वृत्त क्रमांक 1036
नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा नदीपात्रात कुणीही जाऊ नये
नांदेड दि.30 सप्टेंबर : दिनांक 27 व 28 सप्टेंबर 2025 रोजी जायकवाडी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी झाल्याने दिनांक 28 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 11 वाजता जायकवाडी धरणातून 3,06,000 क्युसेक्स विसर्ग सोडण्यात आलेला होता. जायकवाडी धरणातून सोडण्यात आलेले पाणी शंकररावजी चव्हाण विष्णुपूरी प्रकल्पामध्ये साधारणत: 36 ते 40 तासामध्ये पोहचते. त्यामुळे हा विसर्ग शंकररावजी चव्हाण विष्णुपूरी प्रकल्पामध्ये 30 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 10 ते सकाळी 6 वाजेच्या दरम्यान प्राप्त होण्याची शक्यता असून अंदाजे 6 ते 7 तास सलग 3,50,000 क्युसेक्स प्रमाणे राहण्याची शक्यता आहे. तरी या दरम्यान शंकररावजी चव्हाण विष्णुपूरी प्रकल्पामधून 3,25,000 ते 3,50,000 क्युसेक्स विसर्ग सोडणे अनिवार्य असल्याने नांदेड शहराची धोका पातळी 354.00 मी. ओलांडून तो अंदाजे 354.25 मी. जाण्याची शक्यता आहे.
सद्यस्थितीमध्ये शंकररावजी चव्हाण प्रकल्पाचे 17 दरवाजे उघडले असून एकूण 2,34,732 क्युसेक्सचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आलेला आहे. गोदावरी नदीपात्रामधील नांदेड जुना पूल येथील नोंदीनुसार 351.00 मी. ही इशारा पातळी असून सध्याला 351.94 मी. पर्यत पाणी पातळी वाढ झालेली आहे.
तेलंगना राज्यातील पोचमपाड धरण पूर्ण क्षमतेने भरलेले असून सद्यस्थितीत 3,95,000 क्युसेक्स आवक 3,34,231 क्युसेक जावक नदीपात्रात सोडण्यात येत आहे. जर शंकररावजी चव्हाण विष्णुपूरी प्रकल्पातून 2,50,000 क्युसेक्स पाणी नदीपात्रात सोडले आणि पोचमपाड धरणातून विसर्ग नियंत्रित पण कमी सोडण्यात आला तर धर्माबाद तालुक्यातील नदीकाठच्या गावांना पुराचा वेढा पडू शकतो अथवा गावामध्ये पाणी जाऊ शकते.
त्यामुळे शंकररावजी चव्हाण विष्णुपूरी प्रकल्पाच्या खालील बाजूस नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याबाबत तसेच नदीपात्रात कुणीही जाऊ नये किंवा वाहने किंवा जनावरे, पाळीव प्राणी अशी कोणतीही जीवीत अथवा वित्त हानी होणार नाही याबाबत उक्त गावांना सावधानतेचा इशारा संबंधित तहसिलदार व उपविभागीय अधिकारी, पोलीस निरीक्षक यांनी द्यावा असे आवाहन जिल्हाप्रशासनाने केले आहे.
00000

No comments:
Post a Comment