Tuesday, November 25, 2025

 वृत्त क्रमांक 1239

संविधान अमृत महोत्सवानिमित्त विविध उपक्रम

संविधान प्रभातफेरीचे 26 नोव्हेंबर रोजी आयोजन

 नांदेड, दि. 25 नोव्हेंबर :- भारतीय संविधानास 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त संविधान अमृत महोत्सव “घर घर संविधान” शासन निर्णय परिपत्रक 18 नोव्हेंबर 2025 नुसार 26 नोव्हेंबर 2025 ते 26 जानेवारी 2026 या कालावधीत सर्व शासकीय विभागाचे कार्यालयात, महाविद्यालये, शाळा, वसतिगृहामध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्याचे निर्देशित करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने नांदेड जिल्ह्यातील सर्व शासकीय विभागाचे कार्यालय, महाविद्यालय, शाळा, निवासी शाळा व मुला-मुलींचे शासकीय वसतिगृहामध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी आदेशीत केले आहे.

बुधवार 26 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 8 वा. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यापासुन शिवाजीनगर, कलामंदिर, मुथा चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत संविधान प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले आहे. सदरहु संविधान प्रभातफेरीमध्ये सर्व नागरीकांनी सहभागी होण्याचे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केली आहे.

0000000

 वृत्त क्रमांक 1238

इलेक्ट्रॉनिक माध्यमांव्दारे प्रसारीत करण्यात येणाऱ्या जाहिरातींचे प्रमाणीकरण करणे आवश्यक

निवडणूक जाहिरात प्रमाणीकरणासाठी समिती

नांदेड, दि. 25 नोव्हेंबर :- नगर परिषद व नगरपंचायतीच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मुक्त, निर्भय, पारदर्शक आणि प्रत्येक राजकीय पक्ष व उमेदवाराला समान संधी मिळावी यासाठी राज्य निवडणूक आयोगाने माध्यम क्षेत्रातील सर्व नियमांचे काटेकोर अंमलबजावणी सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने व्यापक मार्गदर्शक सूचना आणि जाहिरातीतील आचारसंहितेचे पालन बंधनकारक करण्यासाठी जिल्हा व राज्यस्तरावर माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समित्या कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेली आहे. उमेदवारांमार्फत प्रचारासाठी इलेक्ट्रॉनिक / सोशल मिडीयास देण्यात येणाऱ्या जाहिरांतीचे पूर्व प्रमाणिकरण या समितीमार्फत केल्या जाते. 

महाराष्ट्र शासनाच्या 9 ऑक्टोबर 2025 रोजीच्या अधिसूचनेनुसार सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे प्रसारित/प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक विषयक प्रस्तावित जाहिरातींचे प्रसारमाध्यम प्रमाणन व सनियंत्रण समितीकडून पूर्व प्रमाणन करून घेणे आवश्यक आहे. इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये दूरदर्शन, उपग्रह वाहिन्या, केबल वाहिन्या, यूट्यूब वाहिन्या, केबल नेटवर्क, आकाशवाणी, खासगी एफएम वाहिन्या, चित्रपटगृह, सार्वजनिक ठिकाणचे दृकश्राव्य फलक (ऑडीओ व्हिज्युअल डिसप्ले), ई-वृत्तपत्रे, बल्क एसएमएस, व्हाइस एसएमएस, समाजमाध्यमे, संकेतस्थळे आदींचा समावेश होतो.

मुद्रित माध्यमांद्वारे प्रसिध्द करावयाच्या जाहिरातींचे पूर्वप्रमाणन करण्याची आवश्यकता नाही. परंतु, अशा माध्यमातून जाहिरातील प्रसिध्द करताना आचारसंहिता किंवा कोणत्याही कायद्याचे उल्लंघन होता कामा नये. तसेच, इतर प्रत्येक मुद्रित साहित्यावर प्रकाशक, मुद्रणालय, पत्ता, प्रत क्रमांक आणि प्रत संख्या नमूद असणे बंधनकारक आहे. उल्लंघन आढळल्यास प्रेस अॅक्टसह लागू प्रचलित कायद्यांनुसार कारवाई होईल. संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक जाहीर प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर मुद्रित, इलेक्ट्रॉनिक, समाजमाध्यमे आदी माध्यमाद्वारे कोणत्याही प्रचारविषयक जाहिराती देता येणार नाहीत.

अर्जाचा नमुना व आवश्यक माहिती जिल्हा माहिती कार्यालय, नांदेड, पार्वती निवास, खुरसाळे हॉस्पिटल, यात्री निवास रोड, बडपूरा नांदेड येथून उपलब्ध करून घेता येईल. अर्जासोबत जाहिरातींची इलेक्ट्रॉनिक स्वरुपातील प्रत (पेनड्राईव्ह) आणि साक्षांकित जाहिरात संहिता जोडणे बंधनकारक आहे. जाहिरातींची कोणतीही देयके धनादेश, धनाकर्ष ऑनलाईन पद्धतीने अदा करण्यात येतील. अन्य भाषांतील जाहिरातींसाठी मराठी अनुवादित साक्षांकित केलेली प्रत व नोटराईज्ड अनुवाद प्रत जोडणे आवश्यक आहे. 

00000

वृत्त क्रमांक 1237

26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करण्याचे निर्देश   

 नांदेड दि. 25 नोव्हेंबर :- भारतीय संविधानाची नागरिकांना माहिती असावी व त्यासंबंधी जनजागृती व्हावी या उद्देशाने दरवर्षी 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून पाळण्यात येतो. जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांनी हा दिवस साजरा करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी नांदेड यांनी  दिले आहेत.  

या दिनानिमित्त भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन शासकीय कार्यालये, महामंडळे, शाळा, महाविद्यालये इत्यादी ठिकाणी करण्यात यावे. तसेच वादविवाद स्पर्धा, निबंध स्पर्धा आयोजित कराव्यात. विद्यापीठामधून विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात यावे. तसेच शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना संविधानाची ओळख व्हावी यासाठी संविधानाविषयी जनजागृती व्हावी या उद्देशाने प्रभात फेऱ्यांचे आयोजन करावे. संविधानातील महत्वाची कलमे ठळकरित्या दिसतील असे बॅनर्स, पोस्टर्स वापरण्यात यावे.  कोणत्याही प्रकारची तक्रार येणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. तसेच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल शासनास सादर करावा. या कार्यक्रमाचे आयोजन सर्व विभाग प्रमुखांनी करावे, असेही निर्देश जिल्हा प्रशासनाच्यावतीने दिले आहेत.

0000

वृत्त क्रमांक 1236

अडचणीतल्या महिलांसाठी हक्काचा शासकीय आधार 

नांदेड दि. 25 नोव्हेंबर :- महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत नांदेड शहरात माता अनुसया शासकिय महिला वसतिगृह (राज्यगृह) ही शासकीय संस्था अनाथ, निराधार, निराश्रीत व अडचणीतल्या महिलांसाठी कार्यरत आहे. येथे 18 ते 60 वर्षांपर्यंत निवाऱ्याची आवश्यकता असणाऱ्या निराधार, विधवा, कुमारी माता, परित्यक्ता, आत्याचारीत महिलांसाठी विनाशुल्क अन्न, वस्त्र, निवारा, समुपदेशन व पुर्नवसनाची व्यवस्था केली जाते. त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी प्रशिक्षणाची व्यवस्था केली जाते.  

येथे आवश्यकतेनुसार कायदेशीर सल्ला व मदत दिली जाते, तसेच नियमित आरोग्य तपासणी केली जाते. 18 वर्षापुढील महिलांना मानसिक, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक दृष्ट्या सक्षम व स्वावलंबी बनविण्यासाठी तसेच पुनर्वसनाच्यादृष्टिने त्यांच्या विवाहाकरीता संस्थेत सर्वतोपरी प्रयत्न केले जातात. येथे शिक्षण व प्रशिक्षण घेत असलेल्या महिलांना आवश्यकतेनुसार प्रवेश दिला जातो. समस्याग्रस्त 18 वर्षापुढील महिलांनी संकटकाळी चुकीच्या मार्गानी न जाता समस्येचे निराकरण होईपर्यंत अल्प कालावधीसाठी या संस्थेत दाखल होण्याच्या फायदा घ्यावा. प्रवेशासाठी फोटोसह ओळखपत्र आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी कामकाजाच्या दिवशी दुपारी 1 ते 3 यावेळेत अधीक्षक माता अनुसया शासकिय महिला वसतिगृह (राज्यगृह), हॉटेल भाईजी पॅलेसच्या पाठीमागे शिवाजीनगर उड्डाणपुल परिसर शिवाजीनगर नांदेड येथे किंवा दुरध्वनी क्रमांक 02462-233044 संपर्क साधावा, असे आवाहन नांदेड येथील शासकीय महिला राज्यगृह अधीक्षक अ.सा.ठकरोड यांनी केले आहे.

00000

वृत्त क्रमांक 1235

इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ कार्यालयाचे स्थलांतर

नांदेड दि. 25 नोव्हेंबर :-  महाराष्ट्र राज्य इतर मागावर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या. जिल्हा कार्यालय नांदेड हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन इमारत अ मध्ये दुसऱ्या मजल्यावर कार्यरत होते. 

सदर कार्यालय हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, ग्यानमाता शाळेच्या समोर, इमारत ब मध्ये दुसऱ्या मजल्यावर स्थलांतर करण्यात आलेले आहे. तरी संबंधितांनी यांची नोंद घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्ग वित्त आणि विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे. 

00000

वृत्त क्रमांक 1277   जिल्हा माहिती कार्यालयातील रद्दी विक्रीसाठी उपलब्ध   नांदेड (जिमाका) ,  दि .   5 :-   जिल्हा माहिती कार्यालय ,   नांदे...