Monday, July 7, 2025

 वृत्त क्र. 704

वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता  

हवामानशास्त्र केंद्राने दिल्या सूचना  

प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी दि. 07 जुलै 2025 रोजी दुपारी 14:00 वाजता दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दि. 07, 08 व 09 जुलै 2025 या तीन दिवसांसाठी यलो (Yellow) अलर्ट जारी केलेला आहे. दि. 07 जुलै 2025 ह्या दिवशी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी 30 ते 40 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची तसेच दि. 08 व 09 जुलै 2025 हे दोन दिवस जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी 40 ते 50 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता वर्तविली आहे. या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि जनतेने खबरदारी घ्यावी. नागरिकांनी खबरदारीची उपाययोजना म्हणून पुढील प्रमाणे काळजी घ्यावी. असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 

या गोष्टी करा 

विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा. तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा. तुमच्या स्मार्ट मोबाईल फोन मध्ये 'दामिनी', 'सचेत' हे दोन ॲप डाउनलोड करा 'दामिनी' ॲप तुमच्या आजूबाजूला वीज विषयक संभाव्य धोके दर्शविते तर 'सचेत' ॲप मुळे तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या हवामानाविषयी अचूक इशारे व माहिती मिळते. 

या गोष्टी करु नका

आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका. उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका. धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका. जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे. असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

0000

वृत्त क्र. 703

प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी अॅग्रिस्टॅक शेतकरी ओळखपत्र क्रमांक अनिवार्य

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी 31 जुलै अंतिम मुदत

नांदेड दि. 7 जुलै :- प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम सन 2025-26 राबविण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. ही योजना नांदेड जिल्ह्यात भारतीय कृषी विमा कंपनी पत्ता : मुंबई क्षेत्रीय कार्यालय, लोक चेंबर्स, मरोळ मरोशी रोड, मरोळ, अंधेरी पूर्व, मुंबई, महाराष्ट्र- ४०० ०५९ ई-मेल : pikvima@aicofindia.com या विमा कंपनी मार्फत राबविण्यात येणार आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम मुदत 31 जुलै 2025 आहे. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजनेत 31 जुलै 2025 पर्यंत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.

ही योजना नांदेड जिल्ह्यातील अधिसूचित केलेल्या ज्वारी, मुग, उडीद, तूर, सोयबीन व कापूस या पिकांसाठी केवळ अधिसूचित क्षेत्रासाठी लागू असेल. प्रधानमंत्री पीक विमा योजना कर्जदार, तसेच, बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये सहभागासाठी शेतकऱ्यांना ओळखपत्र क्रमांक (अग्रिस्टॅक फार्मर आयडी) असणे अनिवार्य आहे. 

शासनाच्या 11 एप्रिल, 2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये कृषि विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभासाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक (फार्मर आयडी) 15 एप्रिल 2025 पासून अनिवार्य करण्यात आलेला आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजना सन 2025-26 मध्ये सहभागी होण्याकरीता अॅग्रिस्टॅक अंतर्गत शेतकरी ओळखपत्र क्रमांक (फार्मर आयडी) बंधनकारक राहील. त्यामुळे जिल्ह‌यातील शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड, आधार लिंक असलेला मोबाईल क्रमांक, सातबारा उतारा (जमिनीचा दाखला) घेऊन नजीकच्या सीएससी सेंटर (कॉमन सर्व्हिस सेंटर) च्या/ सहकार्याने आपली नोंदणी पूर्ण करावी व आपला शेतकरी ओळखपत्र क्रमांक (फार्मर आय.डी.) प्राप्त करुन घ्यावा. नोंदणीसाठी काही अडचण उद्भवल्यास संबंधीत गावचे तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक यांची मदत घ्यावी.

अॅग्रीस्टॅकची नोंदणी पूर्णतः मोफत आहे. कोणतेही शुल्क भरण्याची गरज नाही. कृषी विकास योजना, पी एम किसान निधी, पीक विमा, नैसर्गिक आपत्तीत नुकसान भरपाईचा लाभ मिळण्यासाठी शेतकरी ओळख क्रमांक सक्तीचा आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी या योजनेंतर्गत नोंदणी करावी व तसेच प्रधानमंत्री पिक विमा योजनेत 31 जुलैपर्यंत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नांदेड यांनी केले आहे.

00000

 वृत्त क्र. 702

कृषी विभाग व पाणी फाउंडेशन यांच्यामार्फत डिजीटल शेतीशाळेचे आयोजन 

नांदेड दि. 7 जुलै :- कृषी विभाग व  पाणी फाउंडेशन यांच्यामार्फत सन 2025-26 साठी डिजीटल शेतीशाळा राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.  सदर डिजीटल शेतीशाळाचे वेळापत्रक प्राप्त झाले असून शेतकऱ्यांना स्वत: झुम लिंकवर किंवा पाणी फाउंडेशनच्या युटयुब चॅनलवर लाइव्ह कार्यक्रमास जॉईन होता येईल. तरी शेतकऱ्यांनी या डिजीटल शेतीशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे. 

या डिजीटल शेतीशाळेमध्ये दर सोमवारी सायंकाळी 6.15 वा. बाजरी, सायंकाळी 7.30 वा. सोयाबीन, दर मंगळवारी सायंकाळी 6.15 वा. खरीप ज्वारी तसेच सायं.7.30 वा. कापूस, दर बुधवारी सकाळी 10 वा. भात, सायं. 6.15 वा. मका तसेच सायं. 8 वा. पशुधन, दर गुरुवारी सायंकाळी 6.15 वा. राजमा (घेवडा) तसेच सायंकाळी 7.30 वा. आंबा व पेरु, संत्रा, मोसंबी व कागदी लिंबु दर शुक्रवारी सायंकाळी 7.30 वा. तुर, मुग व उडिद, दर शनिवारी सायंकाळी 7.30 वा. भाजीपाला या पिकांचे शेतीशाळेमध्ये आयोजन करण्यात आले आहे. या डिजीटल शेतीशाळेसाठी शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी शंका झुमच्या चॅट बॉक्स किंवा युटयुब चा कॅमेट सेक्शनमध्ये लिहावे.   

पाणी फाउंडेशन ही संस्था महाराष्ट्रामध्ये कृषी विद्यापीठाच्या सहकार्याने डिजीटल शेतीशाळा राबवित असते. या डिजीटल शेतीशाळेचा शेतकऱ्यांना फायदा होत असल्याचे पाणी फाउंडेशनच्या विविध कार्यक्रमातून व शेतकऱ्यांच्या अनुभवातून दिसून येत आहे.

00000

दि. 6 जुलै 2025

वृत्त क्र. 701

डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय परिसरात 500 झाडांची लागवड 

अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्या हस्ते वृक्षारोपण संपन्न

नांदेड दि. 6 जुलै:- डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, विष्णुपूरी नांदेड परिसरात वृक्षाच्छादन वाढविण्यासाठी हरित महाराष्ट्र, समृध्द महाराष्ट्र व एक पेड माँ के नाम 2.0 या देशव्यापी अभियानातर्गत 5 जुलै रोजी 500 झाडांची लागवड करून वृक्षारोपन अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.

पर्यावरण हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग असून, पर्यावरण आपल्याला स्वच्छ हवा, शुध्द पाणी आणि सकस अन्न पुरवते. पर्यावरणाचे संरक्षण करणे, ही आपली सर्वाची नैतिक जबाबदारी असून, आपण सर्वानी एकत्र येवून पर्यावरणाचे संरक्षण केले तरच आपण एक चांगले भविष्य निर्माण करु शकतो असे प्रतिपादन अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी केले.

पर्यावरणामध्ये विविध नैसर्गिक संसाधने आहेत. त्यांचे जतन आवश्यक असून, जेणेकरुन भविष्यात त्यांची कमतरता भासणार नाही. पर्यावरणातील सर्व घटक एकमेकांशी जोडलेले आहेत. त्यापैकी एका घटकावर परिणाम झाल्यास, त्याचा परिणाम इतर घटकांवरही होतो. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखणे आवश्यक आहे. पर्यावरणाचे संरक्षण केल्यास जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदलाची समस्या कमी करता येते. या वृक्षारोपणामुळे जैवविविधता जोपासण्यास हातभार लागून पर्यावरणाचे संतुलन राखण्यास मदत होईल व आपल्या भावी पिढीचे जगणे सुखकर होईल असे मत अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी व्यक्त केले. पृथ्वी ही आपल्या मातेसमान असून पर्यावरणाची काळजी वृक्षारोपन व वृक्षसंवर्धन करुन घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

या वृक्षारोपन कार्यक्रमात वड, कडुलिंब, पिंपळ, आवळा, बांबू, जांब, हिरडा इत्यादी वृक्षांची लागवड करण्यात आली. या कार्यक्रमात हिंगोलीचे अधिष्ठाता डॉ. चक्रधर मुंगल, विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत गोडबोले, वैद्यकीय अधिक्षक डॉ. विजय कापसे, डॉ. एस.आर. मोरे, डॉ. राजेश अंबुलगेकर, डॉ. एम.ए. समीर, डॉ. शीतल राठोड, डॉ. किशोर राठोड, डॉ. वंदना दुधमल, डॉ. आय.एफ.इनामदार, डॉ. भावना भगत, डॉ. अनिल देगांवकर, डॉ. अतिष गुजराती तसेच विविध विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. मुकुंद कुलकर्णी, डॉ. पंकज कदम,डॉ. सलिम तांबे, उप वैद्यकीय अधीक्षक डॉ. अभिजीत देवगरे, प्रशासकीय अधिकारी के.बी.विश्वासराव, संजय वाकडे, नियोजन अधिकारी बालाजी डोळे, रुग्णालयाच्या अधिसेविका अलका जाधव यांचेसह वैद्यकीय अध्यापक वृंद, राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थी, पदव्युत्तर विद्यार्थी व कर्मचारी  यांची उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन डॉ. आर.डी. गाडेकर सहयोगी प्राध्यापक यांनी केले.

0000



दि. ५ जुलै 2025

 वृत्त क्र. 700

'टिश्यू कल्चर' तंत्रज्ञानाची ५० एकर क्षेत्रात उभारणी

नांदेड जिल्ह्यात प्रकल्पासाठी केंद्रीय पथकाकडून पाहणी

नांदेड, दि. ५ जुलै:- नांदेडच्या केळी उत्पादकांच्या शेतीला 'टिश्यू कल्चर' तंत्रज्ञानाची जोड मिळणार आहे. त्यामुळे केळीचे उत्पादन अधिक दर्जेदार, रोगमुक्त आणि निर्यातीयोग्य होणार आहे. केंद्र शासनाद्वारे भारतीय बीज सहकारी समिती लिमिटेड, नवी दिल्ली संस्थेच्या सहकार्याने  नांदेड जिल्ह्यात ५० एकर क्षेत्रात 'टिश्यू कल्चर' तंत्रज्ञानाची उभारणी करण्यासाठी शुक्रवारी केंद्रीय पथकाने जिल्ह्यात मुदखेड तालुक्यातील मौजे खुजडा येथील पन्नास एकर  शासकीय गायरान जमिनीवर प्रस्तावित जागेची पाहणी केली. नांदेडसह जालना व जळगाव जिल्ह्याचादेखील यासाठी विचार करण्यात येत आहे.

'केळी' उत्पादनाचा उत्तम दर्जा व भरघोस उत्पादनातून शेतकऱ्यांना फायदा व्हावा, यासाठी 'टिश्यू कल्चर' स्थापनेसह बीज उत्पादन, संरक्षण व संवर्धन सुविधा उपलब्ध होणार आहेत. या प्रकल्पासाठी केंद्रीय पथकाने 4 जुलै 2025 रोजी नांदेड जिल्ह्याचा दौरा केला. शासकीय विश्रामगृह, नांदेड येथील बैठक कक्षात डॉ. जयप्रकाश तम्मीनन  यांचे समक्ष जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी सादरीकरणाद्वारे नांदेड व परिसरातील आठ जिल्ह्यात केळीचे क्षेत्र, क्षेत्र विस्तार, उत्पादन उत्पादकता आणि निर्यातवाढीच्या संधी, टिशू कल्चर रोपांची सद्यस्थितीत उपलब्धता आणि आवश्यकता यातील अंतर भरून काढण्यासाठी सदर प्रकल्पाची नांदेड जिल्ह्यासाठीची उपयुक्तता  नांदेड जिल्ह्यातील रोड,रेल्वे,हवाई कनेक्टिव्हिटी, सिंचन , संशोधन केंद्र इत्यादी पायाभूत सुविधांचे पार्श्वभूमीवर प्रस्तावित प्रकल्पाची तांत्रिक अनुकूलता  आणि आर्थिक व्यवहार्यता  विषद केली. 

या बैठकीस निवासी उपजिल्हाधिलारी किरण आंबेकर,मुदखेड तहसीलदार देऊळगावकर, केळी संशोधन केंद्राचे अधिकारी शिंदे, संचालक शीतलादेवी फार्मर प्रोड्युसर कंपनी, बारडचे निलेश देशमुख, तंत्र अधिकारी श्री स्वामी, कृषी अधिकारी चामे,कृषी अधिकारी हे उपस्थित होते. 

त्यानंतर डॉक्टर जयप्रकाश तम्मिनन यांनी अधिकाऱ्यांसमवेत मौजे खुजडा तालुका मुदखेड येथील प्रस्तावित जागेची भेट देऊन पाहणी केली. या  प्रकल्पाची अंतिम जागा निवड लवकरचनिश्चित होणार आहे.

जिल्हाधिकाऱ्यांची विशेष  पूर्वतयारी :

या टिशू कल्चर प्रकल्पासाठी नांदेड,जालना आणि जळगाव जिल्ह्यातील प्रस्तावित जागांपैकी एकाच जागेची निवड होणार असल्याने या प्रकल्पासाठी नांदेड जिल्ह्याची निवड व्हावी यासाठी मागील काही दिवसांपासून जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी  विशेष लक्ष देऊन  कृषी विभाग,महसूल विभाग व केळी संशोधन केंद्राच्या समन्वयातून विशेष पूर्वतयारी केली.

- निर्यातीचा 'टक्का' वाढणार

या प्रकल्पामुळे नांदेडच्या केळीचा दर्जा उंचावेल आणि थेट आंतरराष्ट्रीय बाजाराची दारे खुली होतील. त्यातून केळी निर्यातीचा 'टक्का' वाढणार आहे. साहजिकच शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. तसेच नांदेड जिल्ह्यातील केळीचे क्षेत्र आणि उत्पादन वाढण्यास मदत होणार आहे. केळीची टिशू कल्चर रोपे कमी दरात उपलब्ध होतील. 

प्रस्तावित जागेची पाहणी

नवी दिल्लीतील भारतीय बीज सहकारी समिती लिमिटेडचे  वितरण साखळीचे प्रमुख डॉ. जयप्रकाश तम्मीनन यांनी प्रस्तावित  शासकीय जागेची पाहणी केली. त्यांच्यासोबत  जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नांदेड, प्रभारी अधिकारी, केळी संशोधन केंद्र नांदेड,तहसीलदार मुदखेड, तालुका कृषी अधिकारी मुदखेड, तलाठी मौजे खुजडा  इत्यादी उपस्थित होते.

टिश्यू कल्चर केळीचे फायदे

रोगमुक्तः नियंत्रित वातावरणात वाढ होत असल्याने संसर्गाची बाधा होत नाही.

समान वाढ : सर्व झाडे समान गुणधर्माने वाढत असल्याने समान फळांचे उत्पादन हाती येते.

जलद वाढ आणि उत्पादन : झाडे लवकर परिपक्व होत असल्याने उत्पादकाला फायदा होतो.

आधुनिक उत्पादन : कोणत्याही ऋतूत केळीची लागवड केली जाऊ शकते.

उत्कृष्ट दर्जाचे फळ : चांगला आकार, चव फळाचे उत्पादनाची निर्मिती होती.

००००००






  वृत्त क्रमांक 827   डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते महाविर चौक मार्गावर 10 ते 16 ऑगस्ट पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश     नांदेड दि. 9 ऑग...