Wednesday, December 3, 2025

वृत्त क्रमांक 1267

पदवीधर मतदारसंघाची प्रारूप यादी प्रसिद्ध

18 डिसेंबर पर्यंत हरकती नोंदविता येणार 

नांदेड, दि. 3 डिसेंबर :- भारत निवडणूक आयोगाचे पत्र 14 नोव्हेंबर 2025 अन्वये जाहीर करण्यात आलेल्या पदवीधर मतदारसंघाच्या सुधारित मतदार नोंदणी कार्यक्रमानुसार 5-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाची प्रारूप मतदार यादी बुधवार 3 डिसेंबर 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालय सर्व तहसिल कार्यालय येथे मतदारांच्या अवलोकनासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील सर्व मतदारांना सदर मतदार यादी नांदेड जिल्ह्याच्या https://nanded.gov.in/en/document-category/graduate-constituency-electionया संकेतस्थळावर सुद्धा पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात  आलेली आहे.  

दिनांक 3 डिसेंबर 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीमध्ये नांदेड जिल्ह्यातील 23 हजार 867 पुरूष, 6 हजार 264 महिला 4 इतर असे एकुण 30 हजार 135 पदवीधर मतदारांची नावे समाविष्ट करण्यात आलेली आहेत.  

सदर पदवीधर प्रारूप मतदार यादीच्या अनुषंगाने दावे हरकती स्विकारण्याचा कालावधी दिनांक 3 डिसेंबर 2025 ते 18 डिसेंबर2025 असा आहे. या कालावधीमध्ये दावे हरकती स्विकारण्यासाठी मतदान केंद्रनिहाय पदनिर्देशीत अधिकारी नियुक्त करण्यात आले असून त्यांनी पूर्ण वेळ मतदान केंद्रावर उपस्थित राहून दावे हरकती स्विकारणेबाबत त्यांना निर्देश देण्यात आले आहेत. 

दावे हरकती निकाली काढण्याचा दिनांक पुरवणी यादी तयार करणे छपाई करण्याचा दिनांक 5 जानेवारी 2026 (मंगळवार) हा असून पदवीधर मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी दिनांक 12 जानेवारी 2026 (सोमवार) रोजी करण्यात येणार आहे.  

नांदेड जिल्ह्यातील सर्व पात्र पदवीधर मतदारांना याद्वारे आवाहन करण्यात आले आहे की, त्यांनी प्रारूप मतदार यादीमध्ये आपली नावे इतर तपशील अचुक असल्याबाबतची खात्री करावी. सदर प्रारूप मतदार यादीमध्ये काही बदल, दुरूस्ती अथवा सुधारणा करावयाची असल्यास किंवा नाव समाविष्ट करावयाचे असल्यास संबंधित मतदान केंद्रावर प्रत्यक्ष भेट देऊन मतदान केंद्रस्तरीय पदनिर्देशित अधिकारी यांचेकडे किंवा संबंधित तहसीलदार, उपविभागीय अधिकारी किंवा पदनिर्देशित अधिकारी सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांचेकडे विहीत नमुन्यात अर्ज सादर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा 05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाचे सहा. मतदार नोंदणी अधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

00000

 वृत्त क्रमांक 1266

एचएसआरपी नंबर प्लेट वेळेत बसवा आणि दंड टाळा !

नंबर प्लेट बसवून घेण्यास 31 डिसेंबर पर्यंत  मुदतवाढ

नांदेड, दि. 3 डिसेंबर :- केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 50 नुसार वाहनांस एचएसआरपी  बसविण्याची तरतूद आहे. रस्ते व महामार्ग मंत्रालय नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार 1 एप्रिल 2019 पासून उत्पादित होणाऱ्या सर्व नवीन वाहनांना हायसिक्युरीटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविण्याची तरतूद करण्यात आली आहे. कोणताही दंड टाळण्यासाठी 31 डिसेंबर  2025 पूर्वी एचएसआरपी HSRP नंबर प्लेट बसवून घ्यावे, असे आवाहन सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत कंकरेज यांनी केले आहे.

वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करुन होणारे गुन्हे कमी करणे, रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे व तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सर्व वाहनांना मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी व नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून 1 एप्रिल 2019 पूर्वी उत्पादीत वाहनांना एचएसआरपी बसविण्याकरिता मे. रोजमर्टा सेफ्टी सिस्टम लिमीटेड या संस्थेची / उत्पादकाची निवड करण्यात आली असून वाहनांना हाय सिक्युरीटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट बसविण्याकरिता ऑनलाईन अपॉईंटमेंटकरिता https://mhhsrp.com या संकेतस्थळावर भेट द्यावी. या व्यतिरीक्त कुठल्याही इतर संकेतस्थळावर नोंदणी करणे टाळावे.  

मोटार सायकल व ट्रक्टरसाठी दर 450 रुपये, तीन चाकी वाहनांकरिता  500 रुपये व सर्व प्रकारचे चारचाकी वाहनांकरिता 745 रुपये इतका दर आकारला जाणार असुन याव्यतिरीक्त जीएसटीचा दर भरावा लागणार आहे. सदर शुल्क हे ऑनलाईन स्वरुपातच भरावे लागणार आहे. यादरांव्यतिरीक्त फिटमेंट सेंटरकडुन एचएसआरपी बसविण्याकरिता जादा पैस्याची मागणी करत असेल तर या कार्यालयास त्याबाबत तक्रार दाखल करता येईल. 

सद्य:स्थितीत नांदेड जिल्ह्यामध्ये 3 डिसेंबर 2025 रोजी पर्यंत एकुण 1 लाख 44 हजार 495 वाहनांची नोंदणी ऑनलाईन पध्दतीने एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्याकरिता करण्यात आली असून 1 लाख 2 हजार 755 इतक्या वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्यात आलेली आहे. एचएसआरपी नंबरप्लेट बसविण्याकरिता प्रतिसाद वाढत असून वाहनधारकांनी वेळेत वाहनांना एचएसआरपी नंबरप्लेट बसवून घ्यावी. याबाबत सविस्तर मुलाखात प्रसार भारती, नांदेड आकाशवाणी केंद्र येथे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी 21 सप्टेंबर 2025 रोजी दिली. तसेच 28 नोव्हेंबर 2025 रोजीच्या शासन परिपत्रकान्वये वाहनांना एचएसआरपी बसविण्याकरिता 31 डिसेंबर 2025 रोजी पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे.

1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांना हाय सिक्युरीटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविण्याबाबत शासनाद्वारे नियुक्त करण्यात आलेले अधिकृत एचएसआरपी फिटमेंट सेंटरर्स येथे HSRP बसविण्याकरिता Appointment घेण्याची कार्यपध्दती व इतर सर्वप्रकारची माहिती विभागाच्या https://www.transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

नांदेड जिल्हयातील वाहनधारक ज्यांची वाहने वाहनधारकांनी 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या ज्या वाहनांना हाय सिक्युरीटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट नाही अशा सर्व वाहनचालकांना पुन:श्च आवाहन करण्यात आले आहे की, त्यांनी वर नमूद केलेल्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पध्दतीने शुल्क भरून 31 डिसेंबर 2025 पूर्वी बसवून घ्यावी अन्यथा वाहनाचे कुठलेही काम असो जसे की, वाहन हस्तांतरण, वाहनाची पुन: नोंदणी, वाहनाचे वित्तदात्यांची नोंदणी, वाहनाची वित्तदात्याचा बोजा उतरवणे इ. वाहना संबंधी कामकाज होणार नाहीत. त्यामुळे वाहनांच्या कामकाजाचा खोळंबा होणार आहे. तसे नकेल्यास मोटार वाहन कायद्यानुसार एचएसआरपी नंबर प्लेट विहित वेळेत न बसविण्यासाठी दंड आकारणी परिवहन विभागातर्फे करण्यात येईल. हा दंड टाळण्यासाठी  31 डिसेंबर  2025 पूर्वी एचएसआरपी नंबर प्लेट बसवून घ्यावी, असेही आवाहन सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत कंकरेज यांनी केले आहे.

000000

05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ

प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध

विभागात एकूण 2 लाख 40 हजार 549 मतदार 

छत्रपती संभाजीनगर, दि. 03 (विमाका) : भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार, दिनांक ०१ नोव्हेंबर २०२५ या अर्हता दिनांकावर आधारीत पदवीधर मतदारसंघासाठी नव्याने मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम घोषित केला आहे. सदर सुधारीत कार्यक्रमानुसार मतदारयादीच्या प्रारूप प्रसिध्दीचा दिनांक ०३ डिसेंबर, २०२५ (बुधवार) होता. त्यानुसार प्रारुप मतदार यादी आज प्रसिध्द करण्यात आली. 

विभागीय आयुक्त कार्यालयात या कार्यक्रमावेळी विभागीय आयुक्त तथा ०५-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ मतदार नोंदणी अधिकारी जितेंद्र पापळकर, अपर आयुक्त सामान्य प्रशासन तथा सहायक मतदार र्नादणी अधिकारी श्रीमती मंजुषा मिसकर यांच्यासह तसेच राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकूण 46 हजार 406 पुरूष, 15 हजार 908 महिला व 4 तृतीयपंथी असे एकूण 62 हजार 318 मतदार आहेत. जालना जिल्ह्यात एकूण 23 हजार 648 पुरूष, 5 हजार 272 महिला तर 2 तृतीयपंथी असे एकूण 28 हजार 922 मतदार आहेत. परभणी जिल्ह्यात 16 हजार 635 पुरूष, 4 हजार 64 महिला तर 1 तृतीपंथी असे एकूण 20 हजार 700 मतदार आहेत. हिंगोली जिल्ह्यात 6 हजार 476 पुरूष, 1 हजार 528 महिला असे एकूण 6 हजार 4 मतदार आहेत. नांदेड जिल्ह्यात 23 हजार 867 पुरूष, 6 हजार 264 महिला तर 4 तृतीयपंथी असे एकूण 30 हजार 135 मतदार आहेत. लातूर जिल्ह्यात 17 हजार 492 पुरूष, 4 हजार 993 महिला तर 2 तृतीयपंथी असे एकूण 22 हजार 487 मतदार आहे. धाराशिव जिल्ह्यात 16 हजार 762 पुरूष, 4 हजार 47 महिला असे एकूण 20 हजार 809 मतदार आहेत. बीड जिल्ह्यात 34 हजार 485 पुरूष, 9 हजार 687 महिला तर 2 तृतीयपंथी असे एकूण 47 हजार 174 मतदार आहेत. विभागातील आठही जिल्ह्यात एकूण 1 लाख 88 हजार 771 पुरूष, 51 हजार 763 महिला तर 15 तृतीयपंथी असे एकूण 2 लाख 40 हजार 549 मतदार आहेत. 

पुढील अत्यंत महत्वाचा टप्पा, म्हणजेच दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी (कलम १२ अन्वये) (Period for filing of claims and objections), हा दिनांक ०३ डिसेंबर २०२५ (बुधवार) ते १८ डिसेंबर २०२५ (गुरुवार) असा निश्चित करण्यात आला आहे. या कालावधीमध्ये प्राप्त झालेल्या सर्व दावे व हरकती दिनांक ०५ जानेवारी, २०२६ पुर्वी निकाली काढण्यात येणार आहेत. अंतिम मतदार यादी प्रसिद्धी दिनांक १२ जानेवारी, २०२६ (सोमवार) असा निश्चित करण्यात आला असल्याची माहिती  प्रशासनाकडून देण्यात आली. 

*****









 

वृत्त क्रमांक 1265

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात  
जलद कार्यवाहीमुळे वृद्धरुग्ण सुखरूप घरी रवाना
 

नांदेड, दि. 3 डिसेंबर :- दिनांक 14 नोव्हेंबरपासून बेपत्ता असलेले वय 80 वर्षांपेक्षा जास्त असलेले प्रवृद्ध रामकिशन पांडे यांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या मुलाकडे सुखरूप हस्तांतरित करण्यात आले. 19 नोव्हेंबर 2025 रोजी पायाला गंभीर जखम असलेल्या या अनोळखी वृद्धाला 108 रुग्णवाहिकेमार्फत डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड येथील शल्यचिकित्सा कक्ष क्रमांक 3 मध्ये दाखल करण्यात आले. यापूर्वी ते हुजूर साहेब नांदेड रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर तब्बल तीन दिवस पडून होते. स्टेशन मास्टर यांनी 108 ला कॉल करून माहिती दिल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. 

रुग्णाची ओळख पटत नसल्याने त्यांची नोंद ‘अनोळखी रुग्ण’ म्हणून करण्यात आली. त्यानंतर समाजसेवा अधीक्षक (वैद्यकीय) राजरत्न केळकर यांनी रुग्णाचा व्हिडिओ तयार करून जीवनज्योती फाउंडेशनचे दीपक पवार यांच्याशी संपर्क साधला. दोघांच्या पुढाकाराने हा व्हिडिओ रुग्णाची मुलगी उर्मिला पाठक (कल्याण) व मुलगा मनोज पांडे (वाराणसी उत्तर प्रदेश) यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आला. 

मुलगा मनोज पांडे यांनी 36 तासांचा प्रवास करून नांदेड येथे येत वडिलांची ओळख पटविली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 14 नोव्हेंबर रोजी वडील कोणालाही न सांगता घरातून बाहेर पडले होते. त्यांनी वृद्धाश्रम, पोलीस स्टेशन आणि नातेवाईकांकडे शोध घेतला परंतु काहीही माहिती मिळाली नाही. 

रामकिशन पांडे यांनी सांगितल्यानुसार ते कल्याण येथे मुलीकडे जाण्यासाठी निघाले होते परंतु वाढत्या वयामुळे मार्ग चुकून वाराणसीहून नांदेडला पोहोचले आणि तेथे आजारी अवस्थेत पडून राहिले. 

रुग्णालयातील वास्तव्या दरम्यान परीसेविका प्रतिभा वाघदरीकर, अधिपरीचारीका रिता होंडे, वैशाली सोळंके तसेच अधिसेविका बी. आर. मुदीराज यांनी रुग्णाची अत्यंत मनापासून सेवा-शुश्रूषा केली. त्यांच्या सेवेमुळे प्रभावित होऊन मुलगा मनोज यांनी विशेष आभार व्यक्त केले. 

रुग्णांचे उपचार प्रा. डॉ. अनिल देगावकर (विभागप्रमुख शल्यचिकित्साशास्त्र विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. सुनील बोंबले यांच्या पथकाने केले. अनोळखी रुग्णाची ओळख पटवून त्यांना कुटुंबाशी एकत्र करण्याची ही मोहीम अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजयकुमार कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवानंद देवसरकर यांनी यशस्वीरीत्या राबविली. आज 3 डिसेंबर 2025 रोजी अनोळखी रुग्ण रामकिशन पांडे यांना अधिकृतपणे त्यांच्या मुलाकडे सुपूर्द करण्यात आले. सोडत देताना त्यांच्या डोळ्यात  आनंदाश्रू  दाटून आले.

00000



 


 वृत्त क्रमांक 1264

धनमुद्रा अर्बन मल्टी-स्टेट को-ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटीची निवडणूक जाहीर 

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले निवडणूक निर्णय अधिकारी   

नांदेड, दि. 3 डिसेंबर :- धनमुद्रा अर्बन मल्टी-स्टेट को-ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी लि., 1/15/465/ साईसदन शारदानगर नांदेडची निवडणूक जाहीर करण्यात आली असून जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनात ही निवडणूक पार पडणार आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत आज यासंदर्भातील माहिती जारी करण्यात आली.   

ॲसीस्टंट रजिष्टार, को-ऑपरेशन, सी.ई.ए. (को-ऑपरेटीव्ह इलेक्शन ॲथोरेटी) 9 वा मजला, टावर-ई, वर्ल्ड ट्रेड सेंटर, नौरोजीनगर दिल्ली-110029 यांनी त्यांचे पत्र दिनांक 6 ऑक्टोबर  2025 नुसार सदर संस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक घेण्यासाठी  निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांची नियुक्ती केली आहे.   

संस्थेच्या निवडणूक कार्यक्रमानुसार एकुण 11 संचालक निवडुन द्यावयाचे असुन त्यामध्ये सर्वसाधारण मतदार संघातून 8, अनुसूचीत जाती/जमाती मतदार संघातून 1 आणि महिला राखीव मतदारसंघातून 2 संचालकाची निवड करावयाची आहे.  

सदर संस्थेच्या संचालक मंडळाचा निवडणूक कार्यक्रमासह 8 डिसेंबर 2025 रोजी संस्थेच्या पात्र मतदारांची प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे. 9 ते 13 डिसेंबर 2025 या कालावधीत प्रारुप मतदार यादीवर आक्षेप नोंदविणे, प्राप्त झालेल्या आक्षेपाची छाननी 15 ते 19 डिसेंबर 2025 या कालावधीत करण्यात येणार आहे. 20 डिसेंबर 2025 रोजी संस्थेच्या सभासदांची अंतिम मतदार यादी सकाळी 11 वा. प्रसिध्द करण्यात येणार आहे.  

22 ते 27 डिसेंबर 2025 या कालावधीत सकाळी 11 ते दुपारी 3 यावेळेत नामनिर्देशनपत्र दाखल करता येईल. प्राप्त नामनिर्देशन पत्राची प्रसिध्दी 27 डिसेंबर 2025 रोजी दु. 5 वा. करण्यात येणार आहे. प्राप्त नामनिर्देशन पत्राची छाननी 29 डिसेंबर 2025 रोजी करुन वैध नामनिर्देशन पत्राची प्रसिद्धी 29 डिसेंबर 2025 रोजी दु. 5 वा. करण्यात येणार आहे. दिनांक 30 डिसेंबर 2025 रोजी दु. 3 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र परत घेता येतील. त्यानंतर निवडुन द्यावयाच्या उमेदवारांची यादी 31 डिसेंबर 2025 रोजी दु. 5 वा. प्रसिद्ध करण्यात येणार आहे. आवश्यकता असल्यास 11 जानेवारी 2026 रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 या कालावधीत मतदान घेण्यात येणार आहे. तर मतमोजणी 12 जानेवारी 2026 रोजी सकाळी 8 वा. करण्यात येणार आहे. को-ऑपरेटीव्ह इलेक्शन ॲथॉरीटी नवी दिल्ली यांच्याकडून मंजूरी प्राप्त झाल्यानंतर 19 जानेवारी 2026 रोजी संचालक मंडळ निवडणुकीचा निकाल घोषीत करण्यात येणार आहे. 

धनमुद्रा अर्बन मल्टी-स्टेट को-ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी लि., 1/15/465/साईसदन शारदानगर नांदेडच्या सर्व सभासदांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन धनमुद्रा अर्बन मल्टी-स्टेट को-ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी लि., 1/15/465/साईसदन शारदानगर नांदेडचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे. संस्थेच्या संचालक मंडळ निवडणुकीचा कार्यक्रम संस्थेच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. अधिक माहिती 1/15/465/साईसदन शारदानगर नांदेड येथील मुख्य कार्यालयात पहावयास मिळतील, असे प्रसिद्धी पत्रकात स्पष्ट केले आहे.

00000





 


वृत्त क्रमांक 1277   जिल्हा माहिती कार्यालयातील रद्दी विक्रीसाठी उपलब्ध   नांदेड (जिमाका) ,  दि .   5 :-   जिल्हा माहिती कार्यालय ,   नांदे...