Wednesday, July 30, 2025

 वृत्त क्र. 780

नांदेड जिल्हा निर्यातक्षम फुल पिके उत्पादक शेतकऱ्यांचा हब होण्यासाठी मदत करणार 

- जिल्हाधिकारी राहुल कर्डिले  

मॅग्नेट प्रकल्पाअंतर्गत फुल पिके उत्तम कृषीपद्धती या विषयावर प्रशिक्षण संपन्न

नांदेड दि. 30 जुलै :- अलिकडच्या काळात शेतकऱ्यांनी इतर पिकांबरोबर निर्यातक्षम फुल पिके  उत्पादकतेवर भर द्यावा. भविष्यात नांदेड जिल्हा निर्यातक्षम फुल पिके उत्पादक शेतकऱ्यांचा हब होण्यासाठी सर्वोतोपरी मदत करण्यात येईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. 

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन भवनात आज सहकार व पणन विभाग अंतर्गत आशियाई विकास बँक अर्थसहाय्यीत महाराष्ट्र ऍग्री बिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्प अंतर्गत महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पुणे, कृषी व आत्मा विभाग नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने फुल पिके  उत्तम कृषी पद्धती या विषयावर प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते. 

कार्यक्रमास नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय लहानकर, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे प्रशिक्षण विभाग प्रमुख दिगंबर साबळे, मॅग्नेट प्रकल्प लातूर विभागीय प्रकल्प उपसंचालक महादेव बरडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक आत्मा दत्तकुमार कळसाईत, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पुणेचे मनुष्यबळ विकास तथा वरिष्ठ प्रशिक्षण अधिकारी हेमंत जगताप, प्रकल्प उपसंचालक मॅग्नेट लातूर महादेव बरडे,  विभागीय प्रकल्प अधिकारी मॅग्नेट,  भारतीय पुष्प अनुसंधान पुण्याचे शास्त्रज्ञ डॉ. गणेश कदम, केएफ बायो प्लांट्स पुणेचे तांत्रिक अधिकारी राजन निफाडकर, न्यू लीफ डायनामिक टेक्नॉलॉजीचे तांत्रिक अधिकारी विवेक वीर  , शितलादेवी शेतकरी उत्पादक कंपनी, बारडचे अध्यक्ष निलेश देशमुख बारडकर, हिरकणी बायोटेकचे रत्नाकर देशमुख, मॅग्नेट प्रकल्पाचे गजेंद्र नवघरे आदी उपस्थित होते. 

नांदेड जिल्ह्यातील फुल उत्पादक शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन बाजारपेठेचा अभ्यास, प्रक्रिया युक्त फुलपिकांच्या बाबी यासाठी संघटित होऊन शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा. तसेच शेतीसह शेतमाल प्रक्रिया उद्योगाकडे वळावे. उत्पादित केलेला पक्का शेतमाल निर्यात करण्याकडे भर द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी केले. 

अशा प्रकारचा प्रशिक्षण कार्यक्रम नांदेड जिल्ह्यातील फुल उत्पादक शेतकऱ्यांसाठी राबविल्याबद्दल मॅग्नेट प्रकल्पाचे सभापती संजय लहानकर यांनी आभार मानले. तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत फुल उत्पादक शेतकऱ्यांसाठी आवश्यक ती मदत केली जाईल असेही त्यांनी सांगितले. 

मॅग्नेट प्रकल्प अंतर्गत नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी  फुल पिके  निर्यातीसाठी  मॅग्नेट प्रकल्पांतर्गत आवश्यक ती सर्व मदत केली जाईल असे विभागीय प्रकल्प उपसंचालक महादेव बरडे यांनी आश्वासित केले. फुल पिके  निर्यातीसाठी आवश्यक ती सर्व मदत त्यासाठी लागणारी ऑनलाइन नोंदणी याविषयी कृषी विभाग मार्गदर्शन व मदत करेल असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार  कळसाईत यांनी सांगितले. 

फुल पीक तंत्रज्ञानातील वाव व संधी याविषयी प्रशिक्षण विभाग प्रमुख दिगंबर साबळे यांनी मार्गदर्शन केले. 

एमसीडीसीला लातूर विभागामध्ये फुल पिके प्रशिक्षण घेण्यासाठी मॅग्नेट प्रकल्पाने संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल प्रकल्पाचे आभार मनुष्यबळ विकास तथा वरिष्ठ प्रशिक्षण अधिकारी हेमंत जगताप यांनी मानले. खुल्या वातावरणातील फुलशेती लागवड तंत्रज्ञानातील विविध बारकावे पुण्याचे शास्त्रज्ञ डॉ.गणेश कदम  यांनी समजून सांगितले. संरक्षित शेती वातावरणातील फुल पिके तंत्रज्ञान याविषयी सविस्तर माहिती तांत्रिक अधिकारी राजन निफाडकर दिली. बायोमास आधारित शीत साठवणूक तंत्रज्ञान यासंबंधी मार्गदर्शन तांत्रिक अधिकारी विवेक वीर यांनी केले. या कार्यक्रमासाठी नांदेड जिल्ह्यातील ३५० हून अधिक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला.

00000





No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक 1277   जिल्हा माहिती कार्यालयातील रद्दी विक्रीसाठी उपलब्ध   नांदेड (जिमाका) ,  दि .   5 :-   जिल्हा माहिती कार्यालय ,   नांदे...