Friday, October 12, 2018


अवसायकांची पॅनेलसाठी अर्ज करण्याचे
विभागीय सहनिबंधकाचे आवाहन
      नांदेड दि. 12 :- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 102 व कलम 110 (अे) अन्वये जिल्ह्यातील अवसायनातील संस्थांचे कामकाजासाठी अवसायकांची नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
अर्जाचे विहित नमुने विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, लातूर विभाग लातूर मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, दूसरा मजला, शिवाजी चौक लातूर यांचे कार्यालयात 15 ते 30 ऑक्टोंबर 2018 या कालावधीत कार्यालयीन वेळेत मिळू शकतील. अर्ज सादर करण्याची अंतीम मुदत दिनांक 30 ऑक्टोंबर 2018 पर्यंत राहील, असे आवाहन श्रीकांत देशमुख विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था लातूर यांनी केले आहे.
अर्ज करण्यास पात्र व्यक्ती पुढील प्रमाणे आहेत. न्यायालयातील निवृत्त न्यायाधीश व सेवानिवृत्त विधी अधिकारी. प्रॅक्टीसिंग ॲडव्होकटस. चार्टर्ड अकौन्टट, कॉस्ट अकौन्टट, कंपनी सेक्रेटरी. राष्ट्रीयकृत बँका, ग्रामीण बँका, भूविकास बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, व्यापारी बँका, नागरी  सहकारी बँका, राज्य सहकारी बँका यांचे सेवेतील व्यवस्थापक दर्जापेक्षा कमीदर्जा नसलेले सेवानिवृत्त अधिकारी. सहकार विभागातील सेवानिवृत्त वर्ग-1, वर्ग-2 दर्जाचे अधिकारी आणि सहकार अधिकारी प्रथम श्रेणी व द्वितीय श्रेणी दर्जाचे कर्मचारी. महसूल विभागातील सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी. कंपनी लिक्विडेटर म्हणून कामकाज केलेले अनुभवी व्यक्ती. सहकारी संस्थेचे लेखापरिक्षण केले असल्याचे 10 वर्षाचे अनुभवी प्रमाणित लेखापरिक्षक असावा.
अर्जदार व्यक्तींनी पुढीलप्रमाणे अर्हता धारण केलेली असावी. अर्जदार व्यक्तीवर कोणत्याही स्वरुपाचे गुन्हे दाखल नसावेत. शासकीय सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी असल्यास त्यांची कोणत्याही प्रकारची खातेनिहाय चौकशी चालू नसावी व सेवेत कोणताही ठपका ठेवलेला नसावा. वर्यामर्यादा 70 वर्षापर्यंत असावी. शारीरीक व मानसिक आरोग्याच्यादृष्टीने सक्षम असावा. प्रॅक्टीसिंग ॲडव्होकेटस् व चार्टर्ड अकौन्टट, कॉस्ट अकौन्टट, कंपनी सेक्रेटरी यांना सहकारी संस्थेचे कामकाजाचा 5 वर्षाचे अनुभव असणे आवश्यक आहे. कोणत्याही सहकारी संस्थेचा थकबाकीदार नसावा किंवा कलम 83 व कलम 88 च्या कार्यवाहीमध्ये जबाबदार धरलेला नसावा (महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 व त्याखालील नियमांतर्गत अपात्र नसावा). सदर व्यक्तीचा सहकार खात्याने काळ्या यादी मध्ये (Black List) समावेश केलेला नसावा. व्यक्ती संबंधीत विभागाच्या विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था कार्यालयाच्या अधिपत्याखाली येणाऱ्या जिल्ह्यातील रहिवासी असावा. (लातूर, उस्मानाबाद, बीड व नांदेड जिल्ह्यातील) सदर व्यक्ती एकावेळी एकाच जिल्ह्यातून अर्ज दाखल करु शकतील.
               प्राप्त अर्जाची छाननी दिनांक 13 नोव्हेंबर 2018 रोजी पूर्ण करुन 17 नोव्हेंबर 2018 पर्यंत प्रारुप नामिका प्रसिध्द करणे व त्यावर हरकती मागवूण निर्णय घेण्यात येईल. हरकतीचा निर्णय करुन 30 नोव्हेंबर 2018 रोजी अंतीम नामीका प्रसिध्द करण्यात येईल. याबाबतची जाहीर सूचना विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था लातूर यांचे कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रसिध्द करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नांदेड या कार्यालयाशी संपर्क साधावा असेही आवाहन  प्रवीण फडणीस जिल्हा उपबिनंधक सहकारी संस्था नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
000000

No comments:

Post a Comment

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...