Wednesday, October 1, 2025

वृत्त क्रमांक 1045

बारावी परीक्षेचे ऑनलाईन अर्ज करण्यास मुदतवाढ 

नांदेड दि. 1 ऑक्टोबर :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रु-मार्च २०२६ मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इ. 12 वी परीक्षेचे ऑनलाईन अर्ज भरण्याच्या तारखेत 20 ऑक्टोबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

 

नियमित विद्यार्थ्यांची अर्ज UDISE + मधील PEN-ID वरून ऑनलाईन पध्दतीने त्यांचे कनिष्ठ महाविद्यालय प्रमुखामार्फत भगवयाची आहेतव्यवसाय अभ्यासक्रम घेणारे नियमित विद्यार्थी सर्व शाखाचे पुनर्परिक्षार्थी नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय. आयटीआय (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer of Credit घेणारे विद्यार्थी) चे विषय घेऊन प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षेची अर्ज त्यांचे कनिष्ठ महाविद्यालय प्रमुखामार्फत प्रचलित पध्दतीने भरावयाची आहेत. सदरची आवेदनपत्रे www.mahahsscboard.in या संकेतस्थळावरून भरावयाच्या तारखांना पुढीलप्रमाणे मुदतवाढ देण्यात आली आहे.

 

शुल्क प्रकारात उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयामार्फत शास्त्रकला व वाणिज्य शाखांचे नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे UDISE + मधील PEN-ID वरुन ऑनलाईन पध्दतीने भरावयाच्या तारखा तसेच व्यवसाय अभ्यासक्रम (HSC Vocatioanl Stream) शाखांचे नियमित विद्यार्थीसर्व शाखांचे पुनर्परिक्षार्थीनाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थीश्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणारे तसेच ITI ( औद्यागिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer of Credit घेणारे विद्यार्थी) विद्यार्थ्यांची अर्ज भरावयाच्या तारखा बुधवार 1 ऑक्टोबर ते

सोमवार 20 ऑक्टोबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

 

उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्याल यांनी 8 सप्टेंबर 2025 ते उपरोक्त नमूद कालावधीत नियमित शुल्काने अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क आरटीजीएस/एनईएफटीद्वारे भरणा करावे. शुल्क जमा केल्यानंतर त्या चलनामध्ये समाविष्ट सर्व विद्यार्थ्यांच्या Application Status मध्ये "Draft" चा "Send to Board" व Payment Status मध्ये "Not Paid चा "Paid" असा बदल झाला आहे का याची खातरजमा करावी.

 

शुल्क जमा केलेली आरटीजीएस/एनईएफटीद्वारे पावती/चलनासह विद्यार्थ्याच्या याद्या व प्रिलिस्ट जमा करावयाची तारीख नंतर कळविण्यात येईल याची सर्व उच्च माध्यमिक शाळाप्रमुखप्राचार्य यांनी नोंद घ्यावी. सर्व कनिष्ठ महाविद्यालयांनी आवेदनपत्रे भरण्यापूर्वी कॉलेज प्रोफाईलमध्ये कॉलेजसंस्था मान्यताप्राप्त विषयशिक्षक याबाबतची योग्य माहिती भरून मंडळाकडे पाठविणे आवश्यक आहे.

 

सर्व विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरून सबमिट केल्यानंतर आवेदनपत्रे भरावयाच्या कालावधीमध्ये उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयांना कॉलेज लॉगिन मधून प्रिलिस्ट उपलब्ध करून दिलेला असेलकनिष्ठ महाविद्यालयांनी त्याची प्रिंट काढून आवेदनपत्रात नमूद केलेली सर्व माहिती जनरल रजिस्टरनुसार पडताळून ती अचूक असल्याची खात्री करावी. सदर प्रिलिस्टवर माहितीची खात्री केल्याबाबत संबंधित विद्यार्थ्याची स्वाक्षरी घ्यावी त्याचप्रमाणे पडताळणी केल्याबाबत उच्च माध्यमिक शाळा प्रमुख, प्राचार्य यांनी प्रिलिस्टच्या प्रत्येक पानावर शिक्क्यासह स्वाक्षरी करावी.

 

बारावी परीक्षेची अर्ज ही ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी आवेदनपत्रे त्यांच्या उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयामार्फत भरावी. सर्व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य यांनी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यासाठी पुढील महत्वाच्या बाबी विचारात घेणे आवश्यक आहे.

 

उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना नियमित विद्यार्थ्याची ऑनलाईन आवेदनपत्र UDISE + मधील PEN-ID वरुन भरण्याची सोय उपलब्ध करून दिलेली आहे.  DISE + मध्ये विद्यार्थ्यांची नोंद नसल्यास संपूर्ण माहिती भरून आवेदनपत्रे सादर करता येईल. पुनर्परिक्षार्थीनावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थीश्रेणीसुधार व तुरळक विषय घेऊन परीक्षेस प्रविष्ट होणारे विद्यार्थी. आयटीआय (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer of Credit घेणारे विद्यार्थी)व्यवसाय अभ्यासक्रम शाखेच्या (HSC Vocational) विद्यार्थ्याची माहिती UDISE + मध्ये नसल्याने सदर विद्यार्थ्याची अर्ज प्रचलित पद्धतीने निश्चित केलेल्या तारखांना ऑनलाईन पद्धतीने भगवयाची आहेत. ज्या विद्यार्थ्याचा APPAR-ID उपलब्ध आहे त्याची नोंद आवेदनपत्र भरताना करण्यात यावी, असे आवाहन राज्य शिक्षण मंडळाचे सचिव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

0000

 

कृपया सुधारीत वृत्त घ्यावे, ही विनंती.

वृत्त क्रमांक 1044

प्रत्‍येक पीक कापणी प्रयोग काटेकोरपणे पुर्ण करावा - जिल्‍हाधिकारी राहुल कर्डिले  

नांदेड दि. 1 ऑक्टोबर : पीक कापणी प्रयोगाच्‍या नियोजनाप्रमाणे प्रत्‍येक प्रयोग काटेकोरपणे पुर्ण करावेत असे निर्देश जिल्‍हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले. मंगळवार 30  सप्टेंबर रोजी सायंकाळी कृषी, महसूल व ग्राम विकास (जिल्‍हा परिषद) विभागाच्‍या अधिकारी कर्मचारी यांची आढावा बैठक घेण्‍यात आली. खरीप हंगाम सन २०२५-२६ साठी सर्व संबंधीतांना पीक कापणी प्रयोगाचे प्रशिक्षण यापूर्वीच देण्‍यात आले आहे.

यावर्षापासून पीक विमा योजनेत नुकसान भरपाई निश्चित करताना पीक कापणी प्रयोगांना आधारभूत धरण्‍यात येणार आहे. त्‍यामुळे पीक कापणी प्रयोगात कोणत्‍याही प्रकारची चूक होणार नाही. पीक कापणी प्‍लॉटची आखणी, कापूस पिकांबाबत आवश्‍यक वेचनी, भात, सोयाबीन, ज्‍वार, तूर इत्‍यादींबाबत सुकविण्‍याचे प्रयोग,उत्‍पादन मोजणी तंत्र तसेच प्रयोगाची आवश्‍यक छायाचित्रे, नोंदी संकलित कराव्‍यात. सर्व प्रयोग शासनाच्‍या मार्गदर्शक सुचनानुसारच पार पडतील याबाबत सर्व संबंधीतांनी दक्षता घेण्‍याच्‍या सूचना यावेळी देण्‍यात आल्‍या. पीक विम्‍यासाठी तसेच पीकांचा आढावा काढण्‍यासाठी पीक कापणी प्रयोगांचे अन्‍यन्‍य साधारण महत्‍व असल्‍याने सर्व संबंधीत अधिकारी कर्मचारी यांनी नेमून दिलेल्‍या गावातील सर्व प्रयोग सीसीई ॲपवर अचूकपणे पार नोंदवले जातील यासाठी आवश्‍यक दक्षता घेण्‍याबाबत त्‍यांनी सूचना दिल्‍या.

जिल्‍हयात सर्वत्र अतिवृष्‍टी झाल्‍यामुळे खरीप पिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले. प्रामुख्‍याने सोयाबीन, कापूस, ज्‍वार , तूर पिकांचे कापणी प्रयोग शिल्‍लक आहेत.जिल्‍हयाभरात ५५८ गावांत एकूण ३३१२ कापणी प्रयोगांचे नियोजन करण्‍यात आले आहे. ग्रामस्‍तरीय समिती, क्षेत्रीय अधिकारी, पर्यवेक्षक यांची नेमणूक करण्‍यात आली आहे.त्‍याच गावातील प्रगतीशील शेतकरी, पोलिस पाटील व ग्रामपंचायत निर्देशीत सदस्‍य यांनी देखील अचूक निष्‍कर्ष  नोंदवले जातील यासाठी नियोजीत कापणी प्रयोगास वेळेवर उपस्थित राहण्‍याचे आवाहन केले.

याबैठकीस जिल्‍हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्‍तप्रसाद कळसाईत, निवासी उपजिल्‍हाधिकारी किरण अंबेकर,तहसिलदार विपीन पाटील, तंत्र अधिकारी गोविंद देशमूख, सुप्रिया वायवळ यांचेसह सर्व तहसीलदार, गट विकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते.

00000

वृत्त क्रमांक 1043

गोदावरी नदीच्या संभाव्य पूर परिस्थितीबाबत 

नांदेड पाटबंधारे मंडळाचे नागरिकांना आवाहन

नांदेड दि. 1 ऑक्टोंबर : भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार ऑक्टोबर 2025 च्या पहिल्या आठवड्यात पावसाची शक्यता वर्तविली आहे. गोदावरी नदीच्या पाण्याच्या प्रवाहाचा सध्याचा वेग लक्षात घेता सदरचा विसर्ग शंकररावजी चव्हाण विष्णुपूरी प्रकल्पस्थळी 2 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 1 वाजेनंतर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शंकररावजी चव्हाण विष्णुपूरी प्रकल्पस्थळी 3.50 लक्ष ते 4.00 लक्ष क्सुसेक्स विसर्ग नदीपात्रात वाहणार आहे. सदर विसर्ग 24 तास किंवा त्यापेक्षा जास्त वेळ राहण्याची शक्यता आहे. नांदेड शहरात गोदावरी नदीची इशारा पातळी 351 मीटर व धोका पातळी 354 मीटर आहे. सदरील विसर्गामुळे धोका पातळी ओलांडण्याची शक्यता आहे. त्यानुषंगाने नागरीकांनी संभाव्य उपाययोजना कराव्यात व तशी खबरदारी घ्यावी, असे आवाहन नांदेड पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता अ. आ. दाभाडे यांनी केले आहे. 

आज 1 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 1 वा. शंकररावजी चव्हाण विष्णुपूरी प्रकल्पामधून 2:00 लक्ष क्युसेक्स इतका विसर्ग चालू आहे. दोन दिवसापूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे 28 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 11 वा. जायकवाडी धरणातून 3.00 लक्ष क्युसेक्स विसर्ग सोडण्यात आले आहे. जायकवाडी प्रकल्पातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग चालू आहे. शंकररावजी चव्हाण विष्णुपूरी प्रकल्पाचे 17 दरवाजे 28 सप्टेंबर 2025 पासून पूर्णपणे उघडण्यात आले आहेत. धरणात येणारी आजची आवक सरासरी 2.00 लक्ष क्युसेक्स असून त्यात आज दुपारी 1 वाजेपासून वाढ होण्यास सुरवात झाली आहे. 

पावसाच्या परिस्थितीत काही बदल झाल्यास, प्रकल्पस्थळी येणाऱ्या पाण्याची आवक लक्षात घेवून हा विसर्ग कमी अथवा जास्त होण्याची शक्यता आहे. काही समाजमाध्यमाद्वारे नागरिकांमध्ये विसर्गाबाबत चुकीची अथवा अवास्तव माहिती पसरविली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. वस्तुनिष्ठ माहितीसाठी पूर नियंत्रण कक्ष, सिंचन भवन, नांदेड दुरध्वनी क्र. 02462-263870 या क्रमांवर संपर्क साधावा, असेही आवाहन केले आहे.

00000

 वृत्त क्रमांक 1042

सेवा पंधरवड्यानिमित्त नांदेड येथे भटक्या विमुक्तांना विविध दाखले वाटप

नांदेड दि.१ ऑक्टोबर : छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत 'सेवा पंधरवाडा' निमित्त नांदेड आणि अर्धापूर तालुक्यातील भटक्या विमुक्त जातीतील नागरिकांना विविध दाखले वाटपाचा कार्यक्रम १ ऑक्टोबर रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालय आणि नांदेड तहसील कार्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमाचे आयोजन उपविभागीय कार्यालयाच्या सभागृहात करण्यात आले होते.

छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत उपविभागीय कार्यालय, नांदेड आणि तहसील कार्यालय, नांदेड यांच्या वतीने नागरिकांच्या विविध समस्यांचे निराकरण करून त्यांना आवश्यक असलेले विविध दाखले देण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमात भटक्या विमुक्त जातीचे नेते देविदास हादवे यांनी समाजाच्या विविध समस्या आणि अडचणी मांडल्या. त्यानंतर उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ आणि नांदेडचे तहसीलदार संजय वारकड यांच्या हस्ते भटक्या विमुक्त जातीतील  नागरिकांना जातीचे प्रमाणपत्र, रेशन कार्ड, रहिवासी दाखला आणि इतर आवश्यक दाखले वाटप करण्यात आले. यामध्ये वासुदेव, मसणजोगी, मुस्लिम मदारी, गाडी वडार, वाघे, गोसावी आणि गोंधळी समाजातील जवळपास १५० नागरिकांची उपस्थितीत होती.

यावेळी, समाजातील वंचित घटकांसाठी 'सेतू' मार्फत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल नांदेड शहरातील सेतू केंद्र चालक विजय जोंधळे आणि अर्धापूरचे शिवप्रसाद पत्रे यांचा उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देऊन सत्कार करण्यात आला.वाडी तांड्यावरील व वस्तीबाहेर राहणाऱ्या भटक्या विमुक्त जाती जमातीना शासनाच्या विविध योजना लाभ मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे उपविभागीय अधिकारी डाॅ. सचिन खल्लाळ यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला परभणीचे जिल्हा कोषागार अधिकारी निळकंठ पांचगे, नायब तहसीलदार संजय नागमवाड, नायब तहसीलदार सुनील माचेवाड, नायब तहसीलदार स्वप्नील दिगलवार, पुरवठा निरीक्षक रवींद्र राठोड यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

०००००





प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिनांक ०१ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १३:२२ वाजता दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी ०१ ते ०४ ऑक्टोबर २०२५ या चार दिवसांसाठी यलो (Yellow) अलर्ट जारी केलेला आहे. दिनांक ०१ ते ०४ ऑक्टोबर २०२५ या दरम्यान जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी ३० ते ४० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता वर्तविली आहे. या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि जनतेने खबरदारी घ्यावी. 

या गोष्टी करा 

विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा.

आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका.

आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा.

तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा.

पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा.

या गोष्टी करु नका 

आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका.

विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका.

उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका.

धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका.

जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे.

000000

 वृत्त क्रमांक 1041

2 लाख 90 हजार क्यूसेकच्या महापुरावर विष्णुपुरी प्रकल्पातून नियंत्रण

नांदेड दि. 1 ऑक्टोंबर : नांदेड शहराची तहान भागवण्यासाठी, तीन तालुक्यांतील दुष्काळावर मात करण्यासाठी आणि नांदेड एमआयडीसीच्या विकासासाठी स्व. शंकरराव चव्हाण यांच्या संकल्पनेतून विष्णुपुरी प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली. मागील पंचवीस वर्षांपासून गोदावरी नदीला एवढा मोठा पूर कधीच आला नव्हता. साधारणतः दरवर्षी एक लाख ते सव्वा लाख क्यूसेक एवढा पूर येत असे. परंतु यंदा प्रथमच तब्बल 2 लाख 90 हजार क्यूसेक एवढा प्रचंड महापूर आल्याने प्रशासनासमोर अभूतपूर्व आव्हान उभे राहिले होते. परंतु जिल्हा प्रशासनाच्या तत्पर कार्यवाहीमुळे व विष्णुपुरी प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी वेळेत केलेल्या विविध उपाययोजनांमुळे विष्णुपूरी प्रकल्पाच्या पूरपरिस्थतीवर नियंत्रण मिळविण्यास यश आले आहे.

17 दरवाजे प्रथमच पूर्णपणे उघडले

पूर्वी पूरनियंत्रणासाठी केवळ सव्वा लाख ते दीड लाख  हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यासाठी काही दरवाजे उघडले जात असत. 2006 मध्ये सर्वाधिक 12 दरवाजे उघडण्यात आले होते. परंतु यंदा आलेल्या महापुरामुळे प्रथमच विष्णुपुरी प्रकल्पाचे 17 चे 17 दरवाजे पूर्णपणे उघडावे लागले. हे मोठे संकट समोर असताना प्रशासनाने वेळीच निर्णय घेतला आणि पुराचे पाणी सुरक्षितपणे सोडण्यात यश मिळवले.

नादुरुस्तीत असलेले पाच दरवाजे मोठे आव्हान

प्रत्यक्षात प्रकल्पातील पाच दरवाजे मोठ्या नादुरुस्तीत होते. त्यामुळे एवढ्या महापुराच्या वेळी ते कार्यान्वित करणे हे पाटबंधारे विभागासमोर मोठे संकट होते. अशा परिस्थितीत कार्यकारी अभियंता दत्तात्रय रा. सावंत, चारुदत्त बनसोडे, अशोक चव्हाण, नवनाथ पिसोटे (उपअभियंता) तसेच सहाय्यक अभियंता शिवम ससाने यांनी युद्धपातळीवर काम सुरू केले. रात्रंदिवस प्रयत्न करून, अवघ्या काही तासांत नादुरुस्त दरवाज्यांची दुरुस्ती करण्यात आली. परिणामी 17 पैकी एकही दरवाजा अडथळ्याविना कार्यान्वित करण्यात आला.

शेतजमिनी पाण्याखाली जाण्यापासून वाचल्या

या निर्णायक आणि तातडीच्या कारवाईमुळे महापूराचे पाणी नियोजनबद्ध पद्धतीने सोडण्यात आले. त्यामुळे बॅकवॉटरची समस्या निर्माण झाली नाही. हजारो एकर शेती पाण्याखाली जाण्यापासून वाचली. अन्यथा गोदावरीच्या काठावरील अनेक गावे व शेती पूर्णपणे जलमय झाली असती.

प्रशासन आणि जनतेकडून कौतुक

या यशस्वी पुरनियंत्रणामुळे मोठा अनर्थ टळला. नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ तसेच प्रशासनाने कार्यकारी अभियंता आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे विशेष कौतुक केले. विष्णुपुरी प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी दाखवलेली तत्परता आणि जबाबदारी कौतुकास्पद ठरली आहे.

पंचवीस वर्षांनंतर आलेल्या एवढ्या प्रचंड महापुराच्या वेळी विष्णुपुरी प्रकल्पाची भूमिका अतिशय निर्णायक ठरली. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या धाडसामुळे व कौशल्यामुळे नांदेड जिल्हा एका मोठ्या आपत्तीपासून वाचला आहे.

00000




 वृत्त क्रमांक 1040

ज्येष्ठांचा सन्मान हीच खरी परंपरा : शरद देशपांडे 

नांदेड, दि. 1 ऑक्टोबर : ज्येष्ठांचा सन्मान हीच खरी भारतीय परंपरा आहे. ज्येष्ठ नागरिकांचा अनुभव, मार्गदर्शन आणि आशीर्वाद हे समाजाला दिशा देणारे दीपस्तंभ आहेत. त्यामुळे त्यांच्या कल्याणासाठी आपण सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव शरद देशपांडे यांनी केले. 

समाज कल्याण सहाय्यक आयुक्त, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व  महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ (फेस्कॉम) मराठवाडा प्रादेशिक विभाग (उ) नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जागतिक ज्येष्ठ नागरिक कार्यशाळेचे आयोजन आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे करण्यात आले होते. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे, महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाचे उपाध्यक्ष अशोक तेरकर, मराठवाडा प्रादेशिक विभागाचे अध्यक्ष डॉ. हंसराज वैद्य, महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ महिला आघाडीचे अध्यक्षा निर्मला कोरे यांची उपस्थिती होती. 

ज्येष्ठ नागरिकांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा. ज्येष्ठांसाठी सामाजिक न्याय भवन येथे कक्ष सुरू करण्यात आला आहे. यामध्ये त्यांना असलेल्या कौटुंबिक व सामाजिक समस्यांची नोंद या कक्षामध्ये घेण्यात येत आहे. नांदेड जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांनी शासनाच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या वयोश्री व तीर्थ दर्शन योजनेचा मोठ्याप्रमाणात लाभ घेतला. राज्य शासनाच्या सर्वसमावेशक धोरणामध्ये ज्येष्ठ नागरिक धोरण-2013 ची प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी, उपचार शिबिरे मोठ्याप्रमाणात राबविले जात आहेत. या शिबिरांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी राबविण्यात येणाऱ्या आरोग्य विषयक सोयी-सुविधांचा जास्तीत जास्त प्रमाणात लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. 

या कक्षामध्ये ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या असलेल्या कुटुंबिक तसेच इतर समस्यांची नोंदणी करावी. या प्रसंगी मंचावर उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाज कल्याणचे सेवानिवृत्ती समाज कल्याण अधिकारी बापू दासरी यांनी केले तर आभार लक्ष्मण गायके यांनी मानले.

000













 

 वृत्त क्रमांक 1039

शासकीय वसतीगृह योजनेसाठी 

26 ऑक्टोबरपर्यत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड दि.1 ऑक्टोबर : इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत राबविण्यात येत असलेल्या विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतीगृह योजना सुरु झालेली आहे. 

वसतिगृहात प्रवेशित विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी भोजन तसेच निवास व्यवस्था व शैक्षणिक साहित्यासाठी त्यांच्या आधारसंलग्न बँक खात्यामध्ये थेट रक्कम वितरीत करण्यात येते. तसेच शासकीय वसतीगृहासाठी पात्र असलेल्या तथापी गुणवत्तेनुसार व वसतीगृहाच्या क्षमतेअभावी वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज पंडित दिनदयाळ स्वयंम व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी विचारात घेतले जातील. 

इच्छुक विद्यार्थी - विद्यार्थीनीनी जिल्ह्यामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या बारावी नंतरच्या व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमास असणाऱ्या व्यावसायिक व बिगर व्यावसायिक प्रथम वर्षातील अभ्यासक्रमाच्या प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी सन 2025-26 या वर्षासाठी शासकीय वसतिगृह योजनाचे ऑनलाईन पध्दतीने अर्ज https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर 26 ऑक्टोबर 2025 पर्यत भरावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याणचे सहाय्यक संचालक सचिन खुणे यांनी केले आहे. 

00000

 वृत्त क्रमांक 1038

माहूरगड श्री रेणूका देवी संस्थानतर्फे पूरग्रस्तांना एक कोटी रुपयांची मदत

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी नागरिक व संस्थानी पुढे यावे : 

अध्यक्ष तथा जिल्हा प्रमुख न्यायाधीश सुनिल वेदपाठक

नांदेड दि. 1 ऑक्टोबर : माहूरगड येथील श्री रेणूका देवी संस्थानतर्फे पूरपरिस्थितीमुळे नुकसान झालेल्या पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. संस्थानतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये एक कोटी रुपयांची मदत करण्यात येणार आहे. या निर्णयासाठी संस्थेची बैठक नुकतीच घेण्यात आली यावेळी हा ठराव मंजूर करण्यात आला. संस्थानतर्फे केलेल्या मदतीप्रमाणे इतरही नागरिक व संस्थानी आपआपल्यापरीने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष तथा प्रमुख न्यायाधीश सुनिल वेदपाठक यांनी व्यक्त केला. 

या बैठकीत प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा संस्थेचे अध्यक्ष सुनिल वेदपाठक, माहूर उपविभागीय अधिकारी तथा उपाध्यक्ष श्री. मळगणे, किनवट उपविभागीय अधिकारी तथा संस्थेचे सचिव जेनितचंद्र दोन्तुला तसेच विश्वस्त मंडळ उपस्थित होते. संस्थानतर्फे समाजकारणाच्या कार्यात सातत्याने योगदान दिले जात असून यावेळी पूरग्रस्तांसाठी दिलेला एक कोटी रुपयांचा निधी हा समाजहिताचा आणि मदतीचा एक महत्वाचा उपक्रम ठरणार आहे.  याप्रसंगी सर्व सदस्यांनी पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी पुढाकार घेणे ही समाजाची नैतिक जबाबदारी असल्याचे मत व्यक्त केले. 

0000




 मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष)

मंगळवार, दि. ३० सप्टेंबर, २०२५. 

पूरग्रस्तांच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

टंचाईच्या सर्व सवलती मिळणार, जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याला प्राधान्य

आपत्तीग्रस्तांकडून वसुली नको; बँकाना निर्देश

मुंबई, दि. ३० : राज्य शासन पूरग्रस्ताच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. या भागातील शेतकरी, आपत्तीग्रस्त नागरिकांना टंचाई प्रमाणेच सर्व सवलती व उपाययोजना लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर दिली. आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांकडील कर्जाची वसुली थांबवावी, असे निर्देशही बँकाने दिल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले. 

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, शेतकरी सध्या अडचणीत आहे. हे लक्षात घेऊन बँकांना वसुली थांबवण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. तसेच पूरग्रस्त कुटुंबांना गहू-तांदूळ, डाळी व आवश्यक वस्तूंचे कीट वितरित करण्यात येत आहे. विहीर खचणे, शेतजमीन खरडून जाणे, अशा केंद्र सरकारच्या निकषाबाहेर जाऊन, झालेल्या नुकसानीवरही राज्य सरकार स्वतंत्र मदत करणार आहे. नुकसानीचे पंचनामे दोन-तीन दिवसांत पूर्ण होऊन पुढील आठवड्यात केंद्राला प्रस्ताव पाठवला जाणार आहे. मात्र, केंद्राच्या मदतीची वाट न पाहता राज्य सरकारने स्वतःच्या निधीतून मदत सुरू केली असून नंतर केंद्राकडून ती रक्कम ‘रिइम्बर्समेंट’च्या स्वरूपात मिळेल, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी स्पष्ट केले.

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत असली तरी आपत्ती व्यवस्थापन नियमावलीत ( मॅन्युअल) अशी व्याख्येचा समावेश नाही. असे असले तरी टंचाई निवारण काळातील निकषांप्रमाणेच सर्व सवलती व उपाययोजना लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी स्पष्ट केले.

00000

  वृत्त क्रमांक 1037

नवरात्रीनिमित्त  जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी माहूर येथे भेट देऊन घेतले दर्शन 

माहूर येथे विविध विकासकामांचा घेतला आढावा 

माहूर रेणूका देवी संस्थान तर्फे पूरग्रस्तानसाठी मुख्यमंत्री सहायत्ता निधीस १ कोटी रुपयांचा धनादेश

नांदेड, दि.३० सप्टेंबर:- नवरात्रीनिमित्त जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी आज माहूर येथे भेट देऊन श्री. रेणूका मातेचे दर्शन घेऊन माहूर येथील विविध विकास कामांचा आढावा घेतला. 

या वेळी जिल्हाधिकारी राहूल कर्डीले यांनी कैलास टेकडीकडे जाणारा रस्ता, माहूर विकास आराखडा तसेच जलसंधारणाची कामे यांचा सविस्तर आढावा घेतला. तसेच भाविकांच्या सोयीसाठी स्काय वॉकचे काम दिवाळीपूर्वी सुरू होणार असून यामुळे दररोज 5000 हून अधिक भाविकांचा पायी येणाऱ्या नागरिकांचा फुटफॉल वाढण्याची शक्यता आहे असे त्यांनी स्पष्ट केले.

यासोबतच भाविक व पर्यटकांच्या सोयीसाठी व्यापारी संकुल, पार्किंग सुविधा व निवास व्यवस्था यांच्यावर विशेष भर देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या दौऱ्यादरम्यान  जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी पत्रकारांशी  संवाद साधत स्थानिक नागरिकांच्या मागण्या व सूचना जाणून घेतल्या.

तसेच श्री रेणुका देवी संस्थान माहूरगड यांनी मुख्यमंत्री सहायता निधी यास एक कोटी रुपयांचा निधी पूरग्रस्तांसाठी दिला असल्याबद्दल जिल्हाधिकारी राहूल कर्डीले यांनी संस्थानाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश सुनील वेदपाठक, उपाध्यक्ष उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.मळगणे, सचिव श्री जेनीतचंद्र दंतोला उपविभागीय अधिकारी किनवट व सर्व विश्वस्त यांचे विशेष करून आभार मानले. 

यासोबतच सर्व नागरिक व संस्थांना आपापल्या परीने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्री. कर्डीले यांनी केले. पूरग्रस्त नागरिक आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारकडून जे अनुदान जाहीर झाले आहे ते दिवाळीपूर्वी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत असेही जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले.

या प्रसंगी कार्यकारी अभियंता श्री. चोपडे, तहसीलदार अभिजीत जगताप, मुख्याधिकारी विवेक कांदे, उपअभियंता श्री. भिसे तसेच पोलीस निरीक्षक श्री. कराड यांच्यासह तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय अधिकारी उपस्थित होते.

००००००







 वृत्त क्रमांक 1036

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा नदीपात्रात कुणीही जाऊ नये

नांदेड दि.30 सप्टेंबर : दिनांक 27 व 28 सप्टेंबर 2025 रोजी जायकवाडी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी झाल्याने दिनांक 28 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 11 वाजता जायकवाडी धरणातून 3,06,000 क्युसेक्स विसर्ग सोडण्यात आलेला होता. जायकवाडी धरणातून सोडण्यात आलेले पाणी शंकररावजी चव्हाण विष्णुपूरी प्रकल्पामध्ये साधारणत: 36 ते 40 तासामध्ये पोहचते. त्यामुळे हा विसर्ग शंकररावजी चव्हाण विष्णुपूरी प्रकल्पामध्ये 30 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 10 ते सकाळी 6 वाजेच्या दरम्यान प्राप्त होण्याची शक्यता असून अंदाजे 6 ते 7 तास सलग 3,50,000 क्युसेक्स प्रमाणे राहण्याची शक्यता आहे. तरी या दरम्यान शंकररावजी चव्हाण विष्णुपूरी प्रकल्पामधून 3,25,000 ते 3,50,000 क्युसेक्स विसर्ग सोडणे अनिवार्य असल्याने नांदेड शहराची धोका पातळी 354.00 मी. ओलांडून तो अंदाजे 354.25 मी. जाण्याची शक्यता आहे. 

सद्यस्थितीमध्ये शंकररावजी चव्हाण प्रकल्पाचे 17 दरवाजे उघडले असून एकूण 2,34,732 क्युसेक्सचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आलेला आहे. गोदावरी नदीपात्रामधील नांदेड जुना पूल येथील नोंदीनुसार 351.00 मी. ही इशारा पातळी असून सध्याला 351.94 मी. पर्यत पाणी पातळी वाढ झालेली आहे. 

तेलंगना राज्यातील पोचमपाड धरण पूर्ण क्षमतेने भरलेले असून सद्यस्थितीत 3,95,000 क्युसेक्स आवक 3,34,231 क्युसेक जावक नदीपात्रात सोडण्यात येत आहे. जर शंकररावजी चव्हाण विष्णुपूरी प्रकल्पातून 2,50,000 क्युसेक्स पाणी नदीपात्रात सोडले आणि पोचमपाड धरणातून विसर्ग नियंत्रित पण कमी सोडण्यात आला तर धर्माबाद तालुक्यातील नदीकाठच्या गावांना पुराचा वेढा पडू शकतो अथवा गावामध्ये पाणी जाऊ शकते. 

त्यामुळे शंकररावजी चव्हाण विष्णुपूरी प्रकल्पाच्या खालील बाजूस नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याबाबत तसेच नदीपात्रात कुणीही जाऊ नये किंवा वाहने किंवा जनावरे, पाळीव प्राणी अशी कोणतीही जीवीत अथवा वित्त हानी होणार नाही याबाबत उक्त गावांना सावधानतेचा इशारा संबंधित तहसिलदार व उपविभागीय अधिकारी, पोलीस निरीक्षक यांनी द्यावा असे आवाहन जिल्हाप्रशासनाने केले आहे. 

00000


वृत्त क्रमांक 1035

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ मतदार यादी नव्याने तयार करण्याच्या कार्यक्रमास पदवीधर मतदारांनी सहभाग नोंदवावा- जिल्हाधिकारी राहुल कर्डिले 

•  पदवीधर मतदारसंघाच्या याद्या नव्याने तयार करण्याबाबतचा कार्यक्रम जाहीर

नांदेड दि.30 सप्टेंबर : भारत निवडणूक आयोगाने 1 नोव्हेंबर 2025 या अर्हता दिनांकावर आधारीत औरंगाबाद विभागातील पदवीधर मतदार संघासाठी नव्याने मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम घोषित केला असून यामध्ये पदवीधर मतदारांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.

आज जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ मतदार यादी नव्याने तयार करण्याबाबत पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. 

यावेळी उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजकुमार माने, उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, नायब तहसिलदार नितेशकुमार बोलोलू, इंद्रजीत गरड आदीची उपस्थिती होती. 

जिल्हाधिकारी श्री. कर्डिले यांनी सांगितले, भारत निवडणूक आयोगाचे 12 सप्टेंबर 2025 चे पत्रान्वये 1 नोव्हेंबर 2025 या अर्हता दिनांकावर आधारीत महाराष्ट्र विधान परिषदेच्या  पदवीधर मतदारसंघाच्या याद्या नव्याने तयार करण्याबाबतचा कार्यक्रम जाहीर झाला असून मतदार नोंदणी अधिनियम 1960 चे कलम 31 (3) अन्वये जाहीर सूचना प्रसिध्द करण्याचा दिनांक मंगळवार 30 सप्टेंबर 2025. मतदार नोंदणी अधिनियम 1960 चे कलम 31 (4) अन्वये वर्तमानपत्रातील नोटीसीची प्रथम पुनप्रसिध्दी बुधवार 15 ऑक्टोंबर 2025. मतदार नोंदणी अधिनियम 1960 चे कलम 31 (4) अन्वये वर्तमानपत्रातील नोटीसीची द्वितीय पुनप्रसिध्दी शनिवार 25 ऑक्टोंबर 2025. नमुना 18 किंवा 19 द्वारे दावे स्विकारण्याचा अंतिम दिनांक गुरुवार 6 नोव्हेंबर 2025. हस्तलिखिते तयार करणे व प्रारुप मतदार याद्यांची छपाई गुरुवार 20 नोव्हेंबर 2025. मंगळवार 25 नोव्हेंबर 2025 रोजी प्रारुप मतदार याद्यांची प्रसिध्दी. दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी मंगळवार 25 नोव्हेंबर 2025 ते बुधवार 10 डिसेंबर 2025. गुरुवार 25 डिसेंबर 2025 रोजी दावे व हरकती निकाली काढण्याचा दिनांक व पुरवणी यादी तयार करणे व छपाई करणे. मंगळवार 30 डिसेंबर 2025 रोजी मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी करणे असा तपशिल आहे असे त्यांनी सांगितले.

मतदार नोंदणी नियम 1960 च्या नियम 31 (3) नुसार मतदार नोंदणी अधिकाऱ्यांपैकी प्रत्येक मतदार नोंदणी अधिकारी पदवीधर मतदार संघाचे यादीत नाव नोंदणी करण्यासाठी पात्र असलेल्या प्रत्येक व्यक्तीने मतदार नोंदणी अधिनियम 1960 नुसार नमुना 18 मध्ये संबंधित पदनिर्देशित अधिकारी यांचेकडे मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी पाठवावा किंवा पोहचवावा.

पदवीधर मतदार संघाची मतदार यादी प्रत्येक निवडणुकीपूर्वी नव्याने तयार करणे आवश्यक असल्यामुळे या मतदार संघातील सध्या अस्तित्वात असलेल्या मतदार यादीत ज्या व्यक्तींची नावे समाविष्ट आहेत अशा सर्व व्यक्तींनी सुध्दा विहीत नमुन्यात नव्याने अर्ज सादर करावा.

पदवीधर मतदार संघासाठीची अर्हता :

जो व्यक्ती भारताची नागरिक आहे आणि त्या मतदार संघातील सर्वसाधारण रहिवासी आहे आणि 1 नोव्हेंबर 2025 पूर्वी किमान 3 वर्ष भारताच्या राज्यक्षेत्रातील विद्यापीठाची एकतर पदवीधर असेल किंवा त्याच्याशी समतुल्य असलेली अर्हता धारण करीत असेल अशी प्रत्येक व्यक्ती मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यास पात्र आहे. 3 वर्षाचा कालावधी हा ज्या दिनांकास अर्हता पदवी परीक्षेचा निकाल जाहिर करण्यात आला असेल आणि तो विद्यापिठ किंवा अन्य संबंधित प्राधिकरण यांच्याकडून प्रसिध्द करण्यात आला असेल त्या दिनांकापासून मोजण्यात येईल.

अर्जदाराने अर्जासोबत स्वयंसाक्षांकित केलेल्या आणि अतिरीक्त पदनिर्देशित अधिकाऱ्याने यथोचितरित्या अधिप्रमाणित केलेल्या त्यांच्या पदवी गुणपत्रिका याची प्रत, सोबत प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे अर्जदाराने अर्जासोबत पासपोर्ट फोटो लावणे आवश्यक आहे. अर्जदाराने अर्जासोबत आधार कार्ड  निवडणूकीचे ओळखपत्र व प्रमाणित छायाचित्र ओळखपत्र जोडणे आवश्यक आहे. शासकीय कर्मचारी असल्यास नमुना सी मध्ये सक्षम प्राधिकारी यांचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक.आधारकार्ड जोडने मतदाराच्यावतीने ऐछीक आहे.

भारत निवडणुक आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्र शासन, विधी व न्याय मंत्रालयाच्या अधिसूचना 17 जून 2022 अन्वये पदवीधर मतदार संघाच्या मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठीच्या अर्जाचा अनुक्रमे नमुना क्र. 18 यामध्ये सुधारणा केलेल्या असून सदर सुधारणा 1 ऑगस्ट 2022 पासून लागू आहेत. तसेच सदर नमुना क्र.18 अर्जात आधार क्रमांकासाठी रकाना उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. तथापि, आधार क्रमांक सादर करणे हे मतदारांच्या वतीने ऐच्छिक आहे आणि मतदाराने अर्जात आधार क्रमांक नमूद केलेला नाही या कारणास्तव अर्ज नाकारु नये, असेही आयोगाने स्पष्ट केलेले आहे.

000000








वृत्त क्रमांक 1034

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात शौर्यदिन साजरा

नांदेड, दि. 30 :- जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, नांदेड येथे 29 सप्टेंबर रोजी शौर्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. या दिनानिमित्त निवासी उपजिल्हाधिकारी तथा सैनिक कल्याण अधिकारी किरण अंबेकर यांनी सर्व माजी सैनिकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. तसेच जिल्ह्यातील विरनारी, वीरमाता-वीरपिता व माजी सैनिकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या माजी सैनिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे शरद देशपांडे, ॲड. शीतल गायकवाड (रिटेनर/पॅनल विधीतज्ञ), भारतीय माजी सैनिक संघटना अध्यक्ष सार्जंट रामराव थडगे, सैनिक फेडरेशन मराठवाडा अध्यक्ष लक्ष्मण देवदे व सैनिक फेडरेशन जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील डुमणे उपस्थित होते.

या कार्यक्रमात 4 विरनारी, 2 वीरमाता-वीरपिता तसेच विविध लष्करी मोहिमांमध्ये सहभागी झालेले 52 माजी सैनिक उपस्थित होते. 

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात ऑ. कॅप्टन विठ्ठल कदम (निवृत्त), सैनिक कल्याण संघटक, नांदेड यांनी शौर्यदिनाचे महत्त्व स्पष्ट केले. भारतीय सैन्य दलाने 29 सप्टेंबर 2016 रोजी पाकिस्तान हद्दीत प्रवेश करून ‘सर्जिकल स्ट्राईक’द्वारे दहशतवादी कॅम्प नष्ट केले होते. ही कारवाई 18 सप्टेंबर 2016 रोजी जम्मू-काश्मीरमधील उरी येथे झालेल्या अतिरेक्यांच्या हल्ल्याचा बदला म्हणून करण्यात आली होती.

कार्यक्रमाच्या अखेरीस सैनिक फेडरेशन जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील डुमणे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रकाश कस्तुरे (निवृत्त), अर्जुन जाधव (होस्टेल अधीक्षक), अनिल देवणे (कनिष्ठ लिपिक), सूर्यकांत कदम (चौकीदार) यांनी परिश्रम घेतले.

0000

 वृत्त क्रमांक 1033

स्तन कर्करोग निदान व उपचारविषयक शिबिर संपन्न

नांदेड,३० सप्टेंबर:- डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, विष्णुपुरी नांदेड येथील शल्यचिकित्साशास्त्र विभागांतर्गत “स्वस्थ नारी – सशक्त परिवार” या योजनेअंतर्गत स्तन कर्करोग निदान व उपचार विषयक विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर महाविद्यालयाचे अधिष्ठाता मा. डॉ. सुधीर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.

या शिबिरात सुमारे 200 महिला व पुरुष नागरिकांनी सहभाग नोंदविला. स्तनाच्या कर्करोग तपासणीसाठी आलेल्या रुग्णांपैकी सुमारे 60 महिला व 08 पुरुषांची आधुनिक उपकरणांच्या सहाय्याने तपासणी करण्यात आली. निदान प्रक्रियेद्वारे संभाव्य रुग्णांची निवड करून त्यांना पुढील उपचारासाठी मार्गदर्शन करण्यात आले.

शिबिरादरम्यान उपस्थित नागरिकांना स्तन कर्करोगाविषयी जागरूकता, लवकर निदानाचे महत्त्व तसेच उपलब्ध उपचार पद्धती याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच 12 रुग्णांवर मोठ्या शस्त्रक्रिया व 23 रुग्णांवर लहान शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या करण्यात आल्या.

शिबिर यशस्वी करण्यासाठी अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच विभागप्रमुख डॉ. अनिल देगांवकर, डॉ. व्ही. पी. केळकर, डॉ. नजीमा मेमन, डॉ. जे. बी. देशमुख, डॉ. विजयकुमार कापसे (वैद्यकीय अधीक्षक), डॉ. अजय वराडे (उपवैद्यकीय अधीक्षक), डॉ. शिवांनद देवसरकर, निवासी डॉक्टर डॉ. गरीमा उपाध्याय, डॉ. रेश्मा, डॉ. उर्मी, डॉ. देशना व त्यांच्या टीमचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले.

या शिबिरामुळे स्तन कर्करोगाविषयी जागरूकता वाढविणे, लवकर निदानाची संधी उपलब्ध करून देणे व रुग्णांना योग्य उपचाराकडे मार्गदर्शन करणे हे उद्दिष्ट मोठ्या प्रमाणावर साध्य झाले.

००००




 वृत्त क्रमांक 1032

राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान योजनेअंतर्गत

 15 ऑक्टोबरपर्यत सूचना, आक्षेप, हरकती करावेत                                                                                                                                                                                                                                                                      नांदेड दि. 30 सप्टेंबर :- राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान योजनेअंतर्गत 50 व्या ग्रंथ भेट योजनेसाठी निवड झालेल्या ग्रंथाची मराठी, हिंदी व इंग्रजी यादी ग्रंथालय संचालनालयाच्या www.dol.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर 15 ऑक्टोबर 2025 या कालावधीत खुली ठेवण्यात आली असून या मुदतीत सूचना, हरकती, आक्षेप मागविण्यात आले आहेत. 

तसेच शासनमान्य ग्रंथाच्या यादीसाठी सन 2024 मध्ये प्रकाशित झालेल्या मराठी भाषेतील ग्रंथाची निवड करण्यासाठी ग्रंथ यापुर्वी ग्रंथालय संचालनालयास पाठविले नसल्यास ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय, नगर भवन टाऊन हॉल मुंबई-400001 या पत्त्यावर 15 ऑक्टोबर 2025 पर्यत पाठविण्यात यावीत, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी अ.वा. सुर्यवंशी यांनी केले आहे. 

00000

वृत्त क्रमांक 1031

भुमिहीन दारिद्ररेषेखालील आदिवासीचे सबळीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत

 इच्छुकांनी 30 ऑक्टोबरपर्यत अर्ज करण्याचे आवाहन 

नांदेड दि. 30 सप्टेंबर :- जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रम अंतर्गत भुमिहीन दारिद्ररेषेखालील आदिवासीचे सबळीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत 4 एकर जिरायती (कोरडवाहु) किंवा २ एकर बागायती (ओलीताखालील) जमिन उपलब्ध करुन देणे ही योजना राबवायची आहे. 

तेव्हा नांदेड जिल्ह्यातील (प्राधान्याने किनवट व माहूर तालुका) येथील इच्छूक शेतमालकांनी आदिवासी विकास विभाग शासन निर्णय क्र. भुवायो-2018/प्र.क्र.127/का-14 दि. 28 जुलै 2021 मधील परिच्छेद क्र. 02 व परिशिष्ठ-ब नुसार शेती विकणेसाठी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट जि. नांदेड येथे माहिती सुविधा केंद्रामध्ये परिपूर्ण अर्ज, आवेदन पत्र भरणा करावे तसेच आपले अर्ज, आवेदन पत्र 30 ऑक्टोबर 2025 पर्यत कार्यालयीन वेळेत सादर करण्यात यावेत असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी जेनितचंद्रा दोन्तुला यांनी केले आहे. 

00000

वृत्त क्रमांक 1277   जिल्हा माहिती कार्यालयातील रद्दी विक्रीसाठी उपलब्ध   नांदेड (जिमाका) ,  दि .   5 :-   जिल्हा माहिती कार्यालय ,   नांदे...