Thursday, September 10, 2026

 वृत्त क्रमांक

शेतकऱ्यांनी रेशीम शेतीकडे वळावे

देगलूर येथील कार्यशाळेत डॉ. महेंद्र ढवळे यांचे आवाहन

नांदेड (जिमाका), दि. १० : कमी पावसाच्या परिस्थितीतही चांगले व शाश्वत उत्पन्न मिळवून देणाऱ्या रेशीम शेतीकडे शेतकऱ्यांनी वळावे, असे आवाहन प्रादेशिक रेशीम कार्यालयाचे उपसंचालक डॉ. महेंद्र ढवळे यांनी केले.

‘मेरा रेशीम, मेरा अभिमान’ या उपक्रमांतर्गत सांगवी (क) येथे आयोजित रेशीम शेती कार्यशाळेत ते बोलत होते. पावसाचे प्रमाण कमी होत असताना पारंपरिक शेतीला पर्याय म्हणून रेशीम शेती उपयुक्त ठरू शकते. कमी पाण्यात उत्पादन घेता येत असल्याने शेतकऱ्यांनी या व्यवसायाचा गांभीर्याने विचार करावा, असे डॉ. ढवळे यांनी सांगितले.

जिल्हा रेशीम अधिकारी अशोक वडवळे यांनी रेशीम शेतीच्या आर्थिक फायद्यांची माहिती दिली. योग्य नियोजन व व्यवस्थापनातून प्रति एकर एक ते दोन लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळू शकते, असे त्यांनी सांगितले. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत तुती लागवडीसाठी ४५ हजार रुपये, तर कीटक संगोपन गृहासाठी २ लाख ४३ हजार रुपयांपर्यंत अनुदान उपलब्ध असल्याची माहितीही त्यांनी दिली.

केंद्रीय रेशीम मंडळाच्या वैज्ञानिक बी डॉ. अंतरा गुप्ता यांनी रेशीम शेतीतील तांत्रिक बाबींवर मार्गदर्शन केले. उत्पादनादरम्यान येणाऱ्या अडचणींच्या निराकरणासाठी विभागाकडून आवश्यक सहकार्य करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

तालुका कृषी अधिकारी सोनकांबळे यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत प्राप्त प्रस्तावांना लवकर मान्यता देऊन अनुदान वितरणाची प्रक्रिया गतिमान करण्याचे आश्वासन दिले.

कार्यशाळेस रेशीम कार्यालयाच्या क्षेत्र सहायक कांचन जाधव, अमर सूर्यवंशी, नरोजी कोरके, कृषी विभागातील अधिकारी-कर्मचारी तसेच परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नांदेड जिल्ह्याच्या कर्नाटक सीमेलगतच्या भागातील शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन मार्गदर्शन केल्याबद्दल गावकऱ्यांच्या वतीने मनमत काळे यांनी रेशीम विभागाचे आभार मानले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी कृषी विभागाचे अधिकारी-कर्मचारी आणि गावातील शेतकऱ्यांनी सहकार्य केले.

****





No comments:

Post a Comment

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...