26 जुलै
#कारगिल #विजयदिवसशहीद झालेल्या वीर जवानांना विनम्र #अभिवादन...!
देहदान : मृत्यू पलीकडील अमरत्वाची वाट !
मृत्यू अंतिम नाही तो एका नव्या प्रवासाची सुरुवात आहे, हा विचार कृतीत उतरतो तो देहदान या पवित्र कार्यातून. मृत्यूनंतर देखील आपण कोणाच्या तरी आयुष्याचा आधार होऊ शकतो, आरोग्य सेवेसाठी अमूल्य ठरणारी देणगी देऊ शकतो आणि रुग्णसेवेचे पुण्य कळत नकळत देहदान या कृतीतून घडू शकते. पुराणानुसार महर्षी दधीची यांनी स्वतःच्या अस्थि दान करून केवळ देवतांचेच रक्षण केले नाही तर लोक कल्याणाचे महान कार्यही केले. यातून त्यांच्यातील निस्वार्थ भाव आणि समाजाप्रती केलेल्या त्यागाची कल्पना आपणास येते. हे इतिहासातील पहिले देहदान होय.
आजच्या वैद्यकीय युगात डॉक्टरांना आणि प्रथम वर्षीय वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शरीररचनेचा सखोल अभ्यास करणे ही अत्यंत गरजेची बाब आहे. मानवी शरीर हे अत्यंत अद्भुत आणि जटील आहे. त्याचा प्रत्यक्ष अभ्यास केल्याशिवाय उत्कृष्ट डॉक्टर घडू शकत नाहीत आणि हा अभ्यास होतो तो केवळ देहदानाच्या माध्यमातूनच. पुस्तकातील चित्रे आणि सॉफ्टवेअर यांना मर्यादा आहेत परंतु प्रत्यक्ष मानवी शरीरासारखी शिकवण कोणतीही यंत्रणा देऊ शकत नाही. आजही भारतात लाखो लोकांच्या मनात देहदानाविषयी भीती, अज्ञान आणि गैरसमज आहेत .आम्ही या लेखाद्वारे शरीरचनाशास्त्र विभागाच्या वतीने देहदान जनजागृतीची चळवळ समाज प्रबोधनासाठी, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधनासाठी, उच्च रुग्णसेवेसाठी, भावी पिढ्यांच्या मार्गदर्शनासाठी करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करत आहोत.
* देहदान म्हणजे काय ?
देहदान म्हणजे मृत्यूनंतर आपले संपूर्ण शरीर धर्म व रूढी परंपरेनुसार जाळण्या किंवा पुरण्या ऐवजी वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण, संशोधन आणि विज्ञानासाठी दान करणे होय जेणेकरून तो देह वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा महत्वाचा भाग बनेल.
जीवनात आपण आपल्या स्वेच्छेने विविध दान करतो उदा. रक्तदान, नेत्रदान, अवयवदान इत्यादी मात्र देहदान हे वैद्यकीय अध्ययन व संशोधनासाठी जीवनदायी महान दान ठरते. देहदान ही बदलत्या काळाची गरज आहे .परंतु देहदानाप्रती समाजामध्ये जनजागृती नसल्यामुळे आज बऱ्याच लोकांना याबद्दलची पुरेशी माहिती तर नाहीच पण बरेच गैरसमजही आहेत.
* देहदान का करावे ?
देहदान केलेल्या देहाचा उपयोग हा प्रथम वर्षीय वैद्यकीय शिक्षणासाठी अमूल्य मदत ठरतो. वैद्यकीय विद्यार्थ्यांना मानवी शरीराच्या रचनेचा शास्त्रोक्त पद्धतीने सखोल अभ्यास करण्यासाठी देहदान अतिशय उपयुक्त ठरते.
* देहदान कोण करू शकते ?
अठरा वर्ष पूर्ण झालेले सर्व नागरिक कायद्याने मृत्यूनंतर आपले देहदान करू शकतात. त्यासाठी जात, धर्म असा कोणताही भेदभाव नाही. मृत्यूनंतर देहदान करण्यासंबंधीच्या कायद्या प्रमाणे ( महाराष्ट्र अॅनाटॉमी अॅक्ट ) कोणत्याही व्यक्तीने आपल्या जिवंतपणी लेखी अथवा तोंडी देहदानाची इच्छा व्यक्त केली असेल किंवा त्या व्यक्तीच्या निधनानंतर जवळच्या नातेवाईकांची इच्छा असेल तर मृत व्यक्तीचा मृतदेह अधिकृत वैद्यकीय संस्थेमध्ये दान करता येतो.
* देहदाना संबंधी गैरसमज व वास्तव
अनेक जणांच्या मनात देहदाना विषयी गैरसमज आहेत जसे की- देहदान केलेल्या व्यक्तींच्या मृतदेहाची चिरफाड केली जाते , त्या मृतदेहाची विटंबना होते किवा त्या मृतदेहाचा यथोचीत सन्मान केला जात नाही, देहदान केलेल्या व्यक्तींच्या मृतदेहातील अवयव काढून घेतले जातात इत्यादी.त्याच प्रमाणे अनेक धार्मिक गैरसमजही आहेत उदा. आत्म्याला शांती मिळत नाही, मोक्ष मिळत नाही इत्यादी. परंतु वास्तवतः प्रथम वर्षीय एमबीबीएसच्या मुलांना शवविच्छेदनासाठी काढलेल्या मृतदेहाची ओळख ही गुप्त ठेवल्या जाते.त्या मृतदेहातील अवयव फक्त शैक्षणिक कार्यासाठीच वापरले जातात. मृतदेहाच्या सन्मानार्थ मुलांना अनेक सूचना दिल्या जातात तसेच ह्या विद्यार्थ्यांना एक प्रतिज्ञा दिली जाते जिला CADAVARIC OATH म्हणतात जेणेकरून वर्षभर शवविच्छेदनासाठी अभ्यासत असलेल्या देहांचा सन्मान हा टिकून ठेवला जातो त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात त्या मृतादेहाविषयी आयुष्यभर कृतज्ञता राहते.
* देहदान व अवयवदान यातील फरक
एखाद्या व्यक्तीचा नैसर्गिक मृत्यू झाल्यावर अधिकृत वैद्यकीय संस्थेत वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी संपूर्ण देह हा दान केला जातो तेंव्हा त्यास देहदान असे म्हणतात. एखाद्या रुग्णाचे (Brain Stem Death) झाली असल्यास परंतु त्या रुग्णाचे हृदय, फुफ्फुस, हे कृत्रिमरित्या श्वासोश्वासावर चालू असल्यास त्यांच्या कुटुंबियांच्या सहमतीने त्या व्यक्तीचे अवयव काढून इतर गरजू व्यक्तीस प्रत्यारोपण करणे म्हणजे अवयवदान.
* देहदानासाठी नोंदणी
ज्या व्यक्तीस मृत्यूनंतर देहदान करण्याची इच्छा असेल त्यांना डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेडच्या शरीररचनाशास्त्र विभागात नोंदणी करावी लागते. त्यासाठी स्व-स्वाक्षरीने भरलेले देहदान इच्छापत्र (Body Donation Form) ज्यावर दोन जवळच्या व्यक्तींच्या स्वाक्षऱ्या असाव्यात तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे नोंदणी न करताही एखाद्या व्यक्तीची मृत्यूपरांत देहदान करण्याची इच्छा असल्यास त्यांच्या नातेवाईकांच्या सहमतीने शरीररचनाशास्त्र विभागात देहदान स्वीकारले जाते.
* देहदान प्रक्रिया
देहदान करणाऱ्या व्यक्तीचा मृतदेह खालील नमूद बाबींची पूर्तता करून मृत्यूनंतर शक्य तितक्या लवकर वैद्यकीय महाविद्यालयात आणावा. मृत्यूनंतर सहा ते आठ तासांच्या आत मध्ये प्राप्त झालेल्या मृतदेहावर रासायनिक प्रक्रिया उत्तम प्रकारे होते.
सोबत आणावयाची कागदपत्रे
* नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिक यांनी दिलेले नैसर्गिक कारण असलेले मृत्यू प्रमाणपत्र (Death certificate).
* सोबत असलेल्या नातेवाईकांपैकी एका व्यक्तीच्या ओळखपत्राची सत्यप्रत.
* देहदान करणाऱ्या व्यक्तीच्या ओळखपत्राची सत्यप्रत.
* देहदान करणाऱ्या व्यक्तीचे दोन पासपोर्ट साईज फोटो.
* मृत्यूपूर्वी देहदानपत्र भरलेले असणे आवश्यक नाही.
३) मृत्यूचे कारण खालीलपैकी असल्यास मृतदेह स्वीकारले जात नाहीत.
* कुजण्याची प्रक्रिया सुरू झालेला मृतदेह (मृत्यूनंतर सहा ते आठ तास उलटून गेले असल्यास).
* गुप्तरोग (HIV, AIDS, SYPHILIS).
* रक्तातील कावीळ (Hepapitis-B)
* Bed sores (सदर व्यक्ती मृत्यूपूर्वी प्रदीर्घकाळ Bed ridden) असल्यास होणाऱ्या जखमा.
* संक्रमित क्षयरोग (Active-T.B.)
* धनुर्वात (Tetanus).
* रक्तातील जंतुसंसर्ग (Septicemia).
* Medico legal cases उदा. आत्महत्या, घातपात, विषबाधा असलेली प्रकरणे, (Burns).
* अपघात झालेला मृतदेह.
* नातेवाईकांची समंती नसलेला मृतदेह.
* देहदानाचे महत्व
एमबीबीएस चा विद्यार्थी जेव्हा DISSECTION हॉलमध्ये पहिल्यांदा प्रवेश करतो तेव्हा त्याच्यासमोर असतो एक देहदात्याचा मृतदेह त्या मृतदेहावर अनेक अवयवांचे अध्ययन करताना तो केवळ मृतदेह रहात नाही तर तो देह वैद्यकीय विद्यार्थ्यांना मानवतेचे व वैद्यकीय शिक्षणाचे धडे शिकवत असतो. प्रत्येक स्नायू, रक्तवाहिन्या, प्रत्येक हाड यामागे शास्त्रीय ज्ञानासोबतच एका अज्ञात दात्याची निस्वार्थ भावना दडलेली असते. जे डॉक्टर आज एखाद्याचे हृदय वाचवितात तेव्हा त्यांना हृदयाचा मार्ग शोधायला एखाद्या दात्याच्या शरीरानेच शिकविलेले असते हेच नव्हे तर प्रत्येक डॉक्टरांना प्रत्यक्ष शरीररचनाशास्त्राचा सखोल अभ्यास हा खूप महत्त्वाचा ठरतो आणि हेच विद्यार्थी पुढे जाऊन हजारो रुग्णांचे प्राण वाचवतात. विविध आजार, शस्त्रक्रिया, औषध विज्ञान यासंबंधीचे संशोधन हे या दात्यांच्या योगदानामुळेच शक्य होते. त्यामुळे देहदान हे सर्वात थोर दान आहे. आपण मृत्यूनंतर देखील शिक्षण आणि जीवनाच्या कार्यात सहभागी होऊ शकतो. अनेक ज्येष्ठ नागरिक हे आयुष्यभर समाजासाठी झटत असतात त्यांच्या इच्छेनुसार तर देहदान हे त्यांचे अंतिम महान असे कार्य ठरते. आज समाजात अनेक लोक या दानाचे महत्त्व जाणतात पण ते प्रत्यक्ष कृतीत आणत नाहीत त्यामागे गैरसमज, माहितीचा अभाव, भीती ,धार्मिक भावना इत्यादी कारणीभूत आहेत.
* देह्दानाविषयी आवाहन
शरीररचनाशास्त्र विभागामध्ये देहदान केल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयाविषयी वैयक्तिक कृतज्ञता सर्वांनाच वाटते व ती व्यक्तही केली जाते. देहदान केलेल्या व्यक्तींच्या नातेवाईक यांना मा. अधिष्ठाता व प्राध्यापक व विभागप्रमुख शरीररचनाशास्त्र विभाग यांचे मार्फत प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान केला जातो. देहदान ही एक वैद्यकीय मदतच नव्हे तर ती मानवतेचा सर्वोच्च अविष्कार आहे, मृत्यूनंतरही समाजासाठी जगण्याचा एक मार्ग आहे .आम्ही शरीररचनाशास्त्र विभागातर्फे आपल्याला आवाहन करतो की, चला आपण देहदाना विषयी समजून घेऊया, विचार करूया आणि एक सकारात्मक पाऊल उचलण्याचा, देहदान करण्याचा संकल्प करू या......
" माणूस मरणाने मरत नाही तो जगतो आपल्या विचारांनी,
कर्माने आणि देहदानासारख्या उदात्त निर्णयांनी......"
लेखक : डॉ.वैशाली व्यंकटेश इनामदार
प्राध्यापक व विभाग प्रमुख शरीररचनाशास्त्र विभाग
डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ,विष्णुपुरी ,नांदेड
टीप: देहदान फॉम हे शरीररचनाशास्त्र विभाग ,
डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ,विष्णुपुरी ,नांदेड येथे मिळतील.
देहदान करण्यासंबंधी खालील सहाय्यक प्राध्यापक यांचाशी संपर्क साधावा :
डॉ.पूर्वा कर्डीले (९८२३९६०६९० ) ,
डॉ.महेश शिंदे (९४२१३७५५४७),
डॉ .रचिता माळवतकर (९९७५१५८२८८).
वृत्त क्र. 768
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या मराठवाडा उपविभागीय कार्यालयाचे रविवारी बीड येथे उदघाटन
लाभार्थ्यांच्या समस्यांचे निवारण व योजनांचा व्यापक प्रसार हे उदघाटनाचे उद्दिष्ट
नांदेड दि. 25 जुलै :- अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनेची मराठवाड्यातील वाढती व्याप्ती लक्षात घेता, महामंडळाच्या मराठवाडा विभागासाठी उपविभागीय कार्यालयाचे उदघाटन रविवार 27 जुलै 2025 रोजी सकाळी 11 वा. यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, बीड येथे होणार आहे. या उपविभागीय कार्यालयाचे उदघाटन समारंभाच्या निमित्ताने बीड येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनेचा मराठवाड्यात प्रचार, प्रसारासाठी व्याप्ती वाढवणे. मराठवाड्यातील जिल्ह्यातील लाभार्थ्यांची महामंडळाच्या निगडित कामासाठी ई-सेवा केंद्र, सीएससी सेंटर, खाजगी ऑनलाईन सेंटर अथवा एजंटाकडून होणारी फसवणूक टाळणे. मराठवाड्यातील मराठा समाजापर्यंत पोहोचून त्यांना महामंडळाच्या योजनांचा लाभ मिळवून देऊन जास्तीत जास्त लाभार्थी उद्योजक घडविणे. यासाठी बँकेत प्रलंबित कर्ज प्रकरण संदर्भातील तक्रार निरसन करुन व्याज परतावा त्रुटींबाबत मार्गदर्शन करुन क्लेम होल्ड, मंजुरी होल्ड, विषयी हेल्पलाईन सेंटरच्या माध्यमातून समस्या निवारण करणे असे या उपविभागीय कार्यालयाचे उद्दिष्ट असणार आहे.
मराठवाडा विभागातील हे कार्यालय सुसज्ज आणि अद्ययावत असणार आहे. पात्र लाभार्थ्यांना याठिकाणी महामंडळाकडून देण्यात येणाऱ्या सर्व सुविधा येथे उपलब्ध असतील. या उपविभागीय कार्यालयामुळे मराठवाड्यातील लाभार्थी यांचा वेळ वाचेल. अधिकाधिक लाभार्थी यांना महामंडळाच्या योजनांचा लाभ देण्यासही लाभार्थी व महामंडळ यांना सोयीचे होईल. तालुकास्तरावर देखील महामंडळाच्या योजना पोहोचविण्यासाठी आगामी काळात दौरे करण्यात येणार असल्याचे महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी सांगितले.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनेची व्याप्ती वाढविण्यासाठी उपविभागीय कार्यालय राजू कॉम्पलेक्स, दुसरा मजला, हिना हॉटेल समोर, जालना रोड, बीड येथे सुरु करण्यात येत आहे. यानिमित्त यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, बीड येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी नागरिकांनी महामंडळाच्या या उपविभागीय कार्यालय उद्घाटन समारंभास उपस्थित राहावे. तसेच या मेळाव्यात सहभागी होवून महामंडळाच्या योजनेची माहिती घ्यावी. तसेच लाभार्थ्यांनी स्वत:च्या समस्याचे निवारण करुन घ्यावे, असे आवाहन विभागीय समन्वयक प्रवीण आगवण पाटील यांनी केले आहे.
00000
वृत्त क्र. 767
पीक कापणी प्रयोगात अचूकता राखणे आवश्यक- किरण अंबेकर
जिल्हास्तरीय पीक कापणी प्रयोग प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न
नांदेड दि. 25 जुलै :- पीक विम्यासाठी तसेच पीकांचा आढावा काढण्यासाठी पीक कापणी प्रयोगांचे अन्यन्य साधारण महत्व आहे. यामुळे पीक कापणी प्रयोगात अचूकता राखणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांनी केले. ते पिकांच्या उत्पन्नाचा अंदाज व आढावा काढण्यासाठी आयोजित जिल्हास्तरीय खरीप हंगाम सन 2025-26 पीक कापणी प्रयोगाच्या प्रशिक्षण कार्यशाळेच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते.
पीक विम्यासाठी तसेच पीकांचा आढावा काढण्यासाठी पीक कापणी प्रयोगांचे महत्व असल्याने सर्व संबंधीत अधिकारी कर्मचारी यांनी आवश्यक ती दक्षता घेण्याबाबत त्यांनी सूचना दिल्या. आज कै. डॉ. शंकरराव चव्हाण, नियोजन भवन मुख्य सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे पीक कापणी प्रयोग प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत, प्रशिक्षक शामराव बिंगेवार तसेच महसूल व कृषी विभागाचे अधिकारी आदीची उपस्थिती होती.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी आपल्या प्रास्ताविकात पीक कापणीचे महत्व विषद केले. पीक विमा नुकसान भरपाईसाठी पीक कापणी प्रयोगांस विशेष महत्व आहे. त्यामुळे सर्व संबंधीत अधिकारी कर्मचारी यांनी शास्त्रोक्त पध्दतीने नेमून दिलेले पीक कापणी प्रयोग पुर्ण करावेत असे आवाहन त्यांनी केले. मुख्य प्रशिक्षक शामराव बिंगेवार यांनी याबाबत सखोल मार्गदर्शन केले. कापणी प्रयोगाचे प्लॉट निवडीचे निकष, उत्पादन मोजणी तंत्र, संकलित माहितीचे विश्लेषण व अहवाल सादरीकरणाची पद्धत याचे प्रात्यक्षिक सादर केले. तसेच पिक उत्पादनाचा अचूक अंदाज लावताना होणाऱ्या सर्वसाधारण चुका व त्यावर उपाययोजना याविषयी सविस्तर माहिती दिली.
यावेळी उपविभागीय अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी , महसूल, जिल्हा परिषद व कृषी विभागातील पर्यवेक्षीय अधिकारी, क्षेत्रीय कर्मचारी उपस्थित होते. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी तहसिलदार विपीन पाटील, समअ बालासाहेब भराडे, तंत्र सल्लागार गोविंद देशमुख, सुप्रिया वायवळ, वसंत जारीकोटे आदींनी परिश्रम घेतले.
00000
वृत्त क्र. 766
वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता
नांदेड जिल्हयासाठी आज ऑरेंज अलर्ट
हवामानशास्त्र केंद्राने दिल्या सूचना
नांदेड दि. 25 जुलै :- प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी आज दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दिनांक 25 जुलै रोजी येलो व 26 जुलै रोजी ऑरेज अलर्ट जारी केलेला आहे. 25 जुलै रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी 30 ते 40 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे.
शनिवार 26 जुलै 2025 रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाचा होण्याची अधिक शक्यता वर्तविली आहे. या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि जनतेने खबरदारी घ्यावी. नागरिकांनी खबरदारीची उपाययोजना म्हणून पुढील प्रमाणे काळजी घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांनी केले आहे.
या गोष्टी करा
विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा. तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा.
या गोष्टी करु नका
आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका. उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका. धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका. जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे, असेही आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांनी केले आहे.
00000
वृत्त क्र. 765
शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक
करणाऱ्या बसेसची तपासणी
कारवाईत चालकांकडून 7 लाख 4 हजार रुपयाचा दंड वसूल
नांदेड दि. 24 जुलै :- प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायुवेग पथकामार्फत 18 ते 30 जुन
2025 कालावधीत वायुवेग पथक शालेय विद्यार्थ्यांची वाहतुक करणाऱ्या स्कुल बसची मोटार वाहन कायद्यातील तरतूदी व प्रचलित शासन नियमानुसार तपासणी करण्यात आली आहे. या तपासणी मोहिमेत स्कुल बसची सर्व वैध कागदपत्रे व बसची
तपासणी करण्यात येते. या कारवाईत 89 बसेवर कारवाई करण्यात आली असून 7 लाख 4 हजार रुपयाचा दंड आकारण्यात
आला आहे.
या तपासणी दरम्यान
वैध कागदपत्रे सादर न करणाऱ्या, विनापरवाना अथवा परवान्याच्या
अटीचा भंग करणे, योग्यता प्रमाणपत्र नसणे, वाहनात बेकायदेशीर फेरबदल करणे, सीसीटीव्ही व ट्रकींग
प्रणालीचा वापर न करणे, शालेय विद्यार्थ्यांची
अवैध वाहतुक करणाऱ्या, आसन क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्याची वाहतुक करणाऱ्या, वैध स्कुलबस परवाना नसलेल्या
तसेच मोटार वाहन कायद्यातील तरतुदींचे पालन न करणाऱ्या स्कुलबसेसवर दंडात्मक तसेच मोटार वाहन कायद्यातील तरतुदीप्रमाणे
कारवाई करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील सर्व संघटना,
स्कुलबस चालक-मालक यांनी
स्कुलबस तपासणी दरम्यान दंडात्मक व मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार
कार्यवाही टाळावी. यासाठी शालेय विद्यार्थ्यांची
अवैध वाहतुक करू नये. वाहनाची सर्व वैध कागदपत्रे सोबत ठेवावीत. मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनूसार तपासणी दरम्यान मागणी
केल्यास वैध कागदपत्रे सादर करावीत. शालेय विद्यार्थ्याची वाहतूक नियमानुसार करावी. वाहन अटकाव व दंडात्मक
कारवाई टाळावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी
केले आहे.
0000
26 जुलै #कारगिल #विजयदिवस शहीद झालेल्या वीर जवानांना विनम्र #अभिवादन...!