Saturday, November 29, 2025

 वृत्त क्रमांक 1247


मतमोजणी केंद्र परिसरात प्रतिबंधीत आदेश

 

नांदेड दि. 29 नोव्हेंबर :- जिल्‍ह्यातील गरपरिषद/नगरपंचायत बिलोलीदेगलुरधर्माबादहदगावहिमायतनगरकंधारकुंडलवाडीमुदखेडमुखेडउमरीभोकरकिनवटलोहा निवडणूक मुख्‍यालयी मतमोजणी केंद्र परिसरात बुधवार 3 डिसेंबर 2025 रोजी मतमोजणी केंद्रापासून 200 मीटर परिसरातील सर्व पक्षकारांचे मंडपे, सर्व दुकाने, मोबाईल, कॉडलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्‍वनीक्षेपके, सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर इलेक्‍ट्रॉनिक्‍स उपकरणे, निवडणुकीच्‍या कामाव्‍यतीरिक्‍त खाजगी वाहन, संबंधीत पक्षाचे चिन्‍हांचे प्रदर्शन व निवडणूकीच्‍या कामाव्‍यतीरीक्‍त व्‍यक्‍तीस प्रवेशास प्रतिबंधीत करण्‍यात येत आहे.

 

याबाबतचा आदेश भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्‍वये जिल्‍हादंडाधिकारी राहूल कर्डिले यांनी निर्गमीत केला आहे. हा आदेश नांदेड जिल्‍ह्यातील नप/नपं-बिलोलीदेगलुरधर्माबादहदगावहिमायतनगरकंधारकुंडलवाडीमुदखेडमुखेडउमरीभोकरकिनवटलोहा निवडणूक 2025 च्‍या अनुषंगाने मतमोजणीच्‍या दिवशी बुधवार 3 डिसेंबर2025 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते मतमोजणी प्रक्रिया संपेपर्यन्‍त अंमलात राहणार आहे.

0000 

 वृत्त क्रमांक 1246

मतदान केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

 

नांदेड दि. 29 नोव्हेंबर :- जिल्‍ह्यात स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थेच्‍या नगरपरिषद/नगरपंचायत निवडणूकीच्या मतदानाच्या दिवस मंगळवार 2 डिसेंबर 2025  रोजी सर्व मतदान केंद्र परिसरात भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 प्रमाणे प्रतिबंधात्‍मक आदेश जिल्‍हादंडाधिकारी राहूल कर्डिले यांनी निर्गमीत केले आहेत. या नगरपरिषद/ नगरपंचायत निवडणूक मतदानाच्‍या दिवशी 2 डिसेंबर रोजी मतदान सुरु झाल्‍यापासून ते मतदान संपेपर्यन्‍त हा आदेश अंमलात राहणार आहे.

 

नांदेड जिल्ह्यातील नगरपरिषद/ नगरपंचायत-बिलोलीदेगलुरधर्माबादहदगावहिमायतनगरकंधारकुंडलवाडीमुदखेडमुखेडउमरीभोकरकिनवटलोहा या निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्‍याय वातावरणात पार पाडण्‍याच्‍या दृष्‍टीकोणातून कायदा व सुव्‍यवस्‍था अबाधीत राहण्‍यासाठी ज्‍या ठिकाणी मतदान होणार आहे त्‍या ठिकाणापासून 200 मीटर परिसरातील सर्व पक्षकारांचे मंडपे, सर्व दुकाने, मोबाईल, कॉडलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्‍वनीक्षेपके, सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर इलेक्‍ट्रॉनिक्‍स उपकरणे, निवडणुकीच्‍या कामाव्‍यतीरिक्‍त खाजगी वाहन, संबंधीत पक्षाचे चिन्‍हांचे प्रदर्शन व निवडणूकीच्‍या कामाव्‍यतीरीक्‍त व्‍यक्‍तीस प्रवेश करण्‍याकरीता मंगळवार 2 डिसेंबर 2025 रोजी प्रतिबंधीत करण्‍यात आले आहे.

00000

Thursday, November 27, 2025

 वृत्त क्रमांक 1245

जिल्हास्तर युवा महोत्सव सन 2025-25 चे आयोजन यामध्ये युवक-युवतींचा सहभाग

नांदेड- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तर युवा महोत्सव सन 2025-26 चे आयोजन दि.03 ते 04 डिसेंबर,2025 या कालावधीत करण्याचे निश्चित झाले आहे.

युवा कार्यक्रम खेळ मंत्रालय भारत सरकार यांचे पत्रान्वये राष्ट्रीय युवा महोत्सवाचे रुपांतर VBYLD मध्ये करण्यात आले असून तो विकसित भारत 2047 या दृष्टीकोनाशी जोडण्यात आला आहे. या पार्श्वभुमीवर NYK-VBYLD-2026 चे आयोजन युवा कार्यक्रम व खेळमंत्रालयाकडुन केले जाणार आहे. त्यामध्ये 15 ते 29 वयोगटातील युवकांचा सहभाग अपेक्षित आहे. यामध्ये राज्य/ केंद्रशासीत प्रदेशांनी निवडलेल्या पथकांमध्ये स्पर्धा खालील 4 मार्ग (Track) मध्ये NYF-VBYLD-2026 मध्ये दिल्ली येथे होणार आहेत. 1) Cultural and Innovation Track, 2) Viksit Bharat Challenge Track, 3) Design for Bharat, 4) Hack for Social cause

त्यास अनुसरुन जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर युवा महोत्‍सव- सांस्कृतिक व नवोपक्रम (Cultural and Innovation Track) आयोजन करण्यात येणार असून यामध्ये विकसित भारत जिल्हास्तर युवा महोत्स सांस्कृतीक व नवोपक्रम मार्ग यामध्ये पुढीलप्रमाणे कला प्रकार संख्या अंतर्भुत आहेत. 1) सांस्कृतिक कला प्रकार:- समुह लोकनृत्य (सहभाग संख्या 10), लोकगीत (सहभाग संख्या 10) कौशल्य विकास:- कथालेखन (सहभाग संख्या 03), चित्रकला (सहभाग संख्या 02, वक्तृत्व स्पर्धा (इंग्रजी व हिंदी) (सहभाग संख्या 02), कविता (500 शब्द मर्यादा सहभाग संख्या 03) असे एकुण 30 सहभाग संख्या राहील. या स्पर्धेमध्ये सहभागासाठी 15 ते 29 वयोगट राहील (दि.12 जानेवारी,2026 या दिनांक रोजी वयाची परिगणना 15 ते 29 असावी) जन्म दिनांक बाबत सबळ पुरावे द्यावे लागेल.

युवा महोत्सव म्हणजे युवकाना आपले कलागुण दाखविण्याचे एक खुले व्यासपीठ आहे. यामध्ये युवकांचा सर्वागिण विकास करणे, देशाची संस्कृती व परपंरा जतन करणे, राष्ट्रीय एकात्मता वाढिस लावणे, युवकांना विज्ञान व तंत्रज्ञान यामधील नवसंकल्पना “Innovation in Sciecnce and Technology” चे महत्व पटवुन देणे, शिक्षण, उद्योग व्यवसाया सोबतच शेती या व्यवसायाशी युवकाची ओळख करून देणे, सामाजिक विकासात विज्ञानाचे महत्त्व युवकाना पटवुन देणे इत्यादी बाबीवर युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे.

*सहभाग वयोगट व स्पर्धा कृती कार्यक्रमः-*

या स्पर्धेमध्ये सहभागासाठी 15 ते 29 वयोगट राहील. (दि. 12 जानेवारी 2026 या दिनांक रोजी वयाबाबत परिगणना 15 ते 29 असावी. * जिल्ह्यातील इंजिनियरिंग कोलेज, वैद्यकीय महविद्यालये, कृषि महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्था, सांस्कृतिक मंडळे इ. तसेच 15 ते 29 वयोगटातील युवांना सदर युवा महोत्सवामध्ये सहभागासाठी पात्रता राहील. * महाराष्ट्राचा रहिवाशी असावा. * स्पर्धकांनी नाव पत्ता, जन्म दिनांक, संपर्क क्रमांक, ई मेल आयडी व वयाबाबत सबळ पुरावा सादर करणे आवश्यक राहील,

यात सहभागी होण्यासाठी जिल्हातील कृषी महाविद्यालये, कनिष्ठ व वरीष्ठ महाविद्यालय, अभियांत्रीकी महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, महिला मंडळ, महिला बचत गट, युवकांसाठी कार्य करणाऱ्या स्वंयसेवी संस्था, नेहरू युवा केंद्र, राष्ट्रीय सेवा योजना (NSS), इत्यादी संस्थेतील युवक व युवती यांना सहभागासाठी आमंत्रीत करण्यात येत आहे. युवा महोत्सवामध्ये प्रत्येक कलाप्रकारासाठी विजयी स्पर्धकांना आकर्षक रोख बक्षीस, ट्राफीज देवुन गौरविण्यात येणार आहे. तसेच जिल्हास्तरावर विजयी युवकांना विभागस्तरीय युवा महोत्सवामध्ये सहभागी होण्याचा मान मिळणार आहे.

नांदेड जिल्हायातील उपरोक्त कला प्रकारामध्ये इच्छुक असणाऱ्या युवक व युवतीनी आपली नावे/ प्रवेशिका दि. 02 डिसेंबर,2025 या कालावधीत कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, स्टेडीयम परीसर, नांदेड येथे सादर करावेत. व अधिक माहितीकरीता कार्यासन प्रमुख श्री.बालाजी शिरसीकर (राज्य क्रीडा मार्गदर्शक) संपर्क क्र. 9850522141, 7517536227 यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले आहे.

00000

वृत्त क्रमांक 1244

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू

नांदेड दि. 27 नोव्हेंबर :- नांदेड जिल्ह्यात 28 नोव्हेंबरच्या सकाळी 6 वाजेपासून ते 12 डिसेंबर 2025 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 28 नोव्हेंबरच्या सकाळी 6 वाजेपासून ते 12 डिसेंबर 2025 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहील. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.

अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

00000


वृत्त क्रमांक 1243

नांदेड जिल्हा बालविवाहमुक्त करण्यासाठी शपथ व रॅलीचे आयोजन

जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

नांदेड दि.२७ नोव्हेंबर : -भारत सरकारच्या “बालविवाहमुक्त भारत 100 दिवस संकल्प महाराष्ट्र मोहिमेला” नांदेड जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून महिला व बालविकास विभाग, जिल्हा प्रशासन, विविध शासकीय विभाग, सामाजिक संस्था आणि जनसेवा प्रतिष्ठान संस्थेचा या उपक्रमाला जाहीर पाठिंबा आहे.

जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गणेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली बालविवाह प्रतिबंधासाठी विविध जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. या अंतर्गत बालविवाह प्रतिबंधक रॅली, प्रतिज्ञा, कॅण्डल मार्च, मंदिरांबाहेर बालविवाहमुक्त नोटीस बोर्ड लावणे, धर्मगुरूंमार्फत शपथ, ‘बालविवाहमुक्त ग्राम’ ठराव अशा उपक्रमांचे आयोजन जिल्ह्यात होत आहे.

याच मोहिमेचा एक भाग म्हणून राजर्षी शाहू विद्यालय व ज्युनियर कॉलेज, नांदेड येथे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी आणि उपस्थित मान्यवरांनी “नांदेड जिल्हा बालविवाहमुक्त करणार” असा दृढ संकल्प व्यक्त करत शपथ घेतली.

कार्यक्रमास जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सौ. विद्या आळणे,शाळेचे मुख्याध्यापक सुभाष तिवडे, शिक्षकवृंद, जनसेवा प्रतिष्ठान संस्थेचे अरुण कांबळे, जिल्हा समन्वयक निलेश कुलकर्णी, आशा सूर्यवंशी, प्रकल्प समन्वयक मोनाली धुर्वे, सामाजिक कार्यकर्त्या शकीला शेख आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन शिक्षक गोपाळ मोरे यांनी केले.

०००००



Wednesday, November 26, 2025

वृत्त क्रमांक 1242

सायट्रस प्रोसेसिंगसाठी फळ उत्पादन व प्रक्रियाक्षेत्र उपयुक्त-जिल्हाधिकारी

कृष्णूर येथे सह्याद्री फार्म्स सायट्रस प्रोसेसिंग युनिट भेट

नांदेड, दि. 26 नोव्हेंबर :- नांदेडच्या कृष्णूर एमआयडीसी परिसरात सायट्रस प्रोसेसिंगसाठी उपलब्ध असलेली एकात्मीक सुविधा जिल्ह्यातील फळ उत्पादन व प्रक्रिया क्षेत्रासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.

संविधान दिनानिमित्त आज जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी कृष्णूर एमआयडीसी येथील सह्याद्री फार्म्स सायट्रस प्रोसेसिंग युनिटला भेट दिली. यावेळी ते बोलत होते. सह्याद्री फार्म्सच्या टीमतर्फे जिल्हाधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले. 

सह्याद्री फार्म्सचे कार्य, सायट्रस प्रोसेसिंग युनिटची वैशिष्ट्ये, कार्यपद्धती व कृषी मूल्यसाखळीबाबत सादरीकरण करण्यात आले. सादरीकरणानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी युनिटमधील विविध विभागांची पाहणी केली. यामध्ये सायट्रस फळांचे इनकमिंग क्षेत्र, गुणवत्ता तपासणी, फळ उतरवणे, जेबीटी मशीनद्वारे प्रक्रिया, गुणवत्ता नियंत्रण प्रयोगशाळा तसेच शून्य कचरा धोरणावर आधारित उत्पादन प्रणाली यांचा समावेश होता. आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित उच्च दर्जाच्या लगदा (रस), तेल तसेच इतर मूल्यवर्धित उत्पादने निर्माण करण्याची क्षमता पाहून ते विशेष प्रभावित झाले.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी नांदेड जिल्ह्यात लिंबूवर्गीय फळांची लागवड वाढवणे, शेतकऱ्यांसाठी जागरूकता कार्यशाळा आयोजित करणे तसेच केळी, जांभूळ, आंबा इत्यादी फळ पिकांसाठी एंड-टू-एंड इकोसिस्टम विकसित करण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक सहकार्य देण्याची तयारी दर्शविली. 

00000




 वृत्त क्रमांक 1241

श्री गुरू गोबिंदसिंघजी शासकीय औदयोगिक प्रशिक्षण संस्थेत संविधान दिन साजरा

नांदेड दि. 26 नोव्हेंबर :- भारताचे संविधान अंगिकारण्यात आलेल्या दिवसाच्या  स्मरणार्थ दरवर्षी प्रमाणे आज 26 नोव्हेंबर 2025 रोजी श्री गुरू गोबिंदसिंघजी शासकीय औदयोगिक प्रशिक्षण संस्थेत संविधान दिन साजरा करण्यात आला. संविधान दिन साजरा करण्यामागील उददेश प्रशिक्षणार्थ्यांमध्ये सामाजिक व नागरी जबाबदारीची जाणीव निर्माण करणे, संविधानातील मुल्यांविषयी आदरभाव दृढ करणे आणि लोकशाहीप्रती कर्तव्यभाव जागृत करणे हा आहे. भारतीय संविधानास 75 वर्षे पुर्ण झाल्यानिमित्ताने संविधान अमृत महोत्सव "घर घर संविधान "या कार्यक्रमांतर्गत 26 नोव्हेंबर ते 26 जानेवारी 2026 या कालावधीत विविध स्पर्धा/कार्यक्रम/ उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

आज संविधान दिनाचे औचित्य साधून सकाळी संविधान सन्मान रॅली काढण्यात आली. संविधान दिनाचे महत्व विषद करणेसाठी श्री गुरू गोबिंदसिंघजी शासकीय औदयोगिक प्रशिक्षण संस्थेत कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. कार्यक्रमासाठी जिल्हा कौशल्य रोजगार, उदयोजकता विभागाचे सहायक आयुक्त डॉ. राजपाल कोल्हे, से.नि. प्राध्यापक डॉ. अनंत राउत, व्यवस्थापक सोल्युशन करीअर अकॅडमीचे प्रा. शंकर पुरी, से.नि. लेखाधिकारी असोरे व्ही.आर, सहा.प्रशिक्षणार्थी सल्लागार  अन्नपूर्णे पी. के. हे उपस्थित होते.  

राज्यातील औदयोगिक प्रशिक्षण संस्थामध्ये विदयार्थ्यांना तांत्रिक ज्ञान देउन उदयोगास आवश्यक असणारे प्रशिक्षित मनुष्यबळ पुरविण्यात येते.  बदलत्या काळात औदयोगिक प्रशिक्षण संस्थामधील प्रशिक्षणार्थ्यांना तांत्रिक ज्ञानाबरोबरच सामाजिक जबाबदारी त्यांचे अधिकार व कर्तव्य या संदर्भात मार्गदर्शन असणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने संचालनालयातर्फे राज्यातील सर्व शासकीय / खाजगी औदयोगिक प्रशिक्षण संस्थामध्ये महिन्यातून एकदा एक सामाजिक प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित करणेबाबत सुचित केले  आहे.  

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे प्राचार्य तथा जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी विश्वंभर कंदलवाड  यांनी केले. प्रास्ताविकपर भाषणात त्यांनी संविधानाचे महत्व विषद करून सर्वांना शुभेच्छा दिल्या.  कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते  म्हणून डॉ. अनंत राऊत यांनी  मार्गदर्शनपर भाषणात संविधानाचे महत्व, संविधान उददेशिकांचा अर्थ  विषद केला. माणसाची श्रेष्ठता त्याच्या गुणवत्तेवर अवलंबून असते. मनुष्याने आपल्या जीवनामध्ये बुध्दीवाद/विज्ञानवादाचा पुरस्कार केला पाहिजे.  आपल्या राष्ट्रीय प्रतिकांचा सन्मान केला पाहिजे.  सत्य, अहिंसा, धर्मनिरपेक्ष, बुध्दीवादी, विज्ञानवादी, समृध्द भारत घडवण्यासाठी संविधान अंगीकारणे गरजेचे आहे असे त्यांनी यावेळी नमूद केले. 

शंकर पुरी यांनी प्रशिक्षणार्थ्यांना करीअर विषयी मार्गदर्शन केले. स्पर्धा परीक्षेची तयारी कशाप्रकारे करावी तसेच यशस्वी होणेसाठी संयम, धैर्य, चिकाटी व सातत्य आवश्यक आहे असे सांगितले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संस्थेचे कार्यक्रमाधिकारी पोतदार डी. ए. यांनी तर आभार प्रदर्शन गटनिदेशक कलंबरकर एम. जी. यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.  कार्यक्रम यशस्वीकरणेसाठी संस्थेतील सर्व कर्मचा-यांनी सहकार्य केले.

000000



वृत्त क्रमांक 1240

संविधान दिनानिमित्त भव्य संविधान रॅली 

संविधान प्रस्ताविकेचे सामुहिक वाचन

नांदेड दि. 26 नोव्हेंबर :- समाज कल्याण कार्यालयाच्यावतीने आज संविधान दिनानिमित्त भव्य संविधान रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, अतिरिक्त जिल्हाधिकारी रत्नदीप गायकवाड, सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांचे हस्ते हिरवी झेंडी दाखवून संविधान रॅलीची सुरुवात करण्यात आली.  

यावेळी मान्यवरांच्या हस्ते महात्मा ज्योतीबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. तसेच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार, इतर मागास बहुजन कल्याणचे सहाय्यक संचालक सचिन खुने, सहाय्यक लेखाधिकारी राहूल शेजुल, समाज कल्याण अधिकारी गजानन नरवाडे, सहाय्यक लेखाधिकारी संतोष चव्हाण, संजय कदम तसेच अशोक गोडबोले, गणेश तादलापूरकर, (प्रदेश अध्यक्ष संविधान बचाव समिती),  भगवान ढगे, भिमराव हटकर, सामाजिक कार्यकर्ते व मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले.

या संविधान रॅलीचा मार्ग महात्मा ज्योतीबा फुले पुतळा ते अण्णाभाऊ साठे चौक, हिंगोलीगेट, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या पर्यंत संविधान रॅली काढण्यात आली. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळयास जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांनी कार्याक्रमाचे प्रास्तावीकात  भारतीय राज्य घटना ही जगातील सर्व श्रेष्ठ राज्यघटना असून जिल्हयातील सर्व नागरिकांनी त्याचा अभ्यास करावा व घटनेने दिलेले अधिकार व कर्तव्य याचे पालन करावे असे मनोगत व्यक्त केले. 

जिल्हाधिकारी राहुल कर्डीले हे म्हणाले की, समता, न्याय, बंधूता धर्मनिरपेक्षता आणि समानता या संविधान मुल्याची जोपासना प्रत्येक नागरीकांनी केली पाहीजे असे मनोगत व्यक्त करुन उपस्थितांना संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या. जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांना सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनीगीरे यांच्या हस्ते संविधान प्रास्ताविकेचे फ्रेम देवून सन्मान करण्यात आला. तसेच जिल्ह्यातील समाज भुषण पुरस्कार प्राप्त व्यक्ती, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते संविधान प्रास्ताविकेचे फ्रेम देवून गौरव करण्यात आला.

समाज कल्याण कार्यालय, इतर मागासवर्ग बहुजन कल्याण विभाग तसेच  जिल्ह्यातील विविध महामंडळाचे व्यवस्थापक, विविध शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी व स्काऊट गाईड व एन.एसी.सी. चे शालेय विद्यार्थी, सामजिक कार्यकर्ते तसेच बार्टीचे समतादूत असे एकूण जवळपास 1200 विद्यार्थी, अधिकारी कर्मचारी, नागरीकांची उपस्थिती होती.

या संविधान रॅलीमध्ये पोलिस अधिक्षक कार्यालीयातील पोलिस बँड पथक, बँड पथक संच यांनी देशभक्ती गिते सादर केले. या संविधान रॅलीमध्ये केंब्रीज ‍विद्यालय, आंध्रा समिती तेलगु विद्यालय, प्रतिभा निकेतन हायस्कुल, गुजराथी हायस्कुल, पंचशिल विद्यालय, गुरुगोविंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शांती निकेतन पब्लीक स्कुल, ऑक्सफर्ड इंटरनॅशलन स्कुलचे शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते. या रॅलीस सहभागी झालेल्या शालेय विद्यार्थ्यांना सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाकडून पाणी बॉटल, केळी व बिस्कीटाचे वाटप करण्यात आले. या संविधान रॅलीस जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. 

00000





Tuesday, November 25, 2025

 वृत्त क्रमांक 1239

संविधान अमृत महोत्सवानिमित्त विविध उपक्रम

संविधान प्रभातफेरीचे 26 नोव्हेंबर रोजी आयोजन

 नांदेड, दि. 25 नोव्हेंबर :- भारतीय संविधानास 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त संविधान अमृत महोत्सव “घर घर संविधान” शासन निर्णय परिपत्रक 18 नोव्हेंबर 2025 नुसार 26 नोव्हेंबर 2025 ते 26 जानेवारी 2026 या कालावधीत सर्व शासकीय विभागाचे कार्यालयात, महाविद्यालये, शाळा, वसतिगृहामध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्याचे निर्देशित करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने नांदेड जिल्ह्यातील सर्व शासकीय विभागाचे कार्यालय, महाविद्यालय, शाळा, निवासी शाळा व मुला-मुलींचे शासकीय वसतिगृहामध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी आदेशीत केले आहे.

बुधवार 26 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 8 वा. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यापासुन शिवाजीनगर, कलामंदिर, मुथा चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत संविधान प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले आहे. सदरहु संविधान प्रभातफेरीमध्ये सर्व नागरीकांनी सहभागी होण्याचे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केली आहे.

0000000

 वृत्त क्रमांक 1238

इलेक्ट्रॉनिक माध्यमांव्दारे प्रसारीत करण्यात येणाऱ्या जाहिरातींचे प्रमाणीकरण करणे आवश्यक

निवडणूक जाहिरात प्रमाणीकरणासाठी समिती

नांदेड, दि. 25 नोव्हेंबर :- नगर परिषद व नगरपंचायतीच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मुक्त, निर्भय, पारदर्शक आणि प्रत्येक राजकीय पक्ष व उमेदवाराला समान संधी मिळावी यासाठी राज्य निवडणूक आयोगाने माध्यम क्षेत्रातील सर्व नियमांचे काटेकोर अंमलबजावणी सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने व्यापक मार्गदर्शक सूचना आणि जाहिरातीतील आचारसंहितेचे पालन बंधनकारक करण्यासाठी जिल्हा व राज्यस्तरावर माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समित्या कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेली आहे. उमेदवारांमार्फत प्रचारासाठी इलेक्ट्रॉनिक / सोशल मिडीयास देण्यात येणाऱ्या जाहिरांतीचे पूर्व प्रमाणिकरण या समितीमार्फत केल्या जाते. 

महाराष्ट्र शासनाच्या 9 ऑक्टोबर 2025 रोजीच्या अधिसूचनेनुसार सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे प्रसारित/प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक विषयक प्रस्तावित जाहिरातींचे प्रसारमाध्यम प्रमाणन व सनियंत्रण समितीकडून पूर्व प्रमाणन करून घेणे आवश्यक आहे. इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये दूरदर्शन, उपग्रह वाहिन्या, केबल वाहिन्या, यूट्यूब वाहिन्या, केबल नेटवर्क, आकाशवाणी, खासगी एफएम वाहिन्या, चित्रपटगृह, सार्वजनिक ठिकाणचे दृकश्राव्य फलक (ऑडीओ व्हिज्युअल डिसप्ले), ई-वृत्तपत्रे, बल्क एसएमएस, व्हाइस एसएमएस, समाजमाध्यमे, संकेतस्थळे आदींचा समावेश होतो.

मुद्रित माध्यमांद्वारे प्रसिध्द करावयाच्या जाहिरातींचे पूर्वप्रमाणन करण्याची आवश्यकता नाही. परंतु, अशा माध्यमातून जाहिरातील प्रसिध्द करताना आचारसंहिता किंवा कोणत्याही कायद्याचे उल्लंघन होता कामा नये. तसेच, इतर प्रत्येक मुद्रित साहित्यावर प्रकाशक, मुद्रणालय, पत्ता, प्रत क्रमांक आणि प्रत संख्या नमूद असणे बंधनकारक आहे. उल्लंघन आढळल्यास प्रेस अॅक्टसह लागू प्रचलित कायद्यांनुसार कारवाई होईल. संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक जाहीर प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर मुद्रित, इलेक्ट्रॉनिक, समाजमाध्यमे आदी माध्यमाद्वारे कोणत्याही प्रचारविषयक जाहिराती देता येणार नाहीत.

अर्जाचा नमुना व आवश्यक माहिती जिल्हा माहिती कार्यालय, नांदेड, पार्वती निवास, खुरसाळे हॉस्पिटल, यात्री निवास रोड, बडपूरा नांदेड येथून उपलब्ध करून घेता येईल. अर्जासोबत जाहिरातींची इलेक्ट्रॉनिक स्वरुपातील प्रत (पेनड्राईव्ह) आणि साक्षांकित जाहिरात संहिता जोडणे बंधनकारक आहे. जाहिरातींची कोणतीही देयके धनादेश, धनाकर्ष ऑनलाईन पद्धतीने अदा करण्यात येतील. अन्य भाषांतील जाहिरातींसाठी मराठी अनुवादित साक्षांकित केलेली प्रत व नोटराईज्ड अनुवाद प्रत जोडणे आवश्यक आहे. 

00000

वृत्त क्रमांक 1237

26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करण्याचे निर्देश   

 नांदेड दि. 25 नोव्हेंबर :- भारतीय संविधानाची नागरिकांना माहिती असावी व त्यासंबंधी जनजागृती व्हावी या उद्देशाने दरवर्षी 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून पाळण्यात येतो. जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांनी हा दिवस साजरा करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी नांदेड यांनी  दिले आहेत.  

या दिनानिमित्त भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन शासकीय कार्यालये, महामंडळे, शाळा, महाविद्यालये इत्यादी ठिकाणी करण्यात यावे. तसेच वादविवाद स्पर्धा, निबंध स्पर्धा आयोजित कराव्यात. विद्यापीठामधून विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात यावे. तसेच शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना संविधानाची ओळख व्हावी यासाठी संविधानाविषयी जनजागृती व्हावी या उद्देशाने प्रभात फेऱ्यांचे आयोजन करावे. संविधानातील महत्वाची कलमे ठळकरित्या दिसतील असे बॅनर्स, पोस्टर्स वापरण्यात यावे.  कोणत्याही प्रकारची तक्रार येणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. तसेच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल शासनास सादर करावा. या कार्यक्रमाचे आयोजन सर्व विभाग प्रमुखांनी करावे, असेही निर्देश जिल्हा प्रशासनाच्यावतीने दिले आहेत.

0000

वृत्त क्रमांक 1236

अडचणीतल्या महिलांसाठी हक्काचा शासकीय आधार 

नांदेड दि. 25 नोव्हेंबर :- महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत नांदेड शहरात माता अनुसया शासकिय महिला वसतिगृह (राज्यगृह) ही शासकीय संस्था अनाथ, निराधार, निराश्रीत व अडचणीतल्या महिलांसाठी कार्यरत आहे. येथे 18 ते 60 वर्षांपर्यंत निवाऱ्याची आवश्यकता असणाऱ्या निराधार, विधवा, कुमारी माता, परित्यक्ता, आत्याचारीत महिलांसाठी विनाशुल्क अन्न, वस्त्र, निवारा, समुपदेशन व पुर्नवसनाची व्यवस्था केली जाते. त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी प्रशिक्षणाची व्यवस्था केली जाते.  

येथे आवश्यकतेनुसार कायदेशीर सल्ला व मदत दिली जाते, तसेच नियमित आरोग्य तपासणी केली जाते. 18 वर्षापुढील महिलांना मानसिक, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक दृष्ट्या सक्षम व स्वावलंबी बनविण्यासाठी तसेच पुनर्वसनाच्यादृष्टिने त्यांच्या विवाहाकरीता संस्थेत सर्वतोपरी प्रयत्न केले जातात. येथे शिक्षण व प्रशिक्षण घेत असलेल्या महिलांना आवश्यकतेनुसार प्रवेश दिला जातो. समस्याग्रस्त 18 वर्षापुढील महिलांनी संकटकाळी चुकीच्या मार्गानी न जाता समस्येचे निराकरण होईपर्यंत अल्प कालावधीसाठी या संस्थेत दाखल होण्याच्या फायदा घ्यावा. प्रवेशासाठी फोटोसह ओळखपत्र आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी कामकाजाच्या दिवशी दुपारी 1 ते 3 यावेळेत अधीक्षक माता अनुसया शासकिय महिला वसतिगृह (राज्यगृह), हॉटेल भाईजी पॅलेसच्या पाठीमागे शिवाजीनगर उड्डाणपुल परिसर शिवाजीनगर नांदेड येथे किंवा दुरध्वनी क्रमांक 02462-233044 संपर्क साधावा, असे आवाहन नांदेड येथील शासकीय महिला राज्यगृह अधीक्षक अ.सा.ठकरोड यांनी केले आहे.

00000

वृत्त क्रमांक 1235

इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ कार्यालयाचे स्थलांतर

नांदेड दि. 25 नोव्हेंबर :-  महाराष्ट्र राज्य इतर मागावर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या. जिल्हा कार्यालय नांदेड हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन इमारत अ मध्ये दुसऱ्या मजल्यावर कार्यरत होते. 

सदर कार्यालय हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, ग्यानमाता शाळेच्या समोर, इमारत ब मध्ये दुसऱ्या मजल्यावर स्थलांतर करण्यात आलेले आहे. तरी संबंधितांनी यांची नोंद घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्ग वित्त आणि विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे. 

00000

Monday, November 24, 2025

 वृत्त क्रमांक 1234

सहायक स्‍तरावरील ई- पीक पाहणी नोंदविण्‍यासाठी ५ दिवसांचा अवधी शिल्‍लक 

सहायकांनी  ई-पीक पाहणी पुर्ण करावी जिल्‍हा प्रशासनाचे आवाहन 

नांदेड, दि. 24 नोव्हेंबर :- राज्‍यभरात खरीप हंगाम २०२५ ची ई-पीक नोंदणी १ ऑगस्ट पासून सुरु आहे. राज्‍याच्‍या भूमी अभिलेख विभागाने यासाठी डिजीटल क्रॉप सर्वे (डिसीएस) मोबाईलअॅप उपलब्‍ध करुन दिले आहे. शेतकरी स्‍तरावरील ई- पीक नोंदणीचा कालावधी १ ऑगस्ट ते ३० सप्‍टेबर होता. 1 ऑक्‍टोबर पासून सहायक स्‍तरावरील पीक पाहणी चालू आहे. या नोंदणीची मुदत ३० नोव्‍हेबर रोजी संपत आहे. ई- पीक पाहणीसाठी केवळ ५  दिवसांचा अवधी शिल्‍लक आहे. त्‍यामुळे जास्‍तीत जास्‍त शेतक-यांनी ई-पीक नोंदणी पुर्ण करुन घ्‍यावी, असे आवाहन जिल्‍हा प्रशासनाच्‍यावतीने करण्‍यात आले आहे. 

नांदेड जिल्‍हयात एकूण ११२७८४७  पीक पाहणी करावयाची खातेदार संख्‍या असून त्‍यापैकी ७१८५३० इतक्‍या खातेदारांची शेतकरी स्‍तरावर ई-पीक पाहणी पुर्ण झाली आहे. १ ऑक्‍टोबर पासून सहायक स्‍तरावर ई-पीक पाहणी नोंदविण्‍याची कार्यवाही सुरु आहे. असे असले तरी अद्याप ४०१९६३ शेती खातेदारांची सहायक स्‍तरावर ई-पीक पाहणी करावयाची शिल्‍लक आहे. उर्वरीत पीक पाहणी सहायकांमार्फत पुर्ण करण्याबाबत सर्व तहसिलदार यांना प्रशासनाने निर्देशीत केले आहे. 

शासनाच्‍या विविध जसे पीक विमा, पीक कर्ज नैसर्गिक आपत्तीत नुकसान भरपाई तसेच शेतमालास किमान आधारभूत किमत याचा लाभ घेण्‍यासाठी ई-पीक नोंदणी आवश्‍यक आहे. त्यामुळे ई-पीक पाहणी करावयाचे राहिलेल्‍या  शेतकरी बांधवांनी आपल्‍या शेतीक्षेत्राची  सहायकामार्फत ई-पीक  नोंदणी करुन घ्‍यावी,  असे आवाहन जिल्‍हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

00000

 वृत्त क्रमांक 1233

विविध प्राधिकरणाकडे मोठ्याप्रमाणावर माहितीचे अर्ज करणाऱ्या

अपिलार्थ्यांची द्वितीय अपिले आयोगाने सुनावणी घेवून फेटाळली 

नांदेड, दि. 24 नोव्हेंबर :- छत्रपती संभाजीनगर येथील मा. राज्य माहिती आयोग खंडपीठ यांनी निर्गमीत केलेल्या आदेशान्वये अपिलार्थी यांनी विविध प्राधिकरणाकडे 56 माहितीचे अर्ज सादर केले आहेत. अशा मोठया प्रमाणावर माहिती अर्ज करणाऱ्या अपिलार्थ्यांची व्दितीय अपिले आयोगाने सुनावणी घेवून फेटाळलेली आहेत. 

प्रस्तुत प्रकरणात, अपिलार्थी यांनी विविध प्राधिकरणांकडे 56 माहितीचे अर्ज सादर केलेले आहेत. अशा मोठ्या प्रमाणावर माहिती अर्ज करणाऱ्या पुढील नमूद अपिलार्थी यांची व्दितीय अपिले आयोगाने सुनावणी घेऊन फेटाळलेली आहेत.आयोगाकडील सदरील निर्णय आयोगाच्या www.sic.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेले आहेत. याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. 

अपिलार्थी यांचे नाव, आयोगाकडे दाखल द्वितीय अपिलांची संख्या,  आयोगासमोरील सुनावणी/निर्णयाचा दिनांक पुढीलप्रमाणे आहे.

 

·         केशवराजे निंबाळकर- आयोगाकडे दाखल द्वितीय अपिलांची संख्या 2 हजर 788, आयोगासमोरील सुनावणी/निर्णयाचा दिनांक 26 जून 2024.

·         केशवराजे निंबाळकर- आयोगाकडे दाखल द्वितीय अपिलांची संख्या 842, आयोगासमोरील सुनावणी/निर्णयाचा दिनांक 19 डिसेंबर 2024.

·         शरद दाभाडे- आयोगाकडे दाखल द्वितीय अपिलांची संख्या 159, आयोगासमोरील सुनावणी/निर्णयाचा दिनांक 26 एप्रिल 2024.

·         शरद दाभाडे- आयोगाकडे दाखल द्वितीय अपिलांची संख्या 986, आयोगासमोरील सुनावणी/निर्णयाचा दिनांक 27 सप्टेंबर 2024.

·         मोतीराम गयबु काळे- आयोगाकडे दाखल द्वितीय अपिलांची संख्या 463, आयोगासमोरील सुनावणी/निर्णयाचा दिनांक 23 सप्टेंबर 2024.

·         बाळासाहेब भास्कर बनसोडे- आयोगाकडे दाखल द्वितीय अपिलांची संख्या 256, आयोगासमोरील सुनावणी/निर्णयाचा दिनांक 20 डिसेंबर 2024.

·         श्रीमती अनिता नितीन वानखेडे- आयोगाकडे दाखल द्वितीय अपिलांची संख्या 196, आयोगासमोरील सुनावणी/निर्णयाचा दिनांक 6 सप्टेंबर 2024.

·         बाबुराव धोंडु चव्हाण- आयोगाकडे दाखल द्वितीय अपिलांची संख्या 198, आयोगासमोरील सुनावणी/निर्णयाचा दिनांक 20 जानेवारी 2025.

·         जयभीम नरसिंगराव सोनकांबळे- आयोगाकडे दाखल द्वितीय अपिलांची संख्या 176, आयोगासमोरील सुनावणी/निर्णयाचा दिनांक 1 ऑक्टोबर 2024.

·         हरि प्रताप गिरी- आयोगाकडे दाखल द्वितीय अपिलांची संख्या 296,  आयोगासमोरील सुनावणी/निर्णयाचा दिनांक 28 ऑगस्ट 2024.

·         विनोदकुमार भारुका- आयोगाकडे दाखल द्वितीय अपिलांची संख्या 236, आयोगासमोरील सुनावणी/निर्णयाचा दिनांक 23 ऑगस्ट 2024.

·         गिरीश म.यादव- आयोगाकडे दाखल द्वितीय अपिलांची संख्या 206, आयोगासमोरील सुनावणी/निर्णयाचा दिनांक 23 ऑगस्ट 2024.

·         संजय हाबु राठोड- आयोगाकडे दाखल द्वितीय अपिलांची संख्या 100, आयोगासमोरील सुनावणी/निर्णयाचा दिनांक 30 ऑगस्ट 2024.

·         रायभान किसन उघडे- आयोगाकडे दाखल द्वितीय अपिलांची संख्या 216, आयोगासमोरील सुनावणी/निर्णयाचा दिनांक 30 सप्टेंबर 2024.

·         बालाजी बळीराम बंडे- आयोगाकडे दाखल द्वितीय अपिलांची संख्या 156, आयोगासमोरील सुनावणी/निर्णयाचा दिनांक 1 ऑक्टोबर 2024.

·         भालचंद्र साळुंके- आयोगाकडे दाखल द्वितीय अपिलांची संख्या 103, आयोगासमोरील सुनावणी/निर्णयाचा दिनांक 24 जानेवारी 2025.

·         मिलिंद दगडु मकासरे- आयोगाकडे दाखल द्वितीय अपिलांची संख्या 125, आयोगासमोरील सुनावणी/निर्णयाचा दिनांक 30 ऑगस्ट 2024.

·         ज्ञानेश्वर धायगुडे- आयोगाकडे दाखल द्वितीय अपिलांची संख्या 86, आयोगासमोरील सुनावणी/निर्णयाचा दिनांक 24 जानेवारी 2025.

·         सुरज नंदकिशोर व्यास- आयोगाकडे दाखल द्वितीय अपिलांची संख्या 63, आयोगासमोरील सुनावणी/निर्णयाचा दिनांक 24 जानेवारी 2025.

·         जनक रामराव गायकवाड- आयोगाकडे दाखल द्वितीय अपिलांची संख्या 81, आयोगासमोरील सुनावणी/निर्णयाचा दिनांक 4 जुलै  2025. 

अशी माहिती प्रथम अपिलीय अधिकारी तथा तहसिलदार (सामान्य ) जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.  

00000


 वृत्त क्रमांक 1232

कारखान्याचा ऊसतोडणी, वाहतूक खर्च वाजवी असल्याची शेतकऱ्यांनी खात्री करावी 

नांदेड, दि. 24 नोव्हेंबर :- कारखान्याचा ऊसतोडणी व वाहतूक खर्च हा वाजवी असल्याची खात्री करून गाळपास ऊस देताना ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी जवळच्या कारखान्याची निवड करावी. सरासरी ऊसतोडणी व वाहतूक खर्च जर शेतकऱ्यांना जास्त वाटत असेल तर संबंधित कारखान्याच्या कार्यक्रमानुसार शेतकऱ्यास स्वतः ऊसतोडणी करुन कारखान्यास ऊस गाळपासाठी नेता येईल. याकडेही ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी लक्ष द्यावे, असे आवाहन साखर आयुक्त यांच्या निर्देशानुसार प्रादेशिक सहसंचालक (साखर) नांदेड यांनी केले आहे. 

सद्यस्थितीच्या पद्धतीनुसार कारखान्यांमार्फत ऊस तोडणी व वाहतूक यंत्रणा उभारणी करुन शेतकऱ्यांच्यावतीने त्यांच्या ऊसाची तोडणी व वाहतूक केली जाते. ही ऊस तोडणी व वाहतूकीपोटी आलेला खर्च हा ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या ढोबळ रास्त व किफायतशीर दराच्या (एफ.आर.पी) देय रकमेतून कपात करण्यात येतो. त्यानुषंगाने नांदेड प्रादेशिक विभागातील ऊस उत्पादक शेतक-यांना गाळप हंगाम 2024-25 या वर्षाच्या ऊसतोडणी व वाहतूक खर्चाची माहिती देण्यात आली आहे, विभागातील सर्व शेतकऱ्यांना याची नोंद घ्यावी, असेही आवाहन नांदेडचे प्रादेशिक उपसंचालक (साखर) विश्वास देशमुख यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.   

जिल्हा, सांकेतांक, कारखान्याचे पूर्ण नाव, प्रकार, सरासरी ऊस तोडणी व वाहतूक खर्च (रु. प्रति मे. टन) यानुसार पुढीलप्रमाणे माहिती दिली आहे. 

नांदेड जिल्हा

अर्धापूर तालुका भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना लि. लक्ष्मीनगर- (सांकेतांक 40101), प्रकार- सहकारी, सरासरी ऊस तोडणी व वाहतूक खर्च (रु. प्रति मे. टन) 888.38. 

हदगाव तालुका श्री सुभाष शुगर प्रा. लि. हदगाव- (सांकेतांक 39101), प्रकार- खाजगी, सरासरी ऊस तोडणी व वाहतूक खर्च (रु. प्रति मे. टन) 888.38. 

उमरी तालुका एम.व्ही.के.अँग्रो फुडस प्रॉडक्टस् लि. वाघलवाडा- (सांकेतांक 32301), प्रकार- खाजगी, सरासरी ऊस तोडणी व वाहतूक खर्च (रु. प्रति मे. टन) 906.57. 

नायगाव तालुका कुंटुरकर शुगर अॅन्ड अग्रो प्रा. ॲन्ड अग्रो प्रा. लि. कुंटुर- (सांकेतांक 39301), प्रकार- खाजगी, सरासरी ऊस तोडणी व वाहतूक खर्च (रु. प्रति मे. टन) 950.36. 

लोहा तालुका ट्वेन्टीवन शुगर लि., यु-3 शिवणी- (सांकेतांक 69045), प्रकार- खाजगी, सरासरी ऊस तोडणी व वाहतूक खर्च (रु. प्रति मे. टन) 1078.76. 

मुखेड तालुका शिवाजी सर्व्हीस स्टेशन मांजरी-बा-हाळी- (सांकेतांक 53009), प्रकार- खाजगी, सरासरी ऊस तोडणी व वाहतूक खर्च (रु. प्रति मे. टन) 865.24. 

हिंगोली जिल्हा

कळमनुरी तालुका भाऊराव चव्हाण ससाका लि. डोंगरकडा- (सांकेतांक 19401), प्रकार- सहकारी, सरासरी ऊस तोडणी व वाहतूक खर्च (रु. प्रति मे. टन) 866.69. 

बसमतनगर तालुका पुर्णा सहकारी साखर कारखाना लि.मु.पो.- (सांकेतांक 19601), प्रकार- सहकारी, सरासरी ऊस तोडणी व वाहतूक खर्च (रु. प्रति मे. टन) 885.88. 

औंढा नागनाथ तालुका कपिश्वर शुगर अॅन्ड केमिकल लि. जवळाबाजार- (सांकेतांक 49701), प्रकार- खाजगी, सरासरी ऊस तोडणी व वाहतूक खर्च (रु. प्रति मे. टन) 846.25. 

बसमतनगर तालुका टोकाई सहकारी साखर कारखाना लि.कुरुदा सहकारी- (सांकेतांक 69031), प्रकार- सहकारी, सरासरी ऊस तोडणी व वाहतूक खर्च (रु. प्रति मे. टन) 890.36. 

कळमनुरी तालुका शिऊर साखर कारखाना प्रा. लि. वाकोडी- (सांकेतांक 98765), प्रकार- खाजगी, सरासरी ऊस तोडणी व वाहतूक खर्च (रु. प्रति मे. टन) 910.72. 

जिल्हा परभणी

गंगाखेड तालुका गंगाखेड शुगर अॅण्ड एनर्जी लि. माखणी- (सांकेतांक 63201), प्रकार- खाजगी, सरासरी ऊस तोडणी व वाहतूक खर्च (रु. प्रति मे. टन) 1184.44. 

पाथरी तालुका योगेश्वरी शुगर इंडस्ट्रिज लि. लिंबा- (सांकेतांक 52201), प्रकार- खाजगी, सरासरी ऊस तोडणी व वाहतूक खर्च (रु. प्रति मे. टन) 893.90. 

पुर्णा तालुका बळीराजा साखर कारखाना लि. कानडखेड- (सांकेतांक 69017), प्रकार- खाजगी, सरासरी ऊस तोडणी व वाहतूक खर्च (रु. प्रति मे. टन) 845.62. 

पाथरी तालुका श्री रेणूका शुगर लि. देवनांद्रा- (सांकेतांक 19501), प्रकार- खाजगी, सरासरी ऊस तोडणी व वाहतूक खर्च (रु. प्रति मे. टन) 906.15 

परभणी तालुका श्रीलक्ष्मी नृसिंह शुगर एलएलपी अमडापूर- (सांकेतांक 39201), प्रकार-खाजगी, सरासरी ऊस तोडणी व वाहतूक खर्च (रु. प्रति मे. टन) 1021.72. 

सोनपेठ तालुका ट्वेंन्टीवन शुगर लि. उत्तमनगर, देवीनगरतांडा सायखेडा- (सांकेतांक 68601), प्रकार-खाजगी, सरासरी ऊस तोडणी व वाहतूक खर्च (रु. प्रति मे. टन) 1065.66.    

सेलू तालुका श्री तुळजाभवानी शुगर लि.आडगाव- (सांकेतांक 69063), प्रकार- खाजगी, सरासरी ऊस  तोडणी व वाहतूक खर्च (रु. प्रति मे. टन) 887.53. 

लातूर जिल्हा

विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी ससाका लातूर- (सांकेतांक 20901), प्रकार- सहकारी, सरासरी ऊस तोडणी व वाहतूक खर्च (रु. प्रति मे. टन) 931.52. 

लातूर तालुक्यात विलास सहकारी साखर कारखाना लि. वैशालीनगर निवळी- (सांकेतांक 52003), प्रकार- सहकारी, सरासरी ऊस तोडणी व वाहतूक खर्च (रु. प्रति मे. टन) 957.90. 

उदगीर तालुक्यात विलास सहकारी साखर कारखाना लि. युनिट-2 तोंडार-(सांकेतांक 53003), प्रकार- सहकारी, सरासरी ऊस तोडणी व वाहतूक खर्च (रु. प्रति मे. टन) 1025.16. 

रेणापुर तालुका रेणा ससाका लि., निवडा, पो. सिंधगाव-(सांकेतांक 54801), प्रकार- सहकारी, सरासरी ऊस तोडणी व वाहतूक खर्च (रु. प्रति मे. टन) 854.18. 

औसा तालुका संत शिरोमणी मारूती महाराज ससाकाम-(सांकेतांक 53001), प्रकार- सहकारी, सरासरी ऊस तोडणी व वाहतूक खर्च (रु. प्रति मे. टन) 891.07. 

अहमदपुर तालुका सिध्दी शुगर अॅन्ड अलाईड इंडस्ट्रीज लि. उजना-(सांकेतांक 39701), प्रकार- खाजगी, सरासरी ऊस तोडणी व वाहतूक खर्च (रु. प्रति मे. टन) 1177.63. 

देवणी तालुका जागृती शुगर अॅन्ड अलाईड इंडस्ट्रीज लि. तळेगाव-(सांकेतांक 65901), प्रकार- खाजगी, सरासरी ऊस तोडणी व वाहतूक खर्च (रु. प्रति मे. टन) 899.92. 

श्री. साईबाबा शुगर लि., शिवणी, जि. लातूर-(सांकेतांक 58901), प्रकार- खाजगी, सरासरी ऊस तोडणी व वाहतूक खर्च (रु. प्रति मे. टन) 926.14. 

लातूर तालुक्यात ट्वेंटीवन शुगर्स लि. मळवटी-(सांकेतांक 69058), प्रकार- खाजगी, सरासरी ऊस तोडणी व वाहतूक खर्च (रु. प्रति मे. टन) 1082.84. 

निलंगा तालुका ओंकार साखर कारखाना लि., अंबुलगा-(सांकेतांक 38501), प्रकार- खाजगी, सरासरी ऊस तोडणी व वाहतूक खर्च (रु. प्रति मे. टन) 1153.84. 

औसा तालुका शेतकरी ससाका लि, किलारी- (सांकेतांक 21001), प्रकार- सहकारी, सरासरी ऊस तोडणी व वाहतूक खर्च (रु. प्रति मे. टन) 874.55 याप्रमाणे आहे.

00000

वृत्त क्रमांक 1277   जिल्हा माहिती कार्यालयातील रद्दी विक्रीसाठी उपलब्ध   नांदेड (जिमाका) ,  दि .   5 :-   जिल्हा माहिती कार्यालय ,   नांदे...