Wednesday, July 2, 2025

 वृत्त क्र. 690

कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष

ॲड निलेश हेलोंडे पाटील यांचा नांदेड सुधारित दौरा 

 

नांदेड दि. 2 जुलै  :-  कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) ॲड निलेश हेलोंडे पाटील हे नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.  

शुक्रवार 4 जुलै 2025 रोजी अमरावती येथून काळी 10.15 वा. नांदेडकडे प्रयाण. दुपारी 2 वा. विश्रामगृह,  भोकर जि.नांदेड येथे आगमन व राखीव. दुपारी 3.30 वा. रोहयोअंतर्गत शासकीय गायरान जमीनीवर चारा लागवडीसंबंधी उपजिल्हाधिकारी (रोहयो) व तहसिलदार उमरी यांनी सुचविलेल्या उमरी तालुक्यातील मौजे जिरोना येथे भेट व पाहणी.(तहसिलदार, गटविकास अधिकारी, पशुधन विकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उमरी हे सोबत राहतील) सायं. 6 वा. सोईनुसार अमरावतीकडे प्रयाण करतील.

00000

 वृत्त क्र. 689

वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता  

हवामानशास्त्र केंद्राने दिल्या सूचना  

प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी दि. 02 जुलै 2025 रोजी दुपारी 12:31 वाजता दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दि. 02 जुलै व 06 जुलै 2025 या दोन दिवसासाठी यलो (Yellow) अलर्ट जारी केलेला आहे. दि. 02 व 06 जुलै 2025 ह्या दिवशी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी 30 ते 40 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता वर्तविली आहे. या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि जनतेने खबरदारी घ्यावी. नागरिकांनी खबरदारीची उपाययोजना म्हणून पुढील प्रमाणे काळजी घ्यावी. असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 

या गोष्टी करा 

विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा. तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा. तुमच्या स्मार्ट मोबाईल फोन मध्ये 'दामिनी', 'सचेत' हे दोन ॲप डाउनलोड करा 'दामिनी' ॲप तुमच्या आजूबाजूला वीज विषयक संभाव्य धोके दर्शविते तर 'सचेत' ॲप मुळे तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या हवामानाविषयी अचूक इशारे व माहिती मिळते. 

या गोष्टी करु नका

आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका. उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका. धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका. जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे. असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

0000

 वृत्त क्र. 688

आदिवासी सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी प्रशिक्षण 

नांदेड दि. 2 जुलै :- आदिवासी उमेदवारांसाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र किनवट या प्रशिक्षण केंद्रात येत्या 1 ऑगस्ट 2025 पासून विविध स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उमेदवारांना प्रवेश देण्यात येणार आहेत. या प्रशिक्षण सत्रात नोकऱ्यांसाठी विविध स्पर्धा परिक्षांची तयारी करून घेण्यात येते. पात्र इच्छूक आदिवासी (अनुसूचित जमातीचे) उमेदवारांनी 30 जुलै, 2025 पर्यंत शैक्षणीक व जातीचे प्रमाणपत्राच्या सत्यप्रतीसह अर्ज करावेत, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी किनवट यांनी केले आहे.  

या प्रशिक्षण सत्रात नौकऱ्यासाठी द्याव्या लागणाऱ्या विविध स्पर्धा परिक्षेची तयारी करुन घेण्यात येते तसेच आदिवासी उमेदवारांसाठी राबविण्यात येणाऱ्या इतर खात्याच्या स्वयंरोजगार योजनांची माहिती देवून मार्गदर्शन केले जाणार आहे. प्रशिक्षण केंद्रात 1 ऑगस्ट 2025 पासून सुरू होणाऱ्या 112 व्या प्रशिक्षण सत्रात आदिवासी सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांना विविध स्पर्धा परीक्षेची तयारीसाठी प्रवेश देण्यासाठी उमेदवारांनी 30 जुलै, 2025 तत्पुर्वी या कार्यालयास पोहचतील अशा बेताने आदिवासी (अनुसूचीत जमातीचे ) उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्यासाठी या पत्त्यावर आदिवासी उमेदवारांकरीता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, शासकीय तंत्र प्रशाला औद्योगिक प्रशिक्षण संस्थाच्या बाजूस गोकुंदा ता. किनवट जि. नांदेड नि कोड-431811, संपर्क दुरध्वनी क्रमांक 02469-221801/ 7219709633, 9423748008 वर संपर्क करावा, असेही कळविले आहे.  

या प्रवेशाच्या अटी पुढीलप्रमाणे आहेत. उमेदवार अनुसूचित जमाती पैकी (एस.टी.) प्रवर्गातील असावेत. नांदेड जिल्ह्यातील व इतर जिल्ह्यातील उमेदवारांचाही प्रवेशासाठी विचार करण्यात येइल. उमेदवार कमीत कमी शालांत परीक्षा उतीर्ण असावेत, उच्च शैक्षणिक पात्रतेस प्राधाण्य देण्यात येईल. उमेदवारांनी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, कार्यालयात नाव नोंदणी केलेली असावी. उमेदवारांनी किनवट येथे स्वत: रहाण्याची व जेवणाची व्यवस्था स्वखर्चाने करावी लागेल. प्रशिक्षण कालावधी 3 महीने 15 दिवस असून शालांत परीक्षा उतीर्ण उमेदवारांना तसेच पदवी धारकांना दरमहा 1 हजार रुपये विद्यावेतन दिले जाईल. वयोमर्यादा - उमेदवाराचे वय 30 जुलै, 2025 रोजी 18 वर्ष पुर्ण असावे व 35 पेक्षा जास्त नसावे. प्रशिक्षणार्थिचे विद्यावेतन संबंधीत प्रशिक्षणार्थिचे बँक खात्यामध्ये दर महा जमा करण्यात येणार असल्यामूळे प्रशिक्षणार्थिंचे बँक खाते चालू असणे आवश्यक आहे. आपण यापुर्वी अशाप्रकारचे प्रशिक्षण घेतलेले असल्यास किंवा सदर प्रशिक्षण सत्र अर्ध्यातुन सोडलेले असल्यास प्रवेश देण्यात येणार नाही असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

 वृत्त क्र. 687

नांदेडमधील 28 कृषी सेवा केंद्रावर कार्यवाही ; कृषी विभाग अॅक्शन मोडवर

12 बियाणे, खत, कीटकनाशक विक्रेत्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द

14 बियाणे विक्रेत्यांचे परवाने निलंबित

नांदेड दि. 2 जुलै  :- खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रांची व्यापक तपासणी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत कृषी सेवा केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळून आली आहे. नियमबाह्य कामकाज करणाऱ्या तसेच तपासणीमध्ये त्रुटी आढळल्याने दोषी ठरलेल्या एकूण 28 कृषी सेवा केंद्रांवर कारवाई करण्यात आलेली आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी ही माहिती दिली आहे.

काही दिवसांपूर्वीच विनापरवाना खताची अवैध विक्री केल्याच्या कारणावरून इस्लापूर व हिमायतनगर येथे अवैध खत विकणाऱ्या विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नियमबाह्य कामकाज करणाऱ्या इस्लापूर तालुक्यातील एका कृषी सेवा केंद्राचे तिन्ही परवाने कायमस्वरूपी निलंबित करण्यात आले आहेत. या दुकानांमध्ये परवाना नसलेले एचटीबीटी बियाणे यांची वाहतुकीच्या पावत्या अवैध्यरित्या दुकानात आढळून आल्याने इस्लापूर येथील कृषी सेवा केंद्रांचे तिन्ही परवाने कायमस्वरूपी निलंबित करण्यात आले आहेत.

कृषी विभागाच्या तपासणीत कृषी सेवा केंद्रातील विविध त्रुटी उघड झालेले आहेत. यामध्ये भावफलक व साठा फलक न लावणे, विक्री परवाने दुकानदाराने दर्शनी भागात न लावणे, साठा पुस्तके अद्यावत न ठेवणे, स्त्रोत परवान्यात नमूद नसणे, ग्राहकांना निविष्ठा विक्रीच्या पावत्या न देणे, विक्री अहवाल दर महिन्याला सादर न करणे इत्यादी विविध प्रकारच्या त्रुटी आढळल्या आहेत. त्यांची सुनावणी घेण्यात आली व त्यांना बाजू मांडण्याची संधी देण्यात आली.

दरम्यान अशा 28 कृषी सेवा केंद्रांवर कारवाई करण्यात आलेली आहे. याशिवाय विक्री परवानगी घेतली असतानाही दुकान बंद ठेवणाऱ्या केंद्रावरही मोहिमेत विशेष लक्ष देण्यात आलेले आहे. या कारवाईमध्ये तालुका नायगाव येथील आठ कृषी सेवा केंद्राचा समावेश असून हदगाव तालुक्यातील दोन कृषी सेवा केंद्र तसेच नांदेड तालुक्यातील एक कृषी सेवा केंद्र, देगलूर तालुक्यातील दोन कृषी सेवा केंद्र, कंधार तालुक्यातील एक कृषी सेवा केंद्र, किनवट तालुक्यातील पाच कृषी सेवा केंद्र, मुखेड तालुक्यातील दोन कृषी सेवा केंद्र, उमरी तालुक्यातील पाच कृषी सेवा केंद्र, लोहा तालुक्यातील एक व मुदखेड तालुक्यातील एक कृषी सेवा केंद्र यांचा समावेश आहे.

खरीप हंगामात शेतकऱ्यांना योग्य वेळी आणि नियमानुसार सेवा मिळाव्यात यासाठी ही मोहिम हाती घेण्यात आलेली आहे. अशाच प्रकारची नियमित तपासणी सुरु राहणार असून, नियमभंग करणाऱ्या विरोधात कठोर कारवाई केली जाईल, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.

00000

वृत्त क्र. 686

लोकशाही दिनाचे सोमवारी आयोजन 

नांदेड दि. 2 जुलै  :- सामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी न्याय व तत्परतेने सोडविण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. जिल्हा प्रशासनाच्यावतीने लोकशाही दिन सोमवार 7 जुलै 2025 रोजी दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे आयोजित केला आहे. 

या दिवशी महसूल,  गृह,  मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, पाटबंधारे, बांधकाम, परिवहन, सहकार, कृषि विभाग व जिल्हा पाणी पुरवठा समन्वय अधिकारी इत्यादी जिल्हा स्तरावरील प्रमुख अधिकारी व ज्या कार्यालयाचे लोकशाही दिनात प्रलंबीत प्रकरणे आहेत असे अधिकारी बचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात उपस्थित राहतील. सकाळी 12 वाजेपासून निवेदनाची नोंदणी सुरु होणार आहे. त्यानंतर लगेचच प्राप्त झालेल्या अर्जावर, निवेदनावर म्हणणे ऐकून घेण्याच्या कामास सुरुवात करण्यात येईल. 

लोकशाही दिनाच्या दिवशी प्राप्त होणाऱ्या जनतेच्या तक्रारी, अडचणी एकत्रीतरीत्या समजावून घेऊन त्या शक्य तितक्या लवकर सोडविण्यात येतील, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड यांनी दिली आहे.

00000

 वृत्त क्र. 685

नशेच्या औषधी विक्री करणाऱ्या 
मेडिकल स्टोअर्स विरुद्ध कडक कारवाई
 
नांदेड, दि. 2 जुलै :- शहरातील विविध भागातील औषधी दुकानांच्या तपासणी करून अशा औषधांची, गोळयांची विक्री करणाऱ्या औषध विक्रेत्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश नुकतेच नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी दिले होते. नांदेड शहरात दाखल झालेल्या पथकाने 25 व 26 जून रोजी शहरातील विविध भागातील मेडिकल स्टोअर्सची तपासणी केली आहे. नशेच्या औषधी, गोळयांची विक्री करणाऱ्या मेडिकल स्टोअर्सविरूद्ध कडक कारवाई केली जाणार असल्याची माहिती नांदेड येथील सहायक आयुक्त (औषधे) अ. तु. राठोड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

या कार्यवाहीत एकूण 13 मेडिकल स्टोअर्सची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 2 दुकानामध्ये नशेच्या औषधांची, गोळयाची विक्री होत असल्याचे स्पष्ट झाले. इतर 9 मेडिकल स्टोअर्सकडे औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 व त्याखालील नियम 1945 मधील नियम 65 नुसार त्रुटी आढळून आलेल्या आहेत. उर्वरित 2 मेडिकल स्टोअर्सकडे तपासणी दरम्यान सर्वसाधारण जुटी आढळलेल्या आहेत.

कोटा राजस्थानच्या धर्तीवर नांदेड शहर हे शैक्षणिक हब तयार झाले असून याठिकाणी राज्यातून तसेच पराज्यातून मुले शिक्षणासाठी नांदेड येथे वास्तवास आहेत. अशा मुलांना मेडिकल स्टोअर्सवरून नशेच्या औषधांची व गोळयाची सहज उपलब्ध होत असल्याचे खासदार रविंद्र चव्हाण यांनी नुकत्याच संपन्न झालेल्या जिल्हा नियोजन भवन येथील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत नमूद केले होते. त्यामुळे तरुणपिढी नशेच्या आहारी जाऊन व्यसनाधीन होत असल्याचे चिंता व्यक्ती केली होती. 

सहायक आयुक्त (औषधे) नांदेड यांनी नांदेड कार्यालयात औषध निरीक्षकाची मंजूर पदे रिक्त असल्याने  सहआयुक्त (औषधे) (छत्रपती संभाजीनगर विभाग) छत्रपती संभाजीनगर यांच्याशी तात्काळ संपर्क साधून नशेच्या औषधी, गोळयाची विक्री करणाऱ्या औषधी विक्री दुकानांविरूद्ध विशेष मोहिम राबविण्यासाठी बाहेरील जिल्ह्यातून (छत्रपती संभाजीनगर,जालना,लातूर,हिंगोली) औषध निरीक्षक नांदेड येथे पाठविण्यात यावेत अशी विनंती केली आहे. 

नशेच्या औषधी / गोळयांची विक्री करणाऱ्या तसेच गंभीर स्वरूपांच्या त्रुटी आढळून आलेल्या मेडिकल स्टोअर्सविरूद्ध (दोषीविरूद्ध) औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा व नियमातील तरतूदीनुसार कारवाई घेण्यात येत आहे. यापुढे नशेच्या औषधी, गोळयांची विक्री करणाऱ्या मेडिकल स्टोअर्सविरूध्द कारवाई घेतली जाणार आहे, अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे येथील सहायक आयुक्त (औषधे) अ. तु. राठोड यांनी दिली. 

0000 

  वृत्त क्रमांक 827   डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते महाविर चौक मार्गावर 10 ते 16 ऑगस्ट पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश     नांदेड दि. 9 ऑग...