Thursday, December 5, 2024

वृत्त क्र. 1164

राष्ट्रीय जंतनाशक मोहिम व सीवाय टीबी टेस्टचे उदघाटन

क्षयरुग्ण संपर्कातील व्यक्तींची संसर्गिक तपासणी व औषधोपचार होणार –मीनल करणवाल

नांदेड दि. 5 डिसेंबर :  फुफ्फुसाशी संबंधित क्षयरुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींना क्षयरोगाचा संसर्ग झाला आहे काय याबाबतची तपासणी करून त्यांना रोगप्रतिबंधात्मक औषधोपचार करण्यात येणार आहे. या आरोग्यसेवेचा व जंतनाशक मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी केले.

मुदखेड तालुक्यातील डोंगरगाव येथे जिल्हास्तरीय सीवाय टी बी टेस्ट व जंतनाशक मोहिमेच्या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल ह्यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना आरोग्य संबंधीच्या सेवा त्यांच्या राहत्या गावातूनच मिळाव्यात म्हणून सी वाय टी बी टेस्ट व जंतनाशक गोळ्याचे वितरण सारख्या आरोग्य सेवा देण्यात येत आहेत. हे क्षयरोगाचे उच्चाटन करण्याच्या कामी महत्वपूर्ण पाऊल असून आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सल्ल्याप्रमाणे गरजूवंताना आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. तरी गरजु रुग्णांनी या आरोग्य सेवा उपलब्ध करुन घ्याव्यात, असे आवाहन त्यांनी केले. 

याप्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष सूर्यवंशी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सतीश कोपुरवाड, माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. शिवशक्ती पवार , तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कासराळीकर , शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी,  आरोग्य कर्मचारी आदीची उपस्थिती होती.

00000




 वृत्त क्र. 1163

सशस्त्र सेना ध्वजदिन निधी सकंलन शुभारंभ कार्यक्रमाचे सोमवारी आयोजन

 नांदेड डिसेंबर दि. 5 :- सशस्त्र सेना ध्वजदिन निधी 2024-25 संकलन शुभारंभ कार्यक्रम सोमवार 9 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 12 वाजता नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे. हा कार्यक्रम जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून या कार्यक्रमास पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 

00000

वृत्त क्र. 1162

जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी पेन्शन अदालतीचे आयोजन 

नांदेड डिसेंबर दि. 5 :- नांदेड जिल्ह्यातील महसूल विभागातून सेवानिवृत्त झालेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अडचणीचे निवारण करण्यासाठी डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी 10 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 11 ते 1.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. सेवानिवृत्त झालेले अधिकारी कर्मचारी यांनी अडचणी निवारण्यासाठी पेन्शन अदालतीच्या दिवशी उपस्थितीत राहून तक्रारीचे निवेदन द्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.

०००००

 दि. 5 डिसेंबर, २०२४

वृत्त क्र. २२४

 

देवेंद्र फडणवीस यांनी घेतली महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत

ऐतिहासिक आझाद मैदानात पार पडला शपथविधी

उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी घेतली शपथ

 

मुंबई, दि. ५ : राज्याचे ३१ वे मुख्यमंत्री म्हणून राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाची शपथ दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत ऐतिहासिक आझाद मैदानावर झालेल्या शपथविधी समारंभात मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्यासमवेत उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे, अजित आशाताई अनंतराव पवार यांना राज्यपालांनी पद आणि गोपनियतेची शपथ दिली. राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी शपथविधी सोहळ्याचे संचलन केले.

आजच्या शपथविधी कार्यक्रमास मंचावर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय आरोग्य मंत्री जगतप्रकाश नड्डा, केंद्रीय भूपृष्ठ परिवहन व  महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय कृषि मंत्री शिवराजसिंह चौहान, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियुष गोयल, केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर, केंद्रीय पर्यावरण मंत्री भुपेंदर यादव, केंद्रीय माहिती तंत्रज्ञान व रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री एच डी कुमारस्वामी, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय सूक्ष्म मध्यम लघू उद्योगमंत्री जितनराम मांझी, केंद्रीय दळणवळण मंत्री जोतिरादित्य सिंधिया, केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू, केंद्रीय मत्स्य व्यवसाय व पशुसंवर्धन मंत्री राजीव रंजन सिंह, केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योगमंत्री चिराग पासवान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा, छत्तीसगढचे मुख्यमंत्री विष्णूदेव साय, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, मेघालयचे मुख्यमंत्री कॉनरॅड संगमा, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, त्रिपुराचे मुख्यमंत्री मानिक साहा, उत्तराखंडचे मुख्यमंत्री  पुष्कर सिंह धामी, पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री एन रंगस्वामी, ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन मांझी, मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह, नागालँडचे मुख्यमंत्री नेफ्यु रिओ, सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंह तमांग, केंद्रीय राज्यमंत्री सर्वश्री रामदास आठवले, मुरलीधर मोहोळ, प्रतापराव जाधव, रक्षाताई खडसे, विविध राज्याचे उपमुख्यमंत्री सर्वश्री केशव प्रसाद मौर्य, ब्रजेश पाठक, पवन कल्याण, राजेंद्र शुक्ला, अरुण सावो, विजय शर्मा, प्रेमचंद बैरवा, विजयकुमार सिन्हा, सम्राट चौधरी, कनक बर्धन सिंह देव, प्रवती परिदा, चौना मेन, प्रेसतोन त्यांसोंग, यांथुंगो    पटॉन, टी. आर. झेलियांग, एस धार, श्रीमती दिया कुमारी यांच्यासह साधू, संत, महंत, विविध धर्मांचे गुरु, राज्यातील खासदार, आमदार, विविध राजकीय पक्षांचे वरिष्ठ नेते, उद्योग, क्रीडा, मनोरंजन क्षेत्रातील विविध मान्यवर, विशेष निमंत्रित अतिथी उपस्थित होते.

शपथविधी सोहळ्याची सुरुवात राष्ट्रगीत व राज्य गीताने करण्यात आली.

००००















 

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...