Tuesday, October 6, 2026

वृत्त क्रमांक

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ‘जलतारा’अंतर्गत जलसंधारण कामांना गती द्या- जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

लखमापूर येथे जलताराचे उद्घाटन  

अधिकाधिक कामे हाती घेण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश

पाण्याचा प्रत्येक थेंब अडविण्यावर भर

नांदेड (जिमाका), दि. ६ : माहूर तालुक्यात पावसाचा खंड लांबल्याने निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उपलब्ध पाण्याचा प्रत्येक थेंब अडवून तो जमिनीत मुरविण्यासाठी जलसंधारणाच्या कामांना गती देण्यात यावी. ‘जलतारा’अंतर्गत अधिकाधिक कामे हाती घेऊन ती वेळेत पूर्ण करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले.

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी आज माहूर तालुक्यातील लखमापूर ग्रामपंचायतीला भेट देऊन ‘जलतारा’अंतर्गत जलसंधारण कामाचे उद्घाटन केले. यावेळी तहसीलदार अभिजीत जगताप, गटविकास अधिकारी, , तालुका कृषी अधिकारी, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, तांत्रिक अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामरोजगारसेवक, सरपंच तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

माहूर तालुक्यात पावसाचा खंड लांबल्याने शेतीसह पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जलसंधारणाची कामे दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहेत. त्यामुळे उपलब्ध मनुष्यबळ, यंत्रसामग्री आणि इतर साधनसामग्रीचा योग्य नियोजनातून वापर करून ‘जलतारा’अंतर्गत अधिकाधिक कामे तातडीने हाती घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन करून ते अडविणे व जमिनीत मुरविणे, भूजल पातळी वाढविणे आणि भविष्यातील पाणीटंचाईची तीव्रता कमी करणे, यासाठी जलसंधारणाच्या कामांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. गावपातळीवर आवश्यकतेनुसार कामांचे नियोजन करून त्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर प्रशासनाचा भर राहणार आहे.

वरिष्ठ प्रशासनाने थेट गावपातळीवर भेट देऊन जलसंधारणाच्या कामांचा आढावा घेतल्याने माहूर तालुक्यातील ‘जलतारा’ उपक्रमाला गती मिळणार आहे. दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी उपलब्ध पाणीसाठ्याचे संवर्धन आणि पावसाच्या प्रत्येक थेंबाचे संधारण करण्याच्या दृष्टीने ही कामे महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.

****









वृत्त क्रमांक

माहूर नवरात्रोत्सवासाठी प्रशासन सज्ज- जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

• भाविकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे निर्देश

• 120 एसटी बसेस सज्ज, दोन हजारांहून अधिक अधिकारी-कर्मचारी तैनात

नांदेड (जिमाका), दि. 6 : माहूरगडावरील शारदीय नवरात्रोत्सव-2026 दरम्यान येणाऱ्या भाविकांना सुरक्षित, सुलभ व सुरळीत दर्शन मिळावे, यासाठी आरोग्य, सुरक्षा, वाहतूक, स्वच्छता, पाणी व वीज यांसह सर्व आवश्यक सुविधांमध्ये कोणतीही कुचराई होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिले. 

माहूर येथे दि. 11 ते 20 ऑक्टोबर 2026 या कालावधीत होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली यात्रा नियोजनाबाबत आढावा बैठक घेण्यात आली. सहधर्मादाय आयुक्त तथा संस्थानच्या पदसिद्ध अध्यक्षा हिराबाई शेळके आणि पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत विविध विभागांच्या तयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी तथा संस्थानचे उपाध्यक्ष किरणकुमार भोंडवे, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा सचिव बी. सरवणन, तहसीलदार तथा कोषाध्यक्ष अभिजीत जगताप, विश्वस्त तथा पुजारी चंद्रकांत भोपी, संजय कान्नव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी, आगार प्रमुख चंद्रशेखर समर्थवाड, वन परिक्षेत्र अधिकारी रोहित जाधव, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक, गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर टाकरस, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी, महावितरणचे कार्यकारी अभियंता, पुरातत्त्व विभागाचे अधिकारी, अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी तसेच संबंधित विभागांचे प्रमुख व प्रतिनिधी उपस्थित होते.

माहूरगडावर भाविकांच्या वाहतुकीसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या 120 बसेस उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती आगार प्रमुख चंद्रशेखर समर्थवाड यांनी दिली. भाविकांच्या सुरक्षेसाठी 500 हून अधिक पोलीस अधिकारी, कर्मचारी व होमगार्ड तैनात करण्यात येणार असून, गर्दी नियंत्रण, दर्शन रांगा आणि वाहतूक व्यवस्थेवर विशेष लक्ष देण्यात येणार आहे.

भाविकांना वन्यप्राण्यांपासून सुरक्षितता मिळावी यासाठी जंगल परिसरात वन कर्मचाऱ्यांची गस्त वाढविण्यात येणार असून, आवश्यक ठिकाणी सुरक्षा पथके नियुक्त करण्यात येणार आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्ते दुरुस्तीची कामे, तर राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून बंद असलेले पथदिवे नवरात्रोत्सवापूर्वी सुरू करण्यात येणार आहेत.

भाविकांच्या आरोग्य सुविधांसाठी ग्रामीण रुग्णालयातील 40 पैकी 20 खाटा यात्रा व्यवस्थापनासाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. पुरेसा औषधसाठा आणि रुग्णवाहिका उपलब्ध ठेवण्यात येणार असून, दत्तशिखर, अनुसया माता व रेणुकामाता मंदिराच्या पायथ्याशी आरोग्य पथके आणि रुग्णवाहिका तैनात करण्यात येणार आहेत.

पंचायत समितीच्या माध्यमातून भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात येणार आहे. संस्थानतर्फे पिण्याचे पाणी, स्वच्छता, वीज, सुलभ दर्शन रांगा तसेच परशुराम मंदिर परिसरात महाप्रसाद, साबुदाणा खिचडी व फळांची व्यवस्था करण्यात येणार आहे. नगरपंचायतीतर्फे दत्त चौक येथील नियंत्रण कक्ष, पाणी, पथदिवे आणि शौचालयांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. दत्तशिखर संस्थानतर्फे पाणी, स्वच्छता, वीज, महाप्रसाद तसेच संस्थानच्या जागेत मोफत वाहनतळाची सुविधा उपलब्ध राहणार आहे. महावितरणकडून अखंडित वीजपुरवठा करण्याची ग्वाही देण्यात आली.

नवरात्रोत्सवाच्या कालावधीत भाविकांच्या आरोग्य, सुरक्षा, वाहतूक व इतर आवश्यक सुविधांसाठी विविध विभागांचे दोन हजारांहून अधिक अधिकारी-कर्मचारी कार्यरत राहणार आहेत. दरम्यान, पुरातत्त्व विभाग आणि अन्न व औषध प्रशासनाच्या प्रमुखांच्या बैठकीतील अनुपस्थितीची जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी गांभीर्याने नोंद घेतली.

शारदीय नवरात्रोत्सवासाठी प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि संस्थान सज्ज झाले असून, भाविकांना सुरक्षित व सुरळीत दर्शनाचा अनुभव मिळावा यासाठी सर्व यंत्रणा समन्वयाने कार्यरत राहणार आहेत. भाविकांनी प्रशासनाने केलेल्या सूचनांचे व शिस्तीचे पालन करून निर्धास्तपणे माहूरगडावर यावे आणि श्री रेणुकामातेचे दर्शन घ्यावे, असे आवाहन प्रशासन व संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

***













वृत्त क्रमांक

प्रगती महिला बचत गटातील 130 महिलांना शास्त्रीय पशुपालन व चारा व्यवस्थापनाचे प्रशिक्षण

• किनवट येथे दोन दिवसीय प्रशिक्षण

• शेळीपालन, पशुधन आरोग्य व दुष्काळी परिस्थितीतील चारा व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन

नांदेड(जिमाका), दि. 6 : पशुसंवर्धन विभाग, पंचायत समिती किनवट यांच्या वतीने प्रगती महिला बचत गट, किनवट येथील महिलांसाठी दि. 5 व 6 ऑक्टोबर 2026 रोजी दोन दिवसीय पशुपालन व चारा व्यवस्थापन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. या प्रशिक्षणास बचत गटातील 130 महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

प्रशिक्षणादरम्यान महिलांना शेळीपालनाचे शास्त्रीय व्यवस्थापन, पशुधनाचे आरोग्य, निकृष्ट चारा सकस करण्याच्या विविध पद्धती तसेच दुष्काळी परिस्थितीत चारा व पाण्याचे योग्य नियोजन याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. निकृष्ट चारा सकस करण्याच्या विविध पद्धतींची प्रत्यक्ष प्रात्यक्षिकेही घेण्यात आली.

यावेळी सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, किनवट डॉ. संजीव पाटील तसेच डॉ. योगेश पाटील, डॉ. उमेश सोनटक्के, डॉ. निरंजन बागल, डॉ. सुनील जाधव, डॉ. राहुल जोंधळे, डॉ. शितल वानखेडे, डॉ. लक्ष्मीकांत ढगारे यांच्यासह पशुसंवर्धन विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महिलांना पशुपालनाच्या विविध बाबींवर मार्गदर्शन केले.

शेळीपालनाच्या माध्यमातून महिलांना अतिरिक्त उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देणे, पशुधनाची उत्पादकता वाढविणे आणि उपलब्ध संसाधनांचा प्रभावी वापर करणे यासाठी शास्त्रीय पशुपालन पद्धतींचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात आले.

दुष्काळी परिस्थितीत पशुधनाचे आरोग्य व उत्पादन टिकवून ठेवण्यासाठी चाऱ्याची उपलब्धता, योग्य साठवणूक, निकृष्ट चाऱ्याचे सकसीकरण आणि पाण्याचा काटकसरीने वापर यांचे महत्त्व प्रशिक्षणातून स्पष्ट करण्यात आले.

महिला बचत गटातील महिलांनी प्रशिक्षणास उत्स्फूर्त प्रतिसाद देत शेळीपालन, चारा व्यवस्थापन, पशुधन आरोग्य आणि दुष्काळी परिस्थितीतील पशुपालन व्यवस्थापन याबाबत माहिती घेतली. या प्रशिक्षणामुळे महिलांना शास्त्रीय पशुपालन पद्धतींची माहिती मिळून पशुपालनाच्या माध्यमातून उत्पन्नवाढ, आर्थिक स्वावलंबन आणि महिला सक्षमीकरणाला चालना मिळणार आहे.

**



वृत्त क्रमांक

निकृष्ट चाऱ्याला युरिया प्रक्रियेतून मिळणार सकसतेची जोड

• चारा साक्षरता अभियानांतर्गत देगलूर येथे पशुपालकांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिक

• चारा टंचाईवर शास्त्रीय व्यवस्थापनाचा संदेश

नांदेड(जिमाका), दि. 06: सेवा संकल्प अभियानांतर्गत आज दि. 6 ऑक्टोबर 2026 रोजी देगलूर उपविभागीय कार्यालयात चारा साक्षरता अभियान राबविण्यात आले. दुष्काळसदृश परिस्थिती आणि संभाव्य चारा टंचाई लक्षात घेता उपलब्ध चाऱ्याचा शास्त्रीय व कार्यक्षम वापर करून पशुधनाला सकस व पौष्टिक चारा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांच्या संकल्पनेतून तसेच जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन, नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या उपक्रमात निकृष्ट चाऱ्याची पौष्टिकता वाढविण्यासाठी सोयाबीन गुळीवर युरिया प्रक्रिया करून सकस चारा तयार करण्याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक उपस्थित शेतकरी व पशुपालकांना करून दाखविण्यात आले.

यावेळी युरिया प्रक्रियेद्वारे निकृष्ट चाऱ्याची पौष्टिकता, पाचकता आणि रुचकरता वाढविण्याची शास्त्रीय पद्धत सविस्तर समजावून सांगण्यात आली. तसेच उपलब्ध चाऱ्याचे योग्य संवर्धन, साठवणूक आणि शास्त्रीय व्यवस्थापन करून चारा टंचाईच्या काळात त्याचा पशुधनासाठी प्रभावी वापर कसा करता येईल, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

या प्रसंगी उपविभागीय अधिकारी अनुप पाटील, तहसीलदार सूर्यवंशी, नायब तहसीलदार सरकलवाड तसेच विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते. 

हे प्रात्यक्षिक देगलूरचे सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. आर. व्ही. सुरेवाड व तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ. एस. एल. पाशमवार यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. एस. आर. यंकम यांनी उपस्थित नागरिक, शेतकरी व पशुपालकांना प्रत्यक्ष करून दाखविले.

उपलब्ध चाऱ्याचे शास्त्रीय व्यवस्थापन-चारा टंचाईवर प्रभावी समाधान हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. उपलब्ध चाऱ्याचा योग्य वापर, त्याचे शास्त्रीय संवर्धन व व्यवस्थापन केल्यास चारा टंचाईच्या काळात पशुधनासाठी पुरेसा व सकस चारा उपलब्ध करून देण्यास मदत होणार आहे.

****








वृत्त क्रमांक

मतदारांना मतदानासाठी विशेष नैमित्तिक रजा देण्याचे आवाहन

• खासगी आस्थापना, उद्योग व संस्थांनी मतदानासाठी किमान दोन तासांची सवलत द्यावी

नांदेड (जिमाका), दि. 06 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या 05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी शुक्रवार, दि. 23 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 4 या वेळेत मतदान होणार आहे. मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी संबंधित खासगी आस्थापना, उद्योग, संस्था व कार्यालयांनी आवश्यक वेळ उपलब्ध करून द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

लोकप्रतिनिधित्व अधिनियम, 1951 मधील कलम 135ब नुसार निवडणुकीच्या दिवशी मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्याची तरतूद आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या दि. 23 जून 2011 रोजीच्या शासन निर्णयानुसार पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील मतदारांसाठी विशेष नैमित्तिक रजा जाहीर करण्यात आली आहे.

मात्र, खासगी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या मतदारांना ही विशेष नैमित्तिक रजा लागू नसल्याने, अशा आस्थापनांमध्ये कार्यरत मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी मतदानाच्या दिवशी किमान दोन तासांची विशेष सवलत देण्यात यावी, अशा सूचना संबंधित तहसीलदारांनी खासगी आस्थापनांना देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

मतदारांना मतदानासाठी आवश्यक वेळ उपलब्ध करून देणे, ही बाब लक्षात घेऊन खासगी आस्थापना, उद्योग, संस्था व कार्यालयांनी आपल्या कर्मचाऱ्यांना मतदानाची संधी उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

संबंधित आस्थापना व संस्थांनी याची नोंद घेऊन आवश्यक कार्यवाही करावी, असेही जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी राहुल कर्डिले यांनी कळविले आहे.

**

वृत्त क्रमांक

दिवाळीनिमित्त तात्पुरत्या फटाका विक्री परवान्यासाठी 13 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका), दि. 6 : सन 2026 मधील दिवाळी उत्सव दि. 5 ते 11 नोव्हेंबर 2026 या कालावधीत साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर नांदेड महानगरपालिका हद्दीसाठी तात्पुरते फटाका विक्री परवाने जिल्हादंडाधिकारी कार्यालयामार्फत, तर जिल्ह्यातील संबंधित उपविभागांच्या कार्यक्षेत्रासाठी उपविभागीय दंडाधिकारी यांच्यामार्फत निर्गमित करण्यात येणार आहेत. त्यासाठी तात्पुरत्या फटाका विक्री परवान्याचे अर्ज दि. 13 ऑक्टोबर 2026 पर्यंत संबंधित कार्यालयात स्वीकारले जाणार आहेत.

नांदेड महानगरपालिका हद्दीतील तात्पुरत्या फटाका परवान्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू समितीमार्फत, तर जिल्ह्यातील इतर भागांसाठी संबंधित उपविभागीय कार्यालयामार्फत अर्ज स्वीकारण्यात येतील. अर्जदारांनी विस्फोटक अधिनियम व स्फोटक नियम, 2008 मधील तरतुदींनुसार विहित नमुना AE-5 मध्ये अर्ज सादर करावा.

अर्जासोबत फटाका विक्रीच्या दुकानाचा नकाशा, दोन पासपोर्ट आकाराचे छायाचित्रे, रुपये 600 शुल्क भरल्याच्या चलनाची प्रत, सामूहिक विक्री केंद्र असल्यास दुकान क्रमांक नमूद असलेले वाटपपत्र, संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेचे ना-हरकत प्रमाणपत्र, संबंधित पोलीस ठाण्याचे चारित्र्य व ना-हरकत प्रमाणपत्र, जिल्हा व्यवसायकर अधिकारी यांचे ना-हरकत प्रमाणपत्र, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे ना-हरकत प्रमाणपत्र, विद्युत निरीक्षकांचे ना-हरकत प्रमाणपत्र, जागेच्या मालकी हक्काचा पुरावा आणि संबंधित तहसीलदारांचे ना-हरकत प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

फटाका विक्रीच्या दुकानाचा नकाशा स्थानिक प्राधिकरणाकडून साक्षांकित केलेला असावा. दुकानातील साठा व विक्रीची जागा, साठवणूक क्षमता, ये-जा करण्याचा मार्ग आणि परिसरातील सुविधा यांचा नकाशात स्पष्ट उल्लेख असणे आवश्यक आहे. नियम 84 नुसार दुकानांमध्ये किमान 3 मीटर अंतर तसेच संरक्षित क्षेत्रापासून किमान 50 मीटर अंतर राखणे आवश्यक आहे. दुकान क्रमांकाचाही नकाशात स्पष्ट उल्लेख असावा.

नोंदणीकृत अथवा मान्यताप्राप्त असोसिएशनमार्फत सामूहिक स्वरूपात अर्ज केल्यास, परवान्यात नमूद करण्यात येणाऱ्या अटी व शर्तीनुसार संबंधित दुकानांची उभारणी करणे बंधनकारक राहील. विस्फोटक नियम किंवा परवान्यातील अटींचे उल्लंघन होऊन कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित असोसिएशनची राहील. याबाबत असोसिएशनचे शपथपत्र सादर करणे आवश्यक आहे. तसेच दुकानाच्या ठिकाणी अग्निशमन दल, सुरक्षा रक्षक आदींची आवश्यक व्यवस्था करावी लागणार आहे.

अर्जदाराने विहित नमुन्यातील सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर संबंधित कार्यालयाकडून चलन देण्यात येईल. चलनाद्वारे शुल्क शासन खात्यात जमा केल्यानंतर त्याची प्रत अर्जासोबत जोडावी. परिपूर्ण अर्जांच्या आधारे नांदेड महानगरपालिका हद्दीतील तात्पुरते फटाका विक्री परवाने दि. 26 व 27 ऑक्टोबर 2026 रोजी जिल्हादंडाधिकारी, नांदेड यांच्यामार्फत, तर संबंधित उपविभागाच्या हद्दीतील परवाने संबंधित उपविभागीय दंडाधिकारी यांच्यामार्फत निर्गमित करण्यात येतील.

दिवाळी उत्सवाच्या कालावधीत स्फोटक नियम (The Explosives Rules), 2008 मधील नियम 84(6) नुसार एकाच ठिकाणी 50 पेक्षा अधिक फटाका विक्रीच्या दुकानांना परवानगी दिली जाणार नाही. परवान्यात विहित केलेल्या साठा व विक्रीच्या प्रमाणापेक्षा अधिक व्यवहार करता येणार नाही. तसेच नियमांनुसार आणि SET-X ते SET-XV मधील निर्देशांनुसार साठा नोंदवही ठेवून ती तपासणीसाठी उपलब्ध करून देणे बंधनकारक राहील.

अनधिकृतपणे विस्फोटक पदार्थांचा साठा किंवा विक्री करणे हा गंभीर स्वरूपाचा व दंडनीय अपराध आहे. शासनस्तरावरून तसेच विस्फोटक नियंत्रक व संबंधित विभागांकडून वेळोवेळी प्राप्त होणाऱ्या अटी व शर्तींचे पालन करणे बंधनकारक राहील. त्यामुळे इच्छुक अर्जदारांनी सर्व आवश्यक कागदपत्रांसह दि. 13 ऑक्टोबर 2026 ही अंतिम मुदत लक्षात घेऊन संबंधित कार्यालयात अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

**

वृत्त क्रमांक

सेवा संकल्प अभियानांतर्गत 62 बालकांना मिळणार नवी दृष्टी

• जिल्हा रुग्णालयात केली 171 बालकांची नेत्रतपासणी

• जालना येथील श्री गणपती नेत्रालयात होणार मोफत नेत्रशस्त्रक्रिया

नांदेड(जिमाका), दि. 6 : सेवा संकल्प अभियानांतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या माध्यमातून नांदेड येथील जिल्हा रुग्णालयात दि. 3 ऑक्टोबर 2026 रोजी आयोजित नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरात 171 शालेय बालकांची तपासणी करण्यात आली. यापैकी 62 बालके नेत्रशस्त्रक्रियेसाठी पात्र ठरली असून, या सर्व बालकांवर श्री गणपती नेत्रालय, जालना येथे लवकरच मोफत नेत्रशस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत नांदेड जिल्ह्यात 45 आरोग्य पथकांद्वारे अंगणवाडीतील बालकांची वर्षातून दोन वेळा, तर शालेय बालकांची वर्षातून एकदा नियमित आरोग्य तपासणी करण्यात येते. जन्मजात व्यंग, पोषणमूल्यांची कमतरता, शारीरिक व मानसिक विकासातील विलंब तसेच विविध आजारांचे निदान करून आवश्यक उपचार करण्यात येतात. हृदयरोग, नेत्रविकार, आकडी व इतर आजारांसाठी विशेष तपासणी शिबिरे आयोजित करून मोफत निदान व उपचाराची सुविधाही उपलब्ध करून दिली जाते.

याच उपक्रमाचा भाग म्हणून श्री गुरु गोबिंदसिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालय, नांदेड येथे तिरळेपणा, जन्मजात मोतीबिंदू व पापणी झुकणे आदी नेत्रविकारांसाठी तपासणी, उपचार व शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले. श्री गणपती नेत्रालय, जालना आणि जिल्हा रुग्णालय, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिरात 171 बालकांची नेत्रतपासणी करण्यात आली. त्यापैकी 62 बालके शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरली असून त्यांच्यावर जालना येथील श्री गणपती नेत्रालयात मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्राच्या माध्यमातून 0 ते 6 वर्षे वयोगटातील बालकांमध्ये आढळणारे जन्मजात आजार, बालपणातील आजार, जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे होणारे आजार तसेच विकासात्मक विलंब यांचे वेळीच निदान करून आवश्यक शस्त्रक्रिया व औषधोपचार केले जातात. तसेच अंगणवाडी तपासणीदरम्यान आढळणाऱ्या कुपोषित बालकांना पोषण पुनर्वसन केंद्रात संदर्भित करून उपचार व श्रेणीवर्धनासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात.

या उपक्रमासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, लातूरच्या आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. रेखा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय पेरके, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनुपमा शिंदे, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष सूर्यवंशी आणि निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. राजाभाऊ बुट्टे यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. चंद्रशेखर आपनगिरे, डॉ. रोषनआरा तडवी, श्री.चंदनकर, आरबीएसके समन्वयक अनिल कांबळे, डीईआयसी व्यवस्थापक विठ्ठल तावडे, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता आकाश जोंधळे, तसेच नेत्र चिकित्सा अधिकारी अनिता चव्हाण, शुभांगी रुदेवाड आणि प्रिया जाधव यांच्यासह राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. शिबिरासाठी आपुलकी सेवा संघाच्या वतीने उपस्थित लाभार्थ्यांना मोफत अन्नदान करण्यात आले.

मोफत नेत्रशस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध झाल्याबद्दल पात्र बालकांच्या पालकांनी समाधान व्यक्त केले.

**



वृत्त क्रमांक

पदवी तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी 120 तासांचे प्रत्यक्ष कार्यप्रशिक्षण

• शासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था व स्वयंसेवी संस्थांमध्ये प्रत्यक्ष कार्यानुभवाची संधी

नांदेड (जिमाका), दि. 06 : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 आणि महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत प्रत्यक्ष कार्यानुभव (ऑन द जॉब ट्रेनिंग) मिळावा, या उद्देशाने पदवी तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांसाठी 120 तासांचे प्रत्यक्ष कार्यप्रशिक्षण अनिवार्य करण्यात आले आहे. या उपक्रमाची नांदेड जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रशासन, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि जिल्ह्यातील महाविद्यालयांच्या समन्वयातून शासन-विद्यापीठ-महाविद्यालय प्रत्यक्ष कार्यप्रशिक्षण समन्वय व्यवस्था विकसित करण्यात येत आहे.

या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक शाखा व अभ्यासक्रमाशी संबंधित प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेता येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच स्वयंसेवी संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कार्यप्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात येणार आहे.

महाविद्यालयांनी तातडीने कार्यवाही करावी

प्रत्येक महाविद्यालयाने पदवी तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांची विषय व अभ्यासक्रमनिहाय यादी तयार करून, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विषयानुसार संबंधित शासकीय अथवा इतर संस्थांची निवड करावी. त्यानंतर प्रत्यक्ष कार्यप्रशिक्षणाबाबतचे प्रस्ताव अधिकृत पत्रासह संबंधित कार्यालयांकडे सादर करावेत.

तसेच या उपक्रमाच्या दैनंदिन देखरेखीसाठी आणि संबंधित कार्यालयांशी समन्वय साधण्यासाठी प्रत्येक महाविद्यालयाने प्राध्यापक समन्वयक अधिकारी नियुक्त करणे आवश्यक आहे.

120 तासांचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र

विद्यार्थ्यांनी निर्धारित 120 तासांचे प्रत्यक्ष कार्यप्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर संबंधित कार्यालय प्रमुखांच्या स्वाक्षरीने प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या प्रमाणपत्राचा विहित नमुना प्रशिक्षण सुरू होण्यापूर्वी संबंधित कार्यालयाला महाविद्यालयाने उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.

कार्यालयीन शिस्त व गोपनीयतेचे पालन आवश्यक

प्रत्यक्ष कार्यप्रशिक्षणाच्या कालावधीत विद्यार्थ्यांनी संबंधित कार्यालयाची कार्यालयीन शिस्त, कामाची वेळ, नैतिकता तसेच गोपनीयतेसंदर्भातील नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक राहणार आहे. याबाबत विद्यार्थ्यांना महाविद्यालयामार्फत आवश्यक त्या सूचना देण्यात याव्यात.

शिक्षण आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव यांची सांगड

प्रत्यक्ष कार्यप्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञानावर अवलंबून न राहता प्रत्यक्ष प्रशासकीय कामकाज, संस्थात्मक प्रक्रिया आणि कार्यपद्धती समजून घेण्याची संधी मिळणार आहे. शिक्षण आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव यांची सांगड घालणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांची व्यावसायिक कौशल्ये विकसित करण्याबरोबरच त्यांची रोजगारक्षमता वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

नांदेड जिल्ह्यातील सर्व संबंधित महाविद्यालयांनी पदवी तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांना या अनिवार्य शैक्षणिक उपक्रमाचा लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही तातडीने सुरू करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

**

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...