Saturday, June 1, 2019


वर्कशॉप, चैतन्यनगर  परिसरातील 6 तंबाखू विक्रेत्यांवर कार्यवाही
6 हजार 700 रुपयाचा दंड आकारला  
नांदेड दि. 1 :- जिल्हास्तरीय तंबाखू नियंत्रण पथकाने शहरातील वर्कशॉप  व चैतन्यनगर  परिसरात आज अचानक धाडी टाकून कोटपा कायद्यातील तरतुदीनुसार या पथकामार्फत 6 तंबाखू विक्रेत्यांकडून 6 हजार 700 रुपये दंड आकारण्यात आला आहे. तसेच चैतन्यनगर येथील मे ओम पानशॉप येथे ३ हजार २० रुपयेचा गुटखा व पानमसाला प्रतिबंधित अन्न पदर्थाचा साठा आढळून आल्याने त्यांच्या विरुद्ध अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ अंतर्गत कार्यवाही करण्यात आली. 
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कक्ष जिल्हा रुग्णालय नांदेड यांना प्राप्त तक्रारीनुसार जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. पी. कदम व नोडल अधिकारी डॉ. निळकंठ भोसीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही करण्यात आली.
या परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची मोठ्या प्रमाणात विक्री तसेच कोटपा 2003 कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले. या पथकात जिल्हा सल्लागार डॉ. साईप्रसाद शिंदे, सामाजिक कार्यकर्ता बालाजी गायकवाड तथा ,स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप-निरीक्षक नेहरकर  तसेच अन्न व औषध प्रशासनामार्फत अन्न सुरक्षा अधिकारी उमेश कावळे आदी होते.
जिल्ह्यात कोणत्याही ठिकाणी कोटपा 2003 कायद्याचे उल्लंघन करणारे तसेच शैक्षणिक अथवा शासकीय कार्यालयाच्या परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची विक्री होत असल्यास जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष, जिल्हा रुग्णालय, नांदेड येथे तक्रार नोंदवून नांदेड जिल्हा तंबाखू मुक्त करण्याच्या अभियानास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. पी. कदम यांनी केले आहे.
000000

No comments:

Post a Comment

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...