Friday, November 7, 2025

विशेष लेख

पीसीपीएनडीटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणे गरजेचे

गर्भलिंग निवड

पोटातील गर्भाचं लिंग जाणून घेणं आणि जर ती मुलगी असेल तर गर्भपात करणं म्हणजे गर्भलिंग निवड

* गेल्या काही वर्षात गर्भाचं लिंग जाणून घेण्यासाठी सर्वात जास्त वापरलं जाणारं तंत्रज्ञान म्हणजे अल्ट्रासाउंड सोनोग्राफी आणि मुलगी असेल तर नंतर गर्भपात १९८० नंतर सोनोग्राफीचं तंत्रज्ञान सर्वदूर पसरलं, परिणामी गर्भलिंग निदानात वाढ झाली आणि ०-६ वयातील मुलींची संख्या झपाट्याने खालावू लागली.
०-६ वयोगटातील लिंग गुणोत्तर
०-६ वयोगटातील दर हजार मुलांमागे असणारी मुलीची संख्या मोजून लिंग गुणोत्तर काढलं जातं. भारतामध्ये हे गुणोत्तर दिवसेंदिवस विषम होत आहे. २०१९ मधील ९२० पासून २०२३ मधील ९०७ पर्यंत मुलींची संख्या कमी झाली आहे. जगभरातले अनुभव पाहता स्वाभाविक लिंग गुणोत्तर १५० हुन जास्त हवे. ही तफावत पाहता गर्भलिंग निदान आणि मुलीकडे केलं आणारं दुर्लक्ष यामुळे मुलींची संख्या घटत आहे हे दिसतं. जेव्हा जन्माच्या वेळी लिंग गुणोत्तर काढल आतं (दर हजार मुलांमागे जन्माला येणा-या मुलींची संख्या) तेव्हा जन्माच्या आधी केलं जाणार गर्भलिंग निदान उघडपणे कळतं. जन्माच्या वेळच्या लिंग गुणोत्तरावरुन प्रसवपूर्व गर्भलिंग निदान होत असल्याचं स्पष्ट होतं तरी, देशभरासाठी आणि जिल्हापातळीवरील आकडेवारी कळत असल्याने ०-६ वयातील लिंग गुणोत्तर जास्त प्रमाणावर मान्य केलं जात.
गर्भलिंग निदान का होतं?
* गर्भलिंग निवड म्हणजे केवळ तंत्रज्ञानाचा गैरवापर इतकंच नाही. मुली आणि स्त्रियांना दिलं जाणारं दुय्यम स्थान आणि आयुष्यभर त्यांना सहन करावा लागणारा भेदभाव, याच्या मुळाशी आहे. समाजाची आणि कुटुंबाची पुरुषप्रधान रचना आणि मुलाचा हव्यास वा संदर्भामध्ये या प्रश्नाचा विचार करायला हवा. तसंच हुंडा आणि मुलीकडे परक्याचं धन म्हणून पाहण्याची वृत्ती यामुळेही मुलींचा विचार ओझं म्हणूनच केला जातो.
* मुलीबाबत होणार दुर्लक्ष किंवा भेदभाव अनेक प्रकारचा आहे. अपुरा आहार, आरोग्य किंवा शिक्षणापासून वंचित ठेवणं आणि कुटुंबात होणारी हिंसा, याचंच तीव्र स्वरुप म्हणजे मुली नकोशा होणं किंवा गर्भलिंगनिदानाचा वापर करुन मुलींना जन्मालाच न घालणं.
गर्भलिंग निदानाचे परिणाम
विषम लिंग गुणोत्तरामुळे निसर्गाच सूक्ष्म संतुलन ढळू शकतं तर समाजाचा नैतिक ताणाबाणा बिघडून जाऊ शकतो. मुली कमी असल्या तर त्यांचा दर्जा किंवा स्थान सुधारेल हा काहींचा समज खरा नाही. उलट स्त्रियांवरील अत्याचारात भरच पडेल. बलात्कार, स्त्रियांचं अपहरण, देहविक्रय आणि एका स्त्रीशी अनेकांचा विवाह (बहुपतीत्व) या सर्वांत वाढच होऊ शकते. देशाच्या काही भागात तर आताच स्त्रिया वस्तूप्रमाणे विकत घेतल्या जात आहेत.
गर्भलिंग निवड बेकायदेशीर आहे
गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व तंत्रज्ञान (गर्भलिंग निवडीस प्रतिबंध) हा कावदा नर्भधारणेच्या व प्रसूतीच्या आधी गर्भ- लिगनिवडीला आळा घालतो, १९९४ साली हा कायदा अस्तित्वात आला व २००३ मध्ये त्यात सुधारणा झाल्या. गर्भाचं लिंग जाणून घेण्यासाठी सोनोग्राफीसारख्या तंत्रज्ञानांच्या वापरावर नियंत्रणाचं काम हा कायदा करतो. काही वैद्यकीय कारणं वगळता गर्भाच लिंग माहित करून घेणं बेकायदेशीर आहे. पहिल्या गुन्ह्यासाठी कायद्यामध्ये ३ वर्षांपर्यंत कैद आणि १०,००० रुपयांपर्यंत दंडाची शिक्षा आहे, अंमलबजावणीतील अडचणींमुळे आतापर्यंत फारच कमी जणांना शिक्षा झाली आहे. वैद्यकीय व्यावसायिक आणि आई-वडील वा दोघांच्या संगनमतातून गुन्हा घडत असल्याने तो सिध्द कसा करायचा हे मोठे आव्हान आहे.
याबाबत जनजागृती
* पालक, भाऊ, बहीण, कुटुंबातील सदस्य आणि मित्र मैत्रिणी या नात्याने आपल्या प्रत्येकाचीच यामध्ये काही निश्चित भूमिका आहे. त्याचसोबत आपल्या कामाचा भाग म्हणूनही आपण जागरुक रहायला हवं, शिक्षक, डॉक्टर, वकील, न्यायाधीश, स्वयंसेवी कार्यकर्ते, सरकारी अधिकारी, विधीज्ञ, लोकप्रतिनिधी, पत्रकार, कलाकार कुणीही असलो तरी आपण काही गोष्टी नक्की करु शकतो.
* आपल्या घरी, शेजारी-पाजारी, समाजात व कामाच्या ठिकाणी या विषयाबाबत जागरुकता निर्माण करा.
* भेदभावाचा विरोध करा. उदा. मुली आणि स्त्रियांवरील हिंसा सहन करु नका. हुंडा देऊ किंवा घेऊ नका, आणि संपत्तीत समान हक्काचा आग्रह धरा.
* आपल्या आसपास मुलगे आणि मुलींमध्ये समानता आणण्यासाठी प्रयत्न करा.
* कायद्याचं उल्लंघन होतंय असं लक्षात आल्यास समुचित अधिकाऱ्यांना कळवा. समाजात गर्भलिंगनिवडीविरोधात जागृती करणाऱ्या गटांशी जोडून घ्या. त्यांना मदत करा.
* गर्भलिंगनिवड करु नका ! त्याला मान्यता देऊ नका । आणि निमूटपणे पाहत राहू नका.
गर्भ लिंग निदान प्रतिबंध, लिंग गुणोत्तर प्रमाण वाढविण्याठी आणि स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी सावजानिक आरोग्य विभागामार्फत खबरी योजना रु. १,००,०००/- बक्षीस.
जिल्ह्यातील लिंग गुणोत्तर प्रमाण वाढविण्यासाठी, गर्भलिंग निदान प्रतिबंध आणि स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदानतंत्रे (लिंग निवडीस प्रतिबंध) कायदा १९९४ सुधारित कायदा २००३ (पीसीपीएनडीटी आणि एमटीपी ) कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग महत्वाचे पाऊल.
या कायद्याअंतर्गत तक्रार नोंदविण्यासाठी महाराष्ट्र राज्य पीसीपीएनडीटी टोल क्रमांक १८००२३३४४७५/१०४ आहे. तक्रार नोंदविण्यासाठी तसेच संकेचे निरसन करण्यासाठी संकेतस्थळ http://amchimulgimaha.in. या संकेतस्थळावर व महाराष्ट्र राज्य पीसीपीएनडीटी टोल क्रमांकावर कोणीही तक्रार नोंदविल्यास ती तक्रार गोपनीय राहील. तक्रार देणाऱ्यास त्याची इच्छा असल्यास त्याचे नाव देखील नोंदवू शकतील.
पीसीपीएनडीटी कायद्याअंतर्गत तक्रार निपटारा होऊन गर्भलिंग निदान करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल होणार. तक्रारीची अंमलबजावणी होऊन जर स्त्री भ्रूणहत्या रोखण्यास यश आहे तर तक्रारदारास शासनामार्फत खबरी योजनेअंतर्गत रक्कम रुपये १,००,०००/- बक्षीस आहे.
मुलगी वाचवा
प्रसवपूर्व गर्भलिंग निदान करणे कायद्याने गुन्हा आहे.

डॉ. संजय एम. पेरके
जिल्हा समुचित प्राधिकारी तथा जिल्हा शल्यचिकित्सक नांदेड
00000


वृत्त क्रमांक 1171

जिल्हा क्रीडा पुरस्कारसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

नांदेड दि. 7 नोव्हेंबर:- मा. आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नांदेड यांच्यामार्फत नांदेड जिल्हयात दरवर्षी जिल्हा क्रीडा पुरस्कार वितरीत करण्यात येतो. जिल्हयातील गुणवंत क्रीडा मार्गदर्शक व गुणवंत खेळाडू पुरुष, महिला व दिव्यांग यांनी केलेल्या कार्याचे/ योगदानाचे मूल्यमापन व्हावे त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा. त्यांच्यापासून इतरांनी प्रेरणा घ्यावी या हेतून जिल्हा क्रीडा पुरस्कार देण्यात येतो. जिल्हयातील खेळाडू, मार्गदर्शक यांच्याकडून सन २०२४-२५ या एका वर्षातील पुरस्काराकरीता अर्ज मागविण्यात येत आहेत.

पुरस्कार प्राप्त करण्याकरीता केलेली कामगिरी ही त्या-त्या वर्षातील दिनांक ०१ जुलै ते ३० जुन दरम्यानचा कालावधी गृहीत धरण्यात येणार आहे. पुरस्कार संख्या- गुणवंत क्रीडा मार्गदर्शक-1, गुणवंत खेळाडु (पुरुष-1, महिला-1, दिव्यांग-1) पुरस्काराचे स्वरुप हे प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह व रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

मार्गदर्शक हा मागील १० वर्षात किमान वरीष्ठ गटातील राज्य व राष्ट्रीय पदक विजेते तसेच कनिष्ठ शालेय, ग्रामीण व महिला (खेलो इंडिया) मधील राष्ट्रीयस्तरापर्यंतचे पदक विजेते खेळाडू तयार केले असतील असा क्रीडा मार्गदर्शक जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्यास पात्र राहील.

गुणवंत खेळाडू पुरस्कारासाठी मागील ०५ वर्षातील उत्कृष्ठ ठरणारी ०३ वर्षाची कामगिरी ग्राहय धरण्यात येईल. क्रीडा मार्गदर्शकाकरीता- सांघीक अथवा वैयक्तिक मान्यता प्राप्त क्रीडा प्रकारात नॅशनल गेम्स, वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत प्रतिनिधीत्व केलेला खेळाडू अथवा राज्य/ जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेत प्रथम तीन क्रमांकापर्यंत यश मिळविणारे किमान तीन खेळाडू घडविणारा मार्गदर्शक, तसेच क्रीडा मार्गदर्शकांनी खेळाडूस किती वर्षे प्रशिक्षण दिले याचेही तुलनात्मक मुल्यमापन करण्यात येणार आहे. अर्जदाराने मार्गदर्शन केलेल्या खेळाडूचे विहित नमुन्यातील हमीपत्र अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.

खेळाडु पुरस्कार करीता पात्र क्रीडा प्रकार- ॲथलेटिक्स, बॅडमिंटन, आर्चरी, बास्केटबॉल, कयाकिंग/ कनोईंग, सायकलिंग, क्रिकेट, तलवारबाजी, हॉकी, फुटबॉल, जिम्नॅस्टिक्स, हॅन्डबॉल, बॉक्सिंग, गोल्फ, पॉवरलिफ्टींग, हॉर्स राईडींग, लॉन टेनिस, नेमबाजी, स्विमींग (जलतरण) ड्रायव्हिंग, वॉटर पोलो, ट्रायथलॉन, बॉडीबिल्डिंग, ज्युदो मॉडर्न पेन्टॉथ लॉन, रग्बी, रोईंग, स्पोर्ट्स क्लाइंबिंग, स्क्वॅश, टेबल टेनिस, तायक्वाँदो, व्हॉलीबॉल, वेटलिफटींग, कुस्ती, स्केटींग, वुशू, कॅरम, सॉफ्टबॉल, बेसबॉल, कबड्डी, खो-खो, मल्लखांब, आटयापाटया, बुध्दीबळ, बिलियर्डस ॲन्ड स्नुकर, याटींग इत्यादी खेळाचा समावेश करण्यात आला आहे. इच्छुक खेळाडू व मार्गदर्शक यांनी आपले विहित नमुन्यातील अर्ज 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, इनडोअर हॉल, नांदेड येथे सादर करण्यात यावे.

विहीत कालावधीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, कृपया याची नोंद घ्यावी व जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी समितीने घेतलेला निर्णय अंतिम राहील. अधिक माहितीसाठी व अर्ज प्राप्त करण्याकरीता कार्यालयातील राज्य क्रीडा मार्गदर्शक बालाजी शिरसीकर (मो.क्रं.7517536227) यांच्याशी संपर्क साधावा, असे जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी कळविले आहे.
00000

वृत्त क्रमांक 1170

गुरुद्वारा गेट नंबर 1 चौक ते भगतसिंग चौक वाहतुकीसाठी प्रतिबंध 

नांदेड, दि. 7 नोव्हेंबर : नांदेड शहरात गुरूद्वारा गेट नंबर 1 ते भगतसिंग चौक हा मार्ग वाहतुकीसाठी 9 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर 2025 या कालावधीत बंद राहणार आहे. या कालावधीत देनाबॅक चौक ते जुनामोंढा चौक हा मार्ग दुहेरी मार्ग म्हणून जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी घोषीत केला आहे. देनाबॅक चौक ते जुनामोंढा चौक या पर्यायी मार्गाने वाहने वळविण्यास त्यांनी मान्यता दिली आहे. 

पोलीस अधिक्षक नांदेड  यांनी कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. तर कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी रस्ता वाहतुक प्रतिबंध व पर्यायी रस्त्यासाठी आवश्यक असलेले बोर्ड, चिन्ह लावणे इत्‍यादी बाबतची कार्यवाही करावी. अशी अधिसुचना जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी मोटार वाहन कायदा 1999 चे कलम 115 मधील तरतुदीनुसार 7 नोव्हेंबर 2025 रोजी निर्गमीत केली आहे.

00000

वृत्त क्रमांक 1169

वंदे मातरम गीताच्या 150 व्या वर्धापन दिनानिमित्त

सामुहिक गायनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

जिल्ह्यातील हजारो विद्यार्थी-कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

नांदेड, दि. 7 नोव्हेंबर : “वंदे मातरम” या राष्ट्रभावना जागविणाऱ्या गीताच्या 150 व्या वर्धापन दिनानिमित्त आज जिल्ह्यात वंदे मातरम समूह गायन कार्यक्रम सर्वत्र उत्साहात संपन्न झाला. नांदेड येथे श्री गुरूग्रंथ साहिबजी भवन येथे हा कार्यक्रम हजारो विद्यार्थ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत राष्ट्रभक्तीच्या वातावरणात उत्साहात पार पडला. 

 श्री गुरू गोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके, तहसिलदार संजय वारकड, गुरुद्वारा अधीक्षक हरजितसिंग कडेवाले, शहर पोलीस उपअधीक्षक रामेश्वर वैजने, जिल्हा युवा अधिकारी चंदा रावळकर, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सुर्यवंशी, शिक्षणाधिकारी माध्यमिक, प्राथमिक यांच्यासह शहरातील विविध शाळेतील शिक्षक, विद्यार्थी यांच्यासह विविध कार्यालयाचे अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती. 

जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये आणि सार्वजनिक स्थळी सकाळी 10 वा. एकाच वेळी “वंदे मातरम्” गीताचे सामूहिक गायन करण्यात आले. विद्यार्थ्यांसह शिक्षक, अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मता आणि अभिमानाची भावना दृढ करण्याचा प्रयत्न करण्यात आला. जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली औद्योगिक प्रशिक्षण संस्था व शिक्षण विभागाच्या समन्वयाने हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी दिल्ली येथील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सामूहिक वंदे मातरम गीत गायन सुरु होते, हा कार्यक्रम सर्वाना दूरदृश्यप्रणालीद्वारे दाखविण्यात आला.

“वंदे मातरम्” गीताच्या 150 व्या वर्षानिमित्ताने घेतलेल्या या सामूहिक गायन उपक्रमाने जिल्ह्यात देशभक्तीचा उत्साह आणि ऐक्याची भावना वृद्धिंगत झाली. भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात ‘वंदे मातरम’ या गीताचा विशेष उल्लेखनीय प्रभाव राहिला आहे आणि हे गीत स्वातंत्र्य सैनिकांसाठी प्रेरणास्त्रोत बनले होते. थोर कवी आणि तत्वज्ञ बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी 1875 साली रचलेल्या ‘वंदे मातरम’ या गीताला शुक्रवारी 7 नोव्हेंबर रोजी 150 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने 7 नोव्हेंबर 2025 ते 7 नोव्हेंबर 2026 या दरम्यान एकूण चार टप्प्यात राज्यात विविध उपक्रम व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून कौशल्य विकास विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने राज्यभरात वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. यावेळी विद्यार्थ्यांनी “वंदे मातरम्” गीतावर आधारीत लघुनाटिका सादर केली.

00000










वृत्त क्रमांक 1168

शासकीय तंत्रनिकेतन नांदेडला एनबीए मानांकन : शिक्षण क्षेत्रात यशाची भर

नांदेड,दि.७ नोव्हेंबर:- शासकीय तंत्रनिकेतन नांदेडच्या सिव्हिल, माहिती तंत्रज्ञान व विद्युत अभियांत्रीकी या विभागाला 31 डिसेंबर2028 पर्यंत तसेच यंत्र व उत्पादन अभियांत्रिकी या विभागाला दि. 30 जून 2027 पर्यंत National Board of Aceridinarion (NBA) कडून मानांकन प्राप्त झाले आहे.

राष्ट्रीय मान्यता मंडळ (एनबीए) ही भारतातील एक स्वायत्त संस्था आहे जी अभियांत्रिकी आणि इतर  तांत्रिक कार्यक्रमांचे मूल्यमापन आणि मान्यता राष्ट्रीय स्तरावर देते. सदर  राष्ट्रीय मानांकण हे विभागाच्या दर्जेदार, शैक्षणिक आणि तांत्रिक सुविधासाठी मिळाले आहे.

एनबीए मान्यता प्रक्रियेत अभ्यासक्रम, विद्यार्थाची गुणवत्ता आणि मुल्यांकन प्रणाली इ. बाबींची कसून तपासणी केली जाते.  राष्ट्रीय मान्यता मंडळ (एनबीए) मान्यता दिल्याने विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण, चांगल्या नोकरीच्या संधी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळण्यात मदत होते. यामुळे शिक्षण शिकण्याच्या प्रक्रियेत सुधारणा होते. 

तसेच संस्थेच्या वैद्यकीय अणुविद्युत या विभागाला MSBTE कडून मागील वर्षाकरिता शैक्षणिक तसेच गुणवत्तेच्या आधारे उत्कृष्ट दर्जा प्राप्त झाला आहे. त्याचबरोबर भारत सरकारच्या अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरण यांच्याकडून संस्थेस २६ जुन 2027 पर्यंत प्रमाणित करण्यात आले आहे.

नजिकच्या कालावधीमध्ये जास्तीत जास्त शाखांना मानांकन मिळणारी मराठवाड्यातील शासकीय तंत्रनिकेतन नांदेड ही दुसरी संस्था ठरली आहे. त्यामुळे संस्थेची मान नक्कीच उंचावलेली आहे. 

सदरील मानांकनासाठी विभागाचे संचालक तसेच सहसंचालक यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले आहे. या यशाबद्दल संस्थेचे प्राचार्य डॉ. एन. एल. जानराव यांनी तसेच संस्थेचे एनबीए समन्वयक डॉ.गणेशडी अवचट यांनी समाधान व्यक्त केले असून, हे यश सर्व प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नांचे फळ असल्याचे सांगितले. यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी हे एक महत्त्वपूर्ण यश ठरले आहे. 

0000

वृत्त क्रमांक 1277   जिल्हा माहिती कार्यालयातील रद्दी विक्रीसाठी उपलब्ध   नांदेड (जिमाका) ,  दि .   5 :-   जिल्हा माहिती कार्यालय ,   नांदे...