Thursday, November 6, 2025

वृत्त क्रमांक 1167 

कृषी अधिकारी बदलले तरी भ्रमणध्वनी क्रमांक तोच 

शेतकऱ्यांना संपर्कासाठी कायमस्वरूपी सुविधा; नांदेड जिल्ह्यात ४३९ नवीन सिमकार्डचे वाटप 

नांदेड, दि. 6 नोव्हेंबर : कृषी विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांना कायमस्वरुपी मोबाईल क्रमांक देण्यात आले आहेत. त्यामुळे संबंधित अधिकारी बदलले तरी त्यांचा मोबाईल क्रमांक नव्या अधिकाऱ्याकडे कार्यरत राहणार आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या भागातील कृषी अधिकाऱ्यांशी सातत्यपूर्ण संपर्क ठेवणे सोपे होणार असून विभाग आणि शेतकरी यांच्यातील समन्वय अधिक दृढ होईल. 

महावितरणच्या धर्तीवर, राज्यातील कृषी यंत्रणेतील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी १ नोव्हेंबरपासून हे कायमस्वरुपी मोबाईल क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या योजनेत दर महिन्याला ६० जीबी डेटा, अमर्यादित व्हॉईस कॉल आणि एसएमएसची सुविधा देण्यात आली आहे. 

ही सुविधा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी आणि सहाय्यक कृषी अधिकारी या सर्व पदांसाठी लागू आहे. 

नांदेड जिल्ह्यासाठी कृषी विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी एकूण ४३९ नवीन सिमकार्ड मिळाले असून त्यांचे वाटप तालुका स्तरावर करण्यात आले आहे. या सिमकार्डची सेवा लवकरच वरिष्ठ स्तरावरून सुरु करण्यात येणार आहे. 

कृषी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे एकच कायमस्वरूपी क्रमांक असल्याने शेतकऱ्यांना शेतीविषयक माहिती, मार्गदर्शन, आधुनिक तंत्रज्ञान, कीडरोग व्यवस्थापन आणि विविध योजनांबाबत सल्ला तत्काळ मिळण्यास मदत होईल. तसेच विभागातील अंतर्गत संपर्क व्यवस्था अधिक सुकर होईल व क्षेत्रीय कामकाजात डिजिटल संवाद सशक्त होणार आहे. या उपक्रमाचा प्रमुख उद्देश शेतकऱ्यांशी थेट संवाद वाढवून कृषी सेवा अधिक परिणामकारक करणे हा आहे.

00000

No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक 1277   जिल्हा माहिती कार्यालयातील रद्दी विक्रीसाठी उपलब्ध   नांदेड (जिमाका) ,  दि .   5 :-   जिल्हा माहिती कार्यालय ,   नांदे...