भरती परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी नांदेड जिल्ह्यातून सूचना व अभिप्राय आमंत्रित
विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा परीक्षार्थी, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था, लोकप्रतिनिधी व नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन
नांदेड, दि. ८ (जिमाका) : राज्यातील शासकीय भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासह परीक्षांमधील गैरप्रकारांना प्रतिबंध घालण्यासाठी परीक्षा पद्धतीत आवश्यक सुधारणा करण्याच्या दृष्टीने सूचना व अभिप्राय मागविण्यात येत आहेत. छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी विभागातील विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा परीक्षार्थी, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लासेस, अभ्यासिका चालक, लोकप्रतिनिधी व नागरिकांनी या प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने राज्यातील शासकीय भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक व विश्वासार्ह करण्यासाठी तसेच गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत केली आहे. समितीच्या कार्यकक्षेनुसार राज्यातील प्रत्येक महसुली विभागातील विद्यार्थी, उमेदवार, शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी तसेच संबंधित हितधारकांशी चर्चा करून परीक्षा पद्धतीतील सुधारणांसाठी सूचना व अभिप्राय प्राप्त करून घेतले जाणार आहेत.
या समितीचे अध्यक्ष व सदस्य दि. २१ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता स्मार्टसिटी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे कामकाजाच्या अनुषंगाने भेट देणार आहेत. त्यापूर्वी छत्रपती संभाजीनगर विभागातील नांदेड जिल्ह्यातील नागरिकांकडून सूचना व अभिप्राय प्राप्त करून घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे. हा विशेष कक्ष दि. ९ सप्टेंबर २०२६ पासून दि. १८ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत दररोज सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत कार्यरत राहणार आहे.
भरती परीक्षा पद्धत अधिक सक्षम, पारदर्शक, सुरक्षित व उमेदवाराभिमुख करण्यासाठी संबंधित घटकांनी आपल्या सूचना, शिफारशी, हरकती व निवेदने प्रत्यक्ष अथवा ई-मेलद्वारे सादर करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी नोडल अधिकारी म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी, यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडे प्रत्यक्ष सादर करण्याचे ठिकाण हे जिल्हाधिकारी कार्यालय येथील विशेष कक्ष असून, csn-examreformstaskforce@maharashtra.gov.in या ई-मेलवर दि. ९ ते १८ सप्टेंबर २०२६ दरम्यान सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सादर कराव्यात. ज्या नागरिकांना जिल्हाधिकारी कार्यालयातील विशेष कक्षात प्रत्यक्ष उपस्थित राहणे शक्य नसेल, त्यांनी आपले लेखी अभिप्राय वरील ई-मेलवर विहित मुदतीत पाठवावेत.
या प्रमुख विषयांवर सूचना व अभिप्राय अपेक्षित आहेत
विद्यमान परीक्षा प्रणालीचा आढावाः राज्य शासनाचे विविध विभाग, प्राधिकरणे व परीक्षा घेणाऱ्या संस्थांच्या सध्याच्या परीक्षा पद्धती व कार्यपद्धतीबाबत अभिप्राय.
पारदर्शकता व सुरक्षितता उपायः परीक्षा अधिक सुरक्षित, विश्वासार्ह, निष्पक्ष आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी आवश्यक सर्वकष उपाययोजना,
प्रश्नपत्रिका ते निकाल प्रक्रियाः प्रश्नपत्रिका तयार करणे, मॉडरेशन, डिजिटल अथवा मुद्रित वितरण, गोपनीय वाहतूक, परीक्षा केंद्रांचे व्यवस्थापन, प्रतिसाद नोंदणी, मूल्यांकन व निकाल प्रक्रियेतील सुरक्षा.
माहिती तंत्रज्ञानाचा वापरः डिजिटल प्रणाली, बायोमेट्रिक प्रमाणीकरण, प्रवेश नियंत्रण, ऑडिट ट्रेल्स व सीसीटीव्ही देखरेख यांसारख्या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर.
गैरप्रकारांना प्रतिबंध: पेपरफुटी, गोपनीयतेचा भंग, तोतया उमेदवार, संगनमत व इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा गैरवापर रोखण्यासाठी कडक प्रतिबंधात्मक उपाय व उत्तरदायित्व निश्चित करणे, उत्कृष्ट पद्धतीचा अभ्यासः इतर राज्यांतील अथवा देशांतील यशस्वी, आधुनिक व सुरक्षित परीक्षा प्रणालींचा अभ्यास करून त्या राज्यात लागू करणे.
परीक्षा केंद्रांसाठी किमान मानकेः परीक्षा केंद्रांची निवड, पायाभूत सुविधा, सुरक्षितता, मनुष्यबळ व कार्यसज्जतेबाबत किमान मानके ठरविणे.
संस्थात्मक समन्वयः जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस यंत्रणा, शिक्षण विभाग व परीक्षा संस्था यांच्यात प्रभावी समन्वयाची चौकट निर्माण करणे,
तक्रार निवारण प्रणाली: उमेदवारांसाठी जलद व पारदर्शक तक्रार निवारण व्यवस्था उभारुन परीक्षा प्रक्रियेवरील विश्वास अधिक दृढ करणे.
जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्राप्त होणाऱ्या सर्व सूचना व अभिप्रायांचे संकलन करून ते शासनाच्या उच्चस्तरीय समितीकडे सादर केले जाईल. ही समिती या शिफारर्शीचा सखोल अभ्यास करून राज्य शासनास आपला सर्वसमावेशक अंतिम अहवाल सादर करणार आहे.राज्यातील लाखो स्पर्धा परीक्षा परीक्षार्थीच्या भवितव्याशी निगडित असलेल्या या प्रक्रियेत छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्व नागरिक, अभ्यासक व संस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
*******

No comments:
Post a Comment