वृत्त क्रमांक 887
अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे उद्भवलेल्या आपत्कालीन
परिस्थितीमध्ये योग्य प्रकारे व्यवस्थापन करण्याबाबतच्या सूचना निर्गमित
नांदेड, दि. 21 ऑगस्ट : दिनांक 14, 15, 16, 17 व 18 ऑगस्ट 2025 रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे नांदेड जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांमध्ये आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालेली आहे. या अनुषंगाने वेळोवेळी जिल्हा प्रशासन व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्यामार्फत सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. या व्यतिरिक्त या आपत्कालीन परिस्थितीचे व्यवस्थापन करण्यासाठी खालील महत्त्वाच्या सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. तरी संबधित यंत्रणानी यांची नोंद घ्यावी, असे निर्देश जिल्हा प्रशासनाच्यावतीने दिले आहेत.
जीवितहानी टाळण्याकरिता उपाययोजना
पूर परिस्थिती अतिवृष्टी किंवा इतर कुठल्याही नैसर्गिक आपत्तीमध्ये जीवितहानी होणार नाही याची पूर्ण दक्षता प्रशासनाने व क्षेत्रीय यंत्रणेने घ्यायची आहे. त्याअनुषंगाने येणाऱ्या आपत्ती बाबत मिळालेली अधिकृत सूचना ही लोकांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे याबाबत सर्व क्षेत्रीय यंत्रणांनी सतर्क रहावे.
आवश्यक त्यावेळी ज्या क्षेत्रात नागरिकांना धोका जास्त संभवतो अशा ठिकाणाहून नागरिकांचे स्थलांतर हे सुरक्षित ठिकाणी करणे आवश्यक ठरते याचे योग्य पद्धतीने नियोजन करावे. नागरिकांना योग्य पद्धतीने माहिती देऊन स्थलांतर करावे. स्थलांतर ज्या ठिकाणी होते ते ठिकाण सुस्थितीत असल्याची दक्षता घ्यावी तसेच स्थलांतराच्या ठिकाणी जेवण, पाणी व इतर व्यवस्था योग्य पद्धतीने करण्याची दक्षता घ्यावी.
पडझड झालेल्या घरांमध्ये जे नागरिक रहिवास करत असतील त्यांच्या जीवितास धोका संभवतो त्यामुळे अशा नागरिकांना सुद्धा सुरक्षित ठिकाणीच हलवून त्याठिकाणी त्यांची पूर्ण व्यवस्था करण्यात यावी. त्याचबरोबर पावसाचे किंवा पुराचे पाणी ओसरल्यावर आणि ऊन पडल्यावर घरांना भेगा पडून कच्ची घरे पडण्याची दाट संभावना असते अशा घरांवरही विशेष लक्ष देऊन त्या ठिकाणी धोकादायक घरांमध्ये कुणी राहणार नाही याची दक्षता घ्यावी.
बाधित क्षेत्रामधील स्वच्छता व आरोग्य राखणेबाबत
पूर किंवा अतिवृष्टी सारख्या नैसर्गिक आपत्तीनंतर अस्वच्छतेमुळे मोठ्या प्रमाणावर रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सर्वप्रथम बाधित क्षेत्रामधील गाळ, जमा झालेला कचरा, मलबा इत्यादी बाबींची स्वच्छता करण्यात यावी यासाठी आवश्यक असल्यास टँकर किंवा अग्निशमन यंत्रांचा वापर करावा.
पूर किंवा अतिवृष्टी सारख्या नैसर्गिक आपत्तीनंतर पाणी दूषित होऊन जलजन्य आजार पसरण्याची शक्यता ही दाट असते. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत दूषित होणार नाही याची दक्षता घ्यावी. जर पावसाच्या पाण्यामुळे किंवा पुराच्या पाण्यामुळे हे स्त्रोत दूषित झाले असतील तर तातडीने स्वच्छ पिण्याच्या पाण्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी पाणी ओसरल्यानंतर गावातील सगळ्या पाण्याच्या स्त्रोतांचे शुद्धीकरण करून घ्यावे.
कीटकजन्य आजार पसरू नये यासाठी गावात कुठे पाणी साचलेले राहणार नाही याची दक्षता घ्यावी त्याचबरोबर फॉगिंगडस्टिंग करून कीटकजन्य आजार टाळण्यासाठी उपाययोजना करावी.
गावात जर मृत जनावरे वाहून आली असतील तर तातडीने त्यांचे शवविच्छेदन करून शास्त्रशुध्द पद्धतीने त्यांची विल्हेवाट लावावी कुठल्याही प्रकारे मृत जनावरे गावात पडून राहतील, असे होऊ नये याबाबतची योग्य दक्षता ही घ्यायची आहे.
मूलभूत सुविधांच्या पुनर्स्थापना
अनेक गावांचा संपर्क पुराच्या किंवा अतिवृष्टीच्या पाण्यामुळे हा तुटलेला आहे या ठिकाणी तातडीने रस्त्यांचे किंवा पुलांच्या डागडुजीचे काम करून हा संपर्क पुनर्स्थापित होईल या दृष्टीने सर्व संबंधित यंत्रणा जसे राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग सर्व विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग या सर्वांनी आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजना विभाग या सगळ्यांनी उपायोजना करायची आहे.
विजेचे पोल पडल्यामुळे व लाईन्सचे नुकसान झाल्यामुळे वीजपुरवठा सुद्धा अनेक ठिकाणी खंडित झाला आहे विजेच्या बाबतीत पूर्ण काळजी घेऊन महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने वीजपुरवठा लवकरात लवकर पुनर्स्थापित होईल याची दक्षता घ्यायची आहे. पाणी पुरवठा योजना जर अतिवृष्टी किंवा पुरामुळे बंद पडल्या असतील तर त्यांची दुरुस्ती करून शुद्ध पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून लवकर सुरू करण्याची दक्षता पाणीपुरवठा विभाग जिल्हा परिषद किंवा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणयांनी घ्यायची आहे. जलसंधारण विभाग राज्यस्तर आणि जिल्हा परिषद लघुपाटबंधारे विभाग यांच्या अनेक तलाव व जलसंधारण स्ट्रक्चर्स यांचे नुकसान झाले असेल तर त्याची डागडूजीकरून त्यातून कुठलेही मोठे नुकसान होणार नाही अशी उपाय योजना संबंधित विभागांनी तातडीने करायची आहे.
झालेल्या नुकसानाची पाहणी व पंचनामे
गेल्या पाच दिवसांमध्ये जिल्ह्यात उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीमुळे शेतपिकांचे नुकसान, शेती खरडून गेल्यामुळे झालेले नुकसान त्याचप्रमाणे पशुधनाचे नुकसान हे मोठ्या प्रमाणावर झाले आहे अनेक ठिकाणी अतिवृष्टी व पुराच्या पाण्यामुळे घरांची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आहे व इतरही आस्थापनांचे नुकसान झालेले आहे या सगळ्यांची तातडीने पाहणी करून त्याचा अहवाल अनुदान मागणी सहित लवकरात लवकर संबंधित यंत्रणेने सादर करायचा आहे.
आपत्ती व्यवस्थापनातील संस्थात्मक बाबी
जिल्ह्यामध्ये राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची (SDRF)एक तुकडी तैनात झालेली आहे. त्याचप्रमाणे पोलीस विभागाचे शीघ्र प्रतिसाद दल (QRT), मनपाचे प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन केंद्र व महाराष्ट्र अग्निशमन सेवा हे जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापनाचे काम करत असतात. संबंधित यंत्रणांनीया सर्व तुकड्यांना आपत्तीचे नियोजन करण्यासाठी तत्पर ठेवायचे आहे जेणेकरून कमीत कमी वेळेमध्ये आलेल्या आपत्तीला प्रतिसाद देता येईल.
सर्व शासकीयकार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी आपल्याला नेमून दिलेली जबाबदारीचे अतिशय काटेकोरपणे नियोजन करणे हे आपत्कालीन परिस्थितीमध्ये अपेक्षित आहे त्या अनुषंगाने विभाग प्रमुखांनी सूचना निर्गमित कराव्यात.
प्रत्येक गावाच्या स्तरावर ग्राम आपत्ती व्यवस्थापन समिती ही स्थापित झालेली आहे या समितीच्या बैठका घेऊन त्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापनाच्या कामास गती द्यावी. गेल्या पाच दिवसात झालेल्या आपत्तीमुळे जर गाव आपत्ती व्यवस्थापन आराखडा यात बदल करायचा असेल तर त्या अनुषंगाने तातडीने तो बदल करून सगळे गाव आपत्ती व्यवस्थापन आराखडे हे अद्यावत करावेत.
आपत्ती व्यवस्थापनाच्या कामांमध्ये लोकप्रतिनिधी, एनजीओ NGO’s, समाजसेवी संस्था, सीएसआर या सर्वांशी समन्वय साधने आवश्यक आहे जेणेकरून आपत्ती व्यवस्थापनाचे काम अधिक प्रभावीपणे करता येईल आपत्ती व्यवस्थापनामध्ये लोकसहभाग मिळाल्यास अधिक तातडीने प्रतिसाद देता येतो त्या अनुषंगाने संबंधित यंत्रणांनी लोकांना सोबत घेऊन व विश्वासात घेऊन उपाययोजना कराव्यात, असे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नांदेड यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
00000