Wednesday, November 15, 2017

"राष्ट्रीय पत्रकार दिन" कार्यक्रमाचे
जिल्हा माहिती कार्यालयात आयोजन
नांदेड , दि. 15 :- भारतीय प्रेस परिषदेच्या सुवर्ण जयंती वर्षानिमित्त राष्ट्रीय पत्रकार दिन साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने गुरुवार, 16 नोव्हेंबर 2017 रोजी दुपारी 1 वा. जिल्हा माहिती कार्यालय नांदेड येथे "राष्ट्रीय पत्रकार दिन" साजरा करण्यात येणार आहे.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम यांचे माध्यमासमोरील आव्हाने या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. भारतीय प्रेस परिषदेने माध्यमासमोरील आव्हानेहा विषय यावर्षी दिला आहे. सर्व संपादक, माध्यम प्रतिनिधींनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालय नांदेड यांच्यावतीने करण्यात आले आहे.
000000




शेतकऱ्यांनी मुग, उडीद, सोयाबीन
खरेदी केंद्रावर विक्रीसाठी आणावा  
नांदेड, दि. 15 :- जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केंद्र शासनाच्या आधारभुत किंमत खरेदी योजनेंतर्गत नाफेडमार्फत हमी भावाने एफएक्यु प्रतीचा मुग, उडीद व सोयाबीन खरेदी केंद्रावर विक्रीसाठी आणावा, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जुन खोतकर यांच्यावतीने जिल्हा मार्केटिंग अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
या योजनेंतर्गत नाफेड मार्फत हमी भावाने मुग, उडीद खरेदी करण्यासाठी देगलूर, धर्माबाद, बिलोली येथे खरेदी केंद्र सुरु आहेत. तसेच सोयाबीन खरेदीसाठी नांदेड, (अर्धापूर) भोकर, उमरी, हदगाव, लोहा, नायगाव, मुखेड, देगलूर, धर्माबाद, बिलोली याठिकाणी खरेदी केंद्र सुरु असल्याची माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकारी नांदेड यांनी दिली आहे.

000000
डॉ. चंद्रशेखर एस. व जोस जोइमेट यांचा दौरा
नांदेड, दि. 15 :- डॉ. चंद्रशेखर एस. (आयजीआयडीआर) व जोस जोइमेट (युनिसेफ) हे नांदेड दौऱ्यावर येणार असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.
गुरुवार 16 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 ते 10.30 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी चर्चा. सकाळी 10.30 ते दुपारी 12 वाजेपर्यंत जिल्हा नियोजन अधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्यासोबत ऑनलाईन आणि ऑफलाईन डेटाबेसचा आढावा. दुपारी 12 ते 12.30 वा. महिला आणि बालविकास विभाग यांच्या डेटाबेसबाबत चर्चा, दुपारी 12.30 ते 1 वाजेपर्यंत जिल्हा शिक्षण अधिकारी सोबत डेटाबेस चर्चा, दुपारी 1 ते 1.30 वा. जिल्हा कृषी अधिकारी यांच्या डेटाबेसविषयी चर्चा. दुपारी 1.30 ते 2.15 वाजेपर्यंत राखीव. दुपारी 2.15 ते 3 वाजेपर्यंत समाज कल्याण, आदिवासी विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत डेटाबेसबाबत चर्चा. दुपारी 3 ते 3.30 पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत डेटाबेस चर्चा, दुपारी 3.30 ते 4 वाजेपर्यंत विद्युतीकरण विभाग यांच्याशी डेटाबेस चर्चा. दुपारी 4 ते 4.30 पीडीएस विभागाचे अधिकारी यांच्या कार्यालयाच्या पीडीएसबाबत माहिती. दुपारी 4.30 ते सायं 5.30 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची माहिती एकत्रित करतील.  

00000
मतदारांची माहिती बीएलओ घरोघरी भेटी देऊन गोळा करणार ;
दावे व हरकती 30 नोव्हेंबर पर्यंत स्विकारण्यात येणार  
नांदेड, दि. 15:- भारत निवडणूक आयोगाने छायाचित्र मतदार याद्यांचा संक्षिप्‍त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. या कार्यक्रमाच्‍या अनुषंगाने जिल्‍हयातील नऊ विधानसभा मतदारसंघाच्‍या प्रारूप  मतदार याद्यांची प्रसिध्‍दी करण्‍यात आली आहे. नाव नोंदणी संदर्भात दावे व हरकती गुरुवार 30 नोव्‍हेंबर  2017 पर्यंत स्विकारण्‍यात येणार आहेत. जिल्‍हयातील जास्‍तील जास्‍त मतदारांनी मतदार यादीत नाव नोंदणी, दुरूस्‍ती, वगळणी करून घेण्‍यासाठी संबंधित मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी (बीएलओ), तहसिल कार्यालय किंवा मतदार नोंदणी अधिकारी यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी अरूण डोंगरे यांनी केले आहे.
मतदार नोंदणीपासून वंचित राहिलेल्‍या पात्र नागरीकांना नमुना 6 मधील अर्ज तसेच दुबार, स्‍थलांतरीत मतदारांना, मयत मतदारांच्‍या नातेवाईकांना मतदार यादीतील नाव वगळण्‍यासाठी नमुना 7 मधील अर्ज, मतदार यादीतील चुका दुरूस्‍तीसाठी नमुना 8 मधील अर्ज संबंधित मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी किंवा उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी, तसेच तहसिलदार तथा सहायक मतदार नोंदणी अधिकरी यांच्‍याकडे सादर करता येतील. जास्‍तीतजास्‍त पात्र मतदारांची नोंदणी होण्‍यासाठी मतदार यादी अचुक होण्‍यासाठी व मतदारांना मतदार नोंदणीविषयक चांगल्‍या सुविधा उपलब्‍ध देता याव्‍यात यासाठी 15 नोव्‍हेंबर ते 30 नोव्‍हेंबर 2017 या कलावधीत जिल्‍हयातील सर्व मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी ( बीएलओ ) हे घरोघरी भेटी देऊन मतदारांची नोंदणी व पडताळणी करणार आहेत. 
पुर्वीच्‍या पुनरीक्षण कार्यक्रमात मतदार यादीत नाव नोंदणी पासून वंचित राहिलेल्‍या पात्र नागरीकांना नमुना 6 चे वाटप करणे व त्‍यांच्‍याकडुन परत घेणे, जमा करणे मतदार नोंदणीसाठी पात्र होणाऱ्या  नागरीकांची माहिती जमा करणे. स्‍थलांतरीत व मयत मतदारांच्‍या वगळणीसाठी नमुना- 7 चे वाटप करणे व जमा करणे. प्रारूप मतदार यादीतील तपशिल दुरूस्‍तीसाठी नमुना आठचे वाटप करणे व जमा करणे. मतदारांचे मोबाईल व दुरध्‍वनी क्रमांक गोळा करणे. मोबाईल अज्ञावलीचा वापर करून मतदारांच्‍या घरांचे अक्षांक्ष व रेखांक्ष गोळा करणे. दुबार मतदारांना सूचना बजावणी करणे अथवा पंचनामा करणे, मतदार यादीत फोटो नसलेल्‍या व कृष्‍णधवल फोटो असलेल्‍या मतदारांची नजीकच्‍या काळातील रंगीत  फोटो मतदारांकडून प्राप्‍त  करून घेणे. 

00000
दहावीच्या मार्च 2018 परीक्षेसाठी
ऑनलाईन अर्ज करण्यास मुदतवाढ
नांदेड, दि. 15 :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्यावतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या मार्च 2018 मध्ये होणाऱ्या परीक्षसाठी विलंब शुल्कासह ऑनलाईन अर्ज दाखल करण्यास गुरुवार 30 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ मंडळाने जाहीर केली आहे.  
परीक्षेस नियमित प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थी पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले पुर्वीचे खाजगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेअंतर्गत प्रविष्ट होणारे विद्यार्थी व तुरळक विषय घेवून प्रविष्ट होणारे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याच्या सुधारीत वाढीव तारखा जाहीर करण्यात आल्या असून www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अर्ज भरण्यात यावेत.
माध्यमिक शाळांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्याची मुदत विलंब शुल्कासह ऑनलाईन अर्ज भरावयाची मुदत गुरुवार 30 नोव्हेंबर 2017 पर्यंत आहे. शाळांनी बँकेत चलनाद्वारे शुल्क भरावयाची मुदत शुक्रवार 1 डिसेंबर 2017 पर्यंत. विभागीय मंडळाकडे चलन व विद्यार्थ्यांच्या याद्या जमा करावयाची मुदत शुक्रवार 8 डिसेंबर 2017 आहे.   
शाळांनी विद्यार्थ्यांच्या याद्या गुरुवार 30 नोव्हेंबर 2017 पर्यंत एक्सलमध्ये मुद्रीत कराव्यात. परीक्षेचे अर्ज ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्यासाठी शाळेशी संपर्क साधावा. ऑनलाईन अर्ज भरताना येणाऱ्या अडचणीबाबत मुख्याध्यापक यांनी संबंधित विभागीय मंडळाशी संपर्क साधावा.  ऑनलाईन अर्ज भरताना विद्यार्थ्यांचे जन्म ठिकाण नमूद करण्याची कार्यवाही शाळांनी ऑनलाईन प्रक्रियेमध्ये करावी. प्रचलित शुल्क बॅक ऑफ इंडियात जमा करुन बँक ऑफ इंडियाची चलनाची प्रत, विद्यार्थ्यांच्या याद्या दिलेल्या मुदतीत विभागीय मंडळाकडे सादर करण्यात याव्यात. अर्जामध्ये आधारकार्ड क्रमांक नमुद करण्याबाबत अनिवार्य केलेले असले तरी एखादा विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नोंदणी केलेली असेल तर नोंदणी क्रमांक देखील ग्राह्य धरण्यात येईल. आधार नोंदणी केली नसेल तर निकालापर्यंत आधार कार्ड काढण्यात येईल असे विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापकांना लेखी हमीपत्र देणे आवश्यक आहे. आधार कार्ड क्रमांक नाही म्हणून अर्ज भरले नाही असे होणार नाही याची दक्षता घ्यावी. लातूर विभागीय  मंडळातील शाळांनी एच.डी.एफ.सी. बँकेत मंडळाच्या जमा खात्यात शुल्क जमा करुन चलनाची प्रत व विद्यार्थ्यांच्या याद्या दिलेल्या मुदतीत विभागीय मंडळाकडे सादर कराव्यात. या कालावधीत शाळांनी ऑनलाईन प्रीलिस्ट प्रिंट करुन घ्याव्यात व प्रीलिस्टची विद्यार्थ्यामार्फत तपासणी करुन त्यांच्या ऑनलाईन दुरुस्त्या गुरुवार 30 नोव्हेंबर 2017 पर्यंत करणे आवश्यक आहे. मंडळामार्फत वेगळी प्री-लिस्ट दिली जाणार नाही याची नोंद घ्यावी. मार्च 2018 परीक्षेसाठी खाजगीरित्या ऑनलाईन नावनोंदणी प्रमाणपत्रासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांसाठी अर्ज भरण्याच्या तारखा स्वतंत्रपणे कळविण्यात येतील, असे लातूर विभागीय मंडळाचे विभागीय सचिव यांनी कळविले आहे.

0000000

विकसित महाराष्ट्र २०४७ Vision Document तयार करण्याच्या अनुषंगाने केल्या जाणाऱ्या सर्वेक्षणात सर्वसामान्य जनतेचा सहभाग महत्वाचा असून शासनाकडू...