वृत्त क्रमांक
निकृष्ट चाऱ्यावर प्रक्रिया करून पशुधनासाठी सकस चारा उपलब्ध करा
- चारा साक्षरता अभियानांतर्गत किनवट येथील कृष्णप्रिय गोशाळेत
प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन
नांदेड(जिमाका), दि. 13: जिल्ह्यातील
दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर संभाव्य चारा टंचाईवर मात करण्यासाठी उपलब्ध
चाऱ्याचे पोषणमूल्य वाढवून त्याचा कार्यक्षम वापर करावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाच्या वतीने करण्यात आले. चारा साक्षरता
अभियानांतर्गत किनवट येथील कृष्णप्रिय गोशाळेत आज वाळलेल्या
सोयाबीन कुटारावर युरिया-मोलॅसिस प्रक्रिया करून निकृष्ट चारा सकस करण्याचे
प्रात्यक्षिक शेतकरी व पशुपालकांना दाखविण्यात आले.
या प्रात्यक्षिकादरम्यान हिरवा व वाळलेला
चारा कडबाकुट्टी यंत्राद्वारे बारीक करून वापरणे, निकृष्ट
चाऱ्याचे पोषणमूल्य वाढविणे, मुरघास निर्मिती, गाळपेरा नियोजन तसेच चाऱ्याची नासाडी टाळून उपलब्ध चाऱ्याचा जास्तीत जास्त
उपयोग करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. दुष्काळी परिस्थितीत पशुधनासाठी पुरेसा
व सकस चारा उपलब्ध राहावा, तसेच चारा टंचाईचा संभाव्य परिणाम
कमी व्हावा, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
यावेळी सहाय्यक आयुक्त डॉ. प्रविणकुमार
घुले (नांदेड), सहाय्यक आयुक्त डॉ. संजीव पाटील (किनवट),
पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल जोंधळे, डॉ.
शितल वानखेडे, डॉ. योगेश पाटील, डॉ.
सुनील जाधव, डॉ. लक्ष्मीकांत ढगारे व डॉ. गुरुराज मेनकुदळे
यांच्यासह पशुधन पर्यवेक्षक सचिन पवळे, विनय कटके, ज्ञानेश्वर इंगळे, अशोक चव्हाण, नितीन भुरके व राजकुमार भुरके उपस्थित होते. परिसरातील शेतकरी व
पशुपालकांनीही या उपक्रमात सहभाग घेतला.
दुष्काळी परिस्थितीत उपलब्ध चाऱ्याचे
योग्य नियोजन, शास्त्रीय प्रक्रिया आणि साठवणुकीच्या
तंत्रांचा अवलंब केल्यास चारा टंचाईची तीव्रता कमी करण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे
शेतकरी व पशुपालकांनी चारा साक्षरता अभियानांतर्गत दिलेल्या मार्गदर्शनाचा लाभ
घेऊन पशुधनाच्या पोषणासाठी उपलब्ध चाऱ्याचा कार्यक्षम वापर करावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाच्या वतीने करण्यात आले.
******



No comments:
Post a Comment