 मार्च 2025 रोजी वर्षभरात, निकषाच्या आधारावर टीबी मुक्त ग्रामपंचायत करण्यासाठी परिश्रम घेतलेल्या 16 तालुक्यातील 248 पैकी 67 ग्रामपंचायती रौप्य पदक स्मृतीचिन्हास पात्र ठरल्या आहेत. या ग्रामपंचायतचे सरपंच, ग्रामसेवक, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांचा गौरव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या हस्ते महात्मा गांधी स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र पुष्पगुच्छ देवून गौरव करण्यात आला.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( पंचायत ) मंजुषा कापसे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हिरानी, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. राजाभाऊ बुट्टे, अर्धापूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विद्या झिने , जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सतीश कोपूरवाड, शहर क्षयरोग अधिकारी डॉ. बदीउद्दीन, जागतिक आरोग्य संघटनेच्या सल्लागार डॉ. सम्यक खैरे यांची उपस्थिती होती.
या ग्रामपंचायती मागील वर्षीही ब्राँझ स्मृती चिन्हाने गौरविल्या गेल्या होत्या. मागच्या वर्षातील 86 ग्रामपंचायतीपैकी 67 ग्रामपंचायती पुन्हा टीबी मुक्त ठरल्याने या ग्रामपंचायतींना सिल्वर स्मृतीचिन्ह प्रदान करण्यात आले.
जनसामान्यांमध्ये क्षयरोगाविषयी जनजागृती करून , क्षयरुग्ण शोधून यांना नियमित औषधोपचार देत लवकरात लवकर क्षयमुक्त करावे असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी केले. यानंतर अप्पर जिल्हाधिकारी राम बोरगावकर यांनी क्षयरुग्णांनी नियमित औषधोपचार घेऊन रोगमुक्त व्हावे असे आवाहन केले. यासोबतच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सतीश कोपुरवाड आदींची समयोचित भाषणे झाली.
00000
चित्रपट कथा व पटकथाकार वसंत सबनीस यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाची सांस्कृतिक मानवंदना
कुसुम नाट्यगृहात २२ मार्च २०२५ रोजी वसंत सबनीस यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त वसंत बहार सांस्कृतिक कार्यक्रम
नांदेड दि. 23 मार्च:- चित्रपट कथा व पटकथाकार वसंत सबनीस यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाने सांगितिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन 22 मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता केले होते. चित्रपट कथा व पटकथाकार वसंत सबनीस यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त वसंत बहार या सांस्कृतिक कार्यक्रमाची संकल्पना सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांची असून मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा अपर मुख्य सचिव सांस्कृतिक कार्य विभाग विकास खारगे यांच्या मार्गदर्शनातून कार्यक्रमाची निर्मिती झाली आहे.
या कार्यक्रमात ख्यातनाम कलावंत सहभाग घेतला. संगीत संयोजन आनंदी विकास तर संवाद निरजा आपटे, देविदास फुलारी यांचा होता. ख्यातनाम गायक गायिका सागर जाधव, शेफाली कुलकर्णी, विश्वास अंबेकर, मीना सोलापूरे, आसावरी रवंदे या कलाकारांच्या कला सादरीकरणातून तसेच मुर्तिकार व्यंकट पाटील यांच्या सादरीकरणातून चित्रपट कथा व पटकथाकार वसंत सबनीस यांच्या स्मृतीला उजाळा देण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहसंचालक श्रीराम पांडे यांनी केले.
00000
वृत्त क्रमांक 323
राष्ट्रीय लोकअदालतीच्या माध्यमातून 7 हजार 558 प्रकरणे समोचाराने निकाली
विशेष लेख
घाबरु नका ! योग्य उपचार आणि काळजी घेतल्याने क्षयरोग निश्चितच संपवू शकतो
क्षयरोग हा मायकोबॅक्टेरियम टयुबरक्युलोसीस या जीवाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. याचा प्रसार श्वसनाद्वारे होतो. जगातील एकूण क्षयरुग्णांपैकी 25 टक्के क्षयरुग्ण हे भारतात आढळून येतात. भारतातील क्षयरुग्णांपैकी 10 टक्के रुग्ण महाराष्ट्रात आढळून येतात. परंतु योग्य उपचार व काळजी घेवून आपण क्षयरोग मुक्त होवू शकतो. आपण प्रत्येकाने जर निश्चय केला तर आपण क्षयरोग निश्चितच संपवू शकतो. प्रधानमंत्री महोदयांनी सन 2025 अखेर देशातून क्षयरोगाचे दुरिकरण करण्याचे महत्वाकांक्षी लक्ष्य ठेवलेले आहे. त्यानुसार देशात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
महाराष्ट्राची सद्यसिस्थी :- राज्यात सन 2024 मध्ये 2 लाख 30 हजार 515 क्षयरुग्ण आढळून आले आहेत. सन 2025 साठी केंद्रीय क्षयरोग विभागाकडून राज्यास 2 लाख 30 हजार क्षयरुग्ण शोधण्याचे उद्ष्टि दिलेले आहे. राज्यात माहे जानेवारी ते फेब्रुवारी 2025 दरम्यान 39 हजार 705 क्षयरुग्ण सापडले आहेत.
जागतिक स्तरावरील शाश्वत विकास ध्येयानुसार सन 2030 अखेर क्षयरोगाचे दुरीकरण करणे अपेक्षित आहे. परंतु आपल्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सन 2025 अखेर देशातून क्षयरोगाचे दुरिकरण करण्याचे महत्वाकांक्षी लक्ष्य ठेवले आहे. त्याअनुषंगाने देशात राष्ट्रीय क्षयरोग दुरिकरण कार्यक्रमातंर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
या उपक्रमाचा एक भाग म्हणून केंद्रीय क्षयरोग विभागाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार 7 डिसेंबर 2024 ते 24 मार्च 2025 दरम्यान राज्यातील क्षयरोगासाठी अतिजोखीम असलेल्या निवडक 17 ग्रामीण जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात व 13 महानगरपालिका कार्यक्षेत्रात 100 दिवस क्षयरुग्ण शोध मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यालन 20 मार्च 2025 अखेर राज्यात 40 हजार 471 क्षयरुग्णांचे निदान करण्यात आले आहे.
जागतिक स्तरावर दरवर्षी 24 मार्च हा दिवस क्षयरोगविषयी जनजागृती करण्यासाठी जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून जागतिक स्तरावर मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक असलेल्या क्षयरोगाकडे सर्वाच्या एकत्रित सहकार्याने लक्ष वेधण्यात येते. या दिनाचे औचित्य साधून क्षयरोगाविषयी व्यापक जनजागृती करण्यासाठी चांगली संधी आहे. क्षयरोगाच्या महत्वाच्या बाबींकडे लक्ष वेधण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना जागतिक क्षयरोग दिनानिमित्त दरवर्षी एक घोषवाक्य प्रसारित करते. यावर्षी जागतिक आरोग्य संघटनेने 24 मार्च 2025 साठी प्रसारित केलेले जागतिक क्षयरोग दिनाचे घोषवाक्य होय ! आपण क्षयरोग निश्चित संपवू शकतो : प्रतिज्ञा करा,तरतूद करा, सेवा द्या.
या घोषवाक्यानुसार राज्यातून क्षयरोग संपविण्यासाठी आपण सर्वानी पुढील तीन बाबीवर विशेष भर देण्याची आवश्यकता आहे.
प्रतिज्ञा करा- सर्व भागीदारांनी क्षयरोग संपविण्यासाठी प्रतिज्ञा घेणे.
तरतूद करा- नाविण्यपूर्ण उपक्रम राबविणे, क्षयरोगविषयक सेवा सहज उपलब्ध करुन देण्यासाठी त्रुटी दुर करणे आणि प्रगतीशील संशोधन करणे यासाठी निधीची तरतुद करणे.
सेवा द्या :- क्षयरुग्णांच्या फायद्यासाठी प्रतिज्ञेनुसार व केलेल्या तरतुदीनुसार त्यांना दर्जेदार सेवा देणे.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने सन 2025 पर्यत क्षयरोग दुरीकरण करण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमातंर्गत विविध उपक्रमाची राज्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे.
क्षयरोग दुरिकरणासाठी राज्यात राबविण्यात येत असलेले विविध उपक्रम :
राज्यातील आरोग्य यंत्रणेमार्फत नियमित सर्वेक्षणाद्वारे तसेच सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहिम व 100 दिवस मोहिमेसारख्या विशेष मोहिमा प्रभावीपणे राबवून संशयित क्षयरुग्ण शोधून त्यांच्या छातीचा एक्सरे काढून व त्यांच्या बेडका नमुन्याची मशीनद्वारे व सुक्ष्मदर्शकाद्वारे मोफत तपासणी करुन क्षयरोगाचे निदान करण्यावर भर देण्यात येत आहे. निदान झालेल्या क्षयरुग्णांना त्वरीत उपचाराखाली आणून क्षयरोगाच्या प्रसाराची साखळी खंडीत करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. यासाठी राज्यशासनामार्फत 80 डिजीटल हॅन्ड हेल्ड एक्सरे मशीन खरेदी करुन जिल्ह्यांना वितरीत केल्या आहेत. बेडका नमूना तपासणीसाठी राज्यात 171 सीबीएनएएटी मशीन व 624 ट्रयुनट मशिन्स विविध जिल्हा व महानगरपालिका कार्यक्षेत्रासाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. 2025 निश्चित सुक्ष्मदर्शक केंद्र कार्यान्वीत केले आहेत.
सन 2024 मध्ये सार्वजनिक आरोग्य विभागानने 35 लाख 39 हजार 941 व्यक्तींची संशयित क्षयरुग्ण म्हणून तपासणी केली. माहे जानेवारी व फेब्रुवारी 2025 दरम्यान 7 लक्ष 54 हजार 611 व्यक्तींची संशयित क्षयरुग्ण म्हणून तपासणी केली. क्षयरोगाचे निदान झालेल्या रुग्णांना उपचाराखाली आणण्यात आले.
क्षयरोग प्रतिबंध औषधोपचार :-क्षयरुग्णांच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींची सी वाय टीबी चाचणी करुन पात्र व्यक्तींनी दर आठवड्याला क्षयरोग प्रतिबंधक औषधोपचाराची एक मात्रा याप्रमाणे 3 महिने प्रतिबंधक उपचार देण्यात येत आहेत.
निक्षय पोषण योजना- क्षयरोगाचे निदान झालेल्या व उपचाराखाली असलेल्या रुग्णांचे उपचारादरम्यान योग्य पोषण होण्यासाठी केंद्र शासनाच्या निक्षय पोषण योजनेतून दरमहा 1 हजार रुपये याप्रमाणे रक्कम उपचार सुरु असेपर्यत त्यांनी उपलब्ध करुन दिलेल्या बँक खात्यात थेट हस्तांतरण पध्दतीने पीएफएमएसद्वारे अदा करण्यात येते. सन 2024 मध्ये 1 लाख 60 हजार 395 व सन 2025 मध्ये आजपर्यत 4 हजार 799 क्षयरुग्णांना त्यांच्या बँक खात्यात रक्कम अदा करण्यात आलेली आहे.
प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियान :- राज्यात प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियान राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत 13 हजार 351 निक्षय मित्रांची नोंदणी करण्यात आली आहे. त्यापैकी 12 हजार निक्षय मित्रांनी क्षयरुग्णांना केंद्र शासनाने प्रमाणित केलेले अन्नधान्य बास्केट प्रति क्षयरुग्ण दरमहा एक बास्केट याप्रमाणे कमीत कमी 6 महिने देण्यासाठी संमती दिलेली आहे. 20 मार्च 2025 पर्यत राज्यातील क्षयरुग्णांना निक्षय मित्रामार्फत 3 लाख 46 हजार 539 अन्नधान्य बास्केट वितरीत करण्यात आले. या अभियानाअंतर्गत सन 2023 मध्ये राज्यातील एकूण ग्रामपंचायतीपैकी 2 हजार 251 ग्रामपंचायती व सन 2024 मध्ये 7 हजार 402 ग्रामपंचायती क्षयरोग मुक्त करण्यात राज्य यशस्वी झाले आहे.
क्षयरोग जनजागृती :- जागतिक क्षयरोग दिनानिमित्त सर्व जिल्हा व महानगरपालिका कार्यक्षेत्रात क्षयरोगाविषयी व्यापक जनजागृती करण्यात येते.
राज्यात सन 2022 पासून तपासणी केलेल्या संशयित क्षयरुग्णांची व क्षयरोगाचे निदान झालेल्या रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. वर्ष 2022 मध्ये तपासणी करण्यात आलेले संशयीत क्षयरुग्ण 19 लाख 98 हजार 356 यापैकी 2 लाख 33 हजार 872 क्षयरुग्णाचे निदान झालेले आहेत. सन 2023 मध्ये 26 लाख 22 हजार 646 क्षयरुग्णांची तपासणी करण्यात आली यापैकी 2 लाख 23 हजार 444 रुग्ण निदान झाले आहेत. सन 2024 मध्ये 35 लाख 39 हजार 941 रुग्णांची तपासणी करण्यात येवून त्यापेकी 2 लाख 30 हजार 515 क्षयरुग्णांचे निदान झाले. सन 2025 फेब्रुवारी अखेर 7 लाख 54 हजार 611 संशयित रुग्णांची तपासणी केली त्यापैकी 39 हजार 705 रुग्ण आढळून आले आहेत.
अलका पाटील
उपसंपादक, जिल्हा माहिती कार्यालय नांदेड
वृत्त क्रमांक 322
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नांदेड विमानतळावर स्वागत
नांदेड दि. 23 मार्च :- महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांचे आज एक दिवसाच्या दौऱ्यासाठी श्री. गुरू गोविंद सिंघजी विमानतळ नांदेड येथे आगमन झाले. यावेळी त्यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, माजी मंत्री नवाब मलिक यांचेही आगमन झाले.
यावेळी त्यांचे आमदार विक्रम काळे, आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार राजू नवघरे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.
यावेळी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. मनोहर चासकर, नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, महानगरपालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, राज्य उत्पादन शुल्कचे नांदेड विभागाचे विभागीय उपायुक्त डॉ. बी.एच.तळवी, अप्पर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर आणि विविध पदाधिकारी यांची उपस्थिती होती. जिल्ह्यामधील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी ते नांदेड जिल्ह्याच्या एक दिवसाच्या दौऱ्यावर आले आहेत.
00000
वृत्त क्रमांक 321
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नांदेड दौरा
नांदेड, दि. 22 मार्च :- राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन, राज्य उत्पादन शुल्क मंत्री अजित पवार हे रविवार 23 मार्च 2025 रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.
रविवार
23 मार्च 2025 रोजी बारामती विमानतळ येथून विमानाने सकाळी 10.15 वा. श्री गुरू गोविंदसिंघजी
विमानतळ नांदेड येथे आगमन होईल. त्यानंतर सकाळी 11 वा. मोटारीने नायगाव तालुक्यातील
नरसी येथे आगमन व राखीव. दुपारी 2.40 वा. नायगाव येथे शिवराज पाटील होटाळकर यांच्या
निवासस्थानी आगमन व राखीव. सायंकाळी 4 वा. मोटारीने स्वागत लॉन्स सांगवी विमानतळ रोड
नांदेड येथे आगमन. नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष ग्रामीण,
शहर जिल्हाध्यक्ष, आमदार, माजी आमदार यांची बैठक. त्यानंतर सायं 6.30 वा. मोटारीने
हैदरगार्डन देगलूर नाका नांदेड येथे आगमन व इफ्तार पार्टी कार्यक्रमास उपस्थिती.
रात्री 7.55 वा. मोटारीने श्री गुरू गोविंदसिंघजी विमानतळ नांदेड येथे आगमन.
रात्री 8 वा. विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील व रात्री 8.50 वा. छत्रपती शिवाजी
महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ गेट नं. 8 मुंबई येथे आगमन होईल.
0000
०५-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ लोकशाही प्रक्रीयेत सहभागासाठी जास्तीत जास्त पदवीधर मतदारांनी नाव नोंदणी करावी - विभागीय आयुक्त जितेंद्र...