Tuesday, September 22, 2026

वृत्त क्रमांक 

संजय गांधी निराधार योजनेतील ८९ लाभार्थ्यांचे विशेष मोहिमेतून आधार अद्ययावत

बायोमेट्रिक अडचणी असलेल्या लाभार्थ्यांसाठी २४ सप्टेंबरपासून विशेष उपक्रम

नांदेड (जिमाका), दि. २२ : राज्य शासनाच्या ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत संजय गांधी निराधार योजनेतील बायोमेट्रिक अडचणींमुळे आधार अद्ययावत न झालेल्या नांदेड जिल्ह्यातील ८९ लाभार्थ्यांचे आधार अद्ययावत करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.

राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या दि. ९ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार दि. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत नागरिकांना विविध शासकीय सेवा सुलभपणे उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला असून, आधार अद्ययावत करण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येत आहे.

संजय गांधी निराधार योजनेतील काही लाभार्थ्यांना वयोमान, शारीरिक अपंगत्व, आजार, बोटांचे ठसे अस्पष्ट होणे किंवा उपलब्ध न होणे, तसेच डोळ्यांच्या आजारामुळे अथवा वयोमानानुसार आयरीस स्कॅन (Iris Scan) अयशस्वी होणे यामुळे आधार अद्ययावत करण्यात अडचणी येत आहेत.

अशा लाभार्थ्यांना आधार अद्ययावत करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील एकूण ८९ लाभार्थ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. दि. २४ सप्टेंबर ते १९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत संबंधित तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या समन्वयाने लाभार्थ्यांना त्यांच्या निश्चित दिनांक व वेळेनुसार आधार सेवा केंद्र, महावीर चौक, बंदाघाट रोड, नांदेड येथे आणून आधार अद्ययावत करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.

संबंधित तहसीलदारांना त्यांच्या कार्यालयाच्या अधिनस्त समन्वयक कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून लाभार्थ्यांना निश्चित केलेल्या दिनांक व वेळेनुसार आधार सेवा केंद्रावर उपस्थित राहण्यासाठी आवश्यक सूचना देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

या विशेष उपक्रमामुळे बायोमेट्रिक अडचणींमुळे आधार अद्ययावत न करू शकलेल्या संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना आवश्यक सेवा उपलब्ध होऊन शासकीय योजनांचा लाभ घेण्यातील अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली या विशेष उपक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.

***

No comments:

Post a Comment

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...