वृत्त क्रमांक
सेवा संकल्प अभियानातून योजनांचा लाभ थेट नागरिकांपर्यंत
- विविध प्रमाणपत्रांचे वितरण; 350 नागरिकांची आरोग्य तपासणी, आरोग्य व सौरऊर्जा योजनांबाबत मार्गदर्शन
नांदेड (जिमाका), दि. 13 : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या
मार्गदर्शनाखाली सेवा संकल्प अभियानांतर्गत नांदेड तालुक्यातील नागरिकांसाठी विविध
शासकीय योजनांचा लाभ देणारे शिबिर येथील डॉ. शंकरराव चव्हाण
प्रेक्षागृहात आयोजित करण्यात आले होते.
उपविभागीय अधिकारी डॉ.सचिन खल्लाळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या शिबिरात
विविध विभागांच्या माध्यमातून प्रमाणपत्रांचे वितरण, आरोग्य
तपासणी आणि शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या शिबिरास तहसीलदार संजय वारकड, गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर, तालुका कृषी अधिकारी संजय चातरमल, उपअधीक्षक भूमी अभिलेख बळवंत मस्के, बालविकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण) शिवगंगा पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण मुंडे, नायब तहसीलदार स्वप्नील दिगलवार, सुनील माचेवाड, संजय नागमवाड, पुरवठा निरीक्षण अधिकारी रवींद्र राठोड यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
विविध प्रमाणपत्रांचे वितरण
आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून भटक्या-विमुक्त समाजातील नागरिकांना 31 जातींची प्रमाणपत्रे, 280 रहिवासी प्रमाणपत्रे आणि 145 उत्पन्न प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. ग्रामविकास विभागामार्फत 35 जन्मदाखले व 35 मृत्यूदाखले, महसूल विभागामार्फत 75 जिवंत सातबारा उतारे, तर पुरवठा विभागामार्फत 51 ऑनलाइन शिधापत्रिकांचे वितरण करण्यात आले. कृषी विभागाने महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने 125 महिला शेतकरी प्रमाणपत्रांचे वितरण केले. तसेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आणि महाविस्तार कृत्रिम बुद्धिमत्ता ॲपविषयी मार्गदर्शन केले.
आरोग्य तपासणी आणि कल्याणकारी योजनांची दिली माहिती
जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत 350 नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत 225 आरोग्य कार्डांचे, तर 60 वर्षांवरील नागरिकांसाठी 35 वंदना कार्डांचे वितरण करण्यात आले. याशिवाय अनुलोम संस्थेमार्फत आभा कार्ड, महावितरण विभागामार्फत प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना आणि महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी बचत गटांच्या नोंदणी प्रमाणपत्रांबाबत माहिती देण्यात आली.
एकाच छताखाली विविध शासकीय सेवा
सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून विविध
शासकीय विभागांच्या सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या. प्रमाणपत्रांचे
वितरण, आरोग्य तपासणी, योजनांची माहिती आणि
लाभार्थ्यांना मार्गदर्शन यांमुळे नागरिकांना शासकीय सेवा सुलभतेने मिळण्यास मदत
झाली. विविध योजनांचा लाभ पात्र नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने या
शिबिराचे आयोजन करण्यात आले.
*******
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
No comments:
Post a Comment