वृत्त क्रमांक 855
सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाचे विशेष तपासणी अभियान
ग्राहकांनी सणासुदीच्या काळात अन्न पदार्थ परवानाधारक विक्रेत्यांकडूनच खरेदी करावेत
नांदेड दि. 14 ऑगस्ट :- आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना मिठाई, खवा, दुध, दुग्धजन्य पदार्थ व इतर सुरक्षित अन्न पदार्थ उपलब्ध व्हावेत यासाठी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या संकल्पनेतून सण महाराष्ट्राचा संकल्प अन्न सुरक्षेचा ही राज्यव्यापी मोहिम हाती घेण्यात आलेली आहे.
ही मोहिम जनजागृती, प्रचार व अंमलबजावणी या तीन स्तरावर राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत अन्न व औषध प्रशासन, नांदेड कार्यालयाकडून मिठाई विक्रेते, खाद्यतेल रिपॅकर्स यांच्या बैठका घेऊन सुरक्षित अन्न पदार्थाचे उत्पादन व विक्री याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे. यामध्ये कायद्यातील तरतूदीची कटाक्षाने अंमलबजावणी करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. या तपासणी दरम्यान पेढीमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधित विक्रेत्यांवर अन्न सुरक्षा मानके कायदा 2006 नुसार कठोर कारवाई करण्यात येईल याची जाणीव अन्न व्यावसायिकांना करून देण्यात आली.
या मोहिमेची अंमलबजावणी करीत असताना 11 ऑगस्टपासून आजपर्यंत अन्न व औषध प्रशासन कार्यालयामार्फत स्वीट मार्ट, दुध व दुग्धजन्य अन्न पदार्थाच्या विक्री करणाऱ्या आस्थापनाच्या तपासण्या करून खवा, पनीर, पेढा, बर्फी, खाद्यतेल इत्यादी असे एकूण 20 अन्न नमुने विश्लेषणासाठी घेऊन प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. एका पेढीतून पनीर या अन्न पदार्थाचा एकूण 118कि. ग्रॅ. किंमत रूपये 33 हजार 40 रुपयांचा साठा संशयावरून जप्त करण्यात आला आहे.
ग्राहकांनी सणासुदीच्या काळात अन्न पदार्थ खरेदी करताना परवानाधारक विक्रेत्यांकडूनच खरेदी करावी. अन्न पदार्थ खरेदी करतेवेळी अन्न पदार्थांची विधीग्राहयता तपासून घ्यावी. मिठाई व दुग्धजन्य अन्न पदार्थाची साठवणूक योग्य ठिकाणी करून त्याचा वापर लवकर करण्यात येईल याची दक्षता घ्यावी. तसेच अन्न भेसळी सारखा प्रकार होत असल्याचे निदर्शनास आल्यास अन्न व औषध प्रशासन, नांदेड कार्यालयाशी संपर्क साधावा अथवा FoSCoS या ऑनलाईन पोर्टलवर तक्रार नोंदवावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनचे सहायक आयुक्त सं.ना.चट्टे यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment