Friday, October 3, 2025

 वृत्त क्रमांक 1055

शासनाकडून शेतकऱ्यांना मिळालेली मदत

कर्ज खात्‍यात वळती करु नये : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले 

नांदेड दि. 3 ऑक्टोबर :- जिल्ह्यात ज्‍या शेतकऱ्यांच्या खात्‍यावर शासनाकडून मदतीची रक्‍कम जमा करण्‍यात आली आहे त्‍या शेतकऱ्यांच्या खात्‍यावर जमा झालेली मदतीची रक्‍कम बॅंकांनी कर्ज खात्‍यात अथवा इतर वसुलीसाठी वळती करु नये, असे निर्देश जिल्‍हाधिकारी राहुल कर्डिले यांनी जिल्‍हा अग्रणी बॅंक व जिल्‍हा उपनिबंधक सहकारी संस्‍था यांना दिले आहेत.   

नांदेड जिल्‍ह्यात ऑगस्‍ट २०२५ मध्‍ये अतिवृष्‍टी व पुर यामुळे ७ लाख ७४ हजार ३१३ इतक्‍या शेतकऱ्यांचे,४८,५३३.२१ हेक्‍टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. त्‍याअनुषंगाने जिल्‍हा प्रशासनाचे अहवालावरुन शासनाने एकूण ५५३.३४ कोटी रुपये मदत निधी जिल्‍ह्यातील बाधित शेतकऱ्यांना वाटप करण्‍यासाठी मंजुर केला आहे. ही मंजुर रक्‍कम बाधित शेतकऱ्यांना ऑनलाईन प्रणालीद्वारे वाटप करण्‍यात येत आहे. आता पर्यंत जिल्‍हृयातील ४,८२,६७४ इतक्‍या शेतकऱ्यांना ३६२.०३ कोटी इतक्‍या रकमेचे वाटप करण्‍यासाठीची माहिती ऑनलाईन प्रणालीवर संबंधीत तहसील कार्यालयातून भरण्‍यात आली आहे. उर्वरीत शेतकरी यांची माहिती संगणकीय प्रणालीवर भरण्‍याची कार्यवाही सुरु आहे. 

माहिती भरण्‍यात आलेल्‍या शेतकऱ्यांचे वि.के. नंबर त्‍या गावच्या तलाठी यांच्यमार्फत गावात प्रसिध्‍द करण्‍यात आले आहेत. या वि.के. नंबरद्वारे सेतू सुविधा केंद्रावर जाऊन ई-केवायसी पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्‍यावर थेट मदतीची रक्‍कम डिबीटी पध्‍दतीने शासनामार्फत जमा होत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

00000

वृत्त क्रमांक 1054

अण्णासाहेब पाटील महामंडळाचा मोठा निर्णय:

व्याज परताव्यासोबतच आता उद्योजकता प्रशिक्षण 

नांदेड दि. 3 ऑक्टोबर :- आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या तरुणांना सक्षम उद्योजक बनवण्यासाठी कार्यरत असलेल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाने एक महत्त्वाकांक्षी पाऊल उचले आहे. महामंडळ आता केवळ बँक कर्जावरील व्याज परतावा योजनाच नाही, तर लाभार्थ्यांना त्यांच्या व्यवसायासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण व Mentorship देखील देणार आहे. हा निर्णय तरुण उद्योजकांना केवळ आर्थिक मदत न देता, त्यांना व्यवसाय यशस्वीपणे चालवण्यासाठी आवश्यक ज्ञान आणि कौशल्ये मिळवून देण्याच्या उद्देशाने घेण्यात आला असल्याची माहिती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख यांनी दिली. 

यानुसार अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्यावतीने त्वरीत कार्यवाही सुरु करुन, उद्योग सारथी प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत नुकतचे 24 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वा. ऑनलाईन वेबिनारचे आयोजन करण्यात आले हाते. ज्यामध्ये राज्यभरातील इच्छुक लाभार्थ्यांनी सहभाग घेतला. या वेबिनारमध्ये "पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय" या महत्त्वपूर्ण विषयावर पुणे कृषी विद्यालयाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सोमनाथ माने यांनी मार्गदर्शन केले. हे वेबिनार युट्युब समवेत फेसबुकवर देखील लाईव्ह स्वरुपात दाखविण्यात आले होते. 

यावेळी अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या लाभार्थ्यांसाठी या प्रशिक्षणात डॉ. माने यांनी दुग्धव्यवसायात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेल्या अनेक बाबींवर प्रकाश टाकला, ज्यामुळे नवीन आणि इच्छुक उद्योजकांना मोलाचे मार्गदर्शन मिळाले. उत्तम जातीच्या जनावरांची निवड दुग्धव्यवसायासाठी अधिक दूध देणाऱ्या जातीच्या गाई-म्हशींची निवड कशी करावी, याचे मार्गदर्शन डॉ. माने यांनी केले. यामध्ये गीर, साहिवाल, जर्सी यांसारख्या देशी आणि विदेशी जातींची माहिती दिली. 

आहाराचे महत्त्व जनावरांच्या आरोग्यासाठी आणि दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी योग्य आहार कसा असावा, यावर त्यांनी भर दिला. संतुलित आहार, हिरवा आणि सुका चारा, तसेच आवश्यक खनिज मिश्रणे यांचे महत्त्व सांगितले. आरोग्याची काळजी जनावरांना होणारे आजार आणि त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना याबद्दल सखोल माहिती दिली. वेळोवेळी लसीकरण करणे, स्वच्छतेचे नियम पाळणे आणि आजार झाल्यास त्वरित उपचार करणे यावर मार्गदर्शन केले. आर्थिक नियोजन: दुग्धव्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक भांडवल, शासनाच्या विविध योजनांचा लाभ कसा घ्यावा, तसेच दुधाची विक्री आणि मार्केटिंग याबद्दलही त्यांनी मौल्यवान मार्गदर्शन केले. 

नवीन तंत्रज्ञान दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि व्यवस्थापन सोपे करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून दिली. या वेबिनारमुळे अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या लाभार्थ्यांना केवळ आर्थिक मदतीशिवाय, व्यवसायासाठी आवश्यक तांत्रिक आणि व्यवस्थापकीय ज्ञानही मिळाले. डॉ. माने यांचे मार्गदर्शन हे त्यांच्या व्यवसायाच्या यशस्वी वाटचालीस नक्कीच उपयुक्त ठरेल. डॉ. माने यांनी मार्गदर्शन करताना सांगितले, दुग्ध व्यवसाय हा केवळ उत्पन्नाचा स्रोत नाही, तर ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणारा एक महत्त्वाचा घटक आहे. योग्य प्रशिक्षण, नियोजन आणि शाश्वत व्यवस्थापन यामुळे हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात यशस्वी होऊ शकतो. 

राज्यभरातून अनेक युवक, महिला उद्योजिका व स्वयंसहायता गटांचे प्रतिनिधी या वेबिनारला ऑनलाईन उपस्थित होते. वेबिनार दरम्यान लाभार्थ्यांनी आपल्या शंका उपस्थित करून थेट डॉ. माने यांच्याकडून उत्तर मिळवली. पार पडलेल्या वेबीनारमधील सविस्तर माहिती महामंडळाच्या युट्युब चॅनेलवर उपलब्ध आहे. 

महामंडळाकडून पुढील दिवसात विविध जिल्ह्यामध्ये ऑनलाईन प्रशिक्षण कार्यशाळांचे आयोजन तज्ञ लोकांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. यामुळे महामंडळाच्या माध्यमातून तयार झालेल्या उद्योजकांच्या व्यवसाय वाढीस होणार असल्याचे मत महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख यांनी व्यक्त केले. अशी माहिती महामंडळाचे उपमहाव्यवस्थापक आकाश मोरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

00000

वृत्त क्रमांक 1053

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत अल्पकालीन अभ्यासक्रमाची प्रथम तुकडी 

नांदेड दि. 3 ऑक्टोबर :- राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत चालविण्यात येणाऱ्या नवयुगीन व पारंपारिक अल्पकालीन अभ्यासक्रमांच्या प्रथम तुकडीचे उद्घाटन देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने बुधवार 8 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 3 वा. होणार आहे. त्याअनुषंगाने औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षण घेत असलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना प्रगत कौशल्यावर आधारित प्रशिक्षण मिळणार आहे. यातून त्यांची रोजगार व स्वयंरोजगार क्षमता वृध्दींगत होणार आहे. या सुवर्ण संधीचा लाभ जास्तीत जास्त बेरोजगार युवक-युवतींनी घ्यावा व नोंदणी करावी, असे आवाहन येथील संस्थेचे प्राचार्य सचिन सुर्यवंशी यांनी केले आहे. 

कौशल्य, रोजगार, उदयोजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित  4 व 20 सप्टेंबर रोजीच्या बैठकीत राज्यातील सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित न्यू एज अल्पमुदत अभ्यासक्रम सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. नांदेड येथील श्री गुरू गोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत Artificial Intelligence, Assistant, CCTV Installation Technician, Electric Vehicle- Service Technician, Solar PV Installer Suryamitra,  E-Commerce Micro Entrepreneur, Beauty Therapist, Field Technician-Other Home appliances, Light Motor Vehicle Driver हे अल्पमुदतीचे व्यवसाय राबविण्यात येणार आहेत.

0000

 वृत्त क्रमांक 1052

जिल्हाधिकारी कार्यालयात 

14 ऑक्टोबर रोजी पेन्शन अदालतीचे आयोजन 

नांदेड दि. 3 ऑक्टोंबर : नांदेड जिल्ह्यातील महसूल विभागातून सेवानिवृत्त झालेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अडचणीचे निवारण करण्यासाठी ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी 14 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 ते 1.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. सेवानिवृत्त झालेले अधिकारी कर्मचारी यांनी अडचणी निवारण्यासाठी पेन्शन अदालतीच्या दिवशी उपस्थितीत राहून तक्रारीचे निवेदन द्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.

0000

 वृत्त क्रमांक 1051

अनुकंपासह एमपीएससीच्या शिफारस पात्र 376 उमेदवारांना मिळाली नोकरीची संधी

जिल्हा प्रशासनाचा पुढाकार ; शनिवारी देणार नियुक्तीपत्र

नांदेड, दि. 3 ऑक्टोबर : राज्य शासनाने जाहीर केलेल्या 150 दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात विविध योजना व उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. शासनाने नव्याने लागू केलेल्या अनुकंपा नियुक्तीच्या सर्वसमोवशक सुधारित धोरणानुसार जिल्हाधिकारी राहुल कर्डिले  यांनी या उपक्रमास गती दिल्याने नांदेड जिल्ह्यातून अनुकंपा तत्वावर गट ‘क’ संवर्गात 70 उमेदवार व गट ‘ड’ संवर्गात 227 उमदेवार व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एम.पी.एस.सी.) शिफारस केलेल्या 79 उमेदवार असे एकूण 376 उमेदवारांना शासकीय नोकरीची संधी मिळाली आहे. ते लवकरच आपल्या आयुष्याची नव्याने सुरूवात करणार आहेत. शनिवार 4 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता कुसूम सभागृह, व्‍ही.आय.पी.रोड, नांदेड येथे होणाऱ्या रोजगार मेळाव्यात या उमेदवारांना पालकमंत्री अतुल सावे यांच्‍या हस्‍ते नियुक्तीपत्रे देण्यात येणार आहेत.

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली अनुकंपा भरतीची प्रक्रिया पार पाडण्यात आली. 

शासकीय सेवेत कार्यरत असतांना अधिकारी व कर्मचाऱ्याचे निधन झाल्यास त्याच्या कुटुंबावर ओढवणाऱ्या आर्थिक आपत्तीतून कुटुंबीयांना सावरण्यासाठी कुटुंबातील एका सदस्यास अनुकंपा तत्वावर शासकीय सेवेत नियुक्ती देण्‍याचे सुधारित धोरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राज्य शासनाने पारित केले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात मागील महिन्यात झालेल्या मेळाव्यात उमदेवारांना शासन निर्णय व नियुक्ती प्रकियेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यात अनुकंपा तत्वावर गट-‘क’ पदाकरिता यादीतील 70 उमेदवारांची, तर गट-‘ड’ पदाकरिता 227 उमेदवारांची नियुक्तीकरिता शिफारस करण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगानेही 79 उमेदवारांच्या नियुक्तीची शिफारस केली आहे.

मुख्यमंत्री महोदयांच्या 150 दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत अनुकंपा नियुक्ती प्रक्रियेस गती आणून पात्र उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून देणे हा प्रमुख उद्देश असून या उमेदवारांना येत्या 4 ऑक्टोबर 2025 रोजीच्‍या कार्यक्रमात राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास व अपारंपारिक ऊर्जा, दिव्यांग कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे  यांच्‍या हस्‍ते उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात येणार आहेत.

०००००

 वृत्त क्रमांक 1050

नांदेड तालुक्यातील ढोकी येथे तहसीलदार संजय वारकड यांच्या उपस्थीत पीक कापणी प्रयोग संपन्न

नांदेड, दि. ३ ऑक्टोबर : यावर्षीपासून पीक विमा योजनेत नुकसानभरपाई निश्चित करताना पीक कापणी प्रयोगाला आधारभूत मानले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर नांदेड तालुक्यातील मौजे ढोकी येथे आज सोयाबीन पिकाचा पीक कापणी प्रयोग घेण्यात आला.

हा प्रयोग तहसीलदार संजय वारकड यांच्या उपस्थितीत पार पडला. यासाठी शेतकरी गोविंद संभाजी चपाट यांच्या शेतातील १० x ५ मीटरचा प्लॉट निवडण्यात आला. निवडलेल्या प्लॉटमधील सोयाबीन पिकाची कापणी केली असता एकूण ७ किलो उत्पादन मिळाले. त्यानंतर मळणी प्रक्रियेनंतर प्रत्यक्ष सोयाबीन दाण्यांचे २.०७५ किलो उत्पादन मिळाले.

सदर सोयाबीन पिकाचे मॉइश्चर मशीनद्वारे आर्द्रता मोजली असता १७.६ टक्के आर्द्रता आढळून आली. आर्द्रतेच्या प्रमाणानुसार उत्पादनाच्या वजनात घट होणार असल्याचे नोंदविण्यात आले.

या पीक कापणी प्रयोगावेळी तहसिलदार संजय वारकड यांच्यासह सरपंच सौ. मीनाबाई पांचाळ, उपसरपंच श्री. भगवानराव डाखोरे, विमा कंपनीचे प्रतिनिधी गोपीनाथ थोरात, मंडळ अधिकारी (लिंबगाव) श्री. जगताप, ग्राम महसूल अधिकारी श्री. ब्रीदाळे, ग्रामविकास अधिकारी टी. एन. केंद्रे, सहाय्यक कृषी अधिकारी सौ. मोरताडे, पोलीस पाटील श्री. कांतराव लबडे तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक व प्रगतिशील शेतकरी उपस्थित होते.

०००००




 वृत्त क्रमांक 1049

३ व ४ ऑक्टोबर या दोन दिवसांसाठी यलो अलर्ट जारी

नांदेड, दि. ३ ऑक्टोबर:- प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी ०३ ऑक्टोबर २०२५ रोजी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी ०३ व ०४ ऑक्टोबर २०२५ या दोन दिवसांसाठी यलो अलर्ट जारी केलेला आहे. ०३ व ०४ ऑक्टोबर २०२५ या दरम्यान जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी ३० ते ४० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता वर्तविली आहे. या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि जनतेने खबरदारी घ्यावी. 

या गोष्टी करा :

विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा.

आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका.

आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा.

तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा.

पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा.

या गोष्टी करु नका: 

आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका.

विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका.

उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका.

धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका.

जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे.

०००००

 वृत्त क्रमांक 1048

जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी केली

खडकूत येथे पीक कापणी प्रयोगाची पाहणी

नांदेड, दि. ३ ऑक्टोबर : यावर्षापासून पीक विमा योजनेत नुकसान भरपाई निश्चित करताना पीक कापणी प्रयोगाला आधारभूत मानले जाणार आहे. त्यामुळे या प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची तांत्रिक चूक होऊ नये, शेतकऱ्यांना योग्य लाभ मिळावा यासाठी जिल्हास्तरावर प्रात्यक्षिक स्वरूपात पीक कापणी प्रयोग राबविण्यात येत आहेत.

आज जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी नांदेड तालुक्यातील मौजे खडकूत येथे शेतकरी बालाजी नागुराव कंकाळ यांच्या शेतावर सोयाबीन पिकाची कापणी करून उत्पन्नाचा अंदाज काढण्यासाठी आयोजित प्रात्यक्षिकाची पाहणी केली.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. कर्डीले यांनी शेतकऱ्यांना पीक कापणी प्रयोगाचे महत्त्व, पद्धती आणि त्यातून मिळणाऱ्या निष्कर्षांबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी स्पष्ट केले की, शेतकऱ्यांच्या हितासाठी नुकसान भरपाईची रक्कम योग्य प्रकारे ठरविण्यासाठी पीक कापणी प्रयोग अत्यंत महत्त्वाचे असून त्यात पारदर्शकता व काटेकोरपणा आवश्यक आहे.

या प्रात्यक्षिकावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत, मंडळ कृषी अधिकारी श्री. सानप, सहाय्यक कृषी अधिकारी श्री. कासटेवाड, श्री. येवते, ग्राम महसूल अधिकारी, भारतीय कृषी विमा कंपनीचे तालुका प्रतिनिधी, ग्रामस्तरीय पीक कापणी समितीचे सदस्य, पोलीस पाटील, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

०००००





 वृत्त क्रमांक 1047

दुर्गादेवी विसर्जनाच्या दिवशी उमरखेड ते हदगाव वाहतुकीत बदल

नांदेड, दि. 3 ऑक्टोबर :- हदगाव व उमरखेड शहरातील दुर्गादेवी विसर्जन दरवर्षी पैनगंगा नदीमध्ये होते. दुर्गादेवी विसर्जनाच्या दिवशी पैनगंगा नदी पुलावर भक्तांची मोठी गर्दी होते. याअनुषंगाने उमरखेड येथून हदगावकडे येणारी वाहतूक पैनगंगा नदीपासून ते मल्लीनाथ हॉलपर्यंत शनिवार 4 ऑक्टोबर रोजी दुपारी 4  ते रविवार 5 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 3 वाजेपर्यंत वळविण्यात येणार आहे.  

याबाबत मोटार वाहन कायदा 1999 चे कलम 115 मधील तरतुदीनुसार जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी अधिसूचना निर्गमीत केली आहे. या अधिसुचनेनुसार पोलीस अधीक्षक नांदेड यांनी कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने आवश्यक ती उपाय योजना करावी. संबंधित सहायक पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन हदगाव यांनी वाहतुकीच्या अनुषंगाने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असे निर्देशीत करण्यात आले आहे.  
00000  

वृत्त क्रमांक 1046

अनुकंपासह एम.पी.एस.सी.च्या शिफारसपात्र 332 उमेदवारांना मिळाली नोकरीची संधी

 जिल्हा प्रशासनाचा पुढाकार 

पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते शनिवारी देणार नियुक्तीपत्र

नांदेड, दि. २ ऑक्टोबर : राज्य शासनाने जाहीर केलेल्या 150 दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात विविध योजना व उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. शासनाने नव्याने लागू केलेल्या अनुकंपा नियुक्तीच्या सर्वसमोवशक सुधारित धोरणानुसार जिल्हाधिकारी राहूल कर्डिले  यांनी या उपक्रमास गती दिल्याने नांदेड जिल्ह्यातून अनुकंपा तत्वावर गट ‘क’ संवर्गात 70 उमेदवार व गट ‘ड’ संवर्गात 222 उमदेवार व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एम.पी.एस.सी.) शिफारस केलेल्या 64 उमेदवार असे एकूण 356 उमेदवारांना शासकीय नोकरीची संधी मिळाली आहे. ते लवकरच आपल्या आयुष्याची नव्याने सुरूवात करणार आहेत. शनिवार 4 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता कुसूम सभागृह, व्‍ही.आय.पी.रोड, नांदेड येथे होणाऱ्या रोजगार मेळाव्यात या उमेदवारांना पालकमंत्री अतुल सावे यांच्‍या हस्‍ते नियुक्तीपत्रे देण्यात येणार आहेत. 

जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली अनुकंपा भरतीची प्रक्रिया पार पाडण्यात आली आहे.  

शासकीय सेवेत कार्यरत असतांना अधिकारी व कर्मचाऱ्याचे निधन झाल्यास त्याच्या कुटुंबावर ओढवणाऱ्या आर्थिक आपत्तीतून कुटुंबीयांना सावरण्यासाठी कुटुंबातील एका सदस्यास अनुकंपा तत्वावर शासकीय सेवेत नियुक्ती देण्‍याचे सुधारित धोरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राज्य शासनाने पारित केले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात मागील महिन्यात झालेल्या मेळाव्यात उमदेवारांना शासन निर्णय व नियुक्ती प्रकियेबाबत मागदर्शन करण्यात आले. यात अनुकंपा तत्वावर गट-‘क’ पदाकरिता यादीतील 70 उमेदवारांची, तर गट-‘ड’ पदाकरिता 222 उमेदवारांची नियुक्तीकरिता शिफारस करण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगानेही 64 उमेदवारांच्या नियुक्तीची शिफारस केली आहे.

मुख्यमंत्री महोदयांच्या 150 दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत अनुकंपा नियुक्ती प्रक्रियेस गती आणून पात्र उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून देणे हा प्रमुख उद्देश असून या उमेदवारांना येत्या 4 ऑक्टोबर 2025 रोजीच्‍या कार्यक्रमात पालकमंत्री अतुल सावे यांच्‍या हस्‍ते नियुक्तीपत्रे देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांनी सांगितले.

०००००

वृत्त क्रमांक 1277   जिल्हा माहिती कार्यालयातील रद्दी विक्रीसाठी उपलब्ध   नांदेड (जिमाका) ,  दि .   5 :-   जिल्हा माहिती कार्यालय ,   नांदे...