वृत्त क्रमांक 811
क्रीडांगण व व्यायामशाळा विकासासाठी योजनेसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
६ ते १४ ऑगस्टपर्यंत अर्ज वाटप व प्रस्ताव स्वीकारणार
नांदेड, दि. ५ ऑगस्ट :–राज्यात क्रीडा संस्कृतीचे संवर्धन व प्रचार-प्रसार यासाठी पोषक वातावरण निर्मिती करण्याच्या उद्देशाने सन २०१२ पासून राज्य क्रीडा धोरण राबवले जात आहे. या धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नांदेड यांचेमार्फत शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता क्रीडांगण विकास व व्यायामशाळा विकास योजना अंतर्गत प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.
क्रीडांगण विकास योजनेत एकूण १३ बाबींचा समावेश असून, विविध सुविधा उभारणीसाठी संस्थांना व्यायामशाळा विकास योजनेत व्यायामशाळेचे बांधकाम, अद्ययावत साहित्य खरेदी किंवा खुली जिम उभारणी यासाठी साहित्य/अनुदान देण्यात येणार आहे.
सदर योजनेसाठी विहित नमुन्यातील अर्ज ६ ते १४ ऑगस्ट २०२५ या कालावधीत (सुटीचे दिवस वगळून) जिल्हा क्रीडा संकुल, इनडोअर हॉल, नांदेड येथील क्रीडा अधिकारी कार्यालयात उपलब्ध होतील व तेथेच स्वीकारले जातील.
अर्ज मागविण्याच्या वेळी संस्थेचे दोन्ही नोंदणी प्रमाणपत्रांची सत्यप्रती किंवा संस्थेच्या लेटरहेडवर अर्ज मागणी पत्र सादर करणे आवश्यक आहे. त्यानंतरच अर्ज वितरित करण्यात येतील, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले आहे.
०००००
No comments:
Post a Comment