Monday, July 6, 2026

वृत्त क्रमांक 

विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाची व्यापक जनजागृती करावी : जिल्हाधिकारी कर्डीले

सोशल मिडीयाच्या माध्यमातून प्रत्येक पात्र मतदारापर्यत माहिती पोहोचवा

नांदेड दि. 6 जुलै :- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नांदेड जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाची माहिती प्रत्येक पात्र नागरिकापर्यंत पोहोचविण्यासाठी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सनी सक्रिय सहभाग घ्यावा आणि विविध डिजिटल माध्यमांतून व्यापक जनजागृती करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल कर्डीले यांनी केले.

आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सच्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाची उद्दिष्टे, अंमलबजावणीची प्रक्रिया, नागरिकांची भूमिका आणि जनजागृतीचे महत्त्व याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी उपजिल्हाधिकारी राजकुमार माने, युवा अधिकारी अश्नी कानकटे, जिल्हा माहिती कार्यालयाच्या उपसंपादक अलका पाटील, निवडणूक विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. 

जिल्हाधिकारी राहुल कर्डीले म्हणाले की, लोकशाही व्यवस्थेचा पाया सक्षम मतदार यादीवर अवलंबून असतो. त्यामुळे प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होणे, मतदार यादीतील त्रुटी दूर करणे, आवश्यक दुरुस्त्या करणे तसेच स्थलांतरित किंवा मृत मतदारांची नावे नियमानुसार वगळणे ही अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. या कामात नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सची भूमिका प्रभावी ठरू शकते.

आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया हे जनसंपर्काचे प्रभावी माध्यम बनले आहे. इन्फ्लुएन्सर्सच्या माध्यमातून कमी वेळात मोठ्या संख्येने नागरिकांपर्यंत विश्वासार्ह माहिती पोहोचविणे शक्य आहे. त्यामुळे फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, एक्स (ट्विटर) तसेच इतर डिजिटल प्लॅटफॉर्मवर जिल्हा प्रशासन आणि भारत निवडणूक आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात येणारी अधिकृत माहिती नियमितपणे प्रसारित करावी. कोणत्याही अफवा किंवा अप्रमाणित माहितीला बळी न पडता नागरिकांपर्यंत केवळ सत्य आणि अधिकृत माहिती पोहोचविण्याची जबाबदारी सर्वांनी पार पाडावी, असे आवाहन त्यांनी केले.

विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम हा केवळ प्रशासकीय उपक्रम नसून लोकशाही अधिक मजबूत करण्याचा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे युवक, प्रथमच मतदान करणारे मतदार, महिला तसेच ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत या मोहिमेची माहिती पोहोचविण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी केले.

बैठकीत उपस्थित इन्फ्लुएन्सर्सनी जिल्हा प्रशासनाच्या या उपक्रमाला पूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही दिली. विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर माहितीपर व्हिडिओ, पोस्ट, रील्स आणि जनजागृती संदेश प्रसारित करून विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम अधिक प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. 

यावेळी प्रत्यक्ष गणनापत्र कसे स्कॅन करायचे. कशी माहिती भरायची, अर्जाचे डिजिटायझेशन कसे करायचे याबाबत प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. नांदेड जिल्ह्यात राबविण्यात येणारे विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाबाबत सविस्तर माहिती उपजिल्हाधिकारी राजकुमार माने यांनी दिली. 

000000





No comments:

Post a Comment

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...