Tuesday, December 9, 2025

 वृत्त क्रमांक 1286

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार भटक्या श्वानांवर जिल्हा परिषदेची अंमलबजावणी मोहीम

नांदेड, दि. 9 डिसेंबर:- आज यशवंतराव चव्हाण सभागृह, जिल्हा परिषद नांदेड येथे भटक्या श्वानांसंदर्भात मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

ही कार्यशाळा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. 

कार्यक्रमाला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, जिल्हा उपआयुक्त डॉ. राजकुमार पडिले, जिल्हा उपआयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय, तसेच डॉ. प्रविणकुमार घुले, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन प्रमुख उपस्थित होते.

या कार्यशाळेत सर्व गट विकास अधिकारी, पंचायत समितीचे अधिकारी, सर्व सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, तसेच पशुधन विकास अधिकारी यांनी सहभाग घेतला.

बैठकीत नांदेड जिल्ह्यातील सर्व ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांनी भटक्या श्वानांबाबत तातडीने आणि समन्वयाने कार्यवाही कशी करावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

भटक्या श्वानांच्या व्यवस्थापन, जनजागृती, लसीकरण, निर्बीजीकरण, तसेच सार्वजनिक आरोग्य व सुरक्षेच्या दृष्टीने अंमलात आणावयाच्या उपाययोजनांवर बैठकीत चर्चा झाली.

०००००









वृत्त क्रमांक 1285

दहावी-बारावी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर  

नांदेड दि. 9 डिसेंबर :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र दहावी लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये आयोजित करण्यात येणार आहेत. 

इयत्ता १२ वी (सर्वसाधारण, व्दिलक्षी व व्यवसाय अभ्यासक्रम तसेच माहिती तंत्रज्ञान व सामान्यज्ञान विषयांची ऑनलाईन परीक्षा) लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा कालावधी मंगळवार १० फेब्रुवारी २०२६ ते बुधवार १८ मार्च २०२६ पर्यंत आहे. प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन तसेच NSQF अंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रम प्रात्यक्षिक परीक्षा (माहिती तंत्रज्ञान व सामान्यज्ञान विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षेसह) लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा कालावधी शुक्रवार २३ जानेवारी २०२६ ते सोमवार ९ फेब्रुवारी २०२६ हा आहे. 

इयत्ता १० वी परीक्षा लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा कालावधी शुक्रवार २० फेब्रुवारी २०२६ ते बुधवार १८ मार्च २०२६ राहील. प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा (शरीरशास्त्र, आरोग्यशास्त्र व गृहशास्त्र विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षेसह) लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा कालावधी सोमवार २ फेब्रुवारी २०२६ ते बुधवार १८ फेब्रुवारी २०२६ हा आहे. 

दिनांक निहाय सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा/उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालय यांचेकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल. त्या छापील वेळापत्रकावरूनच परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी व विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ट व्हावे. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच सोशल मिडीया किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये. यामुळे विद्यार्थ्याचे नुकसान झाल्यास मंडळ जबाबदार राहणार नाही याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन राज्यमंडळाचे सचिव डॉ. दिपक माळी यांनी केले आहे.

00000

 वृत्त क्रमांक 1284

कौटुंबिक न्यायालयात डाटा एन्ट्री ऑपरेटर पदासाठी नोटीस प्रसिद्ध   

 

नांदेड दि. 9 डिसेंबर :-  कौटुंबिक न्यायालय नांदेडच्या आस्थापनेवर तीन वर्ष कालावधीसाठी डाटा एन्ट्री ऑपरेटरचे एक पद भरण्यासाठी मान्यताप्राप्त कंत्राटदार यांच्याकडून मनुष्यबळ पुरविण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत.

 

त्याबाबतीत जिल्हा न्यायालय नांदेड यांच्या https://districts.ecourts.gov.in/nanded या संकेतस्थळावर निविदा सूचना आणि जाहिर नोटिस प्रकाशित करण्यात आली आहे. याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन न्यायाधीश, कौटुंबिक न्यायालय नांदेड यांनी केले आहे.

000000

वृत्त क्रमांक 1283

अवैध रेती उत्खननावर पहाटे महसूल विभागाची धडक कारवाई

18 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जागेवरच नष्ट

नांदेड, दि. 9 डिसेंबर :- जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली आज महसूल विभागाच्या पथकाने कल्लाळ व पिंपळगाव निमजी परिसरात पहाटे 5 वाजता अवैध रेती उत्खननाविरोधात मोठी धडक कारवाई केली.

या कारवाईत उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, तहसीलदार संजय वारकड, नायब तहसीलदार सुनील माचेवाड, मंडळ अधिकारी कुणाल जगताप, अनिरुद्ध जोंधळे, मोहसीन सय्यद, तसेच ग्राम महसूल अधिकारी मनोज जाधव, माधव भिसे, श्रीरामे, रमेश गिरी, मनोज सरपे, महेश जोशी, कल्याणकर, सचिन उपरे, मुंगल, गजानन होळगे, संजय खेडकर आणि महसूल सेवक बालाजी सोनटक्के, शिवा तेलंगे, जानोळे, हिंगोले यांचा समावेश होता.

कारवाईत जप्त व नष्ट केलेला मुद्देमाल

गस्तीदरम्यान पथकाला अवैध उत्खननासाठी वापरली जाणारी 3 गुडगुडी, 1 इंजिन, 15 तराफे सापडले. मजुरांच्या साह्याने पथकाने 3 गुडगुडी आणि 1 इंजिन जिलेटीनने स्फोट करून नष्ट केले. 15 तराफे जाळून नष्ट केले असा एकूण 18 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जागेवरच नष्ट केला.

अडथळे असूनही पथकाची धडक मोहीम

अवैध वाळू उत्खनन करणाऱ्यांनी कारवाई टाळण्यासाठी रस्त्यावर जाणूनबुजून पाणी सोडून दिले होते, ज्यामुळे पायी किंवा साध्या वाहनाने पुढे जाणे अशक्य होते. तरीही पथकाने ट्रॅक्टरचा वापर करून उत्खनन पॉईंटपर्यंत पोहोचत कारवाई पूर्ण केली. अवैध रेती उत्खननाविरोधात सक्तीने व सातत्याने कारवाई करण्यात येईल, असा इशारा उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ व तहसीलदार संजय वारकड यांनी दिला आहे.

00000

    































 वृत्त क्रमांक 1282

नंबर प्लेट शिवाय वाहन चालवू नका – प्रादेशिक परिवहन अधिकारी

विशेष तपासणी मोहिमेत 22 दोषी वाहनांवर कारवाई

नांदेड, दि. 9 डिसेंबर :-नांदेड शहरात विना नंबर प्लेट हायवा/टिप्पर वाहने धावत असल्याची माहिती मिळाल्यानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालय, नांदेडच्या वायुवेग पथकातर्फे 7 ते 8 डिसेंबर 2025 या कालावधीत विशेष तपासणी मोहिम राबविण्यात आली.

या मोहिमेदरम्यान एकूण 184 वाहने तपासण्यात आली. त्यापैकी 22 वाहनांवर नंबर प्लेट नसणे, तसेच मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

प्रादेशिक परिवहन अधिकारी, नांदेड यांनी जिल्ह्यातील सर्व वाहनधारकांना आवाहन केले आहे की, वाहनावर नंबर प्लेट लावल्याशिवाय वाहन चालवू नये, मोटार वाहन कायदा व नियमांचे पूर्ण पालन करणे बंधनकारक आहे.

या नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी, नांदेड यांनी केले आहे.

००००

  वृत्त क्रमांक 1286 सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार भटक्या श्वानांवर जिल्हा परिषदेची अंमलबजावणी मोहीम नांदेड, दि. 9 डिसेंबर:- आज यशवं...