वृत्त क्रमांक 1033
स्तन कर्करोग निदान व उपचारविषयक शिबिर संपन्न
नांदेड,३० सप्टेंबर:- डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, विष्णुपुरी नांदेड येथील शल्यचिकित्साशास्त्र विभागांतर्गत “स्वस्थ नारी – सशक्त परिवार” या योजनेअंतर्गत स्तन कर्करोग निदान व उपचार विषयक विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर महाविद्यालयाचे अधिष्ठाता मा. डॉ. सुधीर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.
या शिबिरात सुमारे 200 महिला व पुरुष नागरिकांनी सहभाग नोंदविला. स्तनाच्या कर्करोग तपासणीसाठी आलेल्या रुग्णांपैकी सुमारे 60 महिला व 08 पुरुषांची आधुनिक उपकरणांच्या सहाय्याने तपासणी करण्यात आली. निदान प्रक्रियेद्वारे संभाव्य रुग्णांची निवड करून त्यांना पुढील उपचारासाठी मार्गदर्शन करण्यात आले.
शिबिरादरम्यान उपस्थित नागरिकांना स्तन कर्करोगाविषयी जागरूकता, लवकर निदानाचे महत्त्व तसेच उपलब्ध उपचार पद्धती याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच 12 रुग्णांवर मोठ्या शस्त्रक्रिया व 23 रुग्णांवर लहान शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या करण्यात आल्या.
शिबिर यशस्वी करण्यासाठी अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच विभागप्रमुख डॉ. अनिल देगांवकर, डॉ. व्ही. पी. केळकर, डॉ. नजीमा मेमन, डॉ. जे. बी. देशमुख, डॉ. विजयकुमार कापसे (वैद्यकीय अधीक्षक), डॉ. अजय वराडे (उपवैद्यकीय अधीक्षक), डॉ. शिवांनद देवसरकर, निवासी डॉक्टर डॉ. गरीमा उपाध्याय, डॉ. रेश्मा, डॉ. उर्मी, डॉ. देशना व त्यांच्या टीमचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले.
या शिबिरामुळे स्तन कर्करोगाविषयी जागरूकता वाढविणे, लवकर निदानाची संधी उपलब्ध करून देणे व रुग्णांना योग्य उपचाराकडे मार्गदर्शन करणे हे उद्दिष्ट मोठ्या प्रमाणावर साध्य झाले.
००००
No comments:
Post a Comment