Sunday, September 20, 2026

वृत्त क्रमांक 

सेवा संकल्प महाअभियानांतर्गत नांदेड महा-आयडीयाथॉन २०२६चे आयोजन

शेती, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण व डिजिटल प्रशासनातील स्थानिक समस्यांवर तंत्रज्ञानाधारित उपाय सुचविण्याची युवकांना संधी

नांदेड (जिमाका), दि. २१ : मा. पंतप्रधान यांच्या संवैधानिक पदावरील २५ वर्षांच्या सेवा पर्वाच्या औचित्याने राज्यभरात १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत नांदेड जिल्ह्यातील स्थानिक समस्यांवर कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण उपाय शोधण्यासाठी *‘नांदेड महा-आयडीयाथॉन २०२६’*चे आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या शासन निर्णयानुसार, जिल्हास्तरीय महा-आयडीयाथॉनमधील उत्कृष्ट उपायांना राज्यस्तरीय ‘महा-नाविन्यता आव्हान’ (Maha-Grand Innovation Challenge) मध्ये सादरीकरणाची संधी मिळणार आहे. तसेच निवडक नाविन्यपूर्ण उपायांसाठी शासकीय कार्यादेश आणि उद्योजकता-विकासासाठी आवश्यक मार्गदर्शन व इनक्युबेशन सहाय्य उपलब्ध होणार आहे.

पाच प्रमुख क्षेत्रांतील समस्यांवर नाविन्यपूर्ण उपाय

या उपक्रमात जिल्ह्यातील विद्यार्थी, युवक, स्टार्टअप्स, आयटीआय व अभियांत्रिकी विद्यार्थी, व्यावसायिक तसेच ग्रामीण नवोन्मेषकांना एक ते पाच सदस्यांच्या संघामध्ये सहभागी होता येईल. सहभागी संघांनी पुढील पाच प्रमुख क्षेत्रांतील स्थानिक समस्यांवर तंत्रज्ञान व एआय आधारित उपाय सादर करावयाचे आहेत.

कृषी तंत्रज्ञान (AgriTech), आरोग्य सेवा (Healthcare), गुणवत्तापूर्ण शिक्षण (Education), पर्यावरण, पाणी व कचरा व्यवस्थापन, डिजिटल प्रशासन व सेवा वितरण या विषयावर अर्ज करावयाचे आहे. 

इच्छुक सहभागी संघांनी ५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत Annexure-1 मध्ये मागविण्यात आलेला अर्ज सादर करावा. अर्जासोबत पीडीएफ स्वरूपातील सादरीकरण, दोन मिनिटांचा व्हिडिओ, नमुना प्रारूप (Prototype) तसेच आवश्यक तांत्रिक बाबी सादर करणे अपेक्षित आहे.

प्राथमिक छाननीनंतर निवड झालेल्या उत्कृष्ट संघांना जिल्हाधिकारी, नांदेड तसेच तज्ज्ञ समितीसमोर अंतिम फेरीत आपल्या नाविन्यपूर्ण संकल्पनेचे सादरीकरण करण्याची संधी मिळणार आहे. जिल्हास्तरावरील सर्वोत्कृष्ट तीन संघांना विशेष पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार असून, त्यांची राज्यस्तरीय ‘महा-नाविन्यता आव्हाना’साठी थेट शिफारस करण्यात येणार आहे.

विद्यार्थी व इतर सहभागींसाठी स्वतंत्र अर्ज प्रक्रिया

जिल्ह्यातील अभियांत्रिकी, तंत्रनिकेतन, आयटीआय व कृषी महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी आपले अर्ज संबंधित महाविद्यालयातील प्रशिक्षण व नियुक्ती अधिकारी (TPO) किंवा इनक्युबेशन केंद्रामार्फत सादर करावेत.

स्टार्टअप्स, व्यावसायिक आणि ग्रामीण नवोन्मेषकांनी आपले प्रकल्प Centre for Agro Bio Innovation and Incubation Foundation (CABIIF), स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे सादर करावेत.

या उपक्रमाचा नोडल विभाग कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग असून, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी (MSInS) आणि रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ (RTMSSU), मुंबई यांच्या माध्यमातून राज्यस्तरीय अंमलबजावणी करण्यात येत आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभाग, उद्योग विभाग तसेच इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभाग हे सहआयोजक विभाग आहेत. जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी, नांदेड यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा अंमलबजावणी समितीमार्फत या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

अधिकृत संकेतस्थळावर मार्गदर्शक सूचना उपलब्ध

स्पर्धेची सविस्तर माहिती, मार्गदर्शक सूचना तसेच विविध क्षेत्रांतील समस्यांची माहिती (Problem Statements) नांदेड जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. विद्यार्थी तसेच इतर सहभागींसाठी अर्ज व प्रकल्प सादरीकरणाची प्रक्रिया संबंधित  https://nanded.gov.in/en तसेच https://srtmun.ac.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

नांदेड जिल्ह्यातील विद्यार्थी, युवक, स्टार्टअप्स, संशोधक, व्यावसायिक आणि ग्रामीण नवोन्मेषकांनी ‘नांदेड महा-आयडीयाथॉन २०२६’मध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या नाविन्यपूर्ण संकल्पनांच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासात योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी श्री. हनुमंत रंगा – ९७६४५६७४५६, ७७७६८०४२२० यांच्याशी संपर्क साधावा.

***

वृत्त क्रमांक 

नांदेड जिल्ह्यात ‘सेवा संकल्प अभियान’च्या  प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व विभागांनी समन्वयाने नियोजन करावे - जिल्हाधिकारी राहुल कर्डिले  

१७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान विविध लोकोपयोगी उपक्रमांचे आयोजन 

नागरिकांनी शासकीय योजना व सेवांचा अवश्य लाभ घ्यावा

नांदेड(जिमाका), दि. 20 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदावरील कारकीर्दीला 25 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ‘सेवा परमोधर्म’ या उक्तीनुसार समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विविध शासकीय सेवा प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी दि. 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर 2026 दरम्यान ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येणार आहे. या अभियानाची नांदेड जिल्ह्यात प्रभावी व यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व विभागांनी योग्य समन्वय ठेवून उपक्रमांचे काटेकोर नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले. दरम्यान, या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांनी शासकीय योजना व सेवांचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले. 

‘सेवा संकल्प अभियान’च्या जिल्हास्तरीय अंमलबजावणी समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.

 या बैठकीस दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, सर्व उपविभागीय अधिकारी, महिला व बालविकास विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी, कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त राजपाल कोल्हे, नगर पालिका प्रशासनाचे सहायक आयुक्त , यांच्यासह विविध विभागाचे विभागप्रमुख उपस्थित होते. 

शासनाच्या निर्देशानुसार दि. १७ सप्टेंबर ते दि. १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत नागरिककेंद्री विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या माध्यमातून शासनाच्या विविध योजना, सेवा व उपक्रमांचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविणे, नागरिकांमध्ये शासकीय योजनांविषयी जनजागृती करणे तसेच प्रशासन आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक प्रभावी करणे, हा अभियानाचा प्रमुख उद्देश असल्याचे  जिल्हाधिकारी राहुल कर्डिले म्हणाले. 

 या अभियानांतर्गत ‘सेवा सेतू अभियान’, ‘इनोव्हेशन चॅलेंज’, ‘सेवा माझे योगदान’, ‘विकसित भारत संकल्प यात्रा’, ‘सेवा ज्योत यात्रा’, चित्रकला व वक्तृत्व स्पर्धा, ‘अंगणवाडी उत्सव’, ‘आशीर्वादाचा दिवा’, ‘बदलाची गोष्ट’, ‘आभार आणि संकल्पाची रांगोळी’, ‘नमो सेवा गाथा’, ‘जल, जन आणि संकल्प यात्रा’ तसेच ‘जनसेवक महाकुंभ’ यांसारखे विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगून सर्व विभागप्रमुखांनी त्यांची जबाबदारी व्यवस्थित पार पाडावी तसेच अभियानात केलेल्या कामाची पूर्वीची व नंतरची छायाचित्रे आणि व्हिडीओ चित्रिकरण करून ठेवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

जिल्ह्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांचा या अभियानात व्यापक सहभाग सुनिश्चित करण्यासाठी संबंधित विभागांनी आपल्या कार्यक्षेत्रानुसार उपक्रमांचे नियोजन करावे. प्रत्येक उपक्रमाचा उद्देश, अपेक्षित लाभार्थी, आवश्यक मनुष्यबळ, प्रसिद्धी-प्रसार आणि अंमलबजावणीचे वेळापत्रक याबाबत योग्य नियोजन करण्यात यावे, अशा सूचनाही जिल्हाधिकारी कर्डिले यांनी दिल्या.

‘सेवा सेतू’च्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय सेवा व योजनांचा लाभ सुलभतेने मिळावा, यासाठी संबंधित यंत्रणांनी आवश्यक कार्यवाही करावी. तसेच नाविन्यपूर्ण उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘इनोव्हेशन चॅलेंज’, युवक व विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी चित्रकला व वक्तृत्व स्पर्धा, महिला व बालकल्याणाशी संबंधित उपक्रमांद्वारे जनसहभाग वाढविणे, तर ‘जल, जन आणि संकल्प यात्रा’च्या माध्यमातून जलसंवर्धन व लोकसहभागाचा संदेश देण्यावर भर देण्यात येणार आहे.

अभियानाच्या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या सर्व उपक्रमांची माहिती नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी व्यापक प्रसिद्धी-प्रसार करण्याच्या दृष्टीनेही संबंधित विभागांनी नियोजन करावे. शासकीय योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना मिळवून देताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी क्षेत्रीय पातळीवर विशेष प्रयत्न करावेत, असेही जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सांगितले.

‘सेवा परमोधर्म’ या संकल्पनेनुसार नागरिकांना अधिक गतिमान, पारदर्शक आणि प्रभावी सेवा देण्यासाठी हे अभियान महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे जिल्हाधिकारी श्री. कर्डिले यांनी यावेळी सांगितले.

***



केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...