Tuesday, September 16, 2025

 वृत्त क्रमांक 969

महाराष्ट्र ग्रामीण बँकेत शेतकऱ्यांच्या थकीत कर्जासाठी

शेतकरी नवसंजीवनी व शेतकरी समाधान योजना जाहीर

 

नांदेडदि. 16 सप्टेंबर :- थकीत पिककर्जदारसाठी तसेच शेतीविषयक इतर कर्जदारासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्यावतीने शेतकरी नवसंजीवनी व शेतकरी समाधान योजना जाहीर केली आहे. ही योजना 30 सप्टेंबर 2025 पर्यंत सुरू राहणार आहे. जिल्ह्यातील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या थकबाकीदार शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन त्यांच्यावरील थकीत कर्जाचा बोझा कमी करण्यासाठी संबंधित बँक शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन बँकेचे जिल्हा समन्वयक तथा क्षेत्रीय व्यवस्थापक व जिल्हा उपनिबंधक नांदेड सहकारी संस्था यांनी संयुक्तपणे केले आहे.

 

राज्यात गेल्या काही वर्षांपासून विविध भागात आलेला ओला किंवा कोरडा दुष्काळ, कोविड महामारी तसेच काही ठिकाणच्या भौगोलिक परिस्थितीमुळे बँकेचे बरेचसे शेतकरी थकीत झाले असून त्यांची आर्थिकपत खालावली आहे. आपल्या जिल्ह्यात या कारणास्तव शेतकरी त्यांच्या पीक कर्ज नूतनीकरण करण्यात तसेच शेतीविषयक इतर कर्जाची परतफेड करण्यास असमर्थ ठरत आहेत.   

 

शेतकरी नवसंजीवनी योजनेअंतर्गत सर्व थकीत पीककर्जधारकांना संपुर्ण व्याज माफी ही योजना बँकेने तयार केली असून शेतकऱ्यांना पुन्हा कर्ज मिळण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहेशेतकरी समाधान या योजनेअंतर्गत पुर्ण व्याजमाफी व काही प्रमाणात मुद्दल माफ करून शेतकऱ्यांना कर्ज मुक्त करण्याची योजना बँकेनी आणलेली आहे, अशी माहिती प्रसिद्धी पत्रकात दिली आहे.

00000

वृत्त क्रमांक 968 

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे  

अर्धापूर येथे 19 सप्टेंबर रोजी आयोजन 

नांदेड, दि. 16 सप्टेंबर :- जिल्ह्यात बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड व शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्था अर्धापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार 19 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजेपासून शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्था अर्धापूर येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 

या रोजगार मेळाव्या नामांकित उद्योजक, शाळा व महाविद्यालय तसेच इतर आस्थापनांच्यावतीने मुलाखती घेण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांनी शुक्रवार 19 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजेपासून शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्था अर्धापूर येथे उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त डॉ. रा. . कोल्हे यांनी केले आहे. 

अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, आनंदनगर रोड बाबानगर नांदेड संपर्क क्र. 02462-251674 योगेश यडपलवार 9860725448 ईमेल आयडी nandedrojgar01@gmail.com संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

0000

  

वृत्त क्रमांक 967 

17 सप्टेंबर रोजी घेतलेल्या अनुज्ञप्ती तारखेत बदल

प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे आवाहन   

नांदेड, दि. 16 सप्टेंबर :- मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त 17  सप्टेंबर 2025 रोजी कार्यालयातील कामकाज बंद राहणार आहे. 17 सप्टेंबर रोजी बऱ्याच अनुज्ञप्तीधारकाने पक्की अनुज्ञप्ती व शिकाऊ अनुज्ञप्तीकरिता ॲपाईन्टमेन्ट घेण्यात आल्याचे दिसुन येते. बुधवार 17 सप्टेंबर 2025 रोजी घेण्यात आलेल्या अॅपाईन्टमेन्ट पुढील 7 दिवसात Re-schedule करण्यात येणार आहेत. त्याबाबत अनुज्ञप्ती अर्जदाराच्या नोंदणीकृत मोबाईलवर कळविण्यात येणार आहे. 

सदर दिनांकास घेतलेल्या सर्व अनुज्ञप्तीधारक अर्जदारानी आपणास मोबाईलवर प्राप्त दिनांकास कार्यालयात उपस्थित राहुन आपले अनुज्ञप्ती विषयक कामकाज करुन घ्यावे. 17 सप्टेंबर रोजी ज्या अनुज्ञप्ती अर्जदारानी अनुज्ञप्तीकरिता अॅपाईन्टमेन्ट घेतल्या आहेत त्या सर्व अनुज्ञप्तीधारक अर्जदाराने व नागरिकानी याची नोंद घ्यावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत कंकरेज यांनी केले आहे.

00000

 

वृत्त क्रमांक 966 

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची 17 सप्टेंबर पासून प्रत्येक गावात सुरूवात 

पालकमंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत पिंपळगाव येथे अभियानाची सुरूवात 

नांदेड, दि. 16 सप्टेंबर :- राज्यात राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या महत्त्वाकांक्षी अभियानाची सुरूवात बुधवार 17 सप्टेंबर 2025 पासून होत आहे. राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा, दिव्यांग कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे हे अर्धापूर तालुक्यात मौ. पिंपळगाव (म.) येथे ग्रामसभेत उपस्थितीत राहून मुख्यमंत्री समृद्धी पंचायतराज अभियानाचे उद्घाटन करुन या अभियानाची सुरूवात करणार आहेत. 

जिल्हयातील प्रत्येक गावात विशेष ग्रामसभेचे आयोजन 17 सप्टेंबर रोजी करण्यात आले असून एका गावात स्थानिक आमदार यांच्या उपस्थितीत या अभियानाची सुरूवात करणार आहेत. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात गावस्तरावरील प्रत्येक नागरिकाने सहभाग नोंदवावा, असे आवाहन पालकमंत्री अतुल सावे यांच्यासह जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी केले आहे. 

या अभियानाचा मुख्य उद्देश गावागावात सुशासन प्रस्थापित करणे, आत्मनिर्भरता निर्माण करणे, व विकासाची स्पर्धात्मक भावना रुजवणे हा आहे. हे अभियान केवळ प्रशासकीय यंत्रणेपुरती मर्यादित नसून ग्रामस्थांच्या प्रत्यक्ष सहभागावर आधारलेली आहे. 

या अभियानाची सुरूवात 17 सप्टेंबर पासुन करण्यात येत असुन अभियानाच्या प्रचार प्रसिद्धी व सर्वांकष मार्गदर्शनाकरीता जिल्हा व सर्व तालुकास्तरावर आमदार यांच्या उपस्थितीत कार्यशाळा घेण्यात आल्या आहेत. या कार्यशाळेस गावस्तरावरील सर्व लोकप्रतिनिधी, विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती. 

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा कालावधी शंभर दिवसाचा असून या कालावधीत गावस्तरावर अभियानाचे मुख्य 7 घटक (सुशासन,आर्थिक स्वावलंबन, जलसमृद्धी, योजनांचे अभिसरण, संस्थांचे सक्षमीकरण, उपजीविका विकास आणि लोकसहभाग) यावर काम करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे नांदेड जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) यांनी दिली आहे.

00000




वृत्त क्रमांक 967   

स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान” स्त्रीशक्तीला आरोग्यशक्तीची साथ : ठरणार विकसित भारताचा आधार 

नांदेड, दि. 16 सप्टेंबर :- महिलांचे आरोग्य व सक्षमीकरण हे कुटुंब, समाज आणि देशाच्या प्रगतीचे प्रमुख केंद्रस्थान आहे. याच उद्देशाने आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत स्वस्थ नारी, सशक्त परिवार हे विशेष राष्ट्रीय अभियान 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 दरम्यान संपूर्ण देशभर राबविण्यात येत आहे. या अभियानाचा राष्ट्रीय शुभारंभ इंदौर मध्य प्रदेश येथे  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते  होणार असून या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण देशभरातील प्रमुख ठिकाणी करण्यात  येणार आहे. 

महाराष्ट्रातील राज्यस्तरीय शुभारंभ सोहळा 17 सप्‍टेंबर 2025 रोजी राज्‍यभर होणार असून राज्‍यस्‍तरीय कार्यक्रम मुंबई येथे यशवंतराव चव्‍हाण सेंटर रंगस्‍वर सभागृह नरिमन पॉईंट येथे  राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, राज्यमंत्री आणि मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित करण्‍यात आला आहे. राज्यभरात त्याच दिवशी प्रत्येक जिल्हा व महापालिका स्तरावर महिला व बालकांसाठी विशेष आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. 

अभियानाची उद्दिष्ट्ये  

या अभियानाचा मुख्य उद्देश देशभरातील ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये महिला आणि मुलांसाठी तपासणी व विशेषज्ञ आरोग्य शिबिरे आयोजित करणे असा आहे.

या मोहिमेत आयुष्मान आरोग्य मंदिरांमध्ये दररोज (AAM-SHC) तपासणी आणि जनजागृती शिबिरे आयोजित केली जाणार आहे.

ग्रामीण रुग्‍णालये, उपजिल्‍हा रुग्‍णालये  (CHCs) आणि प्राथमिक आरोग्‍य केंद्रे (AAM-PHC/UPHC) येथे विशेषज्ञाव्‍दारे तपासणी शिबिरे घेतली जाणार आहे.

खाजगी  महात्‍मा फुले जनआरोग्‍य योजना संलग्‍नीत रुग्‍णालये व क्लिनिक येथे देखील विशेषज्ञ आरोग्य शिबिरे आयोजित करण्‍यात येणार आहेत. 

शिबिरांमध्ये विविध आरोग्य सेवा  

महिलांची आरोग्‍य तपासणी:- उच्च रक्तदाब आणि मधुमेहाच्‍या निदानासाठी तपासणी करणे. तोंडाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्‍या निदानासाठीची  तपासणी करणे. जोखीम असलेल्या महिलांसाठी क्षयरोग (Tuberculosis) तपासणी. किशोरवयीन मुली आणि महिलांसाठी ॲनिमिया (रक्तक्षय) तपासणी आणि समुपदेशन. आदिवासी भागातील महिलांसाठी सिकल सेल तपासणी कार्ड वाटप आणि आदिवासी भागात सिकल सेल आजाराबाबत समुपदेशन. 

माता आणि बाल आरोग्‍य सेवा

गर्भवती महिलांसाठी प्रसूतिपूर्व काळजी (ANC) तपासणी व समुपदेशन करणे. हिमोग्लोबिन तपासणी, तसेच पोषण आणि काळजी यावर समुपदेशन. बालकांचे आवश्‍यकतेनुसार लसीकरण  केले जाईल. 

आयुष सेवा

या अंतर्गत आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, युनानी, सिध्‍द व नॅचरोपॅथी इ. पर्यायी उपचार पध्‍दतींची सेवा गरजू रुग्‍णांना उपलब्‍ध करुन देण्‍यात येणार आहे.  

जनजागृती आणि वर्तणूक बदल संवाद

किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळीची स्वच्छता आणि पोषणाविषयी जागृती सत्रे आयोजित केली जातील. महिला बचत गट (SHGs) आणि पंचायत प्रतिनिधींच्या माध्यमातून खाद्यतेल आणि साखरेचा वापर कमी करण्यावर समुपदेशन. पोषण विषयी समुपदेशन व निरोगी राहण्‍यासाठी मार्गदर्शन. 

रक्तदान शिबिरे

1 ऑक्‍टोबर हा राष्‍ट्रीय स्‍वेच्‍छा रक्‍तदान दिन असून त्‍याअनुषंगाने राष्‍ट्रीय महास्‍वेच्‍छा रक्‍तदान  या अभियानात राबविण्‍यात येईल. इंडियन रेड क्रॉस सोसायटी, अखिल भारतीय तेरापंथ युवक परिषद इ. संस्‍थांच्‍या साहायाने 1 लाख युनिट रक्‍त गोळा करण्‍याचे ध्‍येय असून, रक्‍तदात्‍यांची नोंदणी करण्‍याचेही प्रस्‍तावित आहे. My Gov. Portal द्वारे रक्‍तदान प्रतिज्ञा उपलब्‍ध करुन देण्‍यात येईल. 

नोंदणी आणि कार्ड वाटप

आयुष्‍यमान भारत डिजीटल मिशन कार्ड (ABDM), पंतप्रधान जन आरोग्य योजना (PMJAY) अंतर्गत नोंदणी व  आयुष्‍यमान वय वंदना कार्ड वाटप सर्व गरजू व पात्र लाभार्थ्‍यांना करण्‍यात येईल.  

क्षयरोग निर्मुलनासाठी निक्षय मित्र स्वयंसेवकांची नोंदणी

क्षयरुग्‍णांना दत्‍तक घेऊन त्‍यांना पोषक आहार उपलब्‍ध करुन देण्‍यासाठी आणि क्षयरोगाविरुध्‍द जन आंदोलनाला पाठींबा देण्‍यासाठी दानशुर व्‍यक्‍ती, संस्‍था आणि संघटनांना निक्षय मित्र बनवून सहभागी होण्‍यासाठी प्रोत्‍साहित केले जाईल. या करिता माय भारत स्‍वयंसेवक अथवा इतर स्‍वयंसेवकाच्‍या मदतीने निक्षय मित्रांची नोंदणी वाढवण्‍यात येईल, जेणेकरुन क्षयरोग मुक्‍त भारताचे ध्‍येय साध्‍य करणे शक्‍य होईल.

तपासणी शिबीरामध्‍ये (Screening camp) मध्‍ये आवश्‍यक असणा-या रुग्‍णांना विशेषज्ञाकडून तपासणीसाठी संदर्भित केले जाईल व त्‍यांच्‍या आवश्‍यक त्‍या रक्‍त, लघवीच्‍या तपासण्‍या, सोनोग्राफी, क्षकिरण तपासणी व शस्‍त्रक्रिया मोफत व नियोजन करुन करण्‍यात आले आहे. 

महाराष्ट्र राज्यातील 17 सप्टेंबर रोजीचे 75 उपक्रम

75 प्राथमिक आरोग्य केंद्र, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालयांमध्ये आरोग्य शिबिरे. 75असंसर्गजन्य रोग तपासणी शिबिरे (मधुमेह, रक्तदाब, कर्करोग, हृदयरोग). 75 मोफत चष्मा वाटपासह नेत्र तपासणी शिबिरे. 75 दंत तपासणी शिबिरे. 75 माता आणि बाल आरोग्य शिबिरे (प्रसूतीपूर्व तपासणी, लसीकरण). 75 महिला आणि बालकांसाठी पोषण जागरूकता सत्रे. 75 ठिकाणी आयुष आणि योग शिबिरे. 75 क्षयरोग जागरूकता आणि तपासणी शिबिरे. 75 रक्तदान शिबिरे. 75 अवयवदान प्रतिज्ञा शिबिरे. 75 मोफत औषध वितरण शिबिरे. 75 निदान शिबिरे (पॅथॉलॉजी, एक्स-रे, ईसीजी). 75 कर्करोग जागरूकता आणि तपासणी शिबिरे. 75 मानसिक आरोग्य समुपदेशन शिबिरे. 75 व्यसनमुक्ती जागरूकता सत्रे. 75 किशोरवयीन आरोग्य सत्रे. 75 शालेय आरोग्य तपासणी शिबिरे. 75 स्वच्छता आणि स्वच्छता जागरूकता शिबिरे. 75 ब्लॉक आणि जिल्हा स्तरावर आरोग्य मेळावे / प्रदर्शने. 75 दुर्गम भागांसाठी टेलिमेडिसिन सल्लामसलत. 

सहभागी संस्था व केंद्रे

10 हजार 766 उपकेंद्रे. 1 हजार 939 प्राथमिक आरोग्य केंद्रे. 797 शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रे. 1 हजार 40 शहरी सामुदायिक आरोग्य केंद्रे. 372 ग्रामीण रुग्‍णालये, 102 उपजिल्‍हा रुग्‍णालये,  8 सामान्‍य रुग्‍णालये, 22 स्‍त्री रुग्‍णालये, 2 संदर्भ सेवा रुग्‍णालये व 19 जिल्‍हा रुग्‍णालये. राज्यातील सर्व आरोग्य केंद्रे, संस्था, वैद्यकिय महाविद्यालये व खाजगी महात्मा फुले जन आरोग्य योजना सलग्न रुग्णालये सर्व खाजगी वैद्यकीय व्यावसायिक संघटना यांचा अभियानात सक्रिय सहभाग असेल. 

कृती योजना  

या अभियानाची सर्व स्‍तरावर व्‍यापक प्रसिद्धी व माहिती देवून जनजागृती करण्‍यात येत आहे. सर्व प्रसारमाध्‍यमे, सामाजिक माध्‍यमे व स्‍थानिक प्रचार यांचा वापर करण्‍यात येत आहे. या अभियानासाठी राज्‍य, विभाग, जिल्‍हा व म.न.पा तसेच संस्‍थास्‍तरावर मुख्‍य समन्‍वय अधिकारी व एक महिला  समन्‍वय अधिकारी नियुक्‍त करण्‍यात आले आहेत. 17 सप्‍टेंबर  रोजी होणा-या राज्‍यस्‍तरीय व जिल्‍हास्‍तरीय शुभारंभ कार्यक्रम स्‍थानिक सन्‍माननीय लोकप्रतिनिधी (पालकमंत्री/मंत्री/राज्‍यमंत्री/खासदार/आमदार) यांचे उपस्थितीत करण्‍याचे नियोजन व अनुषंगीक व्‍यवस्‍था ( Web Cast/two way weblink/ health kiosk etc.) करण्‍यात आले आहे. सर्व ठिकाणी स्‍थानिक सन्‍माननीय लोकप्रतिनिधी ( पालकमंत्री/ मंत्री/ राज्‍यमंत्री/ खासदार/ आमदार)  यांचे करीता समन्‍वय अधिकारी नियुक्‍त करण्‍यात आले आहेत. 

अभियानाच्‍या यशस्‍वीतेसाठी सार्वजनिक आरोग्‍य विभागाशिवाय वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्‍ये विभाग, महिला व बाल विकास विभाग, शालेय शिक्षण विभाग, युवक कल्‍याण‍ विभाग, ग्रामीण विकास विभाग, नगर विकास विभाग व उच्‍च आणि तंत्र शिक्षण विभाग समन्‍वयाने काम करित असून, त्‍याकरिता आवश्‍यक मनुष्‍यबळ, संसाधने व माहिती याचे सु‍सूत्रीकरण करण्‍यात आले आहे. सर्व आरोग्‍य संस्‍था व खाजगी रुग्‍णालये येथील तपासणी व विशेषज्ञ शिबिरांचे वेळापत्रक तयार करून आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या डॅशबोर्डवर दैनंदिन अहवाल नोंदवावा, असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे जिल्हा शल्यचिकित्सक नांदेड यांनी कळविले आहे.

000

 

वृत्त क्रमांक 966 

कै.वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष

ॲड निलेश हेलोंडे पाटील यांचा दौरा कार्यक्रम 

नांदेड, दि. 16 सप्टेंबर :- कै.वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) ॲड निलेश हेलोंडे पाटील हे गुरूवार 18 व शुक्रवार 19 सप्टेंबर 2025 रोजी नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील. 

गुरूवार 18 सप्टेंबर रोजी अमरावती येथून दुपारी 3.30 वा. विश्रामगृह माहूर येथे आगमन व तहसिलदार गटविकास अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्या समवेत माहूर तालुक्यातील शेतकरी आत्महत्या व शासकीय जमिनीवर चारा लागवड यासंबंधी चर्चा. दुपारी 4.40 वा. तहसिलदार माहूर यांनी निश्चित केलेल्या शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबास भेट. सायं. 6 वा. किनवटकडे प्रयाण. सायं. 7 वा. विश्रामगृह किनवट येथे आगमन व मुक्काम. 

शुक्रवार 19 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वा. तहसिल कार्यालय किनवट येथे प्रकल्प संचालक, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट, वनअधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्या समवेत आदिवासी विकास योजना, किनवट तालुक्यातील शेतकरी आत्महत्या, शासकीय जमिनीवर चारा लागवड व वन विभागाच्या योजना यासंबंधी बैठक व चर्चा. दुपारी 12 वा. तहसिलदार किनवट यांनी निश्चित केलेल्या शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबास भेट. दुपारी 1.30 वा. विश्रामगृह किनवट येथे आगमन व राखीव. सोईनुसार नागपूर जिल्ह्यातील काटोलकडे प्रयाण करतील.

0000

वृत्त क्रमांक 965   

पालकमंत्री अतुल सावे यांचा दौरा कार्यक्रम 

नांदेड, दि. 16 सप्टेंबर :- राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा, दिव्यांग कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे हे बुधवार 17 सप्टेंबर 2025 रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील. 

बुधवार 17 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर विमानतळ येथून वाहनाने सकाळी 1.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. सकाळी 8.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथून माता गुजरीजी विसावा उद्यान नांदेडकडे वाहनाने प्रयाण. सकाळी 8.35  वा. माता गुजरीजी विसावा उद्यान नांदेड येथे आगमन व हुतात्मा स्मारक स्मृती स्तंभास मानवंदना व पुष्पचक्र अर्पण. सकाळी 9 वा. राष्ट्रध्वज वंदन समारंभास उपस्थिती. सकाळी 9.20 वा. अभंग प्रकाशन आयटीआय कॉर्नर नांदेडकडे वाहनाने प्रयाण. सकाळी 9.30 वा. अभंग प्रकाशन नांदेड येथे आगमन व मा. नरेंद्र मोदीजी यांच्या जन्मदिवसानिमित्त विशेष ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन. सकाळी 9.50 वा. अर्धापूर तालुक्यातील महादेव पिंपळगावकडे वाहनाने प्रयाण. सकाळी 10 वा. महादेव पिंपळगाव येथे आगमन व मुख्यमंत्री समृद्धी पंचायतराज अभियानाच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 11 वा. गोवर्धन घाट नांदेडकडे वाहनाने प्रयाण. सकाळी 11.15 वा. गोवर्धनघाट नांदेड येथे आगमन व मा. नरेंद्र मोदीजी यांच्या जन्मदिवसानिमित्त भाजपा शहर कमिटी यांच्यामार्फत आयोजित शहर स्वच्छता अभियानामध्ये सहभाग. सकाळी 11.35 वा. जिल्हाधिकारी कार्यालय नांदेडकडे वाहनाने प्रयाण. सकाळी 11.45 वा. जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे आगमन व सेवापंधरवडा कार्यक्रमाचे उद्घाटन स्थळ कॅबिनेट हॉल नियोजन भवन. दुपारी 12 वा. मा. नरेंद्र मोदी यांच्याहस्ते उद्घाटन होणाऱ्या स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान उद्घाटन समारंभास व्हिसीद्वारे उपस्थिती. स्थळ डीपीसी हॉल नियोजन भवन नांदेड. दुपारी 1 वा. वीज तांत्रिक कामगार मेळावा व सत्कार समारंभास उपस्थिती स्थळ- नियोजन भवन. दुपारी 1.30 वा. शंकरराव चव्हाण मेमोरियल नांदेडकडे वाहनाने प्रयाण. दुपारी 1.40 वा. शंकरराव चव्हाण मेमोरीयल नांदेड येथे आगमन व भाजपा पदाधिकारी यांच्यासमवेत बैठक. दुपारी 2.50 वा. हदगावकडे प्रयाण. दुपारी 3.30 वा. हदगाव येथे आगमन व खासदार नागेश आष्टीकर यांच्या घरी सांत्वनपर भेट. दुपारी 3.45 वा. हदगाव येथून छत्रपती संभाजीनगरकडे वाहनाने प्रयाण करतील.

00000  


वृत्त क्रमांक 1277   जिल्हा माहिती कार्यालयातील रद्दी विक्रीसाठी उपलब्ध   नांदेड (जिमाका) ,  दि .   5 :-   जिल्हा माहिती कार्यालय ,   नांदे...