Monday, March 11, 2024

 वृत्त क्र. 230 

केंद्रीय राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील यांचा नांदेड दौरा

नांदेड दि. 11 :-  केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहिल. 

मंगळवार 12 मार्च 2024 रोजी हैद्राबाद येथून वाहनाने सकाळी 11 वा. महावीर चौक, नांदेड येथे आगमन. सकाळी 11 ते 11.45 वाजेपर्यत पंचवटी हनुमान येथे राखीव. दुपारी 12 वा. महावीर चौक नांदेड येथून सहयोग नगर, राज कार्नर नांदेड येथे आगमन. दुपारी 12 ते 12.50 वा. पदवीधर सेल यांच्यासोबतच्या बैठकीस उपस्थिती.  दुपारी 1 वा. खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वसंत नगर येथील साई सुभाष निवासस्थानी उपस्थिती. दुपारी 1 ते 2 या कालावधीत बचतगट आणि शेतकरी यांच्यासोबत जेवणासाठी राखीव. दुपारी 2 ते 2.30 वा. पत्रकार परिषदेस उपस्थिती. दुपारी 2.30 ते 3. 30 वा. जिल्हा न्यायालयात विधीज्ञ यांच्यासमवेत संकल्प सुझाव या कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 3.30 ते 4.30 वा. झुलेलाल भवन, भगत सिंग रोड, सिंधी कॉलनी, बाफना नांदेड येथे डॉक्टर्स, व्यापारी, नागरिक यांच्यासोबत संकल्प सुझाव कार्यक्रमास उपस्थिती. सायं. 4.30 ते 5.30 वा. शासकीय योजनेतील विविध लाभार्थी यांच्यासोबत शक्ती वंदन इव्हिएम संकल्प सुझाव कार्यक्रमात डॉ. हंसराज वैद्य हॉस्पिटल, मुथा चौक, नांदेड येथील डॉ. शितल ताई भाल यांच्या निवासस्थानी राखीव. रात्री नांदेड येथे मुक्काम.

0000

 सुधारित वृत्त क्र. 229

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू 

 नांदेड (जिमाका) दि. 11 :- नांदेड जिल्ह्यात 23 मार्च 2024 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. 

 

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 23 मार्च 2024 रोजी मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.

 

अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

00000

 वृत्त क्र. 228 

प्रगतशील शेतकऱ्यांसाठी राष्ट्रीय किटक निरीक्षण प्रणाली ॲपचे प्रशिक्षण


नांदेड, दि. 11 :-  भारत सरकारच्या कृषि आणि किसान कल्याण मंत्रालयाच्या प्रादेशिक राष्ट्रीय एकात्मिक कीड व्यवस्थापन संशोधन केंद्र, नागपुर व्दारा नांदेड जिल्हयातील विभीन्न तालुक्यातील प्रगतशील शेतकऱ्यांसाठी राष्ट्रीय किटक निरीक्षण प्रणाली या मोबाईल ॲपचे प्रशिक्षण जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयात नुकतेच आयोजित करण्यात आले होते.

 

यासाठी प्रादेशिक राष्ट्रीय एकात्मिक कीड व्यवस्थापन संशोधन केंद्र नागपुर कार्यालयाच्या सहायक वनस्पती संरक्षण अधिकारी एस.एस.टाक यांनी उपस्थित राहुन शेतकऱ्यांना या ॲपबददल माहिती दिली आणि या ॲपमुळे शेतकऱ्यांना सहज पध्दतीने किडीची ओळख कशी करायची आणि ॲपमध्ये एडवाइजरीचा फायदा कसा घ्यायचा हे प्रात्यक्षिक करुन दाखवले.

 

त्याचबरोबर कापुस संशोधन केंद्र नांदेड येथे प्रक्षेत्र भेट घेण्यात आली. या  भेटी दरम्यान डॉ. पांडागळे, डॉ. भेदे यांनी सहभागी शेतकऱ्यांशी चर्चा करुन मार्गदर्शन केले. एकात्मिक किड व्यवस्थापन, मित्र किडीची ओळख, किटकनाशकांचा सुरक्षित व योग्य वापर, किड रोगांची ओळख आणि त्यासाठीचे उपाय असे विषय या प्रशिक्षणामध्ये घेण्यात आले. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयाचे तंत्र अधिकारी आर.डी.मेरगेवार आणि मंडळ कृषि अधिकारी बी.ए.मुनेश्वर व एस.एस.देवकांबळे यांनी कार्यक्रमात सहभागी राहुन सहयोग केले. प्रशिक्षणामध्ये नांदेड जिल्हयातील 11 प्रगतशिल शेतकऱ्यांनी भाग घेतला.

0000

वृत्त क्र. 227 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हाड ठिसूळता तपासणी शिबिर संपन्न 

नांदेड, दि. 11 :- जागतिक महिला दिनानिमित्त डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील अस्थिव्यंगोपचारशास्त्र व भौतिकोपचारशास्त्र विभागातर्फे हाड ठिसूळता तपासणी शिबिर नुकतेच संपन्न झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख हे तर उद्घाटक बधिरीकरणशास्त्र विभागाच्या विभागप्रमुख डॉ.वैष्णवी कुलकर्णी या होत्या. 

या कार्यक्रमास अस्थिव्यंगोपचार शास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. राजेश अंबुलगेकर, वैद्यकीय अधिक्षक डॉ.वाय.एच.चव्हाण यांची उपस्थिती होती. या शिबिरामध्ये एकूण 167 रुग्णांची हाड ठिसूळता तपासणी करण्यात आली. ज्यामध्ये 40 वर्षे वयाच्या वरील 102 महिला व 60 वर्षावरील 65 पुरुषांचा सहभाग होता. तपासणी करण्यात आलेल्या रुग्णांमध्ये जवळपास 80 टक्के रुग्णांमध्ये हाडांची ठिसूळता आढळून आली. या रुग्णांना अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, डॉ. वैष्णवी कुलकर्णी व डॉ.राजेश अंबुलगेकर यांनी हाडातील कॅल्शियम वाढवण्याबद्दल मार्गदर्शन केले. रुग्णांना अस्थिव्यंगोपचार शास्त्र विभागातर्फे मोफत उपचार देण्यात आले. 

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त भौतिकोपचार शास्त्र विभागातर्फे मागील 7 वर्षांपासून दरवर्षी हाड ठिसूळ तपासणी शिबिर राबवण्यात येते. या शिबिर कार्यक्रमाचे डॉ. अर्चना केसराळे व डॉ.रवी वट्टमवार, भौतिकोपचार तज्ञ, भौतिकोपचार शास्त्र विभाग यांनी यशस्वीपणे आयोजन केले.

0000






Sunday, March 10, 2024

 वृत्त क्र. 226

 

दुसऱ्या दिवशीच्या 'शिवगर्जना' महानाट्याला नांदेडकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 

· शिवरायांच्या जीवनातील चित्तथरारक प्रसंगानी वेधले प्रेक्षकांचे लक्ष

· आजचा शेवटचा दिवस ; प्रवेश सर्वांसाठी खुला

· प्रवेश नि शुल्क : प्रथम येणाऱ्यास बैठक व्यवस्थेत प्रथम प्राधान्य

· नागरिकांनी कुटूंबासोबत महानाटयाचा लाभ घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

 

नांदेड, दि. 10 : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर आधारित शिवगर्जना या महानाट्याचे 9, 10 व 11 मार्च रोजी नांदेडच्या गुरुद्वारा मैदानावर प्रयोग होत आहेत. काल पहिल्या दिवशी या शिवगर्जना महानाटयाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते झाला. आज दुसऱ्या दिवशीच्या महानाट्याच्या प्रयोगाला खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अपर्ण करुन शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. आजच्या प्रयोगाला नांदेडकरांनी भरभरुन प्रतिसाद दिला असून, उद्या होणाऱ्या शेवटच्या प्रयोगालाही नागरिकांनी आपल्या कुटूंबासह उपस्थित राहून या शिवगर्जना महानाटयाचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

 

राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभाग सांस्कृतिक कार्य संचालनालय व नांदेड जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयातून 350 व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित शिवगर्जना महानाट्य प्रयोगाचे सादरीकरण होत आहे. या महानाटयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याची, नितीची, चरित्राची, विचारांची व कार्यकुशलतेची महती जनसामान्यांना विशेष करुन तरुण पिढीला मार्गदर्शक ठरावी. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गौरवशाली व अलौकिक वारशाला प्रसिद्धी मिळावी या उद्देशाने महाराजांच्या जीवनावर आधारित महानाटयाचे सादरीकरण 9, 10 व 11 असे तीन दिवस गुरुद्वारा मैदान हिंगोली गेट रेल्वे हॉस्पिटल समोर दररोज 6:30 वा. होत आहे.

 

उद्या 11 मार्चचा शेवटचा प्रयोग होणार आहे. हा प्रयोग सर्वासाठी खुला असून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. आजच्या शिवगर्जना महानाट्यात कलाकारांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील रोमहर्षक प्रसंगाचे सादरीकरण केले. यात प्रामुख्याने श्री रायरेश्वर मंदिरात घेतलेली स्वराज्य स्थापनेची शपथ, अफजलखानाचा वध, आग्र्यावरुन सुटका, पुरदंरचा तह, शाईस्तेखानाची फजिती अशा अनेक घटनांवर आधारित प्रसंग हुबेहुब सादरीकरणामुळे प्रेक्षकांच्या समोर ऐतिहासिक क्षण डोळ्यापुढे जशाच तसे उभे राहीले.

 

तसेच या कार्यक्रमाच्या सुरवातीला एका कलावंताने संपूर्ण मैदानावर घोडयावर बसून रपेट मारुन सर्व प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. शिवगर्जना महानाटयाला नांदेड जिल्ह्याच्या अनेक भागातून नागरिकांनी गर्दी केली. जिल्हा प्रशासनातील अनेक अधिकारी, कर्मचारी तसेच शालेय विद्यार्थ्यांची या महानाट्यास उपस्थिती लावली होती. प्रत्येक कुटुंबाने बघावा, असा हा नाट्यप्रयोग उद्या सोमवारी शेवटचा प्रयोग होणार आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

00000































सुधारित वृत्त क्र. 225

नांदेड विमानतळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत

 

नांदेड, दि. 10 : हिंगोली येथील रामलीला मैदानावर आयोजित “शासन आपल्या दारी” या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज नांदेडच्या श्री गुरु गोविंदसिंघजी विमानतळावर दुपारी 2.15 वाजता आगमन झाले. हिंगोली येथील कार्यक्रमासाठी ते आले होते. यावेळी नांदेड विमानतळावर त्यांचे स्वागत करण्यात आले.

 

यावेळी खासदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार राजेश पवार, आमदार डॉ. तुषार राठोड, नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक शशिकांत महावरकर, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे आदी मान्यवरांनी त्यांचे स्वागत केले.

 

यावेळी नांदेड येथील विमानतळ कक्षात पदाधिकारी यांची त्यांनी भेट घेतली. त्यानंतर हेलिकॉप्टरने ते हिंगोलीकडे रवाना झाले. हिंगोली येथील “शासन आपल्या दारी” कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सायंकाळी 5.15 वा. हेलिकॉप्टरने नांदेडच्या श्री गुरु गोविंदसिंघजी विमानतळावर आगमन झाले. त्यानंतर त्यांचे शासकीय विमानाने सायं. 5.27 वा. मुंबईकडे प्रयाण झाले.

0000

छायाचित्र : पुरूषोत्तम जोशी, नांदेड




























Saturday, March 9, 2024

वृत्त क्र. 224 

छत्रपतींच्या जयघोषात नांदेडच्या गुरुद्वारा मैदानावर

'शिवगर्जना'चा थाटात शुभारंभ

 

·         महानाट्याचा पहिल्या प्रयोगाला हजारोंची भरगच्च उपस्थिती

·         रविवारचा प्रयोग बरोबर सायं 6.30 ला सुरू होणार

·         प्रवेश निशुल्क : प्रथम येणाऱ्याला बैठक व्यवस्थेत प्रथम प्राधान्य

 

नांदेड, दि. 9 : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर आधारित शिवगर्जना या महानाट्याचा 9 मार्च पासून नांदेडच्या गुरुद्वारा मैदानावर छत्रपतींच्या जयघोषात थाटात शुभारंभ झाला. 250 पेक्षा अधिक कलाकारांचे समर्पित सादरीकरण आणि हजारो रसिक प्रेक्षकांची उत्स्फूर्त दाद अशी तीन तासांची मैफल मैदानावर रंगली राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभाग सांस्कृतिक कार्य संचालनालय व नांदेड जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयातून 350 व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित महानाट्य शिवगर्जनाचा प्रयोग होत आहे.

 

9, 10 व 11 असे तीन दिवस गुरुद्वारा मैदान हिंगोली गेट रेल्वे हॉस्पिटल समोर दररोज 6:30 वाजता महानाट्याच्या प्रयोगाची सुरुवात झाली आहे. उद्या 10 मार्चचा प्रयोगाला बरोबर सायंकाळी 6.30 ला सुरू होणार आहे. प्रत्येक कुटुंबाने या महानाट्याचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. तत्पूर्वी, आ. बालाजी कल्याणकर, आ. राजेश पवार, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, नांदेड-वाघाळा महानगरपालिकेचे आयुक्त महेशकुमार डोईफोडे यांच्यासह विविध मान्यवरांनी सायंकाळी 7 वाजता या महानाट्याची सुरुवात केली.

 

छत्रपती शिवाजी महाराजाच्या उदयापूर्वीची महाराष्ट्राची परिस्थिती, परकिय आक्रमणात पोळलेला महाराष्ट्र आणि छत्रपतीचा उदय होतानाची परिस्थिती. त्याकाळातील संस्कृती, लोकनाट्य, लोककला याची गुंफण करीत पुढे छत्रपतीच्या आयुष्यातील चित्तथरारक प्रसंगाचे लक्षवेधी सादरीकरण, ओघवते निवेदन, ध्वनी व प्रकाश व्यवस्था यामुळे रसिकांना हे महानाट्य खिळवून ठेवते. छत्रपती शिवाजी महाराजांची थेट घोड्यावरून मावळ्यांसह मैदानावरची लाईव्ह रपेट, घोड्यावरची चार मजली सेटवरची हृदयाचा ठोका चुकवणारी एन्ट्री, युद्धाचे प्रसंग चित्तथरारक होते. सलग तीन तास कोणताही मध्यांतर न घेता हा प्रयोग रसिकांना आकर्षित करून ठेवते.  प्रत्येक कुटुंबाने बघावा असा हा नाट्यप्रयोग उद्या रविवारी व सोमवारी होणार आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

00000












केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...