वृत्त क्रमांक
जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद-२०२६ मध्ये उद्योजकांनी सहभागी व्हावे
जिल्हा उद्योग केंद्रातर्फे आवाहन
नांदेड (जिमाका), दि. १५ : उद्योग आयुक्तालयांतर्गत जिल्हा उद्योग केंद्र, नांदेड यांच्या वतीने जिल्ह्यात गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी तसेच उद्योजक व गुंतवणूकदारांना एकत्रित व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद-२०२६’ आयोजित करण्यात येणार आहे. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचे औचित्य साधून पुढील आठवड्यात होणाऱ्या या परिषदेत जिल्ह्यातील उद्योजक व गुंतवणूकदारांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे सहाय्यक आयुक्त (उद्योग व सेवा) अमोल इंगळे यांनी केले आहे.
उद्योग मंत्री, पालकमंत्री तसेच जिल्हाधिकारी, नांदेड यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली ही परिषद होणार आहे. या परिषदेदरम्यान विविध उद्योग घटकांसोबत सामंजस्य करार (एमओयू) करण्यात येणार आहेत.
जिल्ह्यात गुंतवणूक वाढविणे, स्थानिक उद्योजक व गुंतवणूकदारांना एकत्रित व्यासपीठ उपलब्ध करून देणे, जिल्ह्याच्या तसेच राज्याच्या आर्थिक विकासाला चालना देणे आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करणे, हा या परिषदेचा प्रमुख उद्देश आहे.
या परिषदेत नांदेड जिल्ह्यातील प्रमुख उद्योग क्षेत्रे, गुंतवणुकीच्या उपलब्ध संधी, उद्योजकांचे अनुभव कथन तसेच उद्योग क्षमता असलेल्या विविध क्षेत्रांतील गुंतवणूक व व्यवसायाच्या संधींबाबत चर्चा होणार आहे. यासोबतच सामंजस्य करारांच्या स्वाक्षरीचा कार्यक्रमही आयोजित करण्यात येणार आहे.
नांदेड जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला गती देण्यासाठी जिल्ह्यातील उद्योग व गुंतवणूकदारांनी या परिषदेत सहभागी व्हावे. सहभाग नोंदविणे अथवा परिषदेत सहभागी होण्यासंदर्भात अडचणी असल्यास अमोल इंगळे, सहाय्यक आयुक्त (उद्योग व सेवा), जिल्हा उद्योग केंद्र, उद्योग भवन, सहकारी औद्योगिक वसाहत, शिवाजीनगर, नांदेड येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
*****
No comments:
Post a Comment